चालू घडामोडी : २५ ऑगस्ट

राम रहिम सिंग बलात्कारप्रकरणी दोषी

  • डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांना पंचकुलातील सीबीआय न्यायालयाने बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी दोषी ठरविले आहे.
  • त्यांना या प्रकरणात किमान ७ वर्षे आणि कमाल १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. २८ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
  • न्यायालयात राम रहिम यांच्याविरोधातील खटल्याचा निकाल सुनावला जाणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पंजाब, हरयाणात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.
  • खबरदारी म्हणून पंजाब आणि हरयाणातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा ७२ तासांसाठी बंद करण्यात आले. तसेच चंदीगडमधील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी देण्यात आली.
  • याशिवाय पंचकुला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. पंजाब व हरयाणाच्या दिशेने येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या.
  • राम रहिम यांनी व्हिडिओ जारी करून समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले, तरीही पंचकुलात  त्यांचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र आले होते.
  • परंतु सीबीआय न्यायालयाने बाबा राम रहिम यांना दोषी ठरविल्यानंतर पंचकुलात त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केले.
  • या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळीचे प्रकार सुरु झाले. या हिंसाचारात ३० जण ठार झाले आहेत तर २५०हून जास्त लोक जखमी झाले.
  • आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून आणि सैन्यदलांकडून अश्रूधुराचा मारा करण्यात आला आहे. ड्रोन आणि हेलिकॉप्टर यांच्या माध्यमातूनही पंचकुलाची पाहणी करण्यात येते आहे.
  • डेरा सच्चाच्या प्रमुखांकडून चूक होऊच शकत नाही असा दावा आंदोलकांनी केला आहे. याप्रकरणी डेरा सच्चाच्या १ हजार अनुयायांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  • पंचकुलात डेरा सच्चाच्या कार्यकर्त्यांकडून जे काही नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई ही डेरा सच्चा सौदाकडूनच वसुल केली जावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
 काय आहे संपूर्ण प्रकरण? 
  • बाबा राम रहिम यांच्यावर त्यांच्याच आश्रमातील दोन साध्वींवर बलात्कार केल्याचा आणि त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. २००१-२००२च्या दरम्यान हे प्रकरण घडले होते.
  • यापैकी एका साध्वीने २००२मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना निनावी पत्र लिहून गुरमीत सिंग यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती.
  • त्यानंतर इतरही अनेक वादांमध्ये राम रहिम अडकले आहेत. २००२मध्ये पत्रकार रामचंद्र यांची हत्या झाली होती त्याचाही आरोप बाबा राम रहिम यांच्यावर आहे.
  • बाबा राम रहिम यांनी लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याचे प्रकरण हे सर्वात आधी पत्रकार रामचंद्र यांनीच समोर आणल्याची चर्चा आहे.
  • २०१२ मध्ये डेरा सच्चा सौदाच्या ४०० पुरूष अनुयायांची नसबंदी केल्याचाही आरोप बाबा राम रहिम यांच्यावर आहे.
  • याशिवाय राम रहीम यांच्या आश्रमात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारीनंतर हरयाणा उच्च न्यायालयाने त्याची नियमित तपासणी करावी, असे आदेश दिले होते.
 कोण आहेत बाबा राम रहिम? 
  • १५ ऑगस्ट १९६७ रोजी राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात बाबा गुरमीत राम रहीम यांचा जन्म झाला.
  • तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी ३१ मार्च १९७४ रोजी राम रहीम असे त्यांचे नाव ठेवले व २३ सप्टेंबर १९९० मध्ये त्यांना आपला वारसदार जाहीर केले.
  • त्यानंतर वयाच्या २३व्या वर्षी बाबा राम रहिम हे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख झाले. त्यानंतर डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता प्रचंड वाढली.
  • त्यांनी स्वतःला लोकांपुढे देव म्हणून सादर केले आणि. त्यांनी सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि सर्वधर्मसमभाव जपण्याचा संदेश दिला. ज्यानंतर त्यांच्या अनुयायांची संख्या वाढत गेली.
  • शीख समाजाचे गुरू गोविंद सिंह यांच्यासारखी वेशभूषा राम रहीम यांनी केल्याने त्या समाजाने संताप व्यक्त केला होता.
  • राम रहिम यांना सिनेमात काम करण्याचाही छंद आहे. त्यांच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड (MSG)' या चित्रपटातील बराच भाग आक्षेपार्ह असल्याने त्यास संमती देण्यास सेन्सॉर बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्ष लीला सॅमसन यांनी २०१५साली नकार दिला होता.

अमित शहा पहिल्यांदाच राज्यसभेत

  • भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शहा आणि इराणी यांना शपथ दिली.
  • विशेष म्हणजे इराणी यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. शहा पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून गेले आहेत. तर इराणी यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे.
  • गुजरातमधील राज्यसभेच्या ३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी विजय मिळवला. तर तिसऱ्या जागेवर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी विजय मिळवला.

सॅमसंगचे ली जेई योंग यांना ५ वर्षांची शिक्षा

  • दक्षिण कोरियातील न्यायालयाने सॅमसंग या मोबाइल निर्मात्या कंपनीचे उत्तराधिकारी ली जेई योंग यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
  • जगातील सर्वाधिक स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या कंपनी सॅमसंगचे ली हे उत्तराधिकारी असून, फेब्रुवारी २०१७पासून ते तुरूंगात आहेत.
  • लाच देणे, अफरातफरी करणे आणि विदेशात संपत्ती लपवण्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. हे सर्व आरोप ली यांनी फेटाळले आहेत.
  • या हायप्रोफाइल प्रकरणाची सुनावणी मार्च महिन्यात सुरू झाली होती. याच प्रकरणी पार्क ग्यून यांना दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागले होते.
  • तत्कालीन राष्ट्राध्यक्षांना लाखो डॉलरची लाच दिल्याचा ली यांच्यासह सॅमसंगच्या इतर ४ अधिकाऱ्यांवरही आरोप होता.
  • ज्या करारासाठी ली यांनी लाच दिली होती, त्या करारामुळे ते सॅमसंगच्या प्रमुखपदी विराजमान होणार होते. सध्या त्यांचे वडील ली कुन हे सॅमसंग समूहाचे अध्यक्ष आहेत.
  • सरकारी वकिलांनी ली यांना १२ वर्षांच्या शिक्षेची मागणी केली होती. या निकालाची अंतिम सुनावणी २०१८ मध्ये होईल.

नाशिकच्या संजीवनी जाधवला रौप्यपदक

  • तैवान येथे सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समधील १० हजार मीटर शर्यतीत नाशिकची धावपटू संजीवनी जाधवने रौप्यपदक जिंकले.
  • या स्पर्धेत किर्गिझस्तानच्या दारिया मासलोवा सुवर्णपदक जिंकले. भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत दारियाने ५ व १० हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.
  • संजीवनीने ३३ मिनिटे २२ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदक जिंकले. जपानच्या अई होसोदाला ब्राँझपदक मिळाले.
  • आंतर विद्यापीठ स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजीवनीला २ वर्षांपूर्वी ग्वांग्झू (कोरिया) येथील स्पर्धेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
  • जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारी ती भारताची दुसरी ॲथलिट ठरली आहे.
  • यापूर्वी २०१३मध्ये कझान (रशिया) आणि २०१५मध्ये ग्वांग्जू (कोरिया) येथे इंदरजित सिंगने गोळाफेकीत अनुक्रमे रौप्य व सुवर्णपदक जिंकले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा