चालू घडामोडी : २७ फेब्रुवारी

यूपीएससीची गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी भरती

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून केंद्र सरकार यावर्षी फक्त ९८० अधिकाऱ्यांची भरती करणार आहे. मागील पाच वर्षातील ही सर्वात कमी संख्या आहे.
  • भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलिस सेवासारख्या (आयपीएस) इत्यादी प्रतिष्ठित सेवांमध्ये ही भरती करण्यात येईल.
  • वर्ष २०१६मध्ये १०७९ तर २०१५मध्ये ११६४ पदांच्या भरतीच्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर २०१४ आणि २०१३मध्ये अनुक्रमे १३६४ आणि १२२८ अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली होती.
  • २०१७मध्ये लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या ही ९८० इतकी आहे. यातील २७ पदे हे दिव्यांग श्रेणीसाठी आरक्षित असतील.
  • यावर्षीची पूर्व परीक्षा ही १८ जून रोजी होईल. ही पूर्व परीक्षा देण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १८ मार्चपर्यंत आहे.

भारताचा ट्रॉपेक्स युद्धसराव

  • भारतीय नौदलाने अरबी समुद्र आणि उत्तर मध्य हिंदी महासागर अशा विस्तीर्ण टापूमध्ये ‘थिएटर लेव्हल रेडिनेस अँड ऑपरेशनल एक्झरसाइज’ (ट्रॉपेक्स) या मोठ्या युद्धसरावाचे आयोजन केले होते.
  • लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल यांनी संयुक्तपणे युद्धसरावात भाग घेऊन युद्धाच्या तयारीची चाचपणी केली.
  • २३ जानेवारी ते २३ फेब्रुवारीपर्यंत हा युद्धसराव चालला होता. संभाव्य धोक्यांना सामोरे जाता यावे, याकरिता सुरक्षा दलांच्या युद्धाच्या तयारीची चाचणी या सरावाद्वारे करण्यात आली.
  • या युद्धसरावात आण्विक पाणबुडी ‘चक्र’, आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू नौका, सुखोई-३०, जॅग्वार अशा देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या सामरिक आयुधांनी सहभाग घेतला होता.
  • याशिवाय या युद्धसरावात पश्चिम आणि पूर्व नौदल कमांडच्या ४५हून अधिक नौका, पाच पाणबुड्या, नौदलाची ५० लढाऊ विमाने, तटरक्षक दलाच्या ११ नौका, हवाई दलाची २० लढाऊ विमानेही सहभागी झाली होती.

जितू राय आणि हिना सिंधू या जोडीला सुवर्णपदक

  • दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत जितू राय आणि हिना सिंधू या जोडीने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
  • जितू राय आणि हिना सिंधू यांनी मिश्र प्रकारातील १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम लढतीत जपानच्या जोडीचा पराभव केला.
  • मात्र, मिश्र प्रकार प्रायोगिक तत्त्वावर खेळवण्यात येत असल्याने या दोन्ही खेळाडूंच्या गुणांमध्ये त्यामुळे कोणताही फरक पडणार नाही.
  • काही दिवसांपूर्वी भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकाराऐवजी मिश्र लढती आयोजित करण्याची सूचना केली होती.
  • या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात प्रायोगिक तत्वावर मिश्र लढती खेळविण्यात येत आहेत.
  • आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या मान्यतेनंतर हा बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे सादर होईल.
  • ऑलिम्पिक समितीने मंजुरी दिल्यास २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५० मी. पिस्तूल, ५० मीटर रायफल प्रोन आणि डबल ट्रॅप प्रकारात फक्त पुरुषांसाठीच्या लढती न होता मिश्र प्रकारातही लढती होतील.

हरिकाला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक

  • भारताची ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाला सलग तिसऱ्यांदा महिला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • उपांत्य टायब्रेकर लढतीत चीनच्या टॅन झोंगयीला सरस वेळेच्या जोरावर विजयी घोषित करण्यात आले. अंतिम फेरीत टॅनसमोर युक्रेनच्या अ‍ॅना मुझीचुकचे आव्हान आहे.
  • हरिकाने टायब्रेकरमध्ये पहिल्या डावात विजयाने सुरुवात केली होती. तिने फक्त १७व्या चालीतच विजय नोंदवला होता.
  • मात्र, दुसऱ्या डावात हरिकाकडून झालेल्या चुकांचा फायदा टॅनने उचलला आणि विजयासह १-१ अशी बरोबरी साधली.
  • त्यानंतर बिल्ट्स गेममध्ये झ्योंगीने हरिकाला ५ -४ ने पराभूत केले. हरिकाचे या स्पर्धेतील हे तिसरे कांस्य पदक आहे. तिने २०१२ आणि २०१५मध्ये कांस्यपदकाची कमाई केली.

एफडीआयमध्ये १८ टक्क्यांची वाढ

  • देशात २०१६मध्ये थेट विदेशी गुंतवणूक १८ टक्क्यांनी वाढून ४६ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. आधीच्या वर्षांत ती ३९.३२ अब्ज डॉलर होती.
  • भारतातील सेवा, दूरसंचार, व्यापार, माहिती तंत्रज्ञान, वाहन क्षेत्राला विदेशी गुंतवणूकदारांनी पसंती दिल्याने यंदा थेट विदेशी गुंतवणूक वाढली आहे.
  • थेट विदेशी गुंतवणुकीबाबतचे काही नियम केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये शिथिल केले आहेत.
  • त्यामुळे सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड, जपान आदी देशांतून जास्त विदेशी निधीचा ओघ आला आहे.
  • २०१६ मध्ये ऑक्टोबर महिन्यात थेट विदेशी गुंतवणूक सर्वाधिक, तर मेमध्ये ती वर्षांतील किमान राहिली आहे.

मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर

  • न्यू वर्ल्ड वेल्थच्या ने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे. संपत्तीमध्ये मुंबई पाठोपाठ दिल्ली दुसऱ्या तर, बंगळुरु तिसऱ्या स्थानावर आहे.
  • सध्याच्या घडीला मुंबईमध्ये ८२० अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती आहे. मुंबईमध्ये ४६ हजार कोटयधीश आणि २८ अब्जाधीश राहतात.
  • दिल्लीची एकूण संपत्ती ४५० अब्ज डॉलर असून, २३ हजार कोटयधीश आणि १८ अब्जाधीश दिल्लीमध्ये राहतात.
  • बंगळुरुची एकूण संपत्ती ३२० अब्ज डॉलर्स असून बंगळुरुमध्ये ७,७०० कोटयधीश आणि ८ अब्जाधीश राहतात.
  • त्याखालोखाल या यादीमध्ये हैदराबाद (३१० अब्ज डॉलर), कोलकाता (२९० अब्ज डॉलर), पुणे (१८० अब्ज डॉलर), चेन्नई (१५० अब्ज डॉलर) व गुरगाव (११० अब्ज डॉलर) या शहरांचाही समावेश आहे.
  • डिसेंबर २०१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एकूण २.६४ लाख कोटयधीश आणि ९५ अब्जाधीश असून देशातील एकूण संपत्ती ६.२ लाख कोटी डॉलर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा