चालू घडामोडी : २६ ऑगस्ट

नंदन निलेकणी इन्फोसिसचे नवे चेअरमन

  • इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांची इन्फोसिस कंपनीच्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • विशाल सिक्का यांनी अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर इन्फोसिसमध्ये राजीनामासत्र सुरु झाले.
  • सिक्का यांच्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळावरील विद्यमान अध्यक्ष आर शेषसायी आणि सहअध्यक्ष रवी व्यंकटेशन, मंडळाचे सदस्य जेफ्री एस लेहमन आणि जॉन एचमेंडीं यांनी राजीनामे दिले.
  • सॉफ्टवेयर एक्सपोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. निलेकणी यांचे या कंपनीत २.९ टक्के शेअर्स आहेत.
  • इन्फोसिसचे सीईओ म्हणून सिक्का यांनी नुकतीच ३ वर्ष पूर्ण केली होती. त्यांनी १८ ऑगस्ट रोजी इन्फोसिसच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला होता.
  • या कंपनीच्या गुंतवणूकदार संस्था व सल्लागारांनी निलेकणी यांच्या नावाची शिफारस कंपनीच्या संचालक मंडळाला केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर निलेकणी इन्फोसिसमध्ये परतले आहेत.
  • नारायण मूर्ती यांच्यासह इन्फोसिसचे सहसंस्थापक असलेले नंदन निलेकणी ५ वर्ष इन्फोसिसच्या अध्यक्षपदी होते. २००२पासून २००७पर्यंत त्यांनी हे पद सांभाळले. 
  • २००९मध्ये इन्फोसिसमधून बाहेर पडत त्यांनी ‘युनिक आयडेंटीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया’ (यूआयडीएआय)चे चेअरमन पद स्वीकारले.
  • देशातील आधार कार्ड व्यवस्था उभी करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. २०१४मध्ये त्यांनी लोकसभा निडवणूक लढण्यासाठी यूआयडीएआय चेअरमन पदाचा राजीनामा दिला.
  • कंपनीच्या कार्यालयीन कामकाज पद्धतीमध्ये झालेले बदल, नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाढती संख्या, वेतन वाढ, कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे पॅकेज यावरुन कंपनीच्या संचालकांमध्ये नाराजी होती.

पूरग्रस्त बिहारला ५०० कोटींची मदत

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारातील पूरस्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर, पूरग्रस्त भागाला ५०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली.
  • पंतप्रधान सहाय्यता निधीतून पुरात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपयांचे, तर गंभीर जखमींना ५० हजारांचे अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली.
  • मोदी यांनी बिहारमधील चार जिल्ह्यांतील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यात पुर्णिया, कटिहार, किशनगंज, अरारिया यांचा समावेश आहे.
  • त्यानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेतली.
  • पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक बिहारला पाठविण्यात येईल, असे या बैठकीनंतर पंतप्रधानांनी सांगितले.
  • त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी विमा कंपन्यांनी तातडीने प्रतिनिधी पाठवून नुकसानीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
  • केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने पायाभूत सुविधांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
  • बिहारातील १९ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यातील १३ जिल्ह्यांत नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या जलस्रोत विभागाला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे.
  • नद्यांच्या काठांवर उभारण्यात आलेले कोट आणि सिंचन कालवे वाहून गेले आहेत. त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी २,७०० कोटी रुपये खर्च येणार आहे.

राजीव बन्सल एअर इंडियाचे नवे सीएमडी

  • वरिष्ठ सनदी अधिकारी राजीव बन्सल यांची एअर इंडियाचे प्रमुख तथा व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) तीन महिन्यांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अश्वनी लोहानी यांची रेल्वे मंडळाचे प्रमुखपदी निवड झाल्यानंतर रिक्त झालेल्या एअर इंडियाच्या ‘सीएमडी’पदी बन्सल यांची वर्णी लागली आहे.
  • बन्सल हे १९८८च्या बॅचचे नागालॅंड केडरचे अधिकारी असून ते मूळचे हरयाणाचे आहेत.

गुगलची वालॅमार्टसोबत भागीदारी

  • ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ॲमेझॉनला टक्कर देण्यासाठी गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली आहे.
  • यामुळे वॉलमार्टची उत्पादने आता गुगलच्या ऑनलाइन शॉपिंग मॉलवर उपलब्ध होणार आहेत. गुगल असिस्टंटच्या माध्यमातून ग्राहकांना या उत्पादनांची ऑनलाइन खरेदी करता येईल.
  • सध्याही वॉलमार्टची काही प्रमाणात उत्पादने गुगलवरून खरेदी करता येत असून, या भागीदारीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
  • वॉलमार्ट आता व्होल मार्केट ही सुपरमार्केट साखळी ताब्यात घेण्याच्या टप्प्यात आहे. तर गुगलही ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात गुगल होम ब्रॅंडच्या माध्यमातून विस्तार करत आहे.

इसिस जगातील सर्वांत धोकादायक दहशतवादी संघटना

  • मेरिलॅंड विद्यापीठाच्या एका अहवालानुसार, ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) ही जगातील सर्वांत धोकादायक दहशतवादी संघटना ठरली आहे.
  • विद्यापीठाने जागतिक दहशतवादासंबंधीच्या संकलित केलेल्या माहितीनुसार ‘इसिस’ने गेल्या वर्षी १४०० हल्ले केले. त्यात सात हजार नागरिकांचा बळी गेला.
  • २०१५च्या दहशतवादी कारवायांपेक्षा गेल्या वर्षीच्या हल्ल्यांमध्ये २० टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. जगाचा विचार करता २०१६मध्ये दहशतवादी हल्ले आणि त्यातील मृत्यूचे प्रमाण १० टक्‍क्‍याने वाढले होते.
  • गेल्या आठवड्यात स्पेनमधील बार्सिलोनामध्ये लास रामब्लास येथे वर्दळीच्या ठिकाणी व्हॅन घुसवून केलेल्या हल्ल्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारीही ‘इसिस’ने घेतली होती.
  • या संघटनेने इराक व सीरियाचा ताबा घेऊन २०१४मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. एखाद्या व्यक्तीचा व गटाचा वापर करून कोणत्याही पद्धतीने ते आत्मघाती हल्ले करतात.
  • ‘इसिस’शिवाय इराक आणि सीरियात गेल्या वर्षी अन्य दहशतवादी संघटनांनी केलेल्या हल्ल्यांची संख्या ९५० होती. यात तीन हजार नागरिक ठार झाले.
  • ‘इसिस’तर्फे गेल्या वर्षीपासून ‘रुमिया’ हे मासिक प्रसिद्ध केले जाते. त्यात दहशतवादी हल्ल्यांसंदर्भात संपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा