चालू घडामोडी : १७ ऑगस्ट

अमेरिकेकडून हिज्बुल दहशतवादी संघटना घोषित

  • काश्मीरमध्ये सातत्याने भारतविरोधी कारवाया करणारी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनचा समावेश अमेरिकेने आपल्या परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत केला आहे.
  • त्याबरोबरच या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत अमेरिकेने तिच्यावर बंदी घातली आहे.
  • दहशतवादी संघटनांच्या मदतीने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना या कारवाईमुळे धक्का बसला आहे.  
  • अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केल्यामुळे अमेरिकेतील संघटनेच्या सर्व संपत्तीवर टाच येणार आहे.
  • तसेच या दहशतवादी संघटनेसोबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यात येऊ नयेत, असे निर्देश अमेरिकी नागरिकांना देण्यात येतील.
  • त्यामुळे हिज्बुलच्या सर्व हालचालींवर आता निर्बंध येणार आहेत. याशिवाय या दहशतवादी संघटनेत कोणालाही सामीलदेखील होता येणार नाही.
  • यापूर्वी अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते.
  • १९८९मध्ये स्थापन झालेली हिज्बुल मुजाहिद्दीनचा ही दहशतवादी संघटना अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करते आहे.
  • या संघटनेने एप्रिल २०१४मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यात १७ लोक जखमी झाले होते.

मलालाला ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश

  • पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाईला ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे.
  • ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत मलाला युसुफजाई तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करणार आहे.
  • मलाला युसुफजाई हिच्यावर ऑक्टोबर २०१२मध्ये पाकिस्तानात तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता.
  • त्यावेळी तिच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या. या घटनेनंतर तिला तत्काळ उपचारासाठी ब्रिटन येथे हलविण्यात आले होते.
  • त्यानंतर या परिस्थितीतून मलाला पूर्ण बरी झाली. त्यानंतर तिने  ब्रिटनमध्येच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. 
  • मलाला यूसुफजाईला २०१४मध्ये भारताचे कैलास सत्यार्थी यांच्याबरोबर संयुक्तरित्या शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
  • त्यावेळी मलाला अवघ्या १७ वर्षांची होती. नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी ती सर्वांत कमी वयाची विजेता होती.

एमा स्टोन जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

  • सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा सिनेमा 'ला ला लॅंड'ची प्रमुख अभिनेत्री एमा स्टोन जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री असल्याचे फोर्ब्स मॅगझिनने घोषीत केले आहे.
  • एमा स्टोन या २८ वर्षीय अभिनेत्रीने गेल्या वर्षभरात २.६ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास १६६.४ कोटी रूपये कमावले आहेत. 
  • 'ला ला लॅंड' या सिनेमात केलेल्या तगड्या अभिनयाचे बक्षीस म्हणून तिला ऑस्करकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
  • लिंग समानतेसाठीही तिने आवाज उठवला होता. पुरूष आणि स्त्री कलाकारांना समान मानधन मिळावे अशी मागणी तिने केली होती.
  • या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिचा नंबर लागतो. जेनिफर एनिस्टनने गेल्या वर्षात २.५५ कोटी डॉलरची कमाई केली आहे.
  • प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही सिरीज फ्रेन्ड्समध्ये झळकणारी अभिनेत्री म्हणून जेनिफर एनिस्टनची ओळख आहे. ती अमिरात एअरलाइन्सची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहे.
  • गेल्या दोन वर्षांपासून या यादीत प्रथम स्थानी असलेली जेनिफर लॉरेन्स यावर्षी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा