केंद्र सरकारने मृत्यूची नोंद करण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक केला आहे. गृहमंत्रालयाने याबाबतची अधिसूचना काढली आहे.
जम्मू काश्मीर, मेघालय आणि आसाम वगळता सर्व राज्यातील नागरिकांसाठी १ ऑक्टोबर २०१७ पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.
त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना, अर्जदाराला मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड अथवा आधार क्रमांक सादर करावे लागणार आहे.
जर मृत्यू झालेल्या व्यक्तीने आधार कार्ड काढलेच नसेल तर मग तसे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
जर एखाद्याने खोटी माहिती दिली तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही गृहमंत्रालयाकडून देण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार जनरल इंडियाने पत्रक काढून मृत्यूच्या दाखल्यासाठीच्या नवीन नियमाची माहिती दिली.
यामुळे मयत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही, तसेच त्या व्यक्तीविषयीची माहितीही सरकारकडे उपलब्ध असेल.
तसेच यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवून देण्यासाठी एकाहून जास्त कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत.
राज्यसभेतही भाजप सर्वांत मोठा पक्ष
राज्यसभेत ५८ खासदारांसह भाजप काँग्रेसला मागे टाकत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. राज्यसभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या ही ५७ इतकी झाली आहे.
मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेत भाजपचे नूतन खासदार संपतिया उइके यांनी शपथ घेतली.
केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. उइके हे बिनविरोध निवडून आले.
नरेंद्र मोदी सरकार मे २०१४मध्ये सत्तेवर आल्यापासून राज्यसभेत सर्वाधिक भाजपचे खासदार असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
परंतु अद्यापही भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) या वरिष्ठ सभागृहात निर्णायक बहुमत नाही.
२०१८पर्यंत राज्यसभेत काँग्रेस पक्षच सर्वांत मोठा पक्ष राहिला असता. पण त्यांच्या दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या खासदारांची संख्या कमी झाली आहे.
मुगलसराय स्टेशनला दीनदयाल उपाध्याय यांचे नाव
उत्तर प्रदेशमधल्या प्रमुख रेल्वे स्टेशनांपैकी एक असलेल्या मुगलसराय या स्टेशनचे नाव बदलून जनसंघाचे नेते दीनदयाल उपाध्याय यांचे नावदेण्याच्या योगी मंत्रिमंडळाच्या निर्णयाला केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
कोणत्याही स्टेशन, गाव आणि शहराचे नाव बदलण्यासाठी राज्य सरकारांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते.
जून महिन्यात योगी मंत्रिमंडळाने मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदारांनी या नामकरणाला विरोध केला होता.
बराक ओबामा दिसणार डॉक्युमेंट्रीमध्ये
इस्त्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच माजी पंतप्रधान शिमोन पेरेज यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात येणाऱ्या डॉक्युमेंट्रीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अभिनेत्री व गायिक बार्बरा स्ट्रायसँड दिसणार आहेत.
Never Stop Dreaming: The Life and Legacy of Shimon Peres असे डॉक्युमेंट्रीचे नाव आहे. ऑस्कर विजेते रिर्चड ट्रंक या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक आहेत.
२०१६मध्ये या डॉक्युमेंट्रीवर काम करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी ६० तासांची मुलाखत रेकॉर्ड करायची होती. मात्र सप्टेंबर २०१६मध्ये पेरेज यांचे अनपेक्षितपणे निधन झाले.
अभिनेते रॉबर्ट हार्डी यांचे निधन
‘हॅरी पॉटर’ सिनेमातील लोकप्रिय अभिनेते रॉबर्ट हार्डी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
रॉबर्ट यांनी ‘हॅरी पॉटर’मध्ये कॉरनेलियस फज ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांनी थिएटर, टिव्ही आणि सिनेमांमध्ये ७० वर्षांक्षाही अधिक काळ काम केले.
हार्डी यांनी ६ सिनेमांमध्ये ब्रिटीश पंतप्रधान विंसटन चर्चिल यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तसेच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष फ्रँकलिन डी रूसवेल्ट यांची व्यक्तिरेखा साकारली होती.
१९२५मध्ये जन्मलेल्या हार्डी यांनी दुसऱ्या महायुद्धावेळी रॉयल एअर फोर्समध्ये नोकरी केली होती. दुसरे महायुद्ध संपल्यावर त्यांनी आपले लक्ष अभिनयाकडे वळवले.
१९७८ ते १९९० मध्ये त्यांनी ‘ऑल क्रिएचर्स ग्रेट अॅण्ड स्मॉल’ ही नावाजलेली मालिका केली.
अभिनयातील त्यांच्या योगदानाबद्दल ‘सीबीई’ पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा