केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या(सीबीएफसी) अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय सेन्सॉर बोर्डाच्या २३ सदस्यांच्या कार्यकारिणीत अभिनेत्री विद्या बालन हिचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने सीबीएफसीचे वादग्रस्त माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरून हटवून त्यांच्याजागी प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे.
पहलाज निहलानी त्यांच्या मार्गदर्शक तत्वांसाठी कायम चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला.
उडता पंजाब, इंदू सरकार, लिपस्टिक अंडर माय बुरखा तसेच बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या.
या सगळ्या कारणांवरून त्यांच्याविरुद्धचा रोष सातत्याने वाढत होता. यामुळे अनेक दिग्दर्शकांनी पहलाज निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती.
देशाच्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू
व्यंकय्या नायडू यांनी ११ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. व्यंकय्या नायडू हे देशाचे १३ वे उपराष्ट्रपती आहेत. तर स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते देशाचे पहिलेच उपराष्ट्रपती आहेत.
राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली.
उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता.
गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात ६३ बालमृत्यू
उत्तरप्रदेशमधील गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा साठा संपल्याने गेल्या ५ दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने बीआरडी कॉलेजचे प्राध्यापक आर के मिश्रा यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली आहे.
बालरोग विभागात ऑक्सिजनचा तुटवडा आणि संसर्ग, यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
या रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुष्पा सेल्स कंपनीची ६९ लाख रुपयांची थकबाकी न दिल्याने ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता.
या कंपनीने १ ऑगस्टलाच पत्र लिहून रुग्णालय प्रशासनाला थकबाकी न दिल्यास पुरवठ्यावर परिणाम होईल, असा इशारा दिला होता.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ९ ऑगस्ट रोजी या हॉस्पिटलमध्ये भेट दिली होती, त्या दिवशीही ९ रुग्ण मरण पावले होते.
या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहे.
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत देवेंद्र सिंह अंतिम फेरीत
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकारात देवेंद्र सिंहने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
त्याने पहिल्या प्रयत्नात ८२.२२ मीटर, दुसऱ्यांदा ८२.१४ मीटर तर तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात सर्वाधिक ८४.२२ मीटर भाला फेकला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा