चालू घडामोडी : १६ ऑगस्ट

तटरक्षक दलाच्या आधुनिकीकरणासाठी योजना

  • केंद्र सरकारने सागरी सीमेच्या संरक्षणासाठी तटरक्षक दलाच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण योजनेला मंजुरी दिली आहे.
  • सरकारने मंजूर केलेली योजना ५ वर्षे चालणार असून यासाठी ३१ हजार ७४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • २००८ मधील मुंबईवरील हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. यासाठीच केंद्राने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
  • या नव्या योजनेनुसार, तटरक्षक दलाची टेहळणी क्षमता वाढविण्यासाठी नव्या गस्ती नौका, बोटी, हॅलिकॉप्टर, विमाने आणि अन्य महत्त्वाची सामग्री दिली जाणार आहे.
  • २०२२ पर्यंत तटरक्षक दलामध्ये १७५ बोटी आणि ११० विमानांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट या योजनेच्या अंतर्गत ठेवण्यात आले आहे.
  • या योजनेंतर्गत सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी तटरक्षक दलाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. 
  • समुद्र संपत्तीचे संरक्षण, समुद्र पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, तस्करी, समुद्री चाचे यांचा मुकाबला करण्यासाठी तटरक्षक दलाला पूर्णपणे सुसज्ज करण्याची ही योजना आहे.
  • भारताला ७,५१६ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला असून यामध्ये १,३८२ बेटे आहेत. मात्र तटरक्षक दलाची सध्याची क्षमता अतिशय कमी आहे.
  • सध्या तटरक्षक दलाकडे ६० बोटी, १८ हॉवरक्राफ्ट, ५२ लहान इंटरसेप्टर बोटी, ३९ टेहळणी विमाने, १९ चेतक हेलिकॉप्टर आणि ४ आधुनिक ध्रुव हेलिकॉप्टर्स आहेत.

एअर इंडियामध्ये सैनिकांना अग्रक्रम

  • विमानांमध्ये चढताना भारतीय सैन्यातील जवानांना अग्रक्रम देण्याचा निर्णय एअर इंडियाद्वारे घेण्यात आला आहे.
  • देशासाठी सैनिकांप्रती देशाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्या योगदानाचा उचित सन्मान व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • १५ ऑगस्ट रोजी भारताच्या ७१व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची देशातील विमानतळांवर अंमलबजावणी सुरू झाली.
  • यासोबतच जवानांना देशातंर्गत विमान प्रवासाच्या भाड्यातही काही प्रमाणात सवलत दिली जाणार आहे.
  • भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल या तिन्ही विभागातील जवानांना या निर्णयाचा लाभ मिळेल.

बंगळुरूत इंदिरा कॅन्टीन सुरु

  • कामगार वर्ग, गरिबांना स्वस्तात जेवण मिळावे यासाठी बंगळुरूत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन करण्यात आले.
  • या कॅन्टीनमध्ये फक्त ५ रुपयांत नाश्ता आणि १० रुपयांत जेवण मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात असे १०१ कॅन्टीन सुरू होणार आहेत.
  • सध्या प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी या कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील इतर शहरे आणि महत्त्वाच्या ठिकाणीही आणखी कॅन्टीन सुरू करण्यात येतील.
  • तामिळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी सुरू केलेल्या अम्मा कॅन्टीनच्या धर्तीवर कर्नाटकात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आले आहेत.
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावर्षी अर्थसंकल्प सादर करताना अशा प्रकारची कॅन्टीन राज्यभर सुरू करण्याची घोषणा केली होती.

बिल गेट्स यांच्याकडून ४.६ अब्ज डॉलरचे दान

  • मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टमधील त्यांच्या मालकीचे शेअर्स दान केले आहेत. या शेअर्सचे मूल्य गेट्स यांच्या एकूण संपत्तीच्या ५ टक्के इतके आहे.
  • गेट्स यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टचे ६ कोटी ४० लाख शेअर्स दान केले आहेत. या शेअर्सचे मूल्य ४.६ अब्ज डॉलर म्हणजेच २९ हजार ५७१ कोटी रुपये इतके आहे.
  • यातील बहुतांश दान त्यांनी त्यांच्या बिल आणि मेलिंडा फाऊंडेशनला दिले आहे. गेट्स दाम्पत्याने समाजकार्यासाठी या संस्थेची स्थापना केली होती.
  • या संस्थेला बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्याकडून आतापर्यंत ३५ अब्ज डॉलर्स म्हणजेच २.२४ लाख कोटी रुपये इतके दान मिळाले आहे.
  • याआधी १९९९मध्ये गेट्स यांनी शेअर्सच्या स्वरुपातच १६ अब्ज डॉलरचे (१ लाख कोटी रुपये) दान केले होते.
  • त्यानंतर २०००साली गेट्स यांनी ५.१ अब्ज डॉलर्सचे म्हणजेच ३२ हजार ७८० कोटी रुपयांचे दान केले होते.
  • वॉरेन बफेट यांच्यासोबत गेट्स यांनी २०१०मध्ये ‘गिव्हिंग प्लेज’ची स्थापना केली. तेव्हापासून १६८ धनाढ्य लोक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
  • या दानशूर व्यक्तींनी स्वत:च्या संपत्तीतील जास्तीत जास्त वाटा समाजकार्यासाठी देण्याची शपथ घेतली आहे.

शारापोव्हाला अमेरिकन ओपनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री

  • पाच वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद जिंकणाऱ्या मारिया शारापोव्हाला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत थेट मुख्य फेरीत प्रवेश (वाईल्ड कार्ड एन्ट्री) मिळाला आहे.
  • त्यामुळे २०१६मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेपासून दूर असलेली शारापोव्हा ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
  • २०१६मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत उत्तेजक द्रव्य सेवनात दोषी आढळल्यामुळे तिच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.
  • २८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान या वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन स्पर्धा रंगणार आहे. 
  • यापूर्वी माजी चॅम्पियन मार्टिना हिंगिस, लेटन हेविट, किम क्लिस्टर्स, युआन मार्टिन, डेल पेत्रो यांनादेखील अशा प्रकारची वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा