चालू घडामोडी : २३ फेब्रुवारी

सामान्य लोकांसाठीच्या अंत्योदय एक्स्प्रेसचे अनावरण

  • कुशनयुक्त खुर्च्या व एलईडी दिवे अशा सुविधा असलेली ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ या सामान्य लोकांसाठीच्या नव्या संपूर्णपणे अनारक्षित गाडीचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २२ फेब्रुवारी रोजी अनावरण केले.
  • खास करून तयार करण्यात आलेले रंगीत डबे असलेली ही गाडी वर्दळीच्या मार्गावर चालवली जाणार आहे.
  • पहिली अंत्योदय एक्स्प्रेस मुंबई ते टाटानगर आणि दुसरी गाडी एर्नाकुलम व हावडादरम्यान धावणार आहे.
  • चार प्रकारच्या नव्या प्रवासी गाड्या सुरू करण्याची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात (२०१६-१७) करण्यात आली होती. यापैकी हमसफर एक्स्प्रेस सुरू झाली असून आता अंत्योदय सुरू होत आहे.
  • या गाडीतील डब्यांमध्ये वॉटर प्युरिफायर, मोबाइल फोनसाठी चार्जिग पॉइंट्स आणि अग्निशमन उपकरणे यांसारख्या अनेक सोयी आहेत.
  • ‘अंत्योदय’ ही ‘आम आदमी’करिता (सामान्य माणूस) असलेली गाडी आहे. तिच्या डब्यांमध्ये देण्यात आलेल्या सोयी प्रथम श्रेणीच्या डब्यासारख्या आहेत.
  • या नव्या अनारक्षित गाडीचे भाडे मेल/एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

राजेश गोपीनाथन टीसीएसचे नवे सीईओ आणि एमडी

  • टाटा समूहाची ‘ब्ल्यू आईड’ कंपनी टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदी राजेश गोपीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • टीसीएसचे माजी सीईओ नटराजन चंद्रशेखरन ऊर्फ एन चंद्रा यांनी २१ फेब्रुवारी रोजी टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या टीसीएसच्या सीईओपदी गोपीनाथन यांची निवड झाली.
  • गोपीनाथन यांनी १६ वर्षांपूर्वी २००१मध्ये टीसीएसमधील आपली कारकीर्द सुरू यावेळी टीसीएस अन्य कंपन्यांकरिता इंटरनेट ब्राऊजिंगकरिता सोफ्टवेअर तयार करून देत होती.
  • अहमदाबादच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेतून (आयआयएम) त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण, एनआयटीमधून इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्सची अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे.
  • गोपीनाथन २०१३मध्ये कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी झाले. प्रकल्प, धोरण, विपणन, विदेशातील व्यवसाय असे सारे व्यवहार त्यांनी टीसीएसमध्ये हाताळले आहेत.
  • १६.५ अब्ज डॉलरची टीसीएस ही देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे. लाभांशरूपात मुख्य प्रवर्तक टाटा सन्सला मोठा लाभ मिळवून देणारी ही कंपनी आहे.

आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

  • ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या लघुकथा संग्रहासाठी २०१६चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • त्यांच्या ‘आलोक’ या लघुकथा साहित्याला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून साहित्य अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.
  • या लघुकथेमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली त्यामध्ये आलेले व्यापक परिवर्तन हे सशक्त तसेच वस्तुनिष्ठरीत्या प्रस्तुत केलेले आहे.
  • यामध्ये गावातील लोकभाषा, स्थानिक परपंरा अतिशय अलगदपणे मांडली आहे. यासह ग्रामीण लोकांना येणाऱ्या जटीलतेविषयीही सांगण्यात आले आहे.
  • आसाराम लोमटे यांनी मराठी साहित्यात डॉक्टरेट केले आहे. लोमटे यांचे ‘इडा पिडा टळो’, ‘आलोक’, ‘धूळपेर’ हे तीन लघुकथा संग्रह प्रकाशित झाले आहेत.
  • त्यांच्या लिहिलेल्या कथा या पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अभ्यासक्रमात आहेत.
 मिलिंद चंपानेरकर यांना साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 
  • याव्यतिरिक्त ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला २०१६चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळाला.
  • सईद अख्तर मिर्झा यांच्या ‘एम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर’ या इंग्रजीतील आत्मकथेचा चंपानेरकर यांनी मराठीत अनुवाद केला आहे.
  • जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१४ दरम्यानच्या काळात अनुवाद झालेल्या पुस्तकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.

पृथ्वीच्या आकाराच्या सात ग्रहांचा शोध

  • सूर्यमालेबाहेर पृथ्वीच्या आकाराचे सात ग्रहांचा समूह असण्याचा दावा अमेरिकेच्या नासातील खगोलशास्त्रज्ञांनी केला असून, या ग्रहांवर पाणी आणि त्यामुळे जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
  • या दाव्यामुळे खगोल शास्त्रातील संशोधनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. सौरमालेबाहेरील संशोधनालाही यामुळे गती मिळू शकते.
  • स्पिट्झर अवकाश दुर्बिणीद्वारे नासाने हा शोध लावला असून, सूर्यमालेबाहेर एकाच वेळी एवढ्या संख्येने ग्रह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • सूर्यमालेबाहेर असल्याने या ग्रहांना एक्सोप्लॅनेट्स असे नाव दिले गेले आहे. याआधी अशा पद्धतीने पृथ्वी आणि भोवतीच्या ग्रहांसारखीच रचना असलेला ग्रहांचा समूह आढळून आला नव्हता.
  • सौरमालेपासून या नव्या ग्रहांच्या समूहाचे अंतर ४० प्रकाशवर्षे दूर असून, या ग्रहांची रचनाही पृथ्वीसारखीच असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
  • या सात ग्रहांपैकी तीन ग्रहांवर पाण्याची स्रोत आढळून आले आहेत. या सहाही ग्रहांवरील तापमान अत्यंत थंड किंवा अत्यंत उष्ण नाही. त्यामुळे तिथे पाण्याचे अस्तित्व असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
  • सात पैकी पाच ग्रहांचा आकार अगदी पृथ्वी इतकाच आहे. तर उर्वरित दोन ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने लहान आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा