देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर आणि पुणे यांच्यासह एकूण सतरा शहरांचा समावेश आहे.
२०११ ते २०१५ दरम्यानच्या कालावधीमध्ये केलेले सर्वेक्षण आणि चाचण्यांमधून राज्यातील सतरा शहरांमधील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर (पीएम १०) या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा किती तरी अधिक असल्याचे आढळून आले आहे.
याशिवाय पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये पीएम १० बरोबरच नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ२) याही प्रदूषक घटकाची पातळी प्रमाणापेक्षा अधिक आहे.
केंद्रीय प्रदूषण नियत्रंण मंडळाने हे सर्वेक्षण केले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी पावले टाकण्याच्या सूचना या शहरांना करण्यात आल्या आहेत.
केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’चे वार्षिक सरासरी प्रमाण ६० आणि नायट्रोजन डॉयऑक्साइडचे वार्षिक सरासरी प्रमाण ४०पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहरे म्हटले जाते.
राज्यातील सतरा शहरांमध्ये २०११ ते २०१५ या कालावधीमध्ये पीएम १० आणि एनओ२चे प्रमाण सातत्याने या पातळीपेक्षा अधिक राहिले आहे.
भारतासाठी मायक्रोसॉफ्टचे स्काईप लाईट व प्रोजेक्ट संगम उपक्रम
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी भारतीयांसाठी आधारशी संलग्न स्काईप लाईट सेवा तसेच प्रोजेक्ट संगम हा उपक्रम सुरु करण्याची घोषणा केली आहे.
नाडेला यांनी भारतातील कंपन्यांसाठी क्लाऊड कॉम्प्यूटींग सुविधेची माहिती दिली. याशिवाय भारतासाठी लिंक्डइन लाईट हे व्हर्जनही सुरु केले जाणार असल्याची माहिती दिली.
नाडेला यांनी ९९ डॉट्स या उपक्रमाचीही माहिती दिली. या उपक्रमामुळे डॉक्टरांना क्षयरोग झालेल्या रुग्णांशी संवाद साधणे सोपे झाल्याचे ते म्हणालेत.
मायक्रोसॉफ्टने मध्यम आणि लघु उद्योग तसेच सरकारी कामकाजांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे.
या कार्यक्रमांतर्गत कंपन्यांच्या समस्यांपासून ते सामाजिक समस्यांपर्यंत सर्वावर तंत्रज्ञानाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिरुपती मंदिरातील वेंकटेश्वराच्या चरणी साडेपाच कोटींचे दागिने अर्पण केल्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.
तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी चंद्रशेखर राव यांनी तिरुपतीच्या मंदिरात नवस बोलला होता.
राव यांनी वेंकटेश्वराला अर्पण केलेल्या दागिन्यांच्या यादीत शालिग्राम हार आणि मखर कंठाभरणम या बहुपदरी हाराचा समावेश आहे. बालाजी आणि पद्मावती यांच्यासाठी हे दागिने दिले आहेत.
या सर्व दागिन्यांचे वजन अंदाजे १९ किलो इतके आहे. या सगळ्या अलंकारांची किंमत सुमारे पाच कोटी आहे.
जून २०१४ मध्ये आंध्रप्रदेशपासून तेलंगणा वेगळे झाल्यानंतर चंद्रशेखर राव यांनी पहिल्यांदाच तिरुपती बालाजी देवस्थानाला भेट दिली आहे.
आपले वैयक्तिक नवस पुर्ण करण्यासाठी सार्वजनिक निधीमधील पैशाचा अपव्यय केला जात असल्याची टीका राव यांच्यावर होत आहे.
ऑक्टोबर २०१६मध्ये चंद्रशेखर राव यांनी वारंगल येथील भद्रकाली मंदिरात ११ किलोचा सोन्याचा मुकूट भेट दिला होता. ज्याची किंमत ३.५ कोटी रुपये होती.
तसेच यापूर्वी चंद्रशेखर राव यांच्यासाठी तैनात करण्यात आलेली कडेकोट सुरक्षाव्यवस्था अनेकदा चर्चेचा विषय ठरली होती.
हैदराबादच्या बेगमपेठ येथे एक लाख चौरस फुटांवर राव यांच्यासाठी भक्कम तटबंदी असलेला राजप्रासाद बांधण्यात आला होता.
या घरात राव यांच्यासाठी बुलेटप्रुफ बाथरूमही उभारण्यात आले होते. याशिवाय, घराच्या सर्व खिडक्या व व्हेंटिलेटर्स यांच्यावर बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या आहेत.
राज्याच्या सुरक्षा यंत्रणांकडून सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार ही व्यवस्था करण्यात आली होती.
या सगळ्यासाठी काही लाख रूपयांची रक्कम खर्ची पडली होती. मात्र, तेलंगण पोलिसांकडून राव यांच्या सुरक्षाव्यवस्थेचे समर्थन करण्यात आले होते.
दहशतवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी फ्रान्सची गरुडसेना
दहशतवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी फ्रान्सच्या लष्कराने गरुडांना प्रशिक्षण दिले आहे. अर्टाग्नन, अथोस, पोर्थोस आणि अरामीस अशी या चार गरुडांची नावे आहेत.
गेल्या वर्षभरात या गरुडांच्या पथकाने दहशतवाद्यांचे अनेक ड्रोन नष्ट केले आहेत.
प्रशिक्षण दिलेले गरुडांचे पथक जेव्हा आकाशात झेपावते, तेव्हा फ्रान्सच्या लष्कराकडून संपूर्ण मोहिमेवर नियंत्रण मनोऱ्यातून लक्ष ठेवण्यात येते.
करण्यात आलेले गरुडांचे पथक २० सेकंदांमध्ये २०० मीटर अंतर कापते. फ्रान्सच्या हवाई दलाकडून गरुडांच्या सर्व मोहिमांवर बारिक लक्ष ठेवले जाते.
मागील वर्षी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर फ्रान्सच्या लष्कराने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
आकाशात उडणारे ड्रोन टिपणे आणि त्यातही ते जास्त लोकसंख्या असलेल्या भागात टिपणे कठीण असते. त्यामुळे फ्रान्सच्या लष्कराने यासाठी गरुडांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा