चालू घडामोडी : १९ ऑगस्ट

नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील

  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दलाने (जदयु) पुन्हा एकदा भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
  • काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नितीश कुमारांची भेट घेतल्यानंतर जदयूला एनडीएत सामील होण्याचे निमंत्रण दिले होते.
  • जदयुच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एनडीएमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. नितीशकुमार या बैठकीचे अध्यक्ष होते.
  • बिहारमधील महाआघाडीमधून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • यावेळी नाराज असलेल्या शरद यादव गटातील काही कार्यकर्त्यांनी एनडीमध्ये सहभागी होण्याचा निषेध करत नितीश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
  • जदयूच्या प्रवेशामुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद आणखी वाढली आहे.
 पार्श्वभूमी 
  • २०१३मध्ये भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केल्यानंतर नितीश कुमार यांनी दोन दशकापासूनची भाजपाबरोबरची युती तोडली होती.
  • धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर नितीश यांनी त्यावेळी भाजपाबरोबरची आघाडी तोडली होती. त्यानंतर नितीशकुमार हे कट्टर मोदी विरोधक म्हणून ओळखले जात होते.
  • त्यामुळे २०१५च्या बिहार निवडणुकीसाठी जदयु, काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल या पक्षांनी एकत्र येत महाआघाडी स्थापन केली होती.
  • या महाआघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केला. मात्र निवडणुकीनंतर महाआघाडीत मतभेद निर्माण झाले.
  • आमदारांचे संख्याबळ जास्त असल्याने लालूप्रसाद यादव यांचा सरकारमधील हस्तक्षेप वाढला होता. त्यामुळे नितीशकुमार नाराज होते.
  • लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर जुलै २०१७मध्ये नितीश यांनी महाआघाडीपासून फारकत घेत पुन्हा भाजपाबरोबर सरकार स्थापन केले.

आरबीआयकडून ५० रूपयांच्या नव्या नोटेची घोषणा

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५० रूपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली असून लवकरच ती बाजारात येणार आहे.
  • ५० रूपयांच्या या नव्या नोटेवर महात्मा गांधींचे छायाचित्र असेल. या नोटेवर बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.
  • ५० रूपयांच्या नव्या नोटेचा रंग हा फिकट निळा आहे. ही नोट आकाराने १३५ मिमी लांब आणि ६६ मिमी रूंद आहे.
  • या नव्या नोटेवर देशाचा सांस्कृतिक वारसा दाखवण्यात आला आहे. नोटेच्या मागील बाजूस विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपीचे छायाचित्र आहे.
  • ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर ५०० आणि २ हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या आहेत. त्यानंतर आता ५० रूपयांची नवी नोट चलनात येणार आहे.

भारताची अमेरिकेकडून तेलाची खरेदी

  • अमेरिकेने कॉंग्रेसने तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठविल्यानंतर भारताने अमेरिकेकडून १० कोटी डॉलर किंमतीच्या तेलाची खरेदी केली आहे.
  • या तेलाचे जहाज अमेरिकेतून भारताच्या दिशेने निघाले असून सप्टेंबर महिन्यामध्ये ते भारतात येण्याची शक्यता आहे.
  • २०१६साली अमेरिकेने तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवली. ओबामा सरकारच्या काळामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर भारतीय कंपन्यांना अमेरिकन तेल आयातीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
  • त्यानुसार इंडियन ऑइल कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशनने चाळीस लाख बॅरल्स तेलाची मागणी अमेरिकेकडे नोंदविली आहे.
  • या कंपन्यांबरोबर हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडही अमेरिकन तेलाची खरेदी करण्याची शक्यता आहे.
  • भारत हा जगातील तेल आयात करणारा जगातील तिसऱ्या क्रमाकांचा देश आहे. चीन, द. कोरिया आणि जपाननंतर भारत हा आशियातील अमेरिकचे तेल खरेदी करणारा चौथा देश बनला आहे.
  • अमेरिकेने आपले अंतर्गत तेलाचे उत्पादन वाढवल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती झपाट्याने घसरल्या आहेत.
  • व्हेनेझुएलासारख्या केवळ तेलाच्या निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या देशांना याची मोठी झळ सहन करावी लागली.
  • आता अमेरिकेने तेलाची निर्यात सुरु केल्यावर या देशांवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.
 तेलाच्या निर्यातीवर बंदी का होती? 
  • तेलाच्या किंमतीतील चढउतारावर परिणाम करणाऱ्या ओपेक संघटनेला शह देण्यासाठी अमेरिकेने १९७५साली आपल्या देशातील तेल उत्पादकांना तेलाची निर्यात करण्यासाठी बंदी घातली.
  • त्यामुळे अमेरिकेचे देशांतर्गत तेलाचे दर कमी राहण्यास मदत होणार होती. मात्र तेल उत्पादक कंपन्यांवर कालांतराने याचा परिणाम होऊ लागला.
  • तेलाचे वाढते उत्पादन आणि उत्पादित तेलावर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम नसणाऱ्या रिफायनरी यामुळे नवे ग्राहक शोधण्याची गरज होती.
  • त्यामुळे अमेरिकेतील उत्तर डाकोटा आणि अलास्कासारख्या तेलउत्पादक राज्यांनी ही बंदी उठवली जावी यासाठी जोरदार मागणी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा