भारतीय गोलंदाज आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने २५० बळी घेण्याचा डेनिस लिली यांच्या नावे असलेला विक्रम मोडला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली यांना हा टप्पा गाठण्यासाठी ४८ कसोटी सामने खेळावे लागले होते. १९८१मध्ये त्यांनी हा विक्रम रचला होता.
अश्विनने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहिमला बाद करत ४५व्या कसोटीत २५० बळी घेत नवीन विक्रम केला.
२०१६ हे वर्ष अश्विनसाठी लाभदायी ठरले होते. ११ सामन्यांमध्ये त्याने ७१ विकेट घेतल्या होत्या.
याशिवाय अश्विनला आयसीसीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू व कसोटीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पुरस्कार देखील मिळाले.
सर्वाधिक वेळा मालिकावीर होण्याचा विरेंद्र सेहवागचा विक्रम देखील अश्विनने याच वर्षी मोडला.
कसोटी क्रिकेटमध्ये जलद २०० गडी बाद करण्याचा विक्रमही अश्विनच्या नावावर आहे. त्याने ३७ कसोटींत अशी कामगिरी करताना पाकिस्तानच्या वकार युनूसचा विक्रम मोडला होता.
भारताने पुन्हा जिंकला टी-२० विश्वचषक
दृष्टिहीनांच्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत भारताने टी-२० विश्वचषकावर नाव कोरले.
चिन्नास्वामी स्टेडियमवरील अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ९ गडी राखून विजय मिळवत गतवेळच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाने विजेतेपद राखले.
याआधीच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारताने पाकिस्तानचाच पराभव केला होता.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने ९ बाद १९७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानचे हे आव्हान भारताने १८ षटकात पार केले.
त्यामुळे आता दृष्टिहिनांचा वनडे वर्ल्ड कप, टी-२० आशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कप या सर्व स्पर्धांची विजेतीपदे भारतीय संघाकडे आहेत.
भारताने या स्पर्धेतील नऊ पैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला. भारताने पाकिस्तानविरुद्ध एकमेव सामना गमावला. तर पाकिस्तानने नऊ पैकी नऊ सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली होती.
पुण्यातील आलोक राजवाडे फोर्ब्ज यादीत
पुण्यातील युवा रंगकर्मी आणि प्रयोगशील अभिनेता-दिग्दर्शक आलोक राजवाडे याचे नाव प्रतिष्ठेच्या ‘फोर्ब्ज इंडिया’ मासिकात झळकले आहे.
‘फोर्ब्ज इंडिया थर्टी अंडर थर्टी’ अंतर्गत जगभरात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत ‘आश्वासक ३०’ युवक-युवतींना या विशेष यादीमध्ये स्थान देण्यात येते.
त्यामध्ये २७ वर्षीय आलोकचा समावेश झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी पुणेकर तरुण ‘फोर्ब्ज’मध्ये झळकला आहे.
देशातील युवा प्रतिभावान व आश्वासक युवकांच्या यादीमध्ये गेल्यावर्षी पुण्यातील तरुण रंगकर्मी निपुण धर्माधिकारी याचा समावेश झाला होता.
संगीत, क्रीडा, रंगभूमी, ई-कॉमर्स, साहित्य, कायदा अशा विविध क्षेत्रातील ३० वर्षांखालील युवकांचा या यादीमध्ये समावेश असतो.
पुरुषोत्तम स्पर्धा, आसक्त व नाटक कंपनी या संस्थांच्या माध्यमातून आलोक प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहे.
‘सायकल’ या एकांकिकेसह गेली एकवीस वर्षे, आषाढस्य प्रथम दिवसे ही नाटके तसेच ‘विहीर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचे कौतुक झाले आहे. ‘मी गालिब’ या नाटकातून त्याने दिग्दर्शनातही पाऊल टाकले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा