‘रायरंद’चा नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरव
दिग्दर्शक रमेश पोपट ननावरे व लेखक आशिष अशोक निनगुरकर यांच्या ‘रायरंद’ या चित्रपटाला नोएडा येथे संप्पन झालेल्या चौथ्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक्सलन्स पुरस्कार मिळाला.
या चित्रपटाचे खास स्क्रीनिंगही नोएडा येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. चित्रपटाला नोएडा रसिकांची प्रचंड दाद मिळाली.
न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज यांची निर्मिती असलेल्या ‘रायरंद’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नगर जिल्ह्यात झाले असून जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी या चित्रपटात अभिनय केला आहे.
‘रायरंद’ या चित्रपटात बहुरूपी बालमजुरांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात एका लोककलावंत बहुरूपी माणसाची गोष्ट मांडण्यात आलेली आहे.
श्रीरामपूरचे कलावंत श्यामकुमार श्रीवास्तव यांनी मुख्य ‘रायरंद’ची भूमिका साकारली आहे. अभिनेता आनंद वाघ यांनी या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे.
आशिष निनगुरकर यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. गीतलेखन भावेश लोंढे व आशिष निनगुरकर यांचे आहे. लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
शंकराच्या ११२ फुटांच्या मूर्तीचे अनावरण
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोईम्बतूरमध्ये ११२ फुटांच्या शंकराच्या मूर्तीचे अनावरण केले आहे. ‘आदियोगी’ असे या शिवप्रतिमेचे नाव आहे.
ईशा फाउंडेशनतर्फे भगवान शंकराच्या ११२ फूट उंच मूर्तीची उभारणी करण्यात आली आहे. ही मूर्ती स्टीलचे तुकडे जोडून तयार करण्यात आली आहे.
तसेच, येथील नंदीची मूर्ती तिळाचे बी, हळद, भस्म आणि रेती तसेच मातीपासून बनविण्यात आली आहे.
भगवान शंकराच्या भव्यदिव्य मूर्तीचे अनावरण करताना पंतप्रधान मोदींनी योग करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
ईशा फाऊंडेशनकडून लवकरच देशाच्या विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या मूर्ती उभारण्यात येणार आहेत.
कोईम्बतूरमधील शंकराची मूर्तीचे डिझाईन तयार करण्यात अडीच वर्षांचा कालावधी लागला आहे. आठ महिन्यांमध्ये या मूर्तीची उभारणी करण्यात आली.
या मूर्तीचा भगवान शंकराचा चेहरा स्टिलच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. या मूर्तीचे वजन ५०० टन इतके आहे.
ईशा फाउंडेशनचे संस्थापक: योगगुरु जग्गी वासुदेव
नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ केनेथ अॅरो यांचे निधन
आपल्या सिद्धांतांनी विमा, वैद्यकीय सुविधा, शेअर बाजार या संकल्पनांतील अर्थकारण बदलून टाकणारे नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ केनेथ जोसेफ अॅरो यांचे २१ फेब्रुवारी २०१७ रोजी निधन झाले.
त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९२१ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून गणितात एम.ए. पदवी घेतली.
१९५१मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतली, त्यात त्यांनी समाजाने निवडलेले पर्याय व व्यक्ती निवडत असलेले पर्याय यांचा संबंध दाखवला आहे.
अर्थशास्त्रात संशोधन करताना त्यांनी सामाजिक न्याय व त्याबाबतचे पर्यायी मार्ग यावर भर दिला.
पदवी अभ्यास करीत असताना त्यांनी युद्धकाळात हवामान संशोधक म्हणून व एअर कोअर कॅप्टन म्हणून काम केले.
नंतर त्यांनी रॅण्ड कॉर्पोरेशनमध्ये व हार्वर्ड विद्यापीठात अध्यापक म्हणूनही काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठात त्यांनी ११ वर्षे अध्यापनाचे काम केले.
दैनंदिन व्यवहारातील आर्थिक समस्यांवर त्यांनी मोठे योगदान दिले. त्यात विमा, आरोग्यसेवा व हवामान बदल यांचा समावेश होता.
त्यांनी इकॉनॉमिस्टस स्टेटमेंट ऑन क्लायमेंट चेंज पुस्तकाचे सहलेखन केले होते, त्यात त्यांनी हवामान बदलांच्या धोक्याबाबत इशारा दिला होता.
सोशल चॉइस अॅण्ड इंडिव्हिज्युअल व्हॅल्युज या पुस्तकात त्यांनी बहुमताच्या मतदान नियमांतील फोलपणा दाखवून दिला होता, त्यात शेवटी अनपेक्षित निकाल कसा लागतो याचे विवेचन केले.
अॅरो यांना १९७२मध्ये ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन हिक्स यांच्यासमवेत नोबेल मिळाले होते. बाजारपेठ अर्थशास्त्रातील सर्वसाधारण समतोलाचे विवेचन त्यांनी ग्राहक व उत्पादक यांच्यातील अन्योन्यसंबंधातून दाखवले होते.
अर्थशास्त्रातील अमेरिकेचे पहिले नोबेल विजेते पॉल सॅम्युअलसन यांनी अॅरो हे विसाव्या शतकातील महान अर्थशास्त्रज्ञ असल्याचे म्हटले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा