१ एप्रिलपासून ३ लाखांपुढील सर्व रोख व्यवहारांवर केंद्र सरकार १०० टक्के दंड लावणार आहे. रोख व्यवहार पूर्णपणे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
अर्थसंकल्प २०१७-१८ मध्ये अरुण जेटलींनी आयकर कायद्यामध्ये कलम २६९ एसटीमध्ये ही तरतूद टाकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
त्यानुसार एका दिवसात ३ लाखांच्यावर रोख व्यवहार करण्यास निर्बंध लावण्यात येतील. बॅंक आणि सरकारी कामासाठी हे निर्बंध नसतील.
जी व्यक्ती ही रक्कम स्वीकारेल त्या व्यक्तीलाच दंडाची रक्कम भरावी लागणार असल्याची तरतूद आहे.
लोकांनी जास्त मोठ्या रकमेचे रोख व्यवहार करू नये या दृष्टीने १ एप्रिलपासून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे.
नोटाबंदीद्वारे काळ्या पैशांच्या साठ्यावर सरकारने हल्ला चढवला. आता, भविष्य काळात काळा पैसा निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने दिलेल्या अहवालात ५०,०००च्या वर रोख व्यवहार करण्यासाठी निर्बंध असावेत अशी सूचना करण्यात आली होती.
सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंग यांचे निधन
सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंग यांचे प्रदीर्घ आजारानंतर ४ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
सिंग यांची वयाच्या विसाव्या वर्षी आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. ते कर्नाटक केडरचे अधिकारी होते.
त्यांनी देवेगौडा पंतप्रधान असताना केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयची सूत्रे १९९६मध्ये हाती घेतली.
त्यांच्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी बोफोर्स प्रकरण, बिहारमधील चारा घोटाळा प्रकरण यांसारखी अतिशय महत्त्वाची प्रकरणे हाताळली होती.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले होते. ब्रिटन, अमेरिका, जर्मनी व फ्रान्स या देशांत गेलेल्या सरकारी शिष्टमंडळांचे नेतृत्वही त्यांनी केले होते.
अगदी कमी काळात झारखंड मुक्ती मोर्चा खासदारांचे लाच प्रकरण, १३३ कोटींचा युरिया घोटाळा व तत्कालीन केंद्रीय मंत्री सुखराम यांचा दूरसंचार घोटाळा ही प्रकरणेही त्यांनी हाताळली.
आयटीबीपीचे महासंचालक, अमलीपदार्थ विरोधी पथकाचे महासंचालक, रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक ही पदेही त्यांनी भूषवली.
त्यांनी इनसाईड सीबीआय, फिफ्टी डेझ टू टॉप, पुलिस कि कहानी मेरी जुबानी अशी एकूण ३० पुस्तके लिहिली. अनेक नियतकालिकांतही त्यांनी लेखन केले.
त्यांना पंथरत्न, दिल्लीरत्न, पंजाबची शान असे पुरस्कार मिळाले आहेत. प्रामाणिक व निर्भीड अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध होते. प्रसारमाध्यमे त्यांना टायगर संबोधत असत.
गुगल जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड
२०१७मध्ये सर्वात लोकप्रिय आणि जास्त किंमत असलेला जगातील सर्वात मोठा टेक्नॉलॉजी ब्रॅंड म्हणून गुगल पुढे आला आहे.
ब्रॅंड फायनान्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार अॅपलला मागे टाकून गुगल जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड बनला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये गुगलची ब्रॅंड व्हॅल्यू सातत्याने वाढत आहे. २०११पासून अॅपल प्रथम स्थानावर होता. आता हे स्थान गुगलने मिळवले आहे.
गुगलची ब्रॅंड व्हॅल्यू मागील वर्षी ८८.२ अब्ज डॉलर (५८०८ अब्ज कोटी रुपये) होती, यावर्षी ती १०९.४ अब्ज डॉलर (७,१९४ अब्ज कोटी रुपये) आहे.
तर मागील वर्षी अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू १४५ अब्ज डॉलर होती यावर्षी ती १०७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
मागील वर्षी आयफोन ७ आणि ७ प्लस लाँच करुन देखील अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू कमी झाली आहे.
या सर्वेक्षणानुसार, तिसऱ्या स्थानावर अॅमेझॉन, चौथ्या स्थानावर अॅटी अॅंड टी आहे, पाचव्या स्थानावर मायक्रोसॉफ्ट आणि सहाव्या स्थानावर सॅमसंग आहे.
जगातील पहिली आण्विक विमानवाहू युद्धनौका सेवामुक्त
अमेरिकेने जगातील सर्वात पहिली आण्विक विमानवाहू युद्धनौका यूएसएस इंटरप्राइजला सेवामुक्त केले आहे.
या युद्धनौकेने क्युबा मिसाइल संकट, व्हिएतनाम, इराक आणि अफगाणिस्तानच्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
भारत आणि पाकिस्तानच्या १९७१च्या युद्धातही अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी बंगालच्या उपसागरात ही युद्धनौका पाठवली होती.
यूएसएस इंटरप्राइज १९६१मध्ये अमेरिकेच्या ताफ्यात दाखल झाली. ही जगातील सर्वात पहिली आण्विक विमानवाहू युद्धनौका असून, तिला अमेरिकेच्या १० राष्ट्रपतींचे नेतृत्व लाभले आहे.
या युद्धनौकेला निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ती सुमारे ४ वर्ष चालणार आहे.
MT Covers all current events
उत्तर द्याहटवा