जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्यात आले.
शिर्डीत राज्यासह देशविदेशातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने शिर्डीमध्ये विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी १९९० पासून करण्यात येत होती.
राहता तालुक्यातील काकडी गावात हे विमानतळ असून, यामुळे आता मुंबईतून शिर्डीला ३५ मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे.
सध्या शिर्डी विमानतळावरून फक्त दिवसा विमाने उड्डाण करू शकतील. रात्री विमानसेवा सुरू व्हावी, म्हणून धावपट्टी वाढविण्याचे काम सुरू आहे. ते काम जानेवारीत पुर्ण होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट २०१०मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या विमानतळाच्या जागेचे भूमीपूजन झाले होते.
नारायण राणे यांची नव्या पक्षाची घोषणा
काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नव्या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असे बोलले जात होते. मात्र, राणेंना पक्षात घेण्याबाबत भाजपच्या राज्यातील नेत्यांनी प्रतिकूल मत शीर्षस्थ नेत्यांना कळविल्यामुळे राणे यांना स्वतःचाच पक्ष स्थापन करावा लागला आहे.
राज्यातील सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यघटनेच्या मर्यादेत राहून आपण मूल्याधारित राजकारण करणार असल्याचे राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
आपल्या पक्षाचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रापुरते मर्यादित असेल, पक्षाचा झेंडा, निवडणूक चिन्ह नंतर जाहीर करण्यात येईल. ‘दिलेला शब्द खरा करू’ हे पक्षाचे ब्रीदवाक्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा