भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) ३१ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या आयआरएनएसएस-१एच उपग्रहाचे प्रक्षेपण अखेरच्या टप्प्यात अयशस्वी ठरले.
आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील तळावरून संध्याकाळी पीएसएलव्ही सी-३९ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हा उपग्रह अवकाशाच्या दिशेने झेपावला होता.
उड्डाणाचे सुरूवातीचे टप्पे पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यात अंतराळात प्रवेश करताना उपग्रहाभोवतीचे ‘हिट शिल्ड’चे आवरण वेगळे होणे, अपेक्षित होते.
मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे प्रक्षेपकाच्या अंतर्गत भागापासून विलग होऊनही उपग्रह आतमध्येच अडकून राहिला. त्यामुळे उपग्रह अंतराळात प्रक्षेपित होऊ शकला नाही.
आयआरएनएसएस-१एच हा उपग्रह भारतीय विभागीय दळणवळण उपग्रह यंत्रणेतील प्रणालीतील हा आठवा उपग्रह होता.
या उपग्रहामुळे भारताच्या एनएव्हीआयसी या सात दिशादर्शक उपग्रहांचा समूह आणखी विस्तारणार होता.
१,४२५ किलो वजनाच्या आयआरएनएसएस-१एच उपग्रहाचा वापर दिशादर्शन प्रणालीसंबंधी अॅप्लिकेशन्ससाठी होणार होता. त्यामुळे रेल्वे सर्व्हे, लोकेशनवर आधारित सेवा पुरवण्यासाठी मोठी मदत झाली असती.
यापूर्वी आयआरएनएसएस-१ए या उपग्रहाची आण्विक घड्याळे नादुरुस्त झाली होती. त्यामुळे बदली उपग्रह म्हणून देखील हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता.
इस्रोचे अध्यक्ष: किरण कुमार
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ५.७ टक्क्यांवर
२०१७-१८ या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील, म्हणजेच एप्रिल ते जून या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ ५.७ टक्क्यांनी झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीतील वाढ ७.९ टक्के होती, तर या आधीच्या तिमाहीमध्ये, म्हणजे जानेवारी ते मार्च या काळातील विकासाचा दर ६.१ टक्के इतका होता.
गेल्या दोन वर्षांतील हा अर्थव्यवस्थेच्या वाढीचा नीचांक आहे. यापूर्वी २०१४मध्ये जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशाचा विकास दर ४.६ टक्के इतका नोंदविला गेला होता.
नोटाबंदीचा निर्णय आणि जीएसटीच्या अमलबजावणीचा निर्णय या कारणांमुळे अर्थव्यवस्थेची वाढ मंदावली असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
देशातील प्रमुख आठ पायाभूत सेवा क्षेत्राची वाढ जुलैमध्ये घसरून २.४ टक्के नोंदली गेली आहे.
प्रामुख्याने खनिज तेल, शुद्धीकरण उत्पादने, खते, सिमेंटचे उत्पादन कमी झाल्याने यंदा एकूण क्षेत्रात घसरण झाली आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यातच वित्तीय तुटीने अर्थसंकल्पातील अंदाजापैकी ९२.४ टक्के प्रमाण गाठले आहे.
सरकारच्या उत्पन्न व खर्चातील तफावत असलेली वित्तीय तूट ५.०४ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
२०१६-१७ या गेल्या आर्थिक वर्षांतील एप्रिल ते जुलै दरम्यान वित्तीय तुटीचे प्रमाण केंद्रीय अर्थसंकल्पातील उद्दीष्टाच्या ७३.७ टक्के समीप होते.
चालू आर्थिक वर्षांसाठी वित्तीय तुटीचे प्रमाण हे सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ३.२ टक्के राखण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
राजीव महर्षी भारताचे नवे कॅग
केंद्र सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल करताना, माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकपदी (कॅग) नियुक्ती केली आहे.
महर्षी यांचा गृह सचिवपदाचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपला. त्यांनी दोन वर्षे या पदाची धुरा सांभाळली.
त्यांची आता नवे कॅग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते शशिकांत शर्मा यांची जागा घेतील. ते १९७८च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी मुशर्रफ फरार
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी पाकिस्तान न्यायालयाने २ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवले, तर अन्य ५ जणांची निर्दोष मुक्तता केली.
याशिवाय या प्रकरणात आरोपी असणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना न्यायालयाने फरार घोषित केले आहे. तसेच मुशर्रफ यांची संपत्ती जप्त करण्याचेही आदेश दिले.
न्यायालयाने दोषी पोलिस अधिकाऱ्यांना १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्षाच्या अध्यक्षा आणि दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिलेल्या बेनझीर भुट्टो यांचा २७ डिसेंबर २००७ रोजी झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
बेनझीर भुट्टो निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी रावळपिंडीत आल्या असताना त्यांच्यावर गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता.
बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर सुमारे १० वर्षांनंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर २००८साली हा खटला सुरु झाला.
रावळपिंडीतील दहशतवाद विरोधी न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा अखेर न्यायालयाने ३१ ऑगस्ट रोजी अंतिम निकाल दिला.
तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचे ५ दहशतवादी आणि २ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला.
रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अश्विनी लोहानी
एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अश्विनी लोहानी यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एकाच आठवड्यात झालेल्या दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर लोहानी यांची वर्णी लागली आहे.
अत्यंत कर्तव्यकठोर अधिकारी अशी ओळख असलेले लोहानी आहेत मूळचे कानपूरचे आहेत.
मेकॅनिकल इंजिनीअर असलेले लोहानी १९८०मध्ये रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागात रुजू झाले.
त्यानंतर ते भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बनले.
दिल्लीतील अशोका हे नामांकित हॉटेल अनेक वर्षे तोटय़ात का चालले याचा त्यांनी बारकाईने अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना केल्या. काही वर्षांतच या हॉटेलला गतवैभव त्यांनी प्राप्त करून दिले.
कोणता पक्ष सत्ताधारी आहे, याची चिंता न करता नियम व कायद्याच्या चौकटीत काम करणे, हे त्यांचे वैशिष्टय़ असल्याने सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत.
त्यामुळेच मध्य प्रदेशातील पर्यटनाला घरघर लागत असल्याचे पाहून उमा भारती यांनी त्यांना मध्यप्रदेश पर्यटन महामंडळात आणले.
‘एमपी अजब है, सबसे गजब है’ हे आकर्षक घोषवाक्य घेऊन त्यांनी आक्रमक पद्धतीने या पर्यटन महामंडळाची मोहीम माध्यमांतून राबवली.
त्यांच्या निवृत्तीला आणखी दोन वर्षे असल्याने रेल्वेचा ढेपाळलेला कारभार पुन्हा रुळांवर आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
बंद झालेल्या ९९ टक्के नोटा आरबीआयमध्ये जमा
रिझर्व्ह बँकेने नोटबंदी संदर्भातील जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी सुमारे ९९ टक्के नोटा नागरिकांनी जमा केल्या आहेत.
बंद करण्यात आलेल्या ६,७०० दशलक्ष नोटांपैकी फक्त ८९ दशलक्ष (१ टक्का) नोटा रिझर्व्ह बँकेला परत मिळाल्या नाहीत.
बंद नोटांच्या स्वरूपात चलनात असलेल्या १५.४४ लाख कोटींपैकी १५.२८ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली होती.
काळ्यापैशाविरुद्धच्या लढाईसाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले होते.
नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी सरकारने नागरीकांना पन्नास दिवसांची मुदत दिली होती. ३० डिसेंबर २०१६ रोजी ही मुदत संपली.
त्यानंतर काही विशिष्ट समुदायांसाठी आणि अनिवासी भारतीयांसाठी ही मुदत ३० जून २०१७ पर्यंत वाढविण्यात आली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा