मेक्सिकोत सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या शहझार रिझवी आणि मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अनुक्रमे पुरुष व महिला गटात प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.
तर मनूने विश्वचषक अंतिम फेरीची विजेती अॅलेझांड्रा जेव्हेला हिला पराभूत करताना २३७.५ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.
अकरावीमध्ये शिकणाऱ्या मनूने २०१८मध्ये ब्यूनस आयर्स येथे होणाऱ्या युवा ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे.
मनूने जपानमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकले होते. गतवर्षी मनूने दोन राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली.
रवी कुमारने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक मिळवताना २२६.४ गुणांची नोंद केली.
महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये मेहुली घोषने २२८.४ गुण नोंदवत कांस्यपदक मिळवले.
जितू रायने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २१९ गुणांसह कांस्य जिंकले.
जगामध्ये भारतीय लष्कर चौथ्या स्थानावर
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने २०१७मध्ये जगातील विविध देशांच्या सैन्य क्षमतेचे सर्वेक्षण करुन या देशांची क्षमतेनुसार क्रमवारी एका अहवालात प्रसिध्द केली आहे.
या १३३ देशांच्या यादीमध्ये सैन्य दलांमध्ये भारतीय लष्कर चौथ्या स्थानावर आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर महासत्ता असलेला अमेरिका आहे, तर रशिया दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तान या ग्लोबल फायर पावरच्या यादीत १३व्या स्थानावर आहे. मागच्याच वर्षी पाकिस्तानने या यादीत पहिल्या १५मध्ये प्रवेश केला होता.
पाकिस्तानशी तुलना करता भारत जवळपास सर्वच आघाडयांवर सरस असल्याचे या सर्वेक्षणातून समोर येत आहे.
फ्रान्स, यूके, जापान, टर्की आणि जर्मनी हे देश सुद्धा पहिल्या दहामध्ये स्थान टिकवून आहेत.
चीनने रशियाला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले आहे. चीनकडे आजच्या घडीला रशियापेक्षा जास्त फायटर विमाने आणि जहाजे आहेत.
भौगोलिक स्थिती, लष्कराकडे असणारे स्त्रोत, सैनिकांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञान, सैनिकांची संख्या अशा एकूण ५० निकषांचा आढावा घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
अपंगांचे तारणहार जावेद अबिदी यांचे निधन
अपंगांच्या हक्कांसाठी लढणारे आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते जावेद अबिदी यांचे वयाच्या ५३व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ४ मार्च रोजी निधन झाले.
अपंगांच्या हक्कांसाठी झगडणारा भारताचा वैश्विक चेहरा म्हणूनही जावेद अबिदी यांची ओळख होती.
उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये जन्मलेल्या जावेद अबिदी यांना स्पिनिया बिफिडा झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे वयाच्या १५ वर्षापासूनच त्यांना व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला.
अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘डिसअॅबिलिटी राइट ग्रुप’ (डिआरजी)ची स्थापना केली होती.
‘राइट्स फॉर पर्सन विथ डिसअॅबिलिटी बिल २०१४’ हे विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर अपंगांचा कँडल मार्च काढला होता.
ताजमहालपासून अनेक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी विख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांना व्हीलचेअरवरून भेटी देता याव्यात, यासाठी तेथे रॅम्प बांधण्याचा आग्रह अबिदींनीच धरला होता.
१९९३मध्ये सोनिया गांधी यांच्या आग्रहास्तव त्यांनी राजीव गांधी फाऊंडेशनच्या अपंग विकास विभागाची जबाबदारी स्वीकारली.
‘इंटरनॅशनल डिसॅबिलिटी अलायन्स’च्या उपाध्यक्षपदी २०१३ मध्ये अबिदी यांची निवड झाली.
जनगणनेत अपंगांना स्वतंत्र प्रवर्ग, अपंग कामकाज मंत्रालय या महत्त्वाच्या निर्णयांना त्यांची अपंगांच्या हक्कांसाठी चळवळ कारणीभूत होती.
अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. म्हणूनच त्यांना अपंगांचे तारणहार म्हणून ओळखले जायचे.
चीनकडून सैनिकांच्या संख्येत कपात
चीनने आपल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) संख्येत ३ लाखांनी कपात करत पीएलएमधील सैनिकांची संख्या आता २० लाखांवर आणली आहे.
चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी नॅशनल पीपल्स काँग्रेसला सोपवलेल्या आपल्या वार्षिक अहवालात याचा खुलासा केला आहे.
आधुनिक पद्धतीने युद्ध लढून त्यात विजय मिळविणे व जगातील सर्वांत ताकदवान सैन्य बनवणे हा सैनिकांची संख्या घटवण्यामागचा उद्देश आहे.
पीएलएमध्ये यापूर्वी दोनवेळा सैन्यदलात कपात करण्यात आली होती. यापूर्वी १९८०पर्यंत चिनी सैन्यदलात ४५ लाख सैनिक होते.
१९८५मध्ये पहिल्यांदा कपात करत सैनिकांची संख्या ३० लाखांवर आणण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा सैन्य संख्या घटवत २३ लाखांपर्यंत आणण्यात आली. आता चिनी सैन्यदलात २० लाख सैनिक राहिले आहेत.
सध्या चीनकडे जगातील सर्वांत मोठे सैन्यदल आहे. चीन आपल्या सैनिकांची संख्या कमी करत असली तरी ते आधुनिकतेचा स्वीकार करत आहेत.
ते आता सैनिकांची संख्या कमी करून खर्चात कपात करत आहेत. याचाच उपयोग ते आधुनिक आणि मजबूत सैन्यदलासाठी करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा