चालू घडामोडी : ९ ऑगस्ट
भाजप खासदार सांवरलाल जाट यांचे निधन
- माजी केंद्रीय मंत्री आणि अजमेरचे भाजप खासदार सांवरलाल जाट यांचे ९ ऑगस्ट रोजी दिल्लीत निधन झाले.
- गेल्या महिन्यात (२२ जुलै) राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमात सांवरलाल जाट बेशुद्ध पडले होते.
- त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.
- सांवरलाल जाट हे अजमेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. मोदींच्या मंत्रिमंडळात ते ९ नोव्हेंबर २०१४ पासून ५ जुलै २०१६पर्यंत ते केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्रिपदी होते.
- अजमेर जिल्ह्यातील भिनाई विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९३, २००३ आणि २०१३ मध्ये त्यांनी राजस्थान सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले.
- २०१४मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले. २०१६मध्ये फेरबदलानंतर त्यांच्याकडील मंत्रिपद काढून घेण्यात आले होते.
पूरग्रस्त गावांना रिलायन्स फाऊंडेशनची मदत
- रिलायन्स फाऊंडेशनने गुजरातमधील बनासकांठा व पाटण जिल्ह्यांतील ४ पूरग्रस्त गावांना दत्तक घेण्याची घोषणा केली आहे.
- तसेच त्या गावांना रिलायन्स फाऊंडेशन १० कोटींची आर्थिक मदतही करणार आहे. यासंदर्भात रिलायन्स फाऊंडेशन गुजरात सरकारसोबत चर्चा करत आहे.
- रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी पूरग्रस्त भागाची व तेथील पीडितांची भेट घेतली.
- रिलायन्स फाऊंडेशनकडून पूरग्रस्तांना देणाऱ्या मदतीची नीता अंबानी वेळोवेळी समीक्षाही करणार आहेत.
- रिलायन्स फाऊंडेशन देऊ केलेल्या सहकार्यामध्ये घरे, शाळा, आरोग्य सुविधा, आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधांच्या बांधकामाचा समावेश असेल.
कतारमध्ये ८० देशांना व्हिसाशिवाय प्रवेश
- अरब देशांनी प्रतिबंध घातल्यामुळे अडचणीत सापडलेल्या कतारने ८० देशांतील नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे.
- या देशांमध्ये भारतासह ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. पाकिस्तानला मात्र यातून वगळण्यात आले आहे.
- व्हिसामुक्त देशांच्या यादीतील नागरिकांना कतारमध्ये येण्यासाठी व्हिसा अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
- त्यांना प्रवेशाच्या ठिकाणापासूनच विशेष सवलत देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी संबंधित व्यक्तीकडे पासपोर्ट आणि परतीच्या प्रवासाचे तिकीट असणे गरजेचे आहे.
- व्हिसाशिवाय प्रवेश देण्यात येणाऱ्या देशांच्या दोन याद्या करण्यात आल्या आहेत. यातील पहिल्या यादीत ३३ तर दुसऱ्या यादीत भारतासह ४७ देशांचा समावेश आहे.
- पहिल्या यादीतील नागरिकांना दिलेली सवलत १८० दिवसांसाठी वैध असून, ९० दिवसांपर्यंत ते कतारमध्ये वास्तव्य करू शकणार आहेत.
- तर दुसऱ्या यादीतील नागरिकांना देण्यात आलेली सवलत ३० दिवसांसाठी वैध असून, ते दिलेल्या मुदतीपर्यंतच कतारमध्ये राहू शकणार आहेत.
- ८० देशांतील नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्याच्या परवानगीमुळे कतार जगातील सर्वात मोठा मुक्त देश झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा