भारताने ११ फेब्रुवारी रोजी ओडिसाच्या बालासोर येथील अब्दुल कलाम बेटावरुन स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रभेदी (इंटरसेप्टर) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
पृथ्वीच्या वातावरणावतील ५० किमी उंचीपर्यंतच्या प्रदेशातील शत्रूने सोडलेले क्षेपणास्त्र निष्प्रभ करण्यासाठी पीडीव्ही मिशन अंतर्गत ही चाचणी घेण्यात आली.
टेलिमेट्री आणि रेंज स्टेशन्सच्या मदतीने अनेक ठिकाणीहून या चाचणीचे निरीक्षण करण्यात आले.
या चाचणीदरम्यान इंटरसेप्टरने बंगालच्या उपसागरात २००० किमी अंतरावरून सोडलेल्या चाचणी लक्ष्याचा अचूक भेद केला. यासाठी इंटरसेप्टरने रडार आणि दिशादर्शन यंत्रणेचा वापर केला.
या चाचणीच्या यशामुळे भारताने द्विस्तरीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने पुढील पाऊल टाकले आहे.
भारतीय वैज्ञानिकांनी आता ५,००० किमी अंतरावरुन मारा केलेल्या क्षेपणास्त्राला निष्प्रभ करता येईल असे इंटरसेप्टर तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
सेबीच्या अध्यक्षपदी अजय त्यागी
अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी अजय त्यागी यांची भांडवली बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड पाच वर्षांसाठी असणार आहे.
सेबीचे अध्यक्ष यू के सिन्हा यांचा वाढीव कार्यकाळ १ मार्चला संपत असून, त्यानंतर त्यागी पदभार स्वीकारणार आहेत.
त्यागी हे हिमाचल प्रदेश केडरचे १९८४च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. सध्या आर्थिक कामकाज विभागात (गुंतवणूक) ते अतिरिक्त सचिव आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यागी हे काही काळ रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळातही होते.
अॅम्बेसिडर कारवर युरोपीय कंपनीची मालकी
हिंदुस्तान मोटर्सने त्यांच्या मालकीची अॅम्बेसिडर कार ८० कोटी रुपयांमध्ये युरोपीय कंपनी प्युजोला विकली आहे.
तीन वर्षांपूर्वीच अॅम्बेसेडर कारचे उत्पादन बंद झाले. ६० ते ९०च्या दशकात अॅम्बेसेडर कारला भरपूर मागणी होती.
या कारची मालकी, डिजाइन आणि ब्रॅंड नेम या सर्वांची मालकी सी के बिर्ला समूहाच्या हिंदुस्तान मोटर्सकडे होती. ही मालकी आता प्युजोकडे जाणार आहे.
अॅम्बेसिडर ही कार सुमारे सात दशकांपूर्वी भारतात लाँच केली गेली होती. अॅम्बेसिडर कारने अनेक वर्षे भारतीय बाजारपेठेवर हुकुमत केली.
हळुहळु या कारचे स्थान बाजारातून कमी होऊ लागले होते. या कंपनीचा हळहळु तोट्यात जाऊ लागली होती.
अॅम्बेसिडर कारला भारतामध्ये विशेष स्थान होते. विशेषतः राजकीय वर्तुळात हा ब्रॅंड लोकप्रिय होता.
हागणदारीमुक्त गावांसाठी अमिताभ बच्चन करणार जनजागृती
देशभरातील गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारने नवीन अभियानाची तयारी सुरू केली आहे.
उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांची सवय बदलावी यासाठी अमिताभ बच्चन फोन करुन गावागावांत जनजागृती करणार आहेत.
त्यात अमिताभ तुमच्या कुटुंबातील किंवा गावातील कोणी उघड्यावर शौचाला जातात का? असा प्रश्न विचारणार आहेत.
पुढील दहा दिवसांत जवळपास ५० हजार जणांना त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेले फोन ऐकवले जाणार आहेत.
गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी केंद्राच्या जल आणि स्वच्छता विभागातर्फे मोहीम हाती घेतली जाणार आहे.
आतापर्यंत देशातील ९१ जिल्हे आणि १ लाख ५८ हजार गावे हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली आहेत.
ज्या जिल्ह्यांना हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहे, तिथे अजूनही कोणी उघड्यावर शौचाला जात आहे का? हे पाहणे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
बल्गेरियन-फ्रेंच साहित्यिक त्स्वेतान तोदोरोव यांचे निधन
बल्गेरियन-फ्रेंच इतिहासकार, तत्त्वज्ञ, साहित्यिक, समीक्षक, समाजशास्त्रज्ञ आणि निबंधकार त्स्वेतान तोदोरोव यांचे ७ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
१९९१मध्ये त्यांचे ज्यूंच्या शिरकारणावरचे ‘फेसिंग द एक्स्ट्रीम- मॉरल लाइफ इन द कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते.
त्यानंतर २००१मध्ये त्यांचे ‘द फ्रॅगिलिटी ऑफ गुडनेस- व्हाय बल्गेरिया ज्यूज सव्हाईव्हड द हॉलोकास्ट’ हे पुस्तकही लोकप्रिय ठरले.
तोदोरोव यांचा जन्म बल्गेरियाची राजधानी सोफियात १९३९ मध्ये झाला. सोफिया विद्यापीठातून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
नंतर ते फ्रान्समध्ये स्थलांतरित झाले. सामाजिकशास्त्रात विद्यावाचस्पती पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च येथे अध्यापन सुरू केले.
रचनात्मकता वाद म्हणजे अर्थ लावण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे ते नावारूपास आले. त्यांच्यावर सांस्कृतिक मानववंशवादाचा प्रभाव होता.
पाकिस्तानचा बहुराष्ट्रीय ‘अमन १७’ नौदल सराव
पाकिस्तानच्या कराची बंदरावर अरबी समुद्रामध्ये ‘अमन १७’ या बहुराष्ट्रीय नौदल सरावाला ११ फेब्रुवारी रोजी सुरवात झाली. त्यात ३७ देशांनी सहभाग घेतला आहे.
अमेरिका, चीन आणि रशियासारख्या प्रमुख देशांच्या नौदलांनी यामध्ये सहभाग घेतला असला तरी भारताने मात्र यामध्ये सहभाग घेतलेला नाही.
दहशतवाद, अमलीपदार्थ व्यापार, मानवी तस्करी आणि सागरी चाचेगिरी विरोधात एकतेचे प्रदर्शन घडविणे, हा या सरावाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
‘शांततेसाठी एकत्र’ अशी या नौदल सरावाची संकल्पना असून, हा सराव पाच दिवस चालणार आहे.
पाकिस्तानी नौदलाच्या म्हणण्यानुसार, वेगवेगळ्या देशांच्या नौदलांमधील समन्वय सुधारण्यासाठी दर दोन वर्षांनी हा सराव करण्यात येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा