राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणने (एनटीसीए) बीबीसी नेटवर्कवर आणि त्यांचा पत्रकार जस्टिन रॉलेटवर देशातील सर्व व्याघ्र अभयारण्यात प्रवेश करण्यास पाच वर्षांची बंदी घातली आहे.
शिकाऱ्यांविरोधात उचललेल्या पावलांविरोधात प्रश्नचिन्ह निर्माण करणारा बीबीसीचा माहितीपट समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
बीबीसीचे दक्षिण आशिया प्रतिनिधी असलेले रॉलेट यांनी आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात गेंड्यावर ‘वन वर्ल्ड: किलिंग फॉर कंजर्व्हेशन’ नावाने एक माहितीपट बनवला होता.
यामध्ये गेंड्यांच्या संवर्धनासाठी शिकाऱ्यांविरोधात अवलंबवण्यात येणाऱ्या कठोर कारवाईवर शंका उपस्थित करण्यात आली होती.
जर अभयारण्यात कोणी गेंड्याला नुकसान पोहोचवताना दिसला तर त्याला गोळी मारण्याचे अधिकार फॉरेस्ट गार्डला देण्यात आल्याचा दावा या माहितीपटात करण्यात आला आहे.
फॉरेस्ट अधिकाऱ्याला मिळालेल्या या अधिकारामुळे जंगलात गेंड्यापेक्षा मनुष्यच जास्त मारले गेल्याचा दावा रॉलेटने माहितीपटात केला होता.
गेल्यावर्षी १७ गेंड्यांची हत्या झाली पण २३ लोकही मारले गेल्याचे त्यांनी म्हटले. या माहितीपटात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयावर टीका करण्यात आली आहे.
मात्र काझिरंगा व्याघ्र अभयारण्याच्या संचालकांनी गोळी मारण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे म्हटले आहे.
तसेच बीबीसीने जुने फुटे्ज आणि मुलाखतीत नाटकीय बदल करून ते चुकीच्या पद्धतीने ते दाखवले आहे असाही दावा त्यांनी केला आहे.
बीबीसी आणि जस्टिन रॉलेट यांनी पर्यावरण मंत्रालयाला न दाखवता या माहितीपटाचे प्रसारण केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत जितू रायला कांस्यपदक
दिल्लीत सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत नेमबाज जितू रायने १० मी एअर पिस्तुलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताचे हे तिसरे पदक ठरले.
जितू रायने २१६.७ गुणांसह स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. व्हिएतनामचा सुआन विन होआंग २३६.६ गुणांसह रौप्य पदकाचा तर जपानचा टोमोयुकी मत्सुदा २४०.१ गुणांसह सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
भारताकडून जितूसह ओमकार सिंग आणि अमनप्रीत सिंग देखील स्पर्धेत सहभागी होते. मात्र, त्यांना पहिल्या आठ खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त करण्यात अपयश आले.
जितू रायने २७ फेब्रुवारी रोजी महिला नेमबाज हिना सिंधू हिच्यासोबत मिश्र प्रकारातील १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम लढतीत जपानच्या जोडीचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
तसेच भारताच्या अंकुर मित्तलने मॅरेथॉन डबल ट्रॅप फायनलमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. सुवर्णपदकविजेता ऑस्ट्रेलियाच्या जेम्स विलेटच्या तुलनेत तो एका गुणाने पिछाडीवर होता.
सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा
राजिंदर गोयल, पद्माकर शिवलकर आणि शांता रंगास्वामी या दिग्गजांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये दिमाखदार कारकीर्द घडवणाऱ्या राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर या दोन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांचा भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मात्र मिळाली नाही.
मुंबईसाठी खेळताना शिवलकर यांनी १२४ सामन्यांमध्ये ५८९ बळी मिळवले. प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी ४२ वेळा डावात पाच बळी घेण्याची तर १३ वेळा सामन्यात १० बळी घेण्याची किमया साधली.
हरयाणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोयल यांच्या नावावर ७५० बळी आहेत. यापैकी ६३७ रणजी क्रिकेट स्पर्धेत आहेत. रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळींचा विक्रम आजही गोएल यांच्याच नावावर आहे.
गोयल यांनी कारकिर्दीत ५९ वेळा डावात पाच किंवा त्याहून अधिक गडी बाद केले. त्याचबरोबर १८वेळा त्यांनी दहा किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले.
या दोघांच्या बरोबरीने सन्मानित करण्यात येणाऱ्या माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी या पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी १२ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामन्यांत भारताचे नेतृत्व केले.
त्याचबरोबर भारतीय क्रिकेटला दिलेल्या अमूल्य योगदानासाठी वामन कुमार आणि (दिवंगत) रमाकांत देसाई यांना बीसीसीआयतर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
एन. राम, रामचंद्र गुहा आणि डायना एडल्जी यांचा समावेश असलेल्या समितीने या सर्व पुरस्कार्थीची निवड केली आहे.
विराट कोहलीला वर्षांतील सर्वोत्तम कर्णधाराचा पुरस्कार
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची १०व्या ईएसपीएन क्रिकइन्फो वार्षिक पुरस्कारांमध्ये वर्षांतील सर्वोत्तम कर्णधार या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
मागील वर्षांत कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताने १२ कसोटी सामन्यांपैकी ९ सामने जिंकण्याची किमया साधली असल्यामुळे त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
इंग्लंडच्या बेन स्टोक्सने सर्वोत्तम कसोटी फलंदाजाचा पुरस्कार पटकावला आहे. तर इंग्लंडच्याच स्टुअर्ट ब्रॉडने सर्वोत्तम कसोटी गोलंदाजाचा पुरस्कार मिळवला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकची सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज या पुरस्कारासाठी निवड झाली. तर वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरिन सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाज ठरला.
विंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटला सर्वोत्तम ट्वेन्टी-२० फलंदाजाचा व बांगलादेशच्या मुस्ताफिझूर रेहमानला सर्वोत्तम ट्वेन्टी-२० गोलंदाजाचा पुरस्कार जाहीर झाला.
सिमीच्या कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा
बंदी घातलेल्या सिमी संघटनेचा प्रमुख सफदर हुसेन नागोरी याच्यासह अन्य १० जणांना इंदोर येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सिमीच्या कार्यकर्त्यांना भारतीय दंडसंहितेअंतर्गत देशद्रोह आणि धर्माच्या नावावर दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे तसेच बेकायदा कृत्य (प्रतिबंधक) कायदा या अंतर्गत दोषी ठरवले.
या ११ दोषींपैकी १० गुजरातमधील साबरमती तुरुंगात असून त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाचा आदेश कळवण्यात आला.
सन २००८मध्ये देशद्रोहाच्या एका खटल्यात ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा