भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांची देशाचे १३वे उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे.
व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला.
विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपल्यानंतर ११ ऑगस्टला व्यंकय्या नायडू हे देशाचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील.
उपराष्ट्रपतिपदासाठी लोकसभा व राज्यसभेचे खासदार मतदान करीत असतात. या निवडणुकीत ७९० मतदार होते.
विजयासाठी ३९६ मतांची आवश्यकता असताना नायडू यांना ५१६ मते (६८ टक्के) मिळाली असून गांधी यांना २४४ मते (३२ टक्के) मिळाली.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या बिजू जनता दल व संयुक्त जनता दलाने उपराष्ट्रपतिपदासाठी गांधी यांना पाठिंबा दिला होता.
महात्मा गांधीजींचे नातू असलेले डॉ. गोपाळकृष्ण गांधी हे पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत.
निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी डॉ. राजीव कुमार
मोदी सरकारने नियोजन आयोग बरखास्त करून स्थापलेल्या निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली.
तर दिल्लीतील एम्समधील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद पॉल यांची निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष डॉ. अरविंद पानगढिया ३१ ऑगस्ट रोजी पदभार सोडतील. त्यानंतर डॉ. राजीव कुमार निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी रुजू होतील.
नोटाबंदी, कृषी, आरोग्य आदी क्षेत्रांतील सुधारणांवरुन मोदी सरकारमधील धुरिणांशी मतभेद झाल्यानंतर पानगढिया यांनी १ ऑगस्ट रोजी पदाचा राजीनामा दिला होता.
बंगळुरुमध्ये देशातील पहिली हेलिटॅक्सी
बंगळुरुमध्ये विमानप्रवाशांसाठी प्रथमच हेलिकॉप्टर टॅक्सी सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील प्रवाशांना १५ मिनिटांमध्ये विमानतळावर ये-जा करणे शक्य होणार आहे.
बंगळुरुची लोकसंख्या सुमारे १ कोटी इतकी असून या शहरामध्ये ६९ लाख वाहने आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक ३ व्यक्तींच्या मागे २ दुचाकी आहेत. त्यामुळे या शहरामध्ये सतत वाहतूक कोंडी असते.
मेट्रोचे जाळे अद्याप पुरेसे पसरलेले नसल्यामुळे आजही बंगळुरुच्या नागरिकांना रस्तेवाहतुकीवरच भर द्यावा लागतो.
इलेक्ट्रॉनिक सिटीमधील रहिवाशांना या सुविधेचा लाभ होणार आहे. इलेक्ट्रॉनिक सिटी आणि विमानतळ यांच्यामधील अंतर ५५ किमी असून, प्रवाशांना ते अंतर पार करण्यासाठी २ तास प्रवास करावा लागतो.
बंगळुरुमधील एचएएल विमानतळ, व्हाईटफिल्ड एअरपोर्ट येथे हे हेलिकॉप्टर उतरू शकेल. त्याचप्रमाणे ज्या इमारतींवर हेलिपॅड आहे अशा ९० इमारतींवर हे हेलिकॉप्टर उतरू शकेल.
सध्या ही सेवा थुम्बे एव्हिएशन कंपनीतर्फे सुरु होत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकावेळेस ६ प्रवासी प्रवास करु शकतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा