इंडियन युनियन मुस्लीम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार ई अहमद यांचे निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडली.
त्यानंतर त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
लोकसभा खासदार म्हणून २५ वर्षांची दीर्घ कारकीर्द राहिलेले ई अहमद केरळमधील मल्लापुरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते.
तसेच, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये ई अहमद यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाची जबाबदारी पाड पाडली होती.
मुस्लिम विद्यार्थी संघटनेचे सचिव म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरूवातीच्या काळात ते केरळ विधानसभेवर निवडून गेले होते. १९८२ ते १९८७मध्ये ते केरळ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.
ई अहमद यांनी पश्चिम आशिया आणि भारतामध्ये सौहादपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
याशिवाय, त्यांनी १९९१ ते २०१४ या काळात अनेकदा संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्वही केले होते.
अहमद यांनी आखाती देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
हज यात्रेदरम्यान पवित्र काबा विधींसाठी जगभरातून आमंत्रण देण्यात आलेल्या मोजक्या व्यक्तींमध्ये ई अहमद यांचा समावेश होता.
अनुष्का शर्मा ‘स्वच्छ भारत’चा प्रचार करणार
शहर विकास मंत्रालयाद्वारे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माची निवड करण्यात आली आहे.
महिला आणि ग्रामीण भागांमध्ये स्वच्छ भारत अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी लोकप्रियतेच्या निकषावर अनुष्काची निवड करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करणारी अनुष्का शर्मा पहिली महिला आहे.
यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार केला आहे.
द्रव्याची नवी अवस्था टाइम क्रिस्टल्स
अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातील वैज्ञानिकांना काल स्फटिक अर्थात टाइम क्रिस्टल्स तयार करण्यात यश आले आहे.
मेरीलँड विद्यापीठाच्या ख्रिस मन्रो व सहकाऱ्यांनी येटेरबियमचे १० आयन वापरून या स्फटिकांची निर्मिती केली आहे.
याची संकल्पना कॅलिफोर्निया विद्यापीठाचे नॉर्मन येव व इतर दोन संशोधक गटांनी मांडली होती.
द्रव्याची ही नवी अवस्था असून ती काळाशी सममित आहे. हे स्फटिक त्यांची रचना काळाच्या मितीत सतत पुनरावृत्त करतात.
साधारण स्फटिकांची आण्विक रचना अवकाशमितीत पुनरावृत्त होते, तर टाइम क्रिस्टल्सची आण्विक रचना ही कालमितीत पुनरावृत्त होते.
हे स्फटिक गतिहीन समतोलात स्थिर होत नाहीत व ते स्पंदित होत राहतात. असमतोलित द्रव्य अवस्थेचे हे उदाहरण आहे.
मेरीलँडमधील प्रयोगात येटेब्रियमच्या अणूंवर चुंबकीय क्षेत्र व लेसरचा मारा करून त्यांची आण्विक रचना कालमितीत पुनरावृत्त करण्यात आली.
टाइम क्रिस्टल्स हे क्युबिट सिस्टीमसारखे काम करतात म्हणजे त्यांचा उपयोग क्वांटम संगणकात करता येऊ शकतो.
अगदी सुरुवातीला या स्फटिकांची संकल्पना नोबेल विजेते वैज्ञानिक फ्रँक विलझेक यांनी २०१२मध्ये मांडली होती.
नील गॉरस्यूख अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पुराणमतवादी न्यायाधीश नील गॉरस्यूख यांचे नामांकन केले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी या निवडीला कडाडून विरोध केला आहे.
सर्वोच्च न्यायालयावर नामांकन करण्यात आलेले ४९ वर्षीय नील हे गेल्या २५ वर्षांतील सर्वांत कमी वयाचे न्यायाधीश आहेत.
मूळचे कोलोरॅडोमधील असलेले नील गॉरस्यूख हे 'टेन्थ सर्किट'साठीच्या अमेरिकन अपिलीय न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा