सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचे १९ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे दीर्घ आजाराने निधन झाले.
कबीर हे सर्वोच्च न्यायालयाचे ३९वे सरन्यायाधीश होते. २०१३मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले होते.
त्यांचा जन्म २९ सप्टेंबर १९४८ मध्ये झाला होता. एलएलबी पदवी संपादन केल्यानंतर ते १९७३मध्ये कोलकाता बार असोसिएशनचे सदस्य बनले. येथून त्यांची कारकिर्द सुरु झाली.
कोलकाता उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या कबीर यांची १९९०मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
२००५ मध्ये त्यांची नियुक्ती झारखंडचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती.
कबीर यांची २९ सप्टेंबर २०१२ मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी हे पद १८ जुलै २०१३ पर्यंत भूषवले.
सरन्यायाधीश म्हणून कबीर यांची कारकीर्द विवादास्पद राहिली. कबीर यांनी जाणीवपूर्वक आपली पदोन्नती रोखल्याचा आरोप गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भास्कर भट्टाचार्य यांनी मागे केला होता.
सहारा-सेबी प्रकरणाची सुनावणी ज्या पीठासमोर सुरू होती, त्यात कबीर यांनी बदल करून ती आपल्या हातात घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.
रोख दागिने खरेदीवर आता १ टक्का टीसीएस
१ एप्रिलपासून २ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख दागिने खरेदीवर आता १ टक्का टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स) द्यावा लागणार आहे.
प्राप्तीकर कायद्यातील तरतुदीनुसार वस्तू व सेवांसाठीच्या २ लाखांवरील रोखीतील व्यवहारावर १ टक्का टीसीएस आकारला जातो.
आर्थिक विधेयक २०१७मंजूर झाल्यानंतर दागिनेही सामान्य वस्तूंच्या यादीत येणार आहेत. त्यामुळे यावरही १ टक्का कर द्यावा लागणार आहे.
सध्या दागिन्यांच्या ५ लाखांवरील खरेदीवर टीसीएस लागू होतो. ही मर्यादा आता दोन लाखांवर आणण्यात येणार आहे.
रोखीतील मोठ्या व्यवहारातून काळ्या पैशांची देवाणघेवाण रोखण्यासाठी सरकारद्वारे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
२०१७-१८च्या अर्थसंकल्पात तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या नगदी व्यवहारांवरही प्रतिबंध आणले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्या व नगदी रक्कम स्वीकारणाऱ्या व्यक्तीला तितक्याच रकमेचा दंड देण्याची तरतूद आहे.
आयकर विभाग १ जुलै २०१२ पासूनच सोन्याच्या दोन लाखांवरील आणि दागिन्यांच्या पाच लाखांवरील रोखीतील खरेदीवर एक टक्का टीसीएस आकारत आहे.
सुरेंद्र वर्मा यांना व्यास सन्मान जाहीर
हिंदी भाषेतील नामवंत साहित्यिक सुरेंद्र वर्मा यांना बिर्ला फाऊंडेशनचा व्यास सन्मान जाहीर झाला आहे.
२०१०मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘काटना शमी का वृक्ष- पद्म पंखुरी के धार से’ या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
१९४१मध्ये उत्तर प्रदेशातील झांशी येथे जन्मलेल्या सुरेंद्र वर्मा यांचे ‘सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहली किरण तक’ हे पहिले नाटक होते. सहा भाषांत त्याचे भाषांतर झाले आहे.
कथा, नाटके, कादंबऱ्या, समीक्षा अशा प्रकारांत त्यांनी मुझे चांद चाहिए, आठवा सर्ग, कैद ए हयात अशी किमान पंधरा पुस्तके लिहिली आहेत.
त्यांना १९९३मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तर १९९६मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
त्यांच्या रति का कंगन नाटकामध्ये त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक माध्यमातून कामचेतना नाटय़प्रसंगातून दाखवताना विवाहामुळे आलेल्या कामसंबंधाच्या मर्यादा तोडल्या आहेत.
त्यांच्या नाटक व कादंबऱ्यांतील या वर्णनावर प्रच्छन्न टीका झाली असली तरी त्यांनी त्यातून जी रंगभाषा निर्माण केली ती कुणालाही निर्माण करता आली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा