चालू घडामोडी : २२ ऑगस्ट

तिहेरी तलाकवर ६ महिन्यांची बंदी

  • अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तिहेरी तलाकच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
  • या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप करण्यास नकार देत यासंबंधी ६ महिन्यांत संसदेत कायदा करावा, असे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत.
  • कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर ६ महिन्यांची बंदी असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
  • जर सहा महिन्यात सरकारने कायदा तयार केला नाही तर ही बंदी पुढे कायम राहिल असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
  • राजकीय पक्षांनी यासंदर्भात निर्णय घेताना राजकारण बाजूला ठेवावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली.
  • देशभरातील मुस्लिम महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा मुस्लिम महिलांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
  • मात्र हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठातील न्यायाधीशांमध्ये एकमत होऊ शकले नाही.
  • या प्रथेमुळे घटनेतील अनुच्छेद १४, १५, २१ आणि २५चे उल्लंघन होत नसल्याचे मत सरन्यायाधीश जे एस खेहर आणि न्यायाधीश अब्दुल नाझीर यांनी मांडले.
  • तर न्यायाधीश आर एफ नरिमन, यू यू लळित आणि कुरियन जोसेफ यांनी ही प्रथा घटनाबाह्य असल्याचे निकाल देताना म्हटले आहे.
  • तलाक हा सुन्नी समाजातील महत्वाची परंपरा असून गेल्या १००० वर्षांपासून ती सुरु आहे अशी माहिती यावेळी सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी दिली. 

तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक सरकार अल्पमतात

  • तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक पक्षाच्या माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या गटांचे विलीनीकरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी येथील राजकारणाने नवे वळण घेतले आहे.
  • अण्णाद्रमुकचे उपमहासचिव टीटीव्ही दिनकरन यांचे समर्थक असलेल्या १९ बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे.
  • त्यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेऊन, त्यांच्याकडे पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याची मागणी केली.
  • या बंडखोर आमदारांनी राजभवनात येण्यापूर्वी मरीना बीच येथील जयललिता यांच्या समाधीचे दर्शन घेत, या ठिकाणी त्यांनी काही काळ प्रार्थना केली.
  • २३४ सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत सध्या एआएडीएमकेच्या सगळ्या गटांचे मिळून १३५ आमदार आहेत.
  • या १९ आमदारांनी पाठिंबा मागे घेतल्याने पलानीस्वामी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.
  • विरोधी पक्ष असलेल्या डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन यांनीदेखील विधानसभेचे अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
 पार्श्वभूमी 
  • जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी अण्णाद्रमुक पक्षाची धूरा हाती घेतली होती. तर शशिकला गटाविरोधात पनीरसेल्वम यांनी बंड केले होते.
  • यानंतर पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मात्र यादरम्यान शशिकला यांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि पक्षाची बिकट अवस्था झाली.
  • आमदारांनी विधीमंडळ पक्षनेतेपदी ई पलानीस्वामी यांची निवड केली आणि पलानीस्वामी हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.
  • त्यामुळे पक्षात निर्माण झालेल्या पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्या दोन गटातील संघर्ष टोकाला पोहोचला होता.
  • प्रदीर्घ चर्चेनंतर २१ ऑगस्ट रोजी या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची घोषणा केली. त्यामुळे तामिळनाडूत एआयएडीएमकेची ताकद वाढली होती.

थॉमस कैलथ यांना जीवनगौरव पुरस्कार

  • विद्युत अभियंता व गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध प्रा. थॉमस कैलथ यांना अलीकडेच अमेरिकेतील मार्कोनी सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • आधुनिक संदेशवहन क्षेत्रात मोलाचे संशोधन केल्याबद्दल त्यांना अमेरिकेतील मार्कोनी सोसायटीने जीवनगौरव पुरस्कार दिला आहे. 
  • रेडिओचा शोध लावणाऱ्या गुलिमो मार्कोनी यांच्या कन्या गिओया मार्कोनी ब्रॅगा यांनी स्थापन केलेल्या मार्कोनी सोसायटीतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
  • पुण्यात सीरियन ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या थॉमस यांचे शिक्षण सेंट व्हिन्सेंट शाळेत झाले. नंतर त्यांनी सरकारी अभियांत्रिकी विद्यापीठातून पदवी घेतली.
  • त्यांनी मसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेतून पदव्युत्तर पदवी मिळवली. 
  • एमआयटीतून विद्युत अभियांत्रिकी विषयात डॉक्टरेट मिळवणारे ते जन्माने भारतीय असलेले पहिले विद्यार्थी आहेत.
  • प्रा. थॉमस सध्या स्टॅनफर्ड विद्यापीठात ‘हिताची अभियांत्रिकी प्राध्यापक’ आहेत. डॉक्टरेटनंतरच्या शिक्षणासाठी त्यांनी १०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून, त्यापैकी २० ते २५ जणांच्या स्वत:च्या कंपन्या आहेत.
  • संदेशवहन, संगणन, संदेश प्रक्रिया यातील अल्गॉरिदम त्यांनी विकसित केले आहेत. यासंबंधी लीनिअर सिस्टीम्स नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
  • त्यांच्या नावावर अनेक पेटंट्स असून, इंटिग्रेटेड सिस्टीम्स, न्यूमरिकल टेक्नॉलॉजीज यांसारख्या कंपन्यांचे ते सहसंस्थापक आहेत.
  • कैलथ यांनी नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या डिजिटल कम्युनिकेशन्स रिसर्च ग्रुप तसेच बेल लॅबमध्ये काम केले.
  • कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ते अभ्यागत प्राध्यापक आहेत.
  • डॉ. थॉमस यांचे बंगळूरु येथील  इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेशी ३० वर्षांपासून संशोधन संबंध आहेत.
  • १९७०मध्ये ते भारताच्या संरक्षण खात्याचे सल्लागार असताना भारतीय हवाई दलास मदत करू शकतील अशी संशोधन केंद्रे आयआयटीमध्ये सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
  • इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स (आयईईई) या संस्थेचे ते फेलो आहेत.
  • २००९मध्ये त्यांना पद्मभूषण किताब देण्यात आला. त्यांना अमेरिकी अध्यक्षांचे पदकही मिळाले होते. सिलिकॉन व्हॅली इंजिनीअरिंग हॉल ऑफ फेम हा मानही त्यांना मिळाला आहे.
  • त्यांचेच विद्यार्थी असलेले स्टॅनफर्डमधील विद्युत अभियांत्रिकीचे जन्माने भारतीय प्राध्यापक आरोग्यस्वामी पॉलराज यांना २०१४मध्ये (बिनतारी तंत्रज्ञानातील वेगवान पल्ल्यासाठी) मार्कोनी पुरस्कार मिळाला होता.

सीरियातील हवाई हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू

  • सीरियातील रक्का शहराजवळ अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ४२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १९ लहान मुले आणि १२ महिलांचा समावेश आहे.
  • सीरियातील रक्कामध्ये आयसिसच्या तळांवर सीरिया, रशिया आणि अमेरिकन सैन्याचे हवाई हल्ले सुरु आहेत. गेल्या ८ दिवसांत हवाई हल्ल्यात सुमारे १६७ नागरिकांनी जीव गमावला आहे.
  • इराकमध्ये आयसिसचा पराभव केल्यानंतर आता सीरियातील आयसिस विरोधातील लढा तीव्र झाला आहे.
  • रक्कामधून आयसिसला हद्दपार करण्यासाठी कुर्दीश आणि अरब सैन्याचे जवान लढा देत आहेत. आत्तापर्यंत रक्कामधील ६० टक्के परिसर आययसिसपासून मुक्त करण्यात आला आहे.
  • रक्कामध्ये आयसिसचे सुमारे २ हजार दहशतवादी अजूनही सक्रीय असून, सैन्याबरोबर सुरु असलेल्या त्यांच्या युद्धामुळे सर्वसामान्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
  • हवाई हल्ल्यांमध्ये नागरिक राहत असल्याने इमारतींना फटका बसू लागला आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार रक्का आणि परिसरात २५ हजार नागरिक अडकल्याचे वृत्त आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा