चालू घडामोडी : २४ फेब्रुवारी

शस्त्र आयातदारांच्या यादीत भारत प्रथम स्थानी

  • स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मागील पाच वर्षांमध्ये जगभरात शस्त्र व्यापारात मोठी वाढ झाली असून, प्रमुख शस्त्र आयातदारांच्या यादीत भारत प्रथम क्रमांकावर आहे.
  • २०१२ ते २०१६ या कालावधीत झालेल्या शस्त्र आयातीमध्ये एकट्या भारताचा वाटा १३ टक्के होता.
  • चीन आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांबरोबर तणावाचे संबंध असल्याने भारताने आपली लष्करी ताकद वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.
  • भारतानंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, चीन आणि अल्जेरिया या देशांचा क्रमांक लागतो.
  • २००७ ते २०११ या काळातही या यादीत भारतच प्रथम क्रमांकावर होता. त्या वेळी एकूण शस्त्र आयातीमध्ये भारताचा वाटा ९.७ टक्के होता.
  • बहुतेक आखाती देश येमेन, सीरिया आणि इराकमधील संघर्षामध्ये गुंतले असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र आयात केली जाते.
  • गेल्या पाच वर्षांमध्ये सौदी अरेबियाच्या शस्त्र आयातीमध्ये सुमारे २१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण आयातीमध्ये त्यांचा वाटा ८.२ टक्के आहे.
  • ‘मेक इन इंडिया’ स्थानिक पातळीवरच शस्त्रनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला, तरी लष्कराच्या गरजा तातडीने पुरविण्याची स्थानिक बाजारामध्ये तूर्त क्षमता नाही. त्यामुळे अत्याधुनिक शस्त्रांच्या गरजांसाठी भारताला अजूनही आयातीवर भर द्यावा लागत आहे.

भारती एअरटेलकडून टेलिनॉरचे अधिग्रहण

  • दूरसंचार क्षेत्रातील भारती एअरटेलने २४ फेब्रुवारी रोजी याच क्षेत्रातील छोट्या गटातील टेलिनॉरच्या भारतातील व्यवसाय खरेदीचा व्यवहार पूर्ण केला आहे.
  • लूप (पूर्वाश्रमीची बीपीएल मोबाइल) खरेदीनंतरचा भारती एअरटेलचा हा व्यवहार दूरसंचार क्षेत्रातील दुसरे मोठे अधिग्रहण आहे.
  • नॉर्वेस्थित टेलिनॉर समूहाने २००८मध्ये उत्तर भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील युनिटेकच्या सहकार्याने भारतीय दूरसंचार क्षेत्रात शिरकाव केला होता.
  • नंतर २जी ध्वनिहरी घोटाळ्यामुळे टेलिनॉर कालांतराने मर्यादित व्यवसायासह स्वतंत्र कंपनी म्हणून दूरसंचार व्यवसाय करू लागली.
  • भारती एअरटेलची भारती एंटरप्राईजेस व टेलिनॉर इंडिया कम्युनिकेशन्स यांच्या दरम्यान हा करार नवी दिल्लीत झाला आहे. यानुसार टेलिनॉरकडे असलेले ध्वनिलहरी परवाने, कर्मचारी आता भारती एअरटेलच्या ताब्यात येणार आहेत.
  • भारती एअरटेलची स्पर्धक असेलेल्या व्होडोफोनचे आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलरमध्ये विलीनीकरण होण्याची प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे.
  • तसेच अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्सने काही दिवसांपूर्वीच एअरसेलचा दूरसंचार व्यवसाय खरेदी केला.

पूजा घाटकरला नेमबाजी वर्ल्डकपमध्ये कांस्यपदक

  • भारताची नेमबाज पूजा घाटकर हिने नेमबाजीच्या वर्ल्डकपमध्ये दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे.
  • गगन नारंगच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या पुजाने स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत २२८.८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
  • तर चीनच्या मेंगयावो शी हिने २५२.१ गुणांसह नव्या विक्रमाची नोंद करत सुवर्णपदकाची कमाई केली. तिची सहकारी डोंलिजी हिने २४८.९ गुणांसह रौप्यपदक पटकविले.
  • आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केलेल्या पूजा घाटकर हिचे वर्ल्डकप स्पर्धेतील हे पहिले पदक आहे.

स्कॉटलंड यार्डच्या प्रमुखपदी क्रेसिडा डिक

  • स्कॉटलंड यार्ड अर्थात लंडनच्या मेट्रोपोलिटन पोलीस सर्व्हिस या जगद्विख्यात पथकाच्या प्रमुखपदी क्रेसिडा डिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सुमारे १८७ वर्षांनंतर क्रेसिडा डिक यांच्या रूपाने स्कॉटलंड यार्डचे नेतृत्व एका महिलेकडे आले आहे. सध्या परराष्ट्र आणि राष्ट्रकुल खात्यात त्या अधिकारी होत्या.
  • स्कॉटलंड यार्डमध्ये १९८३ साली वयाच्या २३व्या वर्षी  क्रेसिडा यांचा समावेश ऑफिसर म्हणून झाला, तोवर या पथकात एकही महिला अधिकारी नव्हती.
  • ऑक्सफर्डमध्येच शिक्षण झालेल्या क्रेसिडा यांनी केम्ब्रिजमध्ये गुन्हेशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास पूर्ण करून २००१मध्ये त्यांनी आणखी मोठी पदे मिळविली.
  • दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखपद (२०१४पर्यंत) सांभाळताना त्यांनी गुन्हे उकलून काढणे, पुरावे जमा करणे आणि गुन्हेगारांना पकडून कायद्यानुसार शिक्षा भोगण्यास भाग पाडणे, ही पोलिसी कौशल्ये त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहेत.

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन पुरस्कार २०१६

  • आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात हॉकीच्या इतिहासात प्रथमच सर्वोत्तम खेळाडू, गोलरक्षक, उदयोन्मुख खेळाडू, प्रशिक्षक व पंच यांचा गौरव करण्यात आला.
  • यावेळी बेल्जियमचा कर्णधार व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता जॉन डोहमेन आणि नेदरलँडसची नाओमी वॅन अस यांना २०१६ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
  • भारताचा कर्णधार व गोलरक्षक पी आर श्रीजेश व हरमनप्रीत सिंग यांची नावे अनुक्रमे वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक व उदयोन्मुख खेळाडू या पुरस्कारांसाठी नामनिर्देशित करण्यात आली होती. पण दोघांनाही हे पुरस्कार मिळाले नाहीत.
  • आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष: नरिंदर बात्रा (भारत)
पुरस्कारांची यादी
पुरस्कार खेळाडू (देश)
सर्वोत्तम खेळाडू (पुरुष) जॉन डोहमेन (बेल्जियम)
सर्वोत्तम खेळाडू (महिला) नाओमी वॅन अस (नेदरलँडस)
सर्वोत्तम गोलरक्षक (पुरुष) डेव्हिड हर्टे (आयर्लंड)
सर्वोत्तम गोलरक्षक (महिला) मॅडी हिन्च (ग्रेट ब्रिटन)
उदयोन्मुख खेळाडू (पुरुष) आर्थर वॅन डोरेन (बेल्जियम)
उदयोन्मुख खेळाडू (महिला) मारिया ग्रॅनाटो (अर्जेंटिना)
सर्वोत्तम प्रशिक्षक (पुरुष) डॅनी केरी (ग्रेट ब्रिटन)
सर्वोत्तम प्रशिक्षक (महिला) कॅरेन ब्राऊन (ग्रेट ब्रिटन)
सर्वोत्कृष्ट पंच (पुरुष) ख्रिस्टियन ब्लाश (जर्मनी)
सर्वोत्कृष्ट पंच (महिला) लॉरिन डेन फोर्ज (बेल्जियम)

उसेन बोल्टला चौथ्यांदा लॉरियस पुरस्कार

  • जमैकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्टने ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकून ‘लॉरियस स्पोर्टसमन ऑफ द इअर’ पुरस्कार पटकावला.
  • बोल्टला चौथ्यांदा हा पुरस्कार मिळाला असून, महिला गटात जिम्नॅस्ट सिमोन बिल्सला हा पुरस्कार मिळाला.
  • रिओ ऑलिम्पिकमध्ये बोल्टने तीन सुवर्णपदके मिळवली. या कामगिरीची दखल घेऊन त्याला चौथ्यांदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • क्रीडा क्षेत्रातील ऑस्कर म्हणून लॉरियस पुरस्कार ओळखले जातात. याआधी बोल्टने २००९, २०१० आणि २०१३साली हा पुरस्कार मिळवला आहे.
  • याबरोबरच चार पुरस्कार मिळवणारे रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स आणि केली स्लॅटर यांच्या पंक्तीत बोल्ट जाऊन बसला आहे.
 इतर पुरस्कार विजेते 
  • स्पोर्टसवूमन ऑफ द इअर: सिमोन बिल्स (१९ वर्षीय जिम्नॅस्ट सिमोनने रिओ ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्णपदके आणि एक ब्राँझपदक मिळवले.)
  • कमबॅक ऑफ द इअर: मायकेल फेल्प्स (जलतरणपटू फेल्प्सने २०१२च्या ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेतली होती. पण २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करून पाच सुवर्णपदके मिळवली.)
  • ब्रेकथ्रू ऑफ द इअर: निको रॉसबर्ग (फॉर्म्युला वन चॅम्पियन रॉसबर्गला २०१४ आणि २०१५मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अखेर गेल्या वर्षी त्याने विजेतेपद पटकावले.)
  • लॉरियस स्पोर्टस फॉर गूड अवार्ड: ऑलिम्पिक रेफ्यूजी संघ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा