चालू घडामोडी : १८ ऑगस्ट

इन्फोसिसच्या एमडी व सीईओ पदावरून विशाल सिक्का पायउतार

  • देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला आहे.
  • कंपनीचे काम सुरळीत चालावे यासाठी सिक्का यांचा राजीनामा स्वीकारत त्यांना कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. वार्षिक १ डॉलर वेतनावर ते नव्या सीईओचा शोध घेण्यास मदत करणार आहेत.
  • सॉफ्टवेयर एक्सपोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. इन्फोसिसचे सीईओ म्हणून सिक्का यांनी नुकतीच ३ वर्ष पूर्ण केली होती.
  • इन्फोसिसने सिक्का यांची १ ऑगस्ट २०१४ रोजी सीईओपदी नियुक्ती केली होती. संस्थापकांव्यतिरिक्त बनलेले ते इन्फोसिसचे पहिले मुख्याधिकारी होते.
  • कंपनीच्या कामकाजात बदल, वेतन वाढ, नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाढती संख्या, कंपनी सोडणाऱ्यांना देण्यात येणारा मोबदला (सेवरन्स पे) आदी विविध बाबींवरून प्रमोटर्स तसेच कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती नाराज होते.
  • त्यांच्या चांगल्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा तसेच कामात सातत्याने अडथळे निर्माण केल्याचा आरोप सिक्का यांनी आपल्या राजीनामा पत्रात केला आहे.
  • दोन लाखांहून अधिक कर्मचारी असलेल्या इन्फोसिसच्या नवीन एमडी आणि सीईओंची नियुक्ती आता ३१ मार्च २०१८ पर्यंत करण्यात येणार आहे.
  • तोपर्यंत विद्यमान परिचालन अधिकारी यू बी प्रवीण राव यांची कंपनीच्या हंगामी एमडी व सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • १९८०मध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झालेले राव हे इन्फोसिस बीपीओचे अध्यक्षही आहेत. कंपनीत त्यांनी पायाभूत व्यवस्थापन सेवा, युरोपमधील व्यवसाय, ग्राहक व किरकोळ विभाग आदी विभागांची जबाबदारी हाताळली आहे. 
  • बंगळूरु विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी पदवी मिळविणारे राव हे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे संघटन असलेल्या नासकॉम, भारतीय उद्योग संघटना (सीआयआय)च्या विविध समित्यांवरही कार्यरत आहेत.
  • सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या गुंतवणूक सल्लागार मंडळाने या जागेवर इन्फोसिसचे एक सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नावाची शिफारस केली आहे.
  • निलेकणी २००२ ते २००७ दरम्यान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. यानंतर त्यांची यूआयडी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती.

अमेरिकेकडून ६ अपाचे हेलिकॉप्टर खरेदीला मंजुरी

  • भारतीय संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून सहा लढाऊ ‘एएच-६४ ई अपाचे’ हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी ४,१६८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
  • याआधी भारताने २२ हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. मात्र आता आणखी ६ हेलिकॉप्टर्सची स्वतंत्र खरेदी केली जाणार आहे.
  • संरक्षण मंत्रालयातील सर्वोच्च निर्णायक संस्था असलेल्या संरक्षण संपादन परिषदेने (डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिल) या खरेदीला मंजुरी दिली आहे.
  • भारतीय सैन्याकडून ११ हेलिकॉप्टर्सची मागणी करण्यात आली होती. मात्र संरक्षण मंत्रालयाच्या वित्तीय समितीने ६ हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी दिली.
  • याआधी सप्टेंबर २०१५ मध्ये संरक्षण मंत्रालयाने २.२ अब्ज डॉलर्सचा करार करत २२ अपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी दिली होती.
  • या लढाऊ हेलिकॉप्टर्समुळे हलाई दलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे. ही हेलिकॉप्टर्स पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात केली जाणार आहेत. 
  • भारत या अपाचे हेलिकॉप्टर्ससोबतच त्यासंबंधीची उपकरणे, सुटे भाग आणि दारुगोळादेखील खरेदी करणार आहे.
  • बोईंग एएच-६४ अपाचे दोन टर्बोशाफ्ट इंजिन हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर रात्रीच्या अंधारातही उड्डाण करु शकते.
  • या हेलिकॉप्टरने ३० सप्टेंबर १९७५ मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. जगात या हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर केला जातो.
  • डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिलचे अध्यक्ष : संरक्षणमंत्री अरुण जेटली

कॉल ड्रॉप झाल्यास १० लाखांपर्यंत दंड

  • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कॉल ड्रॉपचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर आदेश दिले आहेत.
  • नव्या नियमांनुसार कोणत्याही दूरसंचार सर्कलमध्ये एकूण कालावधीच्या ९० टक्के काळात, ९८ टक्के कॉल्स सुरळीतपणे होणे आवश्यक आहे.
  • त्यामुळे एकूण कॉल्सपैकी दोन टक्क्यांहून अधिक कॉल्स ड्रॉप झाल्यास कंपनीकडून दंड आकारला जाऊ शकतो.
  • सर्वाधिक व्यस्त असलेल्या दिवसांमध्ये एका दूरसंचार सर्कलमधील ९० टक्के मोबाईल टॉवरवरील कॉल ड्रॉपचे प्रमाण ३ टक्क्यांहून अधिक असता कामा नये.
  • दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या एखाद्या कंपनीला सलगच्या तिमाहींमध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अपयश आल्यास दंडाच्या रकमेत दीडपटीने वाढ करण्यात येईल.
  • तर लागोपाठ तीन महिन्यांमध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अयशस्वी ठरल्यास दंडाची रक्कम तिसऱ्या महिन्यात दुपटीने वाढेल.
  • दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीकडून कॉल ड्रॉप रोखण्यासाठीच्या नियमांचा लागोपाठ ३ महिने भंग झाल्यास सर्वाधिक म्हणजेच १० लाखांचा दंड आकारला जाईल.
  • ट्रायचे अध्यक्ष: आर. एस. शर्मा

जागतिक ब्रँड्ससाठी भारत हे महत्वाचे केंद्र

  • रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार कंपनी सीबीआरइच्या दक्षिण आशियाच्या ‘इंडिया रिटेल मार्केट रिपोर्ट’ या अहवालानुसार, भारताने यावर्षी जागतिक किरकोळ विकास सूचकांकात चीनला मागे टाकले आहे.
  • किरकोळ बाजारपेठेतील गुंतवणुकीसाठी जागतिक ब्रँड्ससाठी भारत हे महत्वाचे केंद्र ठरले आहे.
  • या अहवालानुसार यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात सात नव्या जागतिक ब्रँड्सनी देशांतर्गत बाजारपेठेत प्रवेश केला आह
  • देशात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ब्रँडनी आपल्या व्यवसायात विस्तार केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

स्पेनमध्ये आयसिसचा दहशतवादी हल्ला

  • स्पेनमधील बार्सिलोनामधील सिटी सेंटरमध्ये १७ ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांच्या एका व्हॅनने गर्दीच्या ठिकाणी लोकांना चिरडले. 
  • या हल्ल्यात १३ लोक ठार झाले, तर १००हून अधिक लोक जखमी झाले. याप्रकरणी स्पेन पोलिसांनी कारवाई करत दोघा संशयितांनाअटक केली आहे.
  • दहशतवादी संघटना ‘आयसिस’ (इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक ॲन्ड सीरिया)ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
  • या हल्ल्याच्या ८ तासानंतर बार्सिलोनापासून १२० किमी दूर केंब्रिल्स शहरातही व्हॅन गर्दीत घुसवून दहशतवादी हल्ल्याचा दुसरा प्रयत्न झाला.
  • पण सर्तक असलेल्या पोलिसांनी वेळीच या हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ५ दहशतवादी ठार झाले. 
  • या हल्ल्यात ६ नागरीक आणि १ पोलिस अधिकारी जखमी झाला. व्हॅनमधील पाचव्या हल्लेखोराला जखमी झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आले होते पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा