चालू घडामोडी : ३० ऑगस्ट

‘आधार’ सक्तीला मुदतवाढ

  • केंद्र सरकारने लोककल्याणाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ सक्तीची मुदत ३० सप्टेंबरवरुन ३१ डिसेंबरपर्यंत वाढविणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्टात दिली.
  • याबरोबरच या याचिकेवर ३ सदस्यांच्या घटनापीठाऐवजी ५ सदस्यांच्या घटनापीठासमोर सुनावणी घ्यावी, अशी विनंतीदेखील केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली.
  • कल्याणकारी योजनांसाठी केंद्र सरकारने आधार कार्ड बंधनकारक केले होते. त्यासाठी नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.
  • केंद्र सरकारने सरकारी अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी आधार कार्डाला वैधानिक दर्जा देण्याबाबतचे विधेयक एप्रिलमध्ये मांडले होते.
  • केंद्र सरकारने हे विधेयक अर्थ विधेयक म्हणून मांडले होते आणि बहुमताच्या जोरावर सरकारने लोकसभेत हे विधेयक मंजूर करवून घेतले. अर्थ विधेयक असल्याने त्याला राज्यसभेच्या मंजुरीची गरज नव्हती.
  • त्यामुळे या विधेयकाला काँग्रेस खासदारांनी विरोध दर्शवला होता. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

टेक्सासमध्ये हार्वे चक्रीवादळाचे थैमान

  • अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात ‘हार्वे’ या भीषण चक्रीवादळाने थैमान घातले आहे.  सुमारे १३ दशलक्ष लोक या परिस्थितीला तोंड देत आहेत.
  • प्रलयकारी पूर आणि मुसळधार पाऊस यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून अशा भयानक वातावरणाने अनेक जणांचे बळी घेतले आहेत.
  • यामध्ये अनेकांची घरे कोसळली आहेत. रस्त्यावरील खांब आणि झाडेही उन्मळून पडली आहेत. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
  • ह्युस्टन येथे या वादळात २०० भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. तसेच एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यूही झाला आहे. 
  • गेल्या १३ वर्षांमधील अमेरिकेत आलेले ‘हार्वे’ हे सगळ्यात शक्तिशाली व महाभयंकर असे चक्रीवादळ आहे.
  • २१५ किमी प्रति तास या वेगाने आलेल्या या वादळाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका रॉकपोर्ट शहराला बसला.
  • चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सुमारे १६० दशलक्ष अमेरिकी डॉलरचे आर्थिक नुकसान झाले आहे.

अमेरिका-पाकमधील तणावात वाढ

  • पाकिस्तानने अमेरिकेबरोबरची द्विपक्षीय चर्चा आणि अमेरिकेतील नियोजित दौरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • दहशतवाद्यांना आश्रयाबाबत अफगाणिस्तान धोरण जाहीर करताना अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादी संघटनांना आश्रय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती.
  • तसेच याचा परिणाम अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील सहकार्याच्या संबंधांवरही होईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.
  • अमेरिकेबरोबरच्या बिघडत्या संबंधांबाबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानी सिनेटची एक समितीही नेमण्यात आली आहे.

वंदना सिक्का इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षपदावरून पायउतार

  • वंदना सिक्का यांनी ३० ऑगस्ट रोजी अमेरिकेतील इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
  • इन्फोसिस कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांच्या वंदना सिक्का पत्नी आहेत. 
  • काही दिवसांपूर्वीच विशाल सिक्का यांनी कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कामकाजातील हस्तक्षेपाला कंटाळून इन्फोसिस सीइओ पदाचा राजीनामा दिला होता.
  • वंदना यांनी संगणक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असून त्या मागील अडीच वर्षे इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी कार्यरत होत्या.
  • इन्फोसिसची सेवाभावी शाखा असलेल्या या प्रतिष्ठानमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा