चालू घडामोडी : २९ ऑगस्ट
उत्तर कोरियाचा जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र हल्ला
- अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाने २९ ऑगस्ट रोजी थेट जपानच्या दिशेने आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले.
- उत्तर कोरियातील सुनान येथून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले, ते जपानच्या पूर्व किनाऱ्यावरून जात जपानच्या उत्तरेकडील प्रशांत महासागरामध्ये जाऊन पडले.
- या क्षेपणास्त्राने एकूण १७०० मैल म्हणजे २७०० किलोमीटर अंतर कापले होते, तसेच ५५० किलोमीटर उंचीवरून ते गेले.
- यानंतर जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी अमेरिकेला उत्तर कोरियावर दबाव वाढवण्याची मागणी केली आहे.
- गेल्या महिन्यात उत्तर कोरियाकडून २ आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.
- अमेरिकेतील ग्वाम भागाला लक्ष्य करण्याच्या धमक्या उत्तर कोरिया देत असून ते ठिकाण उत्तर कोरियापासून ३५०० किमी अंतरावर आहे.
- उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र व अण्वस्त्र चाचण्यांमुळे कोरियन द्वीपकल्पात तणाव सतत वाढत आहे.
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने उत्तर कोरियावर र्निबधांचा सातवा टप्पा नुकताच जारी केला आहे.
जेष्ठ फुटबॉलपटू अहमद खान यांचे निधन
- अनेक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले फुटबॉलपटू अहमद खान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
- ज्याकाळी फुटबॉलपटूंसाठी फारशा सुविधा व सवलती नव्हत्या अशा काळात भारतीय फुटबॉल क्षेत्रात पन्नासहून अधिक वर्षे ते कार्यरत होते.
- अहमद यांना फुटबॉलचे बाळकडू त्यांचे वडील बाबा खान यांच्याकडून लाभले. बाबा खान हे तेव्हाच्या बँगलोर क्रीसेंट फुटबॉल संघाचे कर्णधार होते.
- अहमद यांच्याकडे उपजत डाव्या पायाने अव्वल दर्जाचा खेळ करण्याची शैली होती. त्यातही अनवाणी खेळणेच त्यांना पसंत असायचे.
- चेंडूवर त्यांचे अफाट नियंत्रण असायचे. तसेच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.
- ईस्ट बंगाल या नावाजलेल्या क्लबचे त्यांनी दहा वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९४८ व १९५२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी आपला ठसा उमटविला होता.
- १९४८च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारत पहिल्याच सामन्यात फ्रान्सकडून पराभूत झाला. मात्र प्रेक्षकांची मने भारतीय खेळाडूंनी विशेषत: अनवाणी खेळणाऱ्या अहमद यांनीच जिंकली.
- १९५१मध्ये भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या यशात अहमद यांच्या कौशल्याचा सिंहाचा वाटा होता.
- १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी युगोस्लाव्हियाविरुद्ध केलेला गोल अतिशय संस्मरणीय गोल म्हणून ओळखला जातो.
शशिकला यांची अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी
- अवैध संपत्ती जमविल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या व्ही. के. शशिकला आणि त्यांनी नेमलेले पक्षाचे उपसरचिटणीस व त्यांचे भाचे टीटीव्ही दिनकरन यांची विलीनिकरण झालेल्या अण्णा द्रमुक पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
- तसेच दिनकरन यांनी पक्षात केलेल्या नियुक्त्या व हकालपट्ट्या अवैध ठरविणारा ठरावही पक्षाने संमत केला आहे.
- या हकालपट्टीमुळे अण्णा द्रमुकवर शशिकला, दिनकरन आणि त्यांचे समर्थक यांचा कोणताही ताबा राहिलेला नाही.
- मात्र २२ आमदार दिनकरन यांच्यासोबत असून, त्यामुळे सरकार अल्पमतात गेले आहे.
- अण्णा द्रमुकला लवकरच केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी केले जाणार असून, त्यानंतर त्यांच्या काही खासदारांना केंद्रात मंत्रिपदे दिली जातील, अशी चर्चा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा