बेहिशेबी संपत्ती प्रकरणात शशिकला यांना ४ वर्षाची शिक्षा
सर्वोच्च न्यायालयाने बेहिशेबी संपत्ती प्रकरणात अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. शशिकला दोषी असल्याचा निकाल दिला आहे.
यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला सारून सत्र न्यायालयाचा निकाल उचलून धरला.
सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना एकूण ४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून, त्वरीत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे शशिकला या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाद झाल्या आहेत. त्यांना अजून किमान ३ वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे. त्यानंतर आणखी ६ वर्षे म्हणजे सुमारे १० वर्षे त्या निवडणूक लढवू शकणार नाहीत.
सुमारे दोन दशकांपासून सुरू असलेल्या या खटल्यात अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा दिवंगत जयललिता या मुख्य आरोपी होत्या. तर शशिकला, इल्वारासी आणि सुधाकरन हे सहआरोपी होते.
या सर्वांनी ज्ञात उत्त्पन्न स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप होता. विशेष न्यायालयाने या सर्वांना चार वर्षांची शिक्षा तसेच १०० कोटी रूपयांचा दंड ठोठाविला होता. त्यानंतर २०१५मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने या चौघांचीही सुटका केली होती.
सचिनकडून डोणजा गावाच्या विकासासाठी ४ कोटी मंजूर
राज्यसभेतील खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संसद आदर्श गाव योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजा या गावाच्या विकासासाठी खासदार निधीतून सचिनने ४ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
या निधीच्या माध्यमातून गावातील विकासाची विविध कामे करण्यात येणार आहेत. गावातील शाळेची इमारत बांधणी, पाणीपुरवठा योजना, चांगले रस्ते, सांडपाण्याचा मार्ग आदी कामे करण्यात येणार आहेत.
सचिनने हे गाव दत्तक घेतल्यापासून ग्रामस्तरावरील पाच विशेष बैठका घेतल्या आहेत. या बैठकीत गावातील महिलांचाही सहभाग होता.
ज्यावेळी सचिनने हे गाव दत्तक घेतले त्यावेळी गावातील ६१० घरांपैकी ४००पेक्षा अधिक घरांमध्ये शौचालय नव्हते. गाव दत्तक घेतल्यानंतर गावात २३१ शौचालये उभारण्यात आली असून ती वापरली जात आहेत.
संसद आदर्श गाव योजनेअंतर्गत याआधी सचिनने आंध्रप्रदेशमधील पुत्तमराजू कंद्रिगा हे गाव दत्तक घेतले आहे.
ब्रिटिश-भारतीय अभिनेता देव पटेलला बाफ्टा पुरस्कार
‘स्लमडॉग मिलेनिअर’द्वारे प्रसिद्धीझोतात आलेला ब्रिटिश-भारतीय अभिनेता देव पटेल याला ‘लायन’ चित्रपटातील भूमिकेसाठी सहायक अभिनेत्याचा ‘बाफ्टा पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
एका परदेशी कुटुंबाने दत्तक घेतलेल्या भारतीय नागरिकाने गूगल मॅपच्या साह्याने स्वतःचे मूळ शोधण्यासाठी केलेल्या प्रवासाची कथा ‘लायन’मध्ये आहे.
७०व्या ब्रिटिश अॅकॅडमी फिल्म अॅवॉर्डमध्ये दिग्दर्शक डेमियन शझिल यांच्या ‘ला ला लँड’ने पाच पुरस्कार पटकावले, तर ‘आय, डॅनियल ब्लेक’ या चित्रपटाला उल्लेखनीय ब्रिटिश चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
केसी अॅफ्लेकला ‘मँचेस्टर बाय द सी’साठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला; तर दिग्दर्शक शझिल यांना ला ला लँड चित्रपटासाठी, तसेच एमा स्टोन हिला याच चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
वायोला डेव्हिसला ‘फेन्स’ चित्रपटामधील भूमिकेसाठी सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
अमेरिकेचे एनएसए प्रमुख मायकल फ्लायन यांचा राजीनामा
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मायकल फ्लायन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि अन्य अधिकाऱ्यांना रशियन राजदूताबरोबर झालेल्या चर्चेची दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे फ्लायन यांना राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता निवृत्त लेफ्टनंट जनरल किथ किलॉग यांची हंगामी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा