चालू घडामोडी : १८ व १९ मार्च

कर्नाटक सरकार लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणार

 • कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरण लक्षात घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
 • लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची केंद्र सरकारकडे लिखित मागणी करण्यात येईल असा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
 • कर्नाटक राज्याच्या अल्पसंख्य आयोगाने या दर्जा देण्याच्या विषयाबाबत सात सदस्यांची समिती स्थापन केली होती. त्या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एच एन नागमोहन दास हे होते.
 • कर्नाटक अल्पसंख्याक कायद्याच्या कलम २ (डी) अंतर्गत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्याचा विचार व्हावा असे नागामोहन दास समितीने म्हटले होते.
 • नागामोहन दास समितीने दिलेल्या या अहवालाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला.
 • कर्नाटकच्या एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के लोकसंख्या लिंगायत असून भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे माजी मुख्यमंत्री असणारे बी एस येडीयुरप्पा देखिल लिंगायत आहेत. 
 • हा समाज १२व्या शतकातील समाज सुधारक बसवेश्वरांचा पाईक आहे. गेल्या काही वर्षांपासून लिंगायतांनी वेगळ्या धर्माचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
 • लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा मिळाला तर कलम २५, २८, २९ आणि ३० अंतर्गत फायदे मिळतील.

लालूप्रसाद चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही दोषी

 • राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी रांची न्यायालयाने चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही दोषी ठरवले. न्यायालयाने यापूर्वी चारा घोटाळ्याच्या तीन प्रकरणांमध्ये लालूंना दोषी ठरवले होते.
 • लालूप्रसाद यांच्यावर डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६दरम्यान झारखंडमधील दुमका कोषागारमधून १३.१३ कोटी रुपये बेकायदेशीररित्या काढल्याचा आरोप आहे.
 • या सुनावणीदरम्यान न्यायालयाने १२ जणांना दोषी ठरवले तर १९ जणांची निर्दोष मुक्तता केली. 
 • चारा घोटाळ्याच्या पहिल्या प्रकरणात लालूंना २०१३मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
 • दुसऱ्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना दोषी ठरवत २३ डिसेंबर २०१७ रोजी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली.
 • याशिवाय चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणात न्यायालयाने २४ जानेवारी २०१८ ला लालूंना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. लालूप्रसाद यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
 काय आहे चारा घोटाळा? 
 • पूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता.
 • प्रत्यक्षात चाऱ्याच्या पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता.
 • या घोटाळ्याच्या एकूण ३३ खटल्यांपैकी ६ खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. सहापैकी चार खटल्यात लालूंवरील दोष सिद्ध झाले आहेत.
 • २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना ११ वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली.

विदर्भाने प्रथमच इराणी करंडकावर नाव कोरले

 • प्रथमच रणजी करंडक जिंकणाऱ्या विदर्भाच्या संघाने इराणी करंडकाच्या रूपाने स्थानिक क्रिकेट मोसमातील दुसरे जेतेपद पटकावले.
 • नागपूरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या लढतीत विदर्भाने शेष भारतावर मात करून प्रथमच इराणी करंडकावर नाव कोरले.
 • शेष भारतविरुद्धची लढत अखेरच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत संपली, पण पहिल्या डावातील आघाडीच्या आधारवर विदर्भाने चषकावर नाव कोरले. 
 • विदर्भातर्फे २८६ धावांची खेळी करणारा अनुभवी फलंदाज वसीम जाफर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
 • विदर्भाने जाफरच्या द्विशतकी खेळीव्यतिरिक्त गणेश सतीश (१२०) व अपूर्व वानखेडे (नाबाद १५७) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पल्यिा डावात ७ बाद ८०० धावांची दमदार मजल मारली होती.
 • प्रत्युत्तरात शेष भारत संघाचा पहिला डाव ३९० धावांत संपुष्टात आला. विदर्भाने पहिल्या डावात ४१० धावांची निर्णायक आघाडी घेतली. 

रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा व्लादिमीर पुतिन

 • रशियामध्ये अध्यक्ष निवडीसाठी पार पडलेल्या मतदानात रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.
 • गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या पुतिन यांनी ७५.९ टक्के मते मिळवत विरोधकांवर एकतर्फी विजय मिळवला.
 • त्यामुळे आता पुढील आणखी ६ वर्षांसाठी ते रशियाचे अध्यक्ष असतील. २०२४पर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदी राहणार आहेत. 
 • २०२४मध्ये जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर दीर्घकाळ रशियाचे नेतृत्व केल्याचा मान पुतीन यांना मिळणार आहे. २०००पासून ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान आहेत.
 • गेल्या २० वर्षांमध्ये पुतीन यांनी आर्थिक आघाडीसह लष्कराचा विस्तार आणि परराष्ट्र धोरणांमध्येही ठसा उमटविला होता. देशांतर्गत राजकारणामध्येही त्यांनी पकड निर्माण केली आहे.
 • हुकुमशाह म्हणून ओळख असलेल्या पुतिन यांची कार्यशैली आणि नेतृत्व याला रशियातील जनतेने कौल दिला आहे.

मल्याळम लेखक एम. सुकुमारन यांचे निधन

 • सुप्रसिद्ध मल्याळम लेखक एम सुकुमारन यांचे १६ मार्च २०१८ रोजी निधन झाले आहे. ते ७६ वर्षांचे होते.
 • कट्टर कम्युनिस्ट असूनही त्यांना माकपमधील उणिवा दिसल्या व त्या उणिवा दाखवण्यासाठी त्यांनी १९७९ मध्ये ‘शेषक्रिया’ ही कादंबरी लिहिली होती.
 • त्यांना ‘मरिचितिल्लावरुदे समराकांगल’ या पुस्तकासाठी १९७६मध्ये व ‘जनीथाकम’ पुस्तकासाठी १९९४ मध्ये असा दोनदा केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
 • त्यांना ‘चुवना चिहनांगल’ या लघुकथा संग्रहासाठी २००६मध्ये राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
 • त्यांच्या ‘संगागनाम’ आणि ‘उनर्थपट्टू’ या लघुकथांवर चित्रपट निर्मिती करण्यात आलेली आहे.

गिलानी यांचा हुर्रियत कॉन्फरन्स पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

 • काश्मीरमधील दहशतवाद्यांना फंड पुरविल्याप्रकरणी एनआयएच्या रडारवर आलेले फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी अखेर तहरीक-ए- हुर्रियत कॉन्फरन्स पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
 • २००१मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून सलग १८ वर्ष त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते मुहम्मद अशरफ सेहराई यांची हुर्रियतचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
 • टेरर फंडिंग प्रकरणात नाव आल्यानंतर तपास यंत्रणेच्या कारवाईच्या भीतीने गिलानी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
 • गिलानी यांच्या कुटुंबीयांकडे एकूण १४ मालमत्ता असून त्याची किंमत १५० कोटी एवढी आहे.
 • त्यांचा मोठा मुलगा सर्जन असून दुसरा मुलगा जम्मू-कश्मीर सरकारमध्ये नोकरीला आहे. टेरर फंडिंग प्रकरणी तपास यंत्रणेने गिलानी यांच्या दोन्ही मुलांची चौकशी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा