तामिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी अण्णाद्रमुकचे नवनिर्वाचित नेते ई के पलानीस्वामी यांना १६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये सुरू असलेला राजकीय गोंधळ तूर्तास संपुष्टात आला असला तरीही, येत्या १५ दिवसांत पलानीस्वामी यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
१२४ आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र पलानीस्वामी यांनी दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते.
यावेळी पलानीस्वामी यांच्यासह त्यांच्या ३१ सदस्यीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही राज्यपालांनी शपथ दिली.
पलानीस्वामी हे व्ही शशिकला यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे आगामी काळात अण्णाद्रमुकची सूत्रे ही शशिकला यांच्याच हातात राहणार आहेत.
आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत १४३व्या क्रमांकावर
अमेरिकेच्या ‘द हेरिटेज फाऊंडेशन’कडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारत आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत जगात १४३व्या क्रमांकावर असल्याचे समोर आहे.
मागील वर्षभरात आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची पिछेहाट झाली असून, याबाबतीत पाकिस्ताननेदेखील भारताला मागे टाकले आहे.
द हेरिटेज फाऊंडेशनने जाहीर केलेल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या निर्देशांकानुसार पाकिस्तानसह दक्षिण आशियातील अनेक देश भारतापेक्षा पुढे आहेत.
या संस्थेने भारताला ५२.६ गुण दिले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत भारताला ३.१ गुण कमी मिळाले आहेत. मागील वर्षात भारत आर्थिक स्वातंत्र्याच्या यादीत १२३व्या क्रमांकावर होता.
आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत हाँगकाँग, सिंगापूर आणि न्यूझीलंड या देशांनी अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे.
भारताचे शेजारी देश भूटान (१०७), श्रीलंका (११२), नेपाळ (१२५), बांगलादेश (१२८), पाकिस्तान (१४१) या यादीत भारतापेक्षा पुढे आहेत.
चीनने गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.४ अधिक गुणांची कमाई करत १११वे स्थान पटकावले आहे. या यादीत अमेरिका ७५.१ गुणांसह १७व्या स्थानी आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी भेटवस्तू स्वीकारणे बेकायदा
सरकारी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी आपल्या उत्पन्नाचा भाग म्हणून भेटवस्तू दाखवणे यापुढे बेकायदा ठरणार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
जयललिता यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
एखाद्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळाली आहे असे दाखवून सरकारी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आपली भ्रष्ट संपत्ती लपवू शकतात. त्यामुळे हा निर्णय महत्वपूर्ण आहे.
भारतीय दंडविधानाच्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यामधील १६१ ते १६५अ या कलमांनुसार नागरी सेवेतील अधिकाऱ्यांनी भेटवस्तू स्वीकारणे बेकायदा आहे.
एखाद्या ज्ञात व्यक्तीने लोकसेवेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला भेटवस्तू दिली तर त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे.
परंतु केवळ नोंद ठेवल्यामुळे किंवा भेटवस्तूवरील कर भरल्यामुळे अशा प्रकारच्या भेटवस्तू घेणे हे कायदेशीर होत नाही असे न्यायालयाने सांगितले.
उसेन बोल्टला चौथ्यांदा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार
वेगाचा बादशाह उसेन बोल्टने विक्रमी चौथ्यांदा लॉरेस जागतिक पुरस्कार सोहळ्यात वर्षातील ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कार पटकावला.
क्रीडा विश्वातील ऑस्कर मानला जाणारा हा पुरस्कार याआधी बोल्टने २००९, २०१० आणि २०१३साली मिळवला आहे.
यासह बोल्टने रॉजर फेडरर, सेरेना विलियम्स आणि केली स्लेटर या दिग्गज खेळाडूंच्या विक्रमाशी बरोबरी करत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लेब्रोन जेम्स या स्टार खेळाडूंना मागे टाकले आहे.
यावेळी जिमनॅस्ट सिमोन बाइल्स हिने महिला गटात वर्षातील ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कार मिळवला. तर अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकल फेल्प्सला ‘वर्षातील सर्वोत्तम पुनरागमन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा