साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचे वयाच्या ९२व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
मुंबईतील जोगेश्वरी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. फेणे यांनी अनेक अडथळ्यांवर मात करत साहित्य विश्वास स्वतःचे स्थान निर्माण केले.
‘काना आणि मात्रा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९७२मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर वयाच्या ९१व्या वर्षापर्यंत ते लेखन करत होते.
वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वयाच्या ९१व्या वर्षी त्यांची ‘कारवारी माती’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
संवेदनशील लेखक अशी ओळख असलेल्या वसंत नरहर फेणे यांनी काही काळ राष्ट्र सेवादलातही काम केले.
नोकरीच्या निमित्ताने कोल्हापूर, विजापूर, पुणे, नाशिक या ठिकाणी त्यांना फिरावे लागले. भटकंतीच्या काळातील अनुभवांमधूनच त्यांच्यातला लेखक प्रगल्भ बनत गेला.
कथा, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद, कादंबरी अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले.
त्यांनी सर्वसामान्य माणसाचे अनुभवविश्व प्रत्ययकारक रीतीने आपल्या कथां-कादंबऱ्यांतून उलगडले. साडेपाच दशकभरांच्या काळात सुमारे साठ कथा व दहा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
हे झाड जगावेगळे, ज्याचा त्याचा क्रूस, मावळतीचे मृदगंध, ध्वज, निर्वासित नाती, पहिला अध्याय, विश्वंभरे बोलविले, शतकान्तिका, सहस्रचंद्रदर्शन अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
अमेरिकी विचारवंत सिडने हुक याच्या ‘स्टडीज इन कम्युनिझम’ या पुस्तकाचा ‘साम्यवाद-एक अभ्यास’ हा अनुवाद फेणे यांनी केला होता.
वसंत फेणे यांच्या ‘काना आणि मात्रा’ कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङमय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर ‘विश्वंभर बोलविले’ कादंबरीसाठी त्यांना ना. सी. फडके पुरस्कार मिळाला होता.
एकूण लेखकीय कारकीर्दीसाठी मुंबईतील ‘शब्द : द बुक गॅलरी’च्या वतीने देण्यात येणाऱ्या भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कारानेही वसंत फेणे यांचा सन्मान करण्यात आला होता.
त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
मुंबई व दिल्ली जगातील प्रथम क्रमांकाचे विमानतळ
मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील प्रथम क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. मुंबईसोबतच दिल्ली विमानतळानेही हा मान पटकावला आहे.
एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनल (ACI)ने विमानतळ सेवेच्या गुणवत्तेवरून दिलेल्या क्रमवारीनुसार हा मान मुंबई व दिल्ली विमानतळाला मिळाला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दरवर्षी ४० दशलक्ष प्रवाशांचा राबता असतो. या निकषावर मुंबई आणि दिल्ली विमानतळाला हा मान मिळाला आहे.
एअरपोर्टचा अॅक्सेस, चेक-इन, सुरक्षा स्क्रीनींग, विश्रामगृह, सामानाची व्यवस्था, रेस्टॉरंट आदी ३४ निकषांवर जागतिक पातळीवर हे सर्वेक्षण करण्यात आले.
त्या खालोखाल ५ ते १५ दशलक्ष प्रवाशांना सेवा देणाऱ्या हैदराबाद विमानतळाचा क्रमांक आहे.
दिल्ली आणि हैदराबाद विमानतळ जीएमआर समूह तर मुंबई विमानतळ जीव्हीके समूह चालवतात.
अॅक्सिस बँक व आयओबीला रिझर्व्ह बँकेकडून दंड
रिझर्व्ह बँकेने अनुत्पादक भांडवलाच्या (एनपीए) वर्गीकरण नियमांचा भंग केल्याबद्दल अॅक्सिस बँकेला ३ कोटींचा तर, केवायसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेला (आयओबी) २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
३१ मार्च २०१६च्या वित्तीय स्थितीच्या आधारे अॅक्सिस बँकेचे वैधानिक परीक्षण करण्यात आले. बँकेने एनपीएविषयक अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या ‘इन्कम रिकग्निशन अँड अॅसेट क्लासिफिकेशन’ नियमांचे अॅक्सिस बँकेने पालन केलेले नाही.
सरकारी मालकीच्या इंडियन ओव्हरसीज बँकेने केवायसी नियमांचे पालन न केल्याचे एका परीक्षणात आढळून आले आहे.
या बँकेच्या व्यवहारांत इतरही काही अनियमिमता आढळून आल्या आहेत. त्यामुळे बँकेला २ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांवरील निगराणी वाढविली आहे.
बँकांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यास घोटाळ्यांना आळा घालणे शक्य होईल, असे रिझर्व्ह बँकेला वाटते.
मनू भाकेरचा सुवर्णपदकाचा डबल धमाका
आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात ओम प्रकाश मिथरवासह दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे.
यापूर्वी मनूने याच स्पर्धेच्या महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
मेक्सिको येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मनूने आपल्या पदार्पणातच वरिष्ठ गटात दोन सुवर्णपदक जिंकली आहेत.
भारतीय नेमबाजीच्या इतिहासात सर्वांत कमी वयात (१६ वर्षे) दोन सुवर्णपदक आपल्या नावे करणारी मनू पहिली नेमबाज ठरली आहे.
या कामगिरीमुळे मनू ऑक्टोबरमध्ये ब्युनस येथे होणाऱ्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली पहिली युवा नेमबाज आहे.
दुसरीकडे दीपक कुमार आणि मेहूली घोष या भारतीय जोडीने चमकदार कामगिरी करताना १० मीटर रायफल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा