लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoU) आणि लेटर ऑफ कम्फर्ट (LoC) यांचा व्यापारामध्ये आयातीसाठी होणारा वापर ताबडतोब बंद करण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
त्यामुळे उद्योगांना अर्थपुरवठा करण्यासाठी यापुढे लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर ऑफ कम्फर्ट देता येणार नाही.
पंजाब नॅशनल बँकेमधला नीरव मोदी व मेहूल चोक्सींचा १३ हजार कोटी रुपयांचा घोटाऴा या एलओयू व एलओसीच्या माध्यमातून झाला होता.
त्यामुळे सध्याच्या मार्गदर्शक प्रणालींचा अभ्यास करून भारतामध्ये मालाची आयात करण्यासाठी उद्योगधंदे वापरत असलेली ही सुविधा बंद करण्यात येत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
लेटर ऑफ क्रेडिट व बँक गॅरंटी या दोन प्रकारांचा वापर मात्र मालाची आयात करण्यासाठी ठरवलेल्या निकषांच्या आत राहून करता येईल असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून नीरव मोदी व मेहूल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेचे एलओयू वापरले व विदेशामध्ये अनेक बँकांकडून १३ हजार कोटी रुपये लुटले असा आरोप आहे.
हा घोटाळा उघडकीस यायच्या आधीच कुटुंबियांसह नीरव मोदी फरार झाला असून तो कुठे आहे याचाही पत्ता लागलेला नाही.
सीबीआय तसेच सक्तवसुली संचालनालय या प्रकरणाचा तपास करत असून पीएनबीच्या आजी माजी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
शस्त्रास्त्र आयातीमध्ये भारत पहिल्या स्थानी
‘इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर्स’ या संस्थेने जगभरातील देशांकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
त्यानुसार २०१३ ते २०१७ या कालावधीत शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या स्थानी आहे.
जगातील शस्त्रास्त्रांच्या एकूण आयातीपैकी १२ टक्के आयात एकटा भारत करतो.
यानुसार २००८ ते २०१२च्या तुलनेत २०१३ ते २०१७ या कालावधीत भारताच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये २४ टक्के वाढ झाली आहे.
भारताच्या पाठोपाठ सौदी अरेबिया दुसऱ्या स्थानी आहे. तर इजिप्त, संयुक्त अरब अमिरात हे देश अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
चीन, ऑस्ट्रेलिया हे देश पाचव्या व सहाव्या स्थानी आहे. तर अल्जेरिया सातव्या, इराक आठव्या आणि पाकिस्तान नवव्या स्थानी आहे.
भारत जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश असून भारतातील ६२ टक्के शस्त्रास्त्रे हे रशियाकडून येतात. तर अमेरिकेकडून १५ टक्के आणि इस्रायलकडून ११ टक्के शस्त्रास्त्रांची खरेदी करण्यात आली आहे.
रशिया आणि इस्रायलकडून भारत नेहमीच शस्त्रास्त्रांची खरेदी करत आला असला तरी अमेरिकेकडून आयातीचे प्रमाणही वाढले आहे.
चीनला शह देण्यासाठी अमेरिका-भारतामधील संबंध सुधारत असून संरक्षण क्षेत्रात अमेरिकेचे योगदान वाढल्याचे सांगितले जाते.
देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रांसाठी भारत अद्याप दुसऱ्या देशावर अवलंबून आहे.
‘मेक इन इंडिया’ मोहीमेअंतर्गत भारताला शस्त्रास्त्रनिर्मितीत अपेक्षित यश न आल्याने, भारताला शस्त्रास्त्रांसाठी अजूनही दुसऱ्यांवर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे.
शस्त्रे निर्यात करणाऱ्या जागतिक देशाच्या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिका आहे. रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि चीन अनुक्रमे दोन ते पाच या स्थानावर आहे.
चीनकडून सर्वात जास्त शस्त्रे आयात करणारा देश हा पाकिस्तान आहे. चीनने ३५ टक्के शस्त्रे पाकिस्तानला निर्यात केली आहेत.
आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारत अव्वल
युवा खेळाडूंच्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर भारताने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह पदक तालिकेत प्रथमच अव्वल स्थान मिळवले आहे.
मेक्सिकोत झालेल्या या स्पर्धेत भारताने चार सुवर्णपदकांबरोबरच एक रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत भारताच्या शहझार रिझवी, मनू भाकेर, अखिल शेरॉन व ओमप्रकाश मिथार्वाल यांनी सुवर्णपदक जिंकले.
पदक तालिकेत अमेरिकेने ३ सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्यपदकांसह दुसरे स्थान मिळवले. चीनला २ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य अशा ५ पदकांसह तिसरे स्थान मिळाले.
उत्तर प्रदेशातील सर्वात मोठय़ा सौरप्रकल्पाचे लोकार्पण
उत्तर प्रदेशातील सर्वात मोठय़ा सौरप्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पणपंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या हस्ते करण्यात आले.
७५ मेगावॉटचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात ५०० कोटी रुपये खर्च झाले असून फ्रान्सच्या एन्जी या कंपनीने तो उभारला आहे.
विंध्य पर्वतराजीत दादर कलान खेडय़ातील उंचावरील भागात हा प्रकल्प असून त्याला १,१८,६०० सौर पट्टय़ा आहेत. एकूण ३८० एकर भागात तो पसरलेला आहे.
वार्षिक १५.६ कोटी युनिट विजेची निर्मिती त्यात होणार असून महिन्याला १.३० कोटी युनिट वीज निर्मिती होईल. यातील वीज उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये असलेल्या जिगना उपकेंद्रात सोडली जाईल.
जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी जास्तीत जास्त स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
आयएसए म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय गुडगाव येथे आहे. पॅरिस जाहीरनाम्यानंतर त्याची स्थापना करण्यात आली होती.
आयएसएची संकल्पना मोदी यांची असून त्यासाठी १२१ देश एकत्र आले आहेत. भारत त्यात २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीज निर्मिती करणार आहे.
सध्याच्या शाश्वत वीजनिर्मिती क्षमतेच्या हे प्रमाण दुप्पट असणार आहे. त्यामुळे भारत युरोपीय समुदायाला मागे टाकील.
भारताला २०१८ ते २०२२ दरम्यान १७५ गिगावॅटच्या वीज निर्मितीसाठी ८३ अब्ज डॉलर्सचा निधी लागणार आहे. सध्या भारताची शाश्वत ऊर्जा क्षमता ६३ गिगावॅट आहे.
सौर व पवन ऊर्जेचे दर युनिटला २.४४ रुपये व ३.४६ रुपये इतके कमी आहेत, जगात हे दर सर्वात नीचांकी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदी सीआयए प्रमुख माईक पोम्पिओ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करत प्रमुख सहकारी परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांना पदावरून हटवले आहे.
टिलरसन यांच्या जागी सीआयएचे प्रमुख माईक पोम्पिओ यांना नियुक्त केले आहे. ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
टिलरसन एक्सॉन मोबिल या कंपनीचे माजी सीईओ असून, त्यांनी १ फेब्रुवारी २०१७ रोजी परराष्ट्रमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
रेक्स यांनी पदभार घेतल्यापासून ट्रम्प आणित्यांच्यात मतभेद सुरू झाले होते. त्याचीच परिणती म्हणून त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे.
पोम्पेओ यांची परराष्ट्रमंत्रिपदी नियुक्ती केल्यानंतर, सीआयएच्या उपसंचालिका जिना हास्पेल यांची संचालक पदावर वर्णी लागली असून, सीआयएच्या संचालक पदावर नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत.
भारताच्या पूजा वस्त्रकारच्या नावे विश्वविक्रमाची नोंद
भारतीय महिला क्रिकेट संघातील ऑल राऊंडर पूजा वस्त्रकार हिने नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी करत ५६ चेंडूंमध्ये ५१ धावा करत विश्वविक्रमाची नोंद केली.
महिला क्रिकेटच्या इतिहासात नवव्या स्थानावर येऊन फलंदाजी करत अर्धशतक झळकावणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने हा विक्रम करताना न्यूझीलंडच्या ल्यूसी दूलान हिचा विक्रम मोडित काढला.
ल्यूसीने २००९मध्ये इंग्लंडविरोधात खेळण्यात आलेल्या सामन्यात नवव्या स्थानावर येऊन फलंदाजी करत सर्वाधिक ४८ धावा केल्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा