चालू घडामोडी : २० फेब्रुवारी

एनपीसीआयकडून भारत क्यूआर कोडप्रणाली सादर

  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मास्टर कार्ड आणि व्हिसा यांच्या सहकार्याने भारत क्यूआर नावाची नवी कोड प्रणाली विकसित केले आहे. 
  • याद्वारे आता एकच क्विक रिस्पॉन्स म्हणजेच क्यूआर कोडमधून सर्व प्रकारचे पेमेंट करता येणार आहे.
  • सर्वच प्रकारच्या पेमेंट्ससाठी एकच क्यूआर कोड असण्याचा हा जगातील पहिलाच क्यूआर कोड असेल.
  • सध्या वेगवेगळया पेमेंट प्रोव्हायडरचे एकाच दुकानात वेगवेगळे क्यूआर कोड असतात. उदा. सध्या पेटीएमचा व एचडीएफसीचाही क्यूआर कोड हा वेगवेगळा आहे.
  • जर एखाद्याकडे पेटीएमचे मोबाइल वॉलेट असेल तर त्याला पेटीएमचा क्यूआरकोड दाखवावा लागतो. तो क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देता येतात.
  • नव्या व्यवस्थेत दुकानदाराला वेगवेगळया कोडऐवजी एकच कोड काऊंटरवर ठेवावा लागेल. हा नवा कोड भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गर्व्हनर आर. गांधी यांनी सादर केला.
  • या नव्या व्यवस्थेत पाँईट ऑफ सेल (पॉस मशीन) मशीनची गरजच उरणार नसून, फक्त स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे देणे आणि घेणे सोपे होणार आहे.
  • हा कोड संबंधित बँकेच्या मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळू शकतो. या नव्या कोडसाठी दुकानदारांना आपल्या सध्याच्या क्यूआर कोडमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याची गरज भासणार नाही.
  • भारत क्यूआरमध्ये बँक खाते, आयएफसी कोड, यूनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि आधारची माहिती देण्याचीही सुविधा उपलब्ध असेल. यामुळे डिजिटल पेमेंट करणे आणखी सोपे जाणार आहे.
  • क्यूआर कोडने पैसे देणे इतर माध्यमांपेक्षा सुरक्षित मानले जाते. त्याचबरोबर ते अत्यंत किफायतशीरही आहे. या व्यवस्थेला ‘पुश पेमेंट’ नावानेही ओळखले जाते.
  • यामध्ये पैसे देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची जबाबदारी व्यापाऱ्याची नव्हे तर ग्राहकांची असते. त्याचबरोबर यामध्ये पिन क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती देण्याची गरज नसते.

विराट कोहलीचा पुमा कंपनीशी ११० कोटींचा करार

  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने क्रीडा साहित्य निर्मितीमध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘पुमा’ कंपनीशी ११० कोटींचा करार केला आहे.
  • एकाच कंपनीशी इतक्या मोठ्या रकमेचा करार करणारा विराट पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • ‘पुमा’ने विराटसोबत केलेला हा करार आठ वर्षांचा आहे. पुमाने याआधीही अनेक दिग्गज क्रीडापटूंसोबत करार केला आहे. या करारासोबत विराट कोहली ‘पुमा’चा ग्लोबल अॅम्बेसेडर झाला आहे.
  • गेल्या वर्षात कोहलीने ब्रॅण्डव्हॅल्यूच्या माध्यमातून ६०० कोटींची कमाई केल्याची माहिती ‘डफ अँड फेल्प्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आली होती.
  • सध्याच्या घडीला कोहली २० पेक्षा अधिक ब्रॅण्डचे प्रमोशन करत आहे. यात जिओनी, अमेरिकन टुरिस्टर अशा मोठ्या ब्रॅण्डचा समावेश आहे.

अमेरिकेत येणार नवा स्थलांतर बंदी आदेश

  • अमेरिकेत नव्याने तयार करण्यात आलेल्या स्थलांतर बंदी आदेशामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ आदेशातील सात मुस्लिमबहुल देशांतील लोकांवर अमेरिकेत येण्यास बंदी कायम ठेवली असून ज्यांच्याकडे आधीच व्हिसा आहे त्यांना अमेरिकेत येण्यास मुभा दिली आहे.
  • अमेरिकेचा व्हिसा आहे, मात्र अद्याप एकदाही अमेरिकेत गेलेले नाहीत अशांनाही सूट मिळणार आहे. त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळू शकेल. 
  • अमेरिकेतील संघराज्य न्यायालयाने ट्रम्प यांच्या मूळ स्थलांतर आणि निर्वासित बंदी आदेशांना स्थगिती दिली होती. 
  • त्या आदेशात इराण, इराक,सीरिया, येमेन, सोमालिया, सुदान व लीबिया या सात देशातील मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती.
  • आता नवीन आदेशातही या सात देशांची नावे कायम आहेत. परंतु जे ग्रीन कार्डधारक आहेत व ज्यांच्याकडे अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व आहे ते नागरिक या देशांमधील असले तरी त्यांना अमेरिकेत येण्याजाण्यास सूट देण्यात येत आहे.
  • सीरियन शरणार्थीना एकटे पाडून नवीन व्हिसा अर्जात नाकारले जाऊ नये असेही या आदेशात म्हटले आहे.
  • या प्रस्तावाचा मसुदा सध्या प्रसारित करण्यात आला असून त्यावर मते घेतल्यानंतर त्याला अंतिम रूप दिले जाईल.
  • ट्रम्प यांच्या मूळ आदेशाने खळबळ उडाली होती व जगातून त्यांच्यावर टीका झाली होती. अमेरिकेतील विमानतळांवर या आदेशाविरोधात निदर्शनेही झाली होती.

शाहिद आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

  • पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
  • शाहिदने कसोटीमधून याआधीच २०१०साली निवृत्ती जाहीर केली होती. तर २०१५साली विश्वचषक स्पर्धेनंतर शाफ्रिदीने वनडेमधूनही निवृत्ती घेतली होती. 
  • पण पाकिस्तान ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व शाहिद करत होता. २०१६साली चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर शाहिदने कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता.
  • आपल्या २१ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत आक्रमक फटकेबाजी आणि लेग स्पिनच्या जोरावर आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
  • १९९६साली आफ्रिदीने आपल्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेविरोधात ३७ चेंडूत शतक ठोकून विक्रम रचला होता.
शाहिद आफ्रिदीची कारकीर्द
कसोटी वनडे ट्वेन्टी-२०
सामने २७ ३९८ ९८
धावा ११७६ ८०६४ १४०५
विकेट्स ४८ ३९५ ९७

मिलिंद सोमणसह चार भारतीयांना अल्ट्रामॅन मॅरेथॉनमध्ये यश

  • अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने तीन दिवसांत ५१७ किमी अंतराची अल्ट्रामॅन मॅरेथॉन स्पर्धा पार केली आहे.
  • फ्लोरिडात रंगलेली मॅरेथॉन स्पर्धा जगातील सर्वात कठीण स्पर्धा आहे. तिला अल्ट्रामॅन असेही म्हटले जाते. यामध्ये पोहणे, धावणे आणि सायकलिंग असे तीन टप्पे स्पर्धकाला पार करावे लागतात.
  • तीन दिवस चालणाऱ्या अल्ट्रामॅन स्पर्धेत पहिल्या दिवशी १० किमी पोहणे आणि १४२ किमी सायकलिंग करणे, दुसऱ्या दिवशी २७६ किमी सायकलिंग तर तिसऱ्या दिवशी ८४ किमी धावावे लागते.
  • मिलिंद सोमणच्या व्यतिरिक्त अभिषेक मिश्रा, कौस्तुभ रडकर, पृथ्वीराज पाटील आणि मनमध रेबा भार्तीहे ४ भारतीयदेखील या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनीदेखील स्पर्धा पूर्ण केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा