चालू घडामोडी : २६ फेब्रुवारी

डॉ. अभय बंग यांना जनसेवा पुरस्कार

  • ‘श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट’च्यावतीने देण्यात येणारा ‘नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शोधग्राम संस्थेचे संस्थापक महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग यांना जाहीर झाला आहे.
  • २८ फेब्रुवारी रोजी बंग यांना हा पुस्कार रयत शिक्षण संस्था, साताऱ्याचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते प्रदान केला जाणार आहे. 
  • २१ हजार रुपये रोख व मानपत्र, सन्माचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • याशिवाय रुग्णांना मदत करणाऱ्या दानोळी (ता. शिरोळ) येथील सुकुमार पाटील यांनाही विशेष सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 डॉ. अभय बंग यांच्याबद्दल 
  • अभय बंग यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५० रोजी वर्धा येथे झाला. त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळवली.
  • १९८४मध्ये त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही पदवी सुवर्णपदकासह मिळवली.
  • त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी शहरी श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
  • डॉ. अभय बंग हे त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांच्यासमवेत सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात.
  • विचारी आणि शांत स्वभाव हे अभय बंग यांचे वैशिष्ट्य आहे आणि कामाचा झपाटा हे राणी बंग यांचे वैशिष्ट्य आहे.
  • त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी, स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न, नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना या विषयांवर कार्य व संशोधन केले आहे.
  • बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप (मॉडेल) वापरले जाते.
  • अभय बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावला आहे. यामुळे ग्रामीण स्त्रिया देखील न्युमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यामुळे उपचार करू शकतात.
  • नवजात बालकाच्या श्वासांची वारंवारता या उपकरणाच्या साहाय्याने बालक धोकादायक अवस्थेत आहे का हे शोधता येते.
  • त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
  • गडचिरोली जिल्ह्याच्या कुपोषणावर व नवजात अर्भकांच्या मृत्यूवर डॉ. अभय बंग व डॉ.राणी बंग यांनी लिहिलेला ‘कोवळी पानगळ’ हा शोधप्रबंध खूप गाजला होता. हा शोधप्रबंध ‘लॅन्सेट’ या मानाच्या वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झाला होता.
  • या शोधप्रबंधामुळे केवळ राज्य व देशाच्याच शासनाला नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यू.एच.ओ) आपले आरोग्याविषयी धोरण बदलावे लागले होते.
  • डॉ. अभय बंग व राणी बंग यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी देण्यात आली असून महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराचेही ते मानकरी ठरले आहेत.

    व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत निवडक प्रसारमाध्यमांना बंदी

    • अमेरिकेच्या व्हाइट हाऊसने अनौपचारिक (ऑफ कॅमेरा) घडामोडींच्या वार्तांकनास काही प्रमुख वृत्तपत्रे, वाहिन्या व वृत्तसंस्था यांना बंदी घातली आहे.
    • व्हाइट हाऊसने आमंत्रित केलेल्या निवडक गटांच्या पत्रकारांमध्ये बीबीसी, दि न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, दि गार्डियन, दि लॉसएंजल्स टाइम्स, पॉलिटिको ई. यांना मनाई करण्यात आली होती.
    • व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव सीन स्पायसर यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. अनौपचारिक पत्रकार परिषद व्हाइट हाऊसच्या ब्रीफिंग रूममध्ये घेण्यात आली.
    • प्रतिबंधित वृत्तपत्रे व वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा समावेश निमंत्रितात नाही असे सांगून त्यांना बाहेरच रोखण्यात आले.
    • निमंत्रित करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये केवळ एबीसी, फॉक्स न्यूज, ब्रेटबार्ट न्यूज, रॉयटर्स आणि वॉशिंग्टन टाईम्स या वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
    • अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल अ‍ॅक्शन कॉन्फरन्सच्या वार्षिक कार्यक्रमात प्रसारमाध्यमांवर टीका करताना, प्रसारमाध्यमेच अमेरिकी जनतेची खरी शत्रू असल्याचा आरोप केला होता.
    • विशेषत: अध्यक्षीय निवडणुकीमधील प्रचारादरम्यान ट्रम्प यांचे सहकारी हे रशियन गुप्तचर खात्याच्या संपर्कात होते, अशा आशयाच्या देण्यात आलेल्या वृत्तामुळे ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
    • ट्रम्प प्रशासन व प्रसारमाध्यमे यांच्यातील तणाव टोकाला गेला असून व्हाईट हाऊसकडून घेण्यात आलेला हा निर्णय नव्या वादळाचे लक्षण मानले जात आहे.

    शाहरुख खानला नॅशनल यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड

    • प्रसिध्द अभिनेता शाहरुख खानला जेष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या हस्ते नॅशनल यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.
    • सिनेसृष्टीतील असामान्य योगादानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. १० लाख रुपये रोख, सुवर्णकंकण असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
    • टी. सुब्बरामी रेड्डी फाउंडेशन, अनु आणि शशी रंजन यांच्या सहकार्याने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
    • अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि रेखा नंतर ह्या पुरस्काराचा मानकरी ठरणारा शाहरुख चौथा बॉलिवूड कलाकार झाला आहे. 
    • शाहरूख खान यांच्या करिअरला आकार देण्यात यश चोप्रा यांचा मोठा वाटा आहे. यश चोप्रा यांच्या यांनी दिग्दर्शित केलेल्या जब तक है जान या शेवटच्या चित्रपटात शाहरुख खानने मुख्य कलाकार म्हणून भूमिका केली होती.
    • यशजींच्या डर, दिल तो पागल है, वीर-झारा या सिनेमांतही शाहरुख खानने काम केलेले आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा