केंद्र सरकारने इतर मागासवर्गीय प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणासाठी क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे.
वार्षिक ८ लाख रूपये उत्पन्न असलेले ओबीसी क्रिमिलेअर अंतर्गत येतील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे.
पूर्वी ही मर्यादा ६ लाख रूपये इतकी होती. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील गरजवंत आणि तळागाळातील लोकांना आरक्षणाचा फायदा मिळेल.
आतापर्यंत ६ लाख किंवा यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या ओबीसी कुटुंबियांना लाभ घेणाऱ्या सूचीतून हटवून क्रिमिलेअरमध्ये ठेवण्यात आले होते.
रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अश्विनी लोहानी
एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अश्विनी लोहानी यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एकाच आठवड्यात दोन मोठे रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे बोर्डचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी राजीनामा दिला होता.
याच प्रकरणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला होता. परंतु, मोदींनी त्यांचा राजीनामा फेटाळला आहे.
गेल्या सात दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये दोन रेल्वे अपघात झाले आहेत. त्यात २० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू तर शेकडो प्रवासी जखमी झाले.
या दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर अश्विनी लोहानी यांची वर्णी लागली आहे.
ए के मित्तल २०१६मध्ये निवृत्त होणार होते. परंतु त्यांना मोदी सरकारने २ वर्षांसाठी मुदतवाढ दिली होती.
गेल्या २ वर्षात रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढले असून शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका होत आहे.
उत्कल एक्स्प्रेसच्या अपघातानंतर सुरेश प्रभू यांनी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
कॉमेडी किंग जेरी लुईस यांचे निधन
दिग्गज विनोदवीर आणि प्रसिद्ध अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक जेरी लुईस यांचे अमेरिकेतील लास वेगासमध्ये निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
जेरी लुईस यांचा जन्म १६ मार्च १९२६ रोजी झाला होता. हॉलिवूडमध्ये त्यांना कॉमेडी किंग म्हणूनही ओळखले जात होते.
लुईस यांनी १९५०च्या दशकात गायक डीन मार्टीन यांच्यासोबत १६ चित्रपट केले. या चित्रपटांतील लुईस यांच्या अभिनयाला सिनेप्रेमींनी चांगली दाद दिली.
नॉटी प्रोफेसर, द बेलबॉय, लेडीज मॅन या चित्रपटांतील लुईस यांचा अभिनय गाजला. गेल्या वर्षी ‘द ट्रस्ट’ चित्रपटात त्यांनी शेवटची भूमिका बजावली.
ते अनेक टीव्ही शो, नाइट क्लब आणि कॉन्सर्टमध्ये आपल्या स्टँडअप कॉमेडी प्रोग्रामसाठी प्रसिद्ध होते.
डीन मार्टीन आणि लुईस यांचा ‘मार्टिन आणि लुइस’ हा कॉमेडी शो देखील प्रचंड प्रसिद्ध झाला होता.
जेरी लुईस यांना अमेरिकन कॉमेडी अवॉर्ड, लॉस अँजेलिस फिल्म क्रिटिक्स असोसिएशन आणि व्हेनिस फिल्म फेस्टिवल अशा अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
येमेनमध्ये हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू
येमेनची राजधानी सना येथे हवाई हल्ल्यात हॉटेलला लक्ष्य केल्याने ६० जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली.
सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील पथकाने हा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
येमेनमध्ये इराणचा पाठिंबा असलेल्या हौथी बंडखोरांविरोधात सौदी अरेबिया आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याने युद्ध पुकारले आहे.
येमेनमधील साना आणि उत्तर भागावर हौथी बंडखोरांचा कब्जा आहे. मार्च २०१५पासून येमेनमध्ये युद्ध सुरु आहे आणि तेव्हापासून येमेनच्या हवाई हद्दीवर सौदी अरेबियाचा ताबा आहे.
येमेनमध्ये संघर्ष हा मुख्यत: शिया इराण आणि सुन्नी सौदी अरेबिया यांच्यातील आहे.
हौथी बंडखोर हे झाईदी शिया असून ते सुन्नी विचारधारेविरोधात लढा देत आहेत. या हौथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे.
येमेनमध्ये हौथींचे वर्चस्व निर्माण झाल्यास सुन्नी सौदी अरेबियाला धोका निर्माण होईल. त्यामुळेच सौदी अरेबियाने पुढाकार घेऊन सुन्नी अरब राष्ट्रांना एकत्रित आणून येमेनवर हल्ले करायला सुरुवात केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा