चालू घडामोडी : २८ ऑगस्ट

न्या. दीपक मिश्रा देशाचे ४५वे सरन्यायाधीश

  • देशाचे ४५वे सरन्यायाधीश म्हणून न्या. दीपक मिश्रा यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २८ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात शपथ दिली. त्यांचा कार्यकाळ २ ऑक्टोबर २०१८पर्यंत असेल.
  • माजी सरन्यायाधीश जे.एस. खेहर हे २७ ऑगस्ट रोजी निवृत्त झाले. प्रघातानुसार त्यांनी मिश्रा यांचे नाव गेल्या महिन्यात सरन्यायाधीश पदासाठी सुचवले होते.
  • अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि तेवढेच प्रभावी वक्तृत्व असलेले न्या. मिश्रा यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९५३ रोजी ओदिशामध्ये झाला.
  • कायद्याची पदवी मिळवल्यानंतर १९७७मध्ये ओदिशा उच्च न्यायालयात त्यांनी आपल्या वकिली व्यवसायास प्रारंभ केला.
  • काही वर्षांतच दिवाणी, फौजदारी, विक्रीकर विषयक तसेच घटनात्मक मुद्दे असलेल्या क्षेत्रातील नामवंत विधिज्ञ म्हणून त्यांचा लौकिक झाला.
  • १९९६मध्ये त्यांना ओदिशा उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदही भूषविले.
  • त्यानंतर २००९मध्ये पाटणा उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश बनले. नंतर काही काळ दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी न्यायदान केले. २०११मध्ये पदोन्नती मिळून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.
  • दीपक मिश्रा यांच्या सरन्यायाधीशपदी झालेल्या नियुक्तीने काकापुतण्या या पदावर नियुक्त झाल्याचा योग जुळून आला आहे. दीपक मिश्रा हे १९९० ते ९१ दरम्यान सरन्यायाधीश राहिलेले रंगनाथ मिश्रा यांचे पुतणे आहेत.
  • न्या. दीपक मिश्रा यांना साहित्य आणि अध्यात्माची विशेष जाण आहे. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचे निकाल दिले आहेत.
  • निर्भया बलात्कार व हत्या खटल्यात चार दोषींना देहदंडाची शिक्षा कायम करणाऱ्या खंडपीठात मिश्रा यांचा समावेश होता.
  • चित्रपटगृहांत राष्ट्रगीताचे गायन बंधनकारक करण्याचा आदेशही त्यांनीच दिला होता. याकुब मेमनच्या फाशीची सुनावणी त्यांनी मध्यरात्री घेतली होती.

डोकलाममधून भारत आणि चीनचे सैन्य मागे

  • डोकलाम वादावर भारताला मोठे यश मिळाले असून द्विपक्षीय चर्चेनंतर चीनने डोकलाममधून सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे.
  • भारतही डोकलाममधून सैन्य मागे घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यापूर्वी हा निर्णय झाल्याने दोन्ही देशांमधील तणाव कमी होणार आहे.
  • डोकलाम परिसरातील वर्चस्वावरुन भारत आणि चीनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून वाद पेटला आहे.
  • डोकलाम हा उंच पठाराचा भाग भूतानमध्ये असून भारत, चीन आणि भूतानच्या सीमा जेथे मिळतात तेथे हा परिसर आहे.
  • डोकलामवर चीनने आपला हक्क सांगितला असून यावरुन भूतान आणि चीनमध्ये वाद सुरु आहे.
  • डोकलाम परिसर भूतानमध्ये असल्याने भारताचा त्याच्याशी थेट संबंध नाही. मात्र भारत आणि भूतान यांच्यात संरक्षण करार झाला असून त्यानुसार भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे.
  • हा वादग्रस्त परिसर सिलिगुडी कॉरिडॉर नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या भूभागाजवळ आहे. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली होती. 
  • दोन महिन्यांपासून दोन्ही देशांचे सैन्य या परिसरात ठाण मांडून होते. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला होता.
  • गेल्या काही दिवसांपासून या वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरु होती.
  • या चर्चेत भारताला मोठे यश मिळाले असून चर्चेअंती दोन्ही देशांनी डोकलाममधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • चीनमध्ये ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जाणार आहेत. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होणार आहे.

जागतिक स्पर्धेत सिंधूला रौप्यपदक

  • स्वित्झर्लंडच्या ग्लास्गो शहरात सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • अटीतटीच्या अंतिम सामन्यात जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१९, २०-२२, २२-२० असा पराभव केला.
  • सिंधूचे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील हे तिसरे पदक ठरले. २०१४ कॉपेहेगनमध्ये आणि २०१३ ग्वाँझूमध्ये सिंधूने ब्राँझपदक मिळविले होते.
  • जागतिक स्पर्धेतील महिला एकेरीत भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे. यापूर्वी २०१५मध्ये भारताच्या साईना नेहवालने रौप्यपदक मिळविले होते.
  • जागतिक स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्ण जिंकणारी नोझुमी ओकुहारा ही पहिली जपानी महिला बॅडमिंटनपटू ठरली. यापूर्वी १९७७मध्ये जपानने या स्पर्धेतील महिला दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते.
  • नोझोमी ओकुहाराने उपांत्य लढतीत भारताच्या साईना नेहवालला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.
  • त्यामुळे या स्पर्धेत साईनाला ब्राँझपदकावरच समाधान मानावे लागले. साईनाचे हे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील दुसरे पदक आहे. २०१५च्या जकार्तामधील स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले आहे.
  • जागतिक स्पर्धेतील महिला एकेरीत प्रथमच भारताच्या दोन बॅडमिंटनपटूंनी पोडियम फिनीश केला. सिंधूने रौप्य आणि साईनाने ब्राँझपदक मिळविले.

त्यागराजन यांना एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार

  • डॉ. एस पी त्यागराजन यांना अलीकडेच तामिळनाडू सरकारचा एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी २०१५पासून दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
  • हा पुरस्कार स्वातंत्र्यदिनी प्रदान केला जातो. ५ लाख रुपये रोख व सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • हेपॅटायटिस विषाणूच्या संसर्गावर महत्त्वाचे संशोधन करणारे त्यागराजन हे रामचंद्र विद्यापीठाचे अधिष्ठाता व विशेष प्राध्यापक आहेत.
  • गेली तीस ते चाळीस वर्षे अध्यापनाबरोबरच त्यांनी प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडेल असे संशोधनही केले आहे.
  • त्यागराजन यांनी हेपॅटायटिस बीवर व्हायरोहेप हे वनौषधींवर आधारित असलेले औषध तयार केले आहे व त्याचे पेटंट मद्रास विद्यापीठांतर्गत घेण्यात आले आहे.
  • कावीळ व यकृताच्या रोगावर ८७ वनस्पतींपासून तयार केलेली किमान ३०० औषधे तरी आहेत; पण त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता नाही.
  • त्यांचे एकूण ३४५ शोधनिबंध व २० पुस्तके प्रसिद्ध असून आठ पेटंट त्यांच्या नावावर आहेत.
  • तामिळनाडूत विद्यापीठ-उद्योग यांचे संबंध जोडणारी शिक्षणपद्धती अवलंबण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पातळीवर त्यांनी उच्च शिक्षणाची धोरणे ठरवण्यात मोठी भूमिका पार पाडली.
  • भारतीय विद्यापीठांमध्ये मूलभूत विज्ञान संशोधनावर भर दिला जावा यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत.
  • भारतातील हेपॅटायटिस बी लसीकरण कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यातही त्यांचा सहभाग आहे.
  • त्यांनी हेपॅटायटिस संसर्गावर कीझानेली म्हणजे फायलन्थस अमारस या वनस्पतीपासून औषध तयार केले. या वनस्पतीत हेपॅटायटिस बी व सी विषाणू मारण्याची क्षमता असते.
  • या संशोधनासाठी त्यांना इटालियन सरकारचा शेवलियर पुरस्कारही यापूर्वी मिळाला आहे.
  • शिक्षक म्हणून त्यांच्या कामाचा गौरव एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाने जीवनगौरव पुरस्कार देऊन केला होता.

राम रहिम सिंगला २० वर्षांची शिक्षा

  • डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग याला बलात्कार आणि लैंगिक शोषणप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
  • एका बलात्कार प्रकरणासाठी १० वर्षांची शिक्षा अशाप्रकारे २ बलात्कारांसाठी त्याला एकूण २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • याचबरोबर, राम रहीमला न्यायालयाने दोन्ही प्रकरणांमधे प्रत्येकी १५ लाख रुपये याप्रमाणे ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
  • तसेच, या दंडाच्या रकमेतील दोन्ही पीडितांना प्रत्येकी १४ लाख रुपये देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
  • बाबा राम रहिमला रोहतकच्या तुरुंगात ठेवण्यात आले असून त्याच ठिकाणी असलेल्या विशेष न्यायलायात ही शिक्षा त्यांना सुनावण्यात आली.
  • बाबा राम रहिमला शिक्षा सुनावताना त्यांनी केलेल्या समाजसेवेचा विचार केला जावा अशी मागणी राम रहिम यांच्या वकिलाने कोर्टात केली होती.
  • सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर आता बाबा राम रहिम याचे वकील हायकोर्टात जामिनाचा अर्ज करू शकतात.
  • निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा हिंसाचार उसळू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  • डेराचे मुख्यालय असलेल्या सिरसा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात हिंसाचारामुळे आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • बाबा राम रहीमने २००२साली आपल्या सिरसा आश्रमातील गुहेमध्ये दोन साध्वींवर बलात्कार केले होते.
  • त्याची तक्रार एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी पाठविले होते.
  • हे प्रकरण दाबण्यासाठी बाबाने, तसेच काही राजकारण्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता, पण अधिकाऱ्यांनी दबाव झुकारून तपास पूर्ण केला आणि बाबावर खटले दाखल झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा