व्यक्तिगत गोपनीयता (राइट टू प्रायव्हसी) हा मुलभूत अधिकार आहे, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
राज्यघटनेतील कलम २१नुसार व्यक्तिगत गोपनीयता हा जगण्याचा मूलभूत अधिकार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील ९ सदस्यीय घटनापीठाने हा निर्णय दिला आहे.
जीवन आणि स्वातंत्र्य यांतच खासगीपणाचा अधिकार अनुस्यूत आहे. भारतीय राज्यघटेने तो संरक्षित केलेला आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
यापूर्वी १९६०मध्ये खरकसिंग प्रकरणात तसेच १९५०मध्ये एम पी शर्मा यांच्या याचिकेवर व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडताना या निर्णयांचा दाखला दिला होता. तसेच सरकार व्यक्तिगत गोपनीयतेचे उल्लंघन करत नसल्याचे म्हटले होते.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत एकमताने व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले.
आधार सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग होतो असा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.
आधारसाठी बायोमेट्रिक पद्धतीने माहिती घेणे म्हणजे व्यक्तिगत गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा सरळ परिणाम आता आधार कार्डसक्ती आणि इतर सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर होणार आहे.
पहिल्यांदाच २०० रुपयांची नोट चलनात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे देशात पहिल्यांदाच २०० रुपयांची नोट २५ ऑगस्टपासून चलनात येणार असल्याची घोषणा अर्थ मंत्रालयाने केली आहे.
२०० रुपयांच्या सुमारे ५० कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार आहेत. त्यामुळे नोटाबंदीनंतर निर्माण झालेला कॅश तुटवडा भरुन काढण्यात मदत मिळणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर नव्याने चलनात येणारी ही चौथी नोट आहे.
नोटाबंदीची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० रुपयाच्या नोटांवर बंदी घातली होती.
यानंतर ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. तसेच काही दिवसांपूर्वी ५० रुपयांची नवी नोटदेखील चलनात आली होती.
देशात १०० आणि ५०० रूपयांमधील एखादी नोट चलनात आणण्याची ही देशातील पहिलीच वेळ असेल.
ही घोषणा करतानाच या नोटेचा नमुनाही सार्वजनिक करण्यात आला. २०० रूपयांची नवी नोट ही ६६ मिमी रूंद आणि १४६ मिमी लांब आहे.
लाखो रोहिंग्यांचे बांगलादेशात स्थलांतर
राखिन प्रांतामध्ये लष्करी तळ करण्याचा निर्णय म्यानमारने घेतल्यानंतर या भागातल्या हजारो रोहिंग्या मुस्लीमांनी बांगलादेशात स्थलांतर केले आहे.
मुख्यत: बौद्ध देश असलेल्या म्यानमारच्या राखिन प्रांतात १० लाख रोहिंग्या मुस्लीम अल्पसंख्याकांची वस्ती आहे.
बौद्ध आणि अनेक दशकांपासून राहत असल्याने स्वत:ला स्थानिक म्हणवणारे रोहिंग्या यांच्यामध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले होते.
त्यामुळे गेल्या ऑक्टोबरपासून म्यानमारमधल्या राखिन प्रांतात हिंसाचाराने थैमान घातले होते. बंडखोरांनी पोलीसांवर हल्ला करण्याचे प्रकारही वाढले होते. त्यानंतर लष्कराने बळाचा वापर केला होता.
राखिन प्रांतात म्यानमारच्या लष्कराने केलेल्या कारवाईमुळे हजारोंच्या संख्येने रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशमध्ये आसरा घेतला आहे.
त्यामुळे बांगलादेशातील सीमेवरील निर्वासितांसाठी उभारण्यात आलेल्या छावण्या क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने सर्व यंत्रणांवर ताण पडत आहे.
परिणामी आता बांगलादेशी सीमा सुरक्षा दलाचे जवानही रोहिंग्या मुस्लीमांना देशात येण्यास मज्जाव करत असल्याचे चित्र आहे.
रोहिंग्या मुस्लीमांना म्यानमारमधील बांगलादेशी घुसखोर म्हणून समजण्यात येते आणि त्यांना नागरिकत्वापासून ते किमान मानवी अधिकारापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी वंचित ठेवण्यात येते.
तसेच रोहिंग्या मुस्लीमांना मुस्लीम बहुसंख्य असलेला बांगलादेशही जवळ करण्यास उत्सुक नाही.
अमली पदार्थांच्या वाहतुकीसारख्या गुन्ह्यांमध्ये रोहिंग्या मुस्लीमांचा सहभाग असल्याचा आरोप बांगलादेशी पोलीस करत आहेत.
अभिमन्यू पुराणिकला ग्रॅण्डमास्टर किताब
पुण्याचा अभिमन्यू पुराणिक बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर किताबाचा मानकरी ठरला आहे.
ग्रॅण्डमास्टर हा किताब पटकावणारा अभिमन्यू हा पुण्यातील ३रा, राज्यातील ७वा, तर देशातील ४९वा बुद्धिबळपटू ठरला आहे.
अबूधाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २५०० एलो रेटिंग गुणांचा टप्पा ओलांडत अभिमन्यूने ग्रॅण्डमास्टर किताबासाठी आवश्यक तिसरा व अंतिम नॉर्म पूर्ण केला.
या स्पर्धेत अभिमन्यूला ३७वे मानांकन होते. या स्पर्धेआधी त्याच्या खात्यावर २४९५ एलो रेटिंग गुण जमा होते.
ग्रॅण्डमास्टरच्या किताबासाठी त्याला ५ गुणांची आवश्यकता होती. स्पर्धेअखेर त्याचे गुण २५१० इतके झाले आहेत. या स्पर्धेत अभिमन्यू ५.५ गुणांसह ११व्या स्थानी राहिला.
अभिमन्यू हा राज्यातील सर्वांत कमी वयाचा ग्रॅण्डमास्टर ठरला आहे. सध्या त्याचे वय १७ वर्षे, ६ महिने आणि १९ दिवस इतके आहे.
या आधी हा विक्रम नाशिकचा ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथी याच्या नावावर होता. २०१३मध्ये १८ वर्षांचा असताना त्याने हा किताब मिळविला होता.
अभिजित कुंटे आणि अक्षयराज कोरे हे पुणेकर अनुक्रमे वयाच्या २३व्या व २४व्या वर्षी ग्रॅण्डमास्टर बनले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा