भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या लक्ष्यवेधी कारवाईसाठी भारतीय लष्कराने ‘इस्रो’च्या कार्टोसॅट मालिकेतील ‘२सी’ या उपग्रहाची मदत घेतली.
या कारवाईत ‘आकाशातील नेत्र’ मानल्या जाणाऱ्या कार्टोसॅट उपग्रहाद्वारे मिळालेल्या हाय-रेझोल्युशन प्रतिमांचा लष्कराला खूपच फायदा झाला.
एखाद्या मोठ्या ‘ऑपरेशन’साठी कार्टोसॅट उपग्रहाची मदत घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे.
४ तास चालेल्या कारवाईत भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील सात दहशतवादी तळ उद्धवस्त करुन ३८ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
सिंधुदुर्गला स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
स्वच्छता मोहिमेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे महापालिका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत.
दिल्लीत आज झालेल्या इंडोसॅन (इंडिया सॅनिटेशन कॉन्फरन्स) या स्वच्छता परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री तसेच उपस्थित सर्व मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ भारतासाठी कटिबद्धता दर्शविणाऱ्या जाहीरनाम्यावर सह्या केल्या.
‘इंडोसॅन’मध्ये ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांनीही अन्य एका जाहीरनाम्यावर सह्या केल्या.
या वेळी स्वच्छता मोहिमेसाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ११ संस्था व संघटनांना गौरविण्यात आले.
अरूंधती भट्टाचार्य यांना एसबीआय अध्यक्षपदी मुदतवाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अध्यक्षाअरूंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
एसबीआयच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर कार्यकाळ वाढविण्यात आलेल्या अरुंधती भट्टाचार्य या पहिल्या अध्यक्षा आहेत.
यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही अध्यक्षांना मुदतीनंतर कार्यकाळ वाढवून मिळालेला नाही.
६ ऑक्टोबर २०१६ रोजी भट्टाचार्य यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र आता ६ ऑक्टोबर २०१७पर्यंत त्या एसबीआयच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळतील.
जागतिक पातळीवरील धोरणानुसार स्टेट बँकेमध्ये सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
या विलीनीकरणाची जबाबदारी सुरळीत पार पाडावी, म्हणून सरकारकडून अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ वाढविण्यात आल्याची शक्यता आहे.
आयडीएस योजनेमुळे ६५,२५० कोटी रुपयांचा काळा पैसा उघड
केंद्र सरकारच्या प्राप्ती जाहीर योजनेंतर्गत (आयडीएस) तब्बल ६५,२५० कोटी रुपयांचा काळा पैसा उघड झाला आहे.
एकूण ६४,२७५ लोकांनी हा पैसा उघड केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने प्राप्ती जाहीर योजना १ जूनला सुरु केली होती. ही योजना ३० सप्टेंबर २०१६च्या मध्यरात्री संपली.
या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेंतर्गत काळा पैसा उघड करणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जाणार आहेत.
तसेच त्यांना आपल्या उत्पन्नावर एकूण ४५ टक्के अधिभार भरावा लागला आहे. ही रक्कम सप्टेंबर २०१७पर्यंत भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
यातून मिळणाऱ्या कर उत्पन्नामुळे केंद्राला अर्थसंकल्पीय तूट भरुन काढण्यास मदत होणार आहे.
या योजेनेंतर्गत हैदराबाद शहरातून सर्वाधिक १३,००० कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर करण्यात आले.
त्याखालोखाल मुंबईत ८,५०० कोटी, दिल्ली ६,००० कोटी, कोलकातामध्ये ४,००० कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर झाले.
प्रतापराव पवार एमआरयूसीच्या संचालकपदी
‘सकाळ’ वृत्तपत्राचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या ‘मीडिया रिसर्च यूझर्स काउन्सिल’ (एमआरयूसी) या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच देशातील वृत्तपत्रांच्या इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) या शिखर संघटनेच्या कार्यकारिणीवरही पवार यांची फेरनिवड झाली आहे.
एमआरयूसी गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रातील विविध पैलूंवर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करत आहे.
इंडियन रीडरशिप सर्व्हे (आयआरएस) हे भारतातल्या वृत्तपत्र वाचकांचे सर्वांत मोठे आणि सर्वांत विश्वासार्ह सर्वेक्षण एमआरयूसीच्या वतीने केले जाते.
वृत्तपत्रांचे वाचक, त्यांचे आर्थिक गट, बदलत्या अपेक्षा, सवयी, बदलते तंत्रज्ञान यांबद्दल सातत्याने सर्वेक्षण करून प्रकाशक तसेच जाहिरातदारांना योग्य माहिती एमआरयूसीकडून मिळत असते.
माध्यम क्षेत्रातील बदलांचा वेळीच अंदाज घेऊन भविष्यकालीन धोरणांचा विचार करण्यासाठी एमआरयूसीच्या सदस्यांना या सर्वेक्षणांचा तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या अभ्यासांचा फायदा होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा