राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयडीएफसी लिमिडेटचे अध्यक्ष विक्रम लिमये यांची नियुक्ती झाली आहे.
एनएसईच्या पहिल्या महिला अध्यक्षा चित्रा रामकृष्ण यांनी कार्यकाल पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिल्यानंतर २ डिसेंबर २०१६पासून हे पद रिक्त होते.
अशोक चावला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बाजाराच्या संचालक मंडळात लिमये यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीला बाजार नियामक सेबीची मंजुरी प्रतिक्षित आहे.
नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळातील एक सदस्य म्हणून लिमये यांची नियुक्ती झाली. कॅगचे माजी प्रमुख विनोद राय हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
स्थावर मालमत्ता क्षेत्रातील आघाडीची वित्त पुरवठादार कंपनी असलेल्या आयडीएफसी लिमिटेडचे विक्रम लिमये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या लिमये यांनी वित्त आणि बहु व्यवस्थापन विषयातील व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहेत.
'विस्डेन'च्या मुखपृष्ठावर विराट कोहली
भारतीय कसोटी, एकदिवसीय व टी-२० क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहलीला क्रिकेटचा धर्मग्रंथ मानल्या जाणाऱ्या 'विस्डेन'च्या वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान मिळाला आहे.
ख्रिसमसपूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विराटने द्विशतक ठोठावले आणि करीअरमधील सर्वोच्च धावसंख्याही (२३५) नोंदवली होती.
विस्डेनचा २०१७चा अंक एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार असून अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 'विस्डेन'ने अंकाचे मुखपृष्ठ ट्विट केले आहे.
विस्डेनच्या अंकात झळकण्याचा मान मिळवणारा विराट हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी २०१४साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विस्डेनच्या मुखपृष्ठावर झळकला होता.
नोव्हेंबर २०१३मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ‘विस्डेन’ने कव्हर फोटोतून त्याच्या कारकिर्दीला सलाम केला होता.
भारतीय वंशाच्या लेखिका भारती मुखर्जी यांचे निधन
‘द मिडलमन अॅण्ड अदर स्टोरीज’ या कादंबरीच्या भारतीय वंशाच्या अमेरिकी लेखिका भारती मुखर्जी यांचे २८ जानेवारी रोजी निधन झाले.
त्यांचा जन्म २७ जुलै १९४० रोजी कोलकात्यामध्ये झाला. अमेरिकेत त्यांनी सर्जनशील लेखनात पदवी घेतली होती व अनेक वर्षे कॅनडात राहात होत्या.
कॅलिफोर्नियाच्या बर्कले विद्यापीठात त्या इंग्रजीच्या मानद प्राध्यापक होत्या. स्थलांतरितांचे संपन्न अनुभव व त्यातील विविधता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.
त्यांच्या ‘द मिडलमन अॅण्ड द अदर स्टोरीज’ या कादंबरीला नॅशनल बुक क्रिटिक सर्कल पुरस्कार मिळाला होता. तिला स्थलांतरितांवर बेतलेल्या पात्रांचा साज होता.
त्यांची ‘जस्मीन’ ही कादंबरी सर्वाधिक गाजलेली होती. या कादंबरीला शाळा, महाविद्यालयांच्या वाचनप्रिय पुस्तकात लगेच स्थान मिळाले.
भारती मुखर्जी यांनी आयोवात डॉक्टरेट केली. ‘अॅन इनव्हिजिबल वुमन’ हा सॅटर्डे नाइट या नियतकालिकातील त्यांचा निबंध गाजला होता.
‘द टायगर्स डॉटर’ ही त्यांची आत्मचरित्रात्मक कहाणी आहे. याशिवाय होल्डर ऑफ द वर्ल्ड, डिझायरेबल डॉटर्स, द ट्री ब्राइड, मिस न्यू इंडिया या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या.
भारती मुखर्जी यांची साहित्यसंपदा
दि टायगर्स डॉटर
वाइफ
डिजायरेबल डॉटर्स
दि होल्डर ऑफ द वर्ल्ड
डार्कनेस
दि ट्री ब्राइड
दुसरे घर खरेदी करणाऱ्यांना करात सवलत नाही
दुसरे घर खरेदी करणाऱ्यांना करात वर्षाला २ लाख रुपयांची सूट देण्याचा प्रस्ताव मागे घेण्यास सरकारने ठामपणे नकार दिला आहे.
दुसऱ्या घरासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात मिळालेल्या सवलतीचा अनेकदा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे.
त्याशिवाय पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना करसवलत देण्यास प्राधान्य मिळायला हवे. याउलट दुसरे घर घेणाऱ्यांना अशा प्रकारची करसवलत देणे योग्य नाही, असेही सरकारचे म्हणणे आहे.
सध्याच्या नियमानुसार, घरमालक भाड्याने दिलेल्या घरावर अथवा मालमत्तेवरील व्याजावर पूर्ण कपातीचा दावा सांगू शकतात.
तर आपल्या राहत्या घरावरील कर्जाच्या व्याजदरामुळे ते २ लाखापर्यंतची करसवलत घेऊ शकतात.
मात्र, अर्थमंत्र्यांनी अलीकडेच सादर केलेल्या प्रस्तावात घर भाड्याने दिले तरी, मालक केवळ २ लाखापर्यंतच्या करसवलतीसाठीच दावा करू शकतो.
त्यामुळे दुसऱ्या घराच्या कर्जावरील व्याजात करसवलत मिळवण्यासाठी आता ते अर्ज करू शकणार नाहीत.
गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या दंगलीतील सर्वच्या सर्व म्हणजे २८ आरोपींची गांधीनगर न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी ३१ जानेवारी रोजी निर्दोष मुक्तता केली.
गोध्रा रेल्वे स्थानकांत झालेल्या जळीतकांडानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारी २००२ रोजी घडलेल्या हिंसाचाराबाबत आरोपींवर आरोप ठेवण्यात आले होते.
गांधीनगर जिल्ह्यातील कलोल तालुक्यातील पालियाड गावात जाळपोळ, दंगल माजविणे आणि अल्पसंख्याक समाजाच्या मालमत्तेचे नुकसान करणे आदी आरोप या २८ जणांवर होते.
या प्रकरणातील साक्षीदारांनी आरोपींना ओळखण्यास असमर्थता दर्शविल्याने या आरोपींविरुद्ध पुरेसा सबळ पुरावा नसल्याचे कारण या आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
गोध्रा रेल्वे स्थानकात साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ या डब्याला २७ फेब्रुवारी २००२ रोजी लावण्यात आलेल्या आगीत जवळपास ५८ जण मृत्युमुखी पडले होते.
त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत मुख्यत्वे अल्पसंख्य समाजातील जवळपास एक हजार जण ठार झाले होते.
हाफिज सईदच्या जमात उद दवाचे नामांतर
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने आपल्या जमात उद दवा या संघटनेचे ‘तेहरीक आझादी जम्मू अॅंड काश्मीर’ असे नामांतर केले आहे.
पाकिस्तान सरकारने त्याला नजरकैदेत ठेवल्यानंतर जमात उद दवाचे जाळे पाकिस्तानमध्ये अबाधित राखण्यासाठी त्याने असे नामांतर केल्याची शक्यता आहे.
हाफिज सईद याच्यावर पाकिस्तान सरकारने परदेश प्रवास करण्यास निर्बंध घातले आहेत. काही दिवसांपासून त्याला नजरकैदेतही ठेवण्यात आले आहे.
५ फेब्रुवारी रोजी काश्मीर दिवस आहे. या दिवशी लाहोर आणि पाकिस्तानातील इतर शहरांमध्ये सईदच्या नव्या संघटनेच्या नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या नव्या संघटनेच्या माध्यमातून निधी गोळा करण्याची केंद्रे उभारण्यात आली आहेत तसेच रुग्णवाहिकांची सेवादेखील सुरू करण्यात आली आहे.
सईदच्या कारवायांचा दाखला देऊन भारत पाकिस्तानची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा