चालू घडामोडी : २१ फेब्रुवारी

लाचखोरीप्रकरणी ईडीच्या माजी सहसंचालकांना अटक

  • आयपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणातील आरोपींकडून लाच घेतल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे माजी सहसंचालक जे पी सिंह यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे.
  • सुरतमध्ये २०१५-१६ या कालावधीत हवाला आणि आयपीएलमधील सट्टेबाजीचे रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरु होती.
  • याप्रकरणातील आरोपींकडून ईडीचे माजी सहसंचालक जे पी सिंह यांनी लाच घेतल्याचा आरोप होता. सीबीआयने जे पी सिंह, त्याचे सहकारी संजयकुमार, विमल अग्रवाल आणि चंद्रेश पटेल या तिघांना अटक केली आहे.
  • सिंह यांच्या लाचखोरीप्रकरणी ईडीनेच तक्रार दाखल केली होती. यापूर्वीही सिंह यांच्यावर लाच मागितल्याचा तसेच छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • जे. पी. सिंह हे भारतीय महसूल सेवेच्या २०००च्या बॅचचे अधिकारी असून सध्या ते सीमा व उत्पादन शुल्क विभागात आयुक्त म्हणून कार्यरत होते.

नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी शुरहोझेलाई लिझित्सू

  • नागालँडच्या मुख्यमंत्रिपदासाठी सहमतीचे उमेदवार म्हणून नागालँड पीपल्स फ्रन्टचे (एनपीएफ) अध्यक्ष शुरहोझेलाई लिझित्सू यांची निवड करण्यात आली. ते टी आर झेलियांग यांची जागा घेतील.
  • डेमोक्रॅटिक अलायन्स ऑफ नागालॅण्डच्या (डीएएन) बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून लिझित्सू यांची निवड करण्यात आली. या बैठकीला ५९ आमदार उपस्थित होते. लिझित्सू डीएएनचेही अध्यक्ष आहेत. 
  • झेलियांग यांनी १९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून पुढील व्यवस्था होईपर्यंत राज्याचा कारभार पाहण्यास सांगितले.
 पार्श्वभूमी 
  • नगरपालिका निवडणुकांत ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील, अशी घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर नागालँडमध्ये निदर्शनांना तोंड फुटले होते.
  • विविध संघटना नगरपालिका निवडणुका रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.
  • त्यातच दिमापूर येथे पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर वातावरण चिघळले होते. परिणामी झेलियांग यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.
  • आता नगरपालिका निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया रद्द करा आणि गोळीबारास जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा या दोन्ही मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने केली आहे.

मुंबईची शरिरसौष्ठवपटू श्वेता राठोडला ‘मिस इंडिया’ किताब

  • इंदौर येथे आयोजित ‘नॅशनल बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप २०१७’ (महिला) स्पर्धेत मुंबईची शरिरसौष्ठवपटू श्वेता राठोडने ‘मिस इंडिया’चा किताब आणि सुवर्ण पदक जिंकले.
  • त्याचबरोबर तिला ‘सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप’च्या ‘स्पोर्ट्स फिजिक’ विभागातदेखील पुरस्कृत करण्यात आले.
  • व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या श्वेताने सलग तिसऱ्या वर्षी ‘मिस इंडिया’ किताब पटाकावून विजयाची हॅट्रिक साधली आहे.
  • ‘एशियन बॉडी बिल्डिंग अॅण्ड फिजिक चॅम्पियनशिप २०१५’ स्पर्धेत ‘स्पोर्ट्स फिजिक विभागात’ रजत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला शरिरसौष्ठवपटू आहे.

हाफिज सईदचा शस्त्रास्त्र परवाना रद्द

  • जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद आणि त्याच्या संघटनेतील सदस्यांना दिलेला शस्त्रास्त्र परवाना पाकिस्तानने रद्द केला आहे.
  • सईद आणि त्याच्या साथीदारांकडे ४४ शस्त्रास्त्रे होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे शस्त्रास्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.
  • मुंबई २६/११ हल्ल्याचा कट रचणाऱ्या हाफिज सईदविरोधात पाकिस्तानने कारवाई करावी यासाठी भारताने पाठपुरावा केला आहे.
  • यापूर्वी पंजाब सरकारने हाफिज सईदला ९० दिवसांसाठी नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय सईद आणि त्याच्या ३७ साथीदारांना परदेशवारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता.
  • तसेच काही दिवसांपूर्वीच हाफिज सईदची नोंदणी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत (एटीए) करण्यात आली आहे.
  • जमात उद दवा या संघटनेवर बंदी घातल्यानंतर हाफीज सईद फलाह-इ-इंसानियत या संघटनेच्या माध्यमातून कारवाया सुरु ठेवेल असा अंदाज आहे.

अमेरिकेचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल मॅकमास्टर

  • मायकेल फ्लिन यांना पदमुक्त केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी लेफ्टनंट जनरल एचआर मॅकमास्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • रशियन राजदूताशी संपर्क केल्याची टीका झाल्याने ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांना पदावरून हटविण्यात आले होते.
  • नव्याने नियुक्त होत असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एचआर मॅकमास्टर यांनी लष्कराचा इतिहास या विषयावर डॉक्टरेट मिळविली आहे.
  • व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकेचा सहभाग होता हा समज खोटा ठरविणाऱ्या ‘डिरीलिक्शन ऑफ ड्युटी’ या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले आहे.

आयपीएल लिलावात बेन स्टोक्सला सर्वाधिक भाव

  • इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठीच्या आगामी दहाव्या पर्वासाठीच्या खेळाडूंचा लिलाव बंगळुरूत पार पडला.
  • इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्सला या लिलावात सर्वाधिक १४ कोटी ५० लाखांचा भाव मिळाला. पुणे सुपर जाएंट्स संघाचे गोयंका यांनी बेन स्टोक्सवर सर्वाधिक बोली लावली.
  • त्यापाठोपाठ इंग्लंडच्याच टायमल मिल्स या वेगवान गोलंदाजाला १२ कोटींचा भाव मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टायमल मिल्सला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
  • भारतीय खेळाडूंमध्ये यावेळी युवा क्रिकेटपटू कर्ण शर्मा याच्यावर ३ कोटी २० लाखांची बोली लागली. तर अनिकेत चौधरी यालाही दोन कोटींचा भाव मिळाला.
आयपीएल लिलावात सर्वाधिक भाव मिळालेले खेळाडू
खेळाडू संघ किंमत
बेन स्टोक्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स १४.५० कोटी
टायमल मिल्स रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १२ कोटी
कगिसो रबाडा दिल्ली डेअरडेव्हिल्स ५ कोटी
ट्रेंट बोल्ट कोलकता नाईट रायडर्स ५ कोटी
पॅट कमिन्स दिल्ली डेअरडेव्हिल्स ४.५० कोटी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा