भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी अजय त्यागी यांची निवड झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने त्यागी यांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे.
सेबीच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी वय ५० ते ६० वर्षेदरम्यान व २५ वर्षे भांडवली बाजाराचा अनुभव असणे आवश्यक असते.
१८ फेब्रुवारी २०११ रोजी सेबी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेले यू के सिन्हा यांच्याकडून त्यागी हे येत्या १ मार्च रोजी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.
सेबीच्या अध्यक्षपदी सर्वाधिक काळ राहिलेल्या डी आर मेहता यांच्यानंतर दुसरी सर्वाधिक कारकीर्द असलेल्या सिन्हा यांना २ वेळा मुदतवाढ मिळाली होती.
तबला वादक संदीप दास यांना ग्रॅमी पुरस्कार
भारतीय तबला वादक संदीप दास यांना यो यो मा यांच्यासोबतच्या ‘सिंग मी होम’ या अल्बमासाठी यावर्षीचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
गायक आणि सितारवादक अनुष्का शंकर यांना लँड ऑफ गोल्ड अल्बमसाठी नामांकन मिळाले होते. परंतु त्यांची सहाव्यांदा ग्रॅमी पुरस्काराची संधी हुकली.
दास यांचा ‘सिंग मी होम’ जागतिक संगीत गटात सर्वोत्कृष्ट अल्बम ठरला. भारतीय आणि पाश्चात्य संगीतच्या जुगलबंदीवर आधारीत हा अल्बम आहे.
यो यो मा आणि संदीप दास वेगवेगळया देशातील कलावंत असलेल्या ‘द सिल्क रोड’ या म्युझिक ग्रुपमध्येही एकत्र काम करतात.
संदीप दास यांनी किशन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तबलावादनाचे प्रशिक्षण घेतले आहे.
ग्रॅमी पुरस्कारात नामांकन मिळण्याचे त्यांचे हे तिसरे वर्ष होते. याआधी २००५ आणि २००९ मध्ये त्यांना नामांकन मिळाले होते.
संदीप दास यांच्याआधी प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना १९९२ आणि २००९ असा दोनवेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
आयर्न लेडी इरोम शर्मिला निवडणुकीच्या रिंगणात
मणिपूरमधील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हटवण्याच्या मागणीसाठी १६ वर्षे उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
पिपल्स रिसर्जंस अॅण्ड जस्टिस अलायन्स (पीआरजेए) या पक्षाची त्यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये स्थापना केली होती.
त्या मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याविरोधात थौबल या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या सायकल हे साधन वापरत आहे.
सायकलवरुन प्रचार केल्यामुळे त्यांचा जनतेशी संपर्क वाढत चालला आहे असे त्या म्हणतात.
गेली १६ वर्षे त्यांनी अफ्प्सा कायद्याविरोधात उपोषण केले. परंतु अद्यापही हा कायदा अस्तित्वात आहे.
हा कायदा संपुष्टात आणावयाचा असेल तर आपण राजकारणात जायला हवे असे त्यांना वाटल्याने त्यांनी पक्षाची स्थापना केली.
६० पैकी ६ जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. क्राउड फंडिंगद्वारे त्या आपल्या प्रचारासाठी पैसे जमा करत आहेत.
व्यापम घोटाळ्यातील ५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द
मध्यप्रदेशमधील व्यापम घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने २००८ ते २०१२ या कालावधीत एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतलेल्या ५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले आहेत.
मध्य प्रदेशात व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेश आणि विविध खात्यांतील सरकारी नोकर भरती याच्याशी संबंधित बाबी व्यावसायिक परीक्षा मंडळातर्फे (व्यापम)पाहिल्या जातात.
परीक्षांमध्ये बनावट विद्यार्थी परीक्षेस बसविणे, पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे व प्रवेश किंवा नोकरी मिळवून देणे, असे गैरव्यवहार या घोटाळ्यामध्ये आढळले आहेत.
मध्यप्रदेश हायकोर्टाने व्यापम घोटाळ्यात दोषी आढळलेल्या ५००हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा निर्णय दिला होता.
चुकीच्या पद्धतीने प्रवेश मिळवल्याप्रकरणी त्यांचे प्रवेश रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला होता.
या आदेशाविरुद्ध विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ५००हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा निर्णय दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा