चालू घडामोडी : ३१ जानेवारी

स्कॉर्पियन श्रेणीतील ‘आयएनएस करंज’चे जलावतरण

  • स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘आयएनएस करंज’चे ३१ जानेवारी रोजी मुंबईच्या माझगाव डॉक येथून जलावतरण करण्यात आले.
  • ‘प्रकल्प ७५’ अंतर्गत स्कॉर्पियन वर्गातील ६ पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम माझगाव गोदी येथे सुरू आहे. या ६ पाणबुड्या २०२०पर्यंत नौदलात सामील करण्याचे उद्दीष्ट आहे.
  • यापूर्वी याच श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी आणि खांदेरी या पाणबुड्यांचे जलावतरण पार पडले होते.
  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या आयएनएस करंजमुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढणार आहे.
  • नौदलाचे चीफ अॅडमिरल : सुनील लांबा
 करंज पाणबुडीची वैशिष्ट्ये 
  • फ्रान्सच्या मदतीने ‘मेक इंन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली करंज ही पूर्णपेण स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे.
  • या पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर, उंची १२.३ मीटर आहे. तिचे वजन १५६५ टन आहे.
  • टॉरपीडो आणि अँटी शिप क्षेपणास्त्रांचा माराही करू शकते. या पाणबुडीतून जमीनीवरही मारा करता येतो.
  • युद्धाच्या वेळी अत्यंत सुरक्षितपणे आणि सहज शत्रूला चकवा देऊन जाऊ शकते. ती कोणत्याही रडारच्या टप्प्यात येत नाही.
  • या पाणबुडीचा वापर प्रत्येत प्रकारच्या युद्धात, अँटी सबमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजन्सच्या कामातही केला जाऊ शकतो.
  • शत्रूला नेमके शोधून लक्ष्य करणे आणि पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करण्याची क्षमताही या पाणबुडीत आहे.
  • जास्तीत जास्त काळ पाण्याखाली राहता यावे यासाठी पाणबुडीत ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था आहे.

ब्लड मून, सुपरमून आणि ब्लुमूनचा त्रिवेणी संगम

  • खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लुमून असा दुर्मिळ तिहेरी नजराणा ३१ जानेवारी रोजी आकाशात पाहायला मिळाला.
  • यावेळी चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे ३.५८ लाख किमी अंतरावर आला. त्यामुळे नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा तर ३० टक्के अधिक तेजस्वी दिसत होता.
  • खगोल शास्त्रज्ञांनी याला ‘स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स’ असे नाव दिले आहे
  • यापूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी म्हणजेच १५२ वर्षांपूर्वी असा तिहेरी योग जुळून आला होता.
  • २०१८नंतर ३१ जानेवारी २०३७ मध्ये ‘सुपर-ब्ल्यू-ब्लड मून’ पाहाण्याचा तिहेरी योग येणार आहे. २६ मे २०२१ रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण असा दुहेरी योग येणार आहे.
 सुपरमून म्हणजे काय? 
  • चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३.८४ किमी इतक्या अंतरावर असतो.
  • पण, चंद्र पृथ्वीभोवती लंबवतुर्ळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ (perigee) तर कधी दूर (apogee) जातो.
  • ज्यावेळी पौर्णिमेचा किंवा अमावस्येचा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ अंतरावर येतो तेंव्हा त्या घटनेला सुपरमून असे म्हटले जाते.
  • अशा स्थितीत चंद्र नेहमी पेक्षा मोठा व तेजस्वी दिसतो. वर्षातून काही वेळा सुपरमून घडून येत असते. यापूर्वीचे सुपरमून याच महिन्यात १ तारखेला झाले होते.
 ब्लुमून म्हणजे काय? 
  • सर्व साधारणपणे एका महिन्यात एक पोर्णिमा व एक अमावस्या असते. पण जेंव्हा एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात तेंव्हा त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लुमून असे म्हटले जाते.
  • ब्लुमूनच्या वेळी चंद्र नेहमी सारखाच असतो, त्याचा रंग निळसर वगैरे असा काही नसतो.
 ब्लड मून म्हणजे काय? 
  • सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत आणि प्रतलात येतात त्यावेळी ग्रहण होते.
  • अशा वेळी जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून (Umbra) जातो तेंव्हा प्रकाश किरणांचे विकीरण होते व बहुतांश निळ्या रंगाच्या छटा शोषल्या जावून नारंगी लाल रंग तेवढाच शिल्लक राहतो.
  • यामुळे चंद्र गडद छायेत असताना म्हणजे खग्रास स्थितीत असताना लालसर नारंगी दिसतो. त्यास ब्लड मून असे म्हणतात.

जगातील श्रीमंत देशांमध्ये भारत सहावा

  • जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या क्रमवारीत भारताने सहावा क्रमांक पटकावला आहे. भारतातील एकूण संपत्तीचे मूल्य ८,२३० अब्ज डॉलर इतके आहे.
  • न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेने तयार केलेल्या अहवालानूसार अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. २०१७ साली अमेरिकेची एकूण संपत्ती ६४,५८४ अब्ज डॉलर इतकी होती.
  • दुसरा क्रमांकावर असलेल्या चीनची एकूण संपत्ती २४,८०३ अब्ज डॉलर, तिसरा क्रमांक पटकाविलेल्या जपानची एकूण संपत्ती १९,५२२ अब्ज डॉलर आहे.
  • या पाहणीसाठी प्रत्येक देशातील प्रत्येक व्यक्तीकडे असलेली स्थावर, जंगम मालमत्ता, समभाग, व्यावसायिक मत्ता आदी विचारात घेण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारकडे असलेल्या निधीची रक्कम या मोजदादीतून वगळण्यात आली आहे.
  • २०१६मध्ये भारताची एकुण संपत्ती ६५८४ अब्ज डॉलर होती. २०१७मध्ये ती ८२३० अब्ज डॉलर झाली. म्हणजे २०१७मध्ये भारताच्या एकुण संपत्तीत २५ टक्के वाढ झाली.
  • भारतात अतिश्रीमंतांची (१० लाख डॉलर वा त्याहून अधिक संपत्ती असणारे) ३,३०,४०० आहे. अमेरिकेत हीच संख्या ५०,४७,००० आहे.
  • भारतातील कोट्यधीशांची संख्या २०,७३० असून, अब्जाधीशांची संख्या ११९ आहे.
  • जगातील अब्जाधीशांच्या यादीत अमेरिका आणि चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोट्यधीशांच्या यादीत भारत सातवा आहे.
जगातील पहिले दहा श्रीमंत देश
क्र. देश संपत्ती (अब्ज डॉलर)
१. अमेरिका ६४,५८४
२. चीन २४,८०३
३. जपान १९,५२२
४. ब्रिटन ९,९१९
५. जर्मनी ९,६६०
६. भारत ८,२३०
७. फ्रान्स ६,६४९
८. कॅनडा ६,३९३
९. ऑस्ट्रेलिया ६,१४२
१०. इटली ४,२७६

यशवंत सिन्हा यांच्याकडून ‘राष्ट्र मंच’ची स्थापना

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी नवीन राजकीय वाटचालीसाठी ‘राष्ट्र मंच’ची स्थापना केली आहे.
  • यामध्ये भाजपचेच खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह इतर पक्षांचे नेतेही सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे.
  • केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा यांच्यासारख्या भाजपच्या जुन्या नेत्यांना बाजूला सारण्यात आले होते.
  • यामुळे या नाराज नेत्यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये शत्रुघ्न सिन्हा देखील आघाडीवर होते.
  • यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी ‘राष्ट्र मंचा’ची स्थापना केली आहे.

चालू घडामोडी : ३० जानेवारी

प्रसिध्द बांग्ला अभिनेत्री सुप्रिया देवी यांचे निधन

  • पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया देवी यांचे वयाच्या ८३व्या वर्षी २६ जानेवारी रोजी निधन झाले.
  • सुप्रिया देवी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुप्रिया चौधरी यांना २०१४साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०११मध्ये त्यांना बंग विभूषणनेही सन्मानित करण्यात आले आहे.
  • सुप्रिया देवी यांना ‘मेघे ढाका तारा’ या बंगाली चित्रपटासाठी ओळखले जाते. जवळपास ५० वर्ष त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये आपले योगदान दिले.
  • या व्यतिरिक्त त्यांनी सन्यासी राजा, स्वरलिपी, कोमल गांधार, अनारकली आदी चित्रपटांमध्ये आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाची झलक दाखविली.
  • सुप्रिया देवी यांचा जन्म म्यानमार (तेव्हाचा बर्मा) येथे झाला होता. त्याठिकाणी त्यांचे वडील गोपाल चंद्र बॅनर्जी वकील होते.
  • त्यांनी उत्तम कुमारसोबत १९५२ मध्ये ‘बासु परिवार’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता.
  • १९५९साली ‘सोनार हरिन’ या चित्रपटानंतर त्यांचा इंडस्ट्रीतील प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. या चित्रपटातही त्यांनी उत्तम कुमारसोबत काम केले होते.
  • त्यांच्या अभिनयगुणांमुळे बंगालची सोफिया लॉरेन, बंगालच्या महामालिकांची जननी अशी नामाभिधाने त्यांना प्राप्त झाली.

अस्मिता योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

  • राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अस्मिता योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • या योजनेनुसार ग्रामीण भागातील शाळकरी मुली आणि महिला यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स मिळणार आहेत.
  • अस्मिता योजना ग्राम विकास खात्याच्या उमेद अभियानातर्फे राबवली जाणार आहे. महिला दिन अर्थात ८ मार्चपासून आम्ही ही योजनेची अंमलबजावणी सुरु होईल.
  • महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.
  • या योजनेमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल तसेच त्यांचे आरोग्यही चांगले राहिल व मुलींचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढेल.

बोपन्ना-बाबोस जोडीला ऑस्ट्रेलियन ओपनचे उपविजेतेपद

  • भारताचा रोहन बोपन्ना आणि हंगेरीची टिमिया बाबोस यांना ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
  • बोपन्ना-बाबोस जोडीला क्रोएशियाचा मॅट पॅव्हिक आणि कॅनडाची गॅब्रिएल डेब्रोवस्की या जोडीने २-६, ६-४, ११-९ असे पराभूत केले.
  • पॅव्हिकसाठी पुरूष दुहेरीपाठोपाठ हे दुसरे विजेतेपद ठरले तर टिमिया बाबोसचा मात्र दुहेरी मुकूटाचा मान हुकला. ती क्रिस्टीना लाडेनोव्हिकसोबत महिला दुहेरीत अजिंक्य ठरली होती.
ऑस्ट्रेलियन ओपन - अंतिम विजेते
प्रकार विजेते उपविजेते
पुरुष एकेरी रॉजर फेडरर मारीन चिलिच
महिला एकेरी कॅरोलिन वॉझनियाकी सिमोना हालेप
पुरुष दुहेरी ऑलिव्हर मराच व मॅट पॅव्हिक जे कबल व रॉबर्ट फराह
महिला दुहेरी टिमिया बाबोस व ख्रिस्तिना लादेनोविच एकाटेरीना मॅकारोव्हा व एलिना व्हेसनिना
मिश्र दुहेरी मॅट पॅव्हिक व गॅब्रिएल डेब्रोवस्की रोहन बोपण्णा व टिमिया बाबोस

ग्रॅमी पुरस्कार २०१८

  • अमेरिकी गायक, संगीतकार पीटर जेने हर्नांडेझ ऊर्फ ब्रुनो मार्स यांनी ६०व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक सहा पुरस्कारांवर नाव कोरले.
  • त्याच्या खालोखाल रॅप संगीत कलावंत केंड्रिक लॅमरने ५ पुरस्कार पटकावले. तरुणांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेला ब्रिटिश गायक व गीतकार एड शिरन याला २ पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
पुरस्कार विजेते
  • सर्वोत्कृष्ट आल्बम - २४ के मॅजिक, ब्रुनो मार्स
  • सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड - २४ के मॅजिक, ब्रुनो मार्स
  • सर्वोत्कृष्ट गीत - ‘दॅट्स व्हॉट आय लाइक’, ब्रुनो मार्स
  • सर्वोत्कृष्ट कंट्री आल्बम - ‘फ्रॉम ए रूम : व्हॉल्यूम १’, ख्रिस स्टेपलटन
  • सर्वोत्कृष्ट रॅप आल्बम - डॅम, केंड्रिक लॅमर
  • सर्वोत्कृष्ट पॉप एकल सादरीकरण - शेप ऑफ यू, एड शिरन
  • नवोदित कलाकार - अॅलिसा कारा
  • रॅप/गायन सादरीकरण - लॉयल्टी, केंड्रिक लॅमर (साथ - रिहाना)
  • सर्वोत्कृष्ट विनोदी आल्बम - ‘दी एज ऑफ स्पिन’ आणि ‘डीप इन दि हार्ट ऑफ टेक्सास’, डेव्ह चॅपेल
  • पारंपरिक पॉप गायन आल्बम - ‘टोनी बेनेट सेलिब्रेट्स ९०’
  • सर्वोत्कृष्ट रॉक आल्बम - ‘ए डीपर अंडरस्टँडिंग’, दि वॉर ऑन ड्रग्ज
  • सर्वोत्कृष्ट पॉप गायन आल्बम - डिव्हाइड, एड शिरन
  • सर्वोत्कृष्ट रॅप गीत - हम्बल, केंड्रिक लॅमर
  • सर्वोत्कृष्ट रॅप सादरीकरण - केंड्रिक लॅमर
  • सर्वोत्कृष्ट अर्बन कंटेंपररी आल्बम - स्टारबॉय - दी विकेंड
  • सर्वोत्कृष्ट आर अँड बी आल्बम - २४ के मॅजिक, ब्रुनो मार्स
  • सर्वोत्कृष्ट आर अँड बी सादरीकरण - ब्रुनो मार्स
  • सर्वोत्कृष्ट आर अँड बी गीत - ‘दॅट्स व्हॉट आय लाइक’, ब्रुनो मार्स
  • सर्वोत्कृष्ट डान्स/इलेक्ट्रॉनिक आल्बम - ‘३-डी दी कॅटालॉग

चालू घडामोडी : २९ जानेवारी

आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर

  • केंद्र सरकारकडून २९ जानेवारी रोजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडला.
  • या अहवालानुसार आगामी आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ७ ते ७.५ टक्क्यांच्या आसपास राहील, असे अनुमान वर्तवण्यात आले आहे.
  • केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर ६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
  • अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे.
  • तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.
  • १ फेब्रुवारीला अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प मांडतील. या पार्श्वभूमीवर आर्थिक सर्वेक्षण अहवालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
 आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे: 
  • हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे शेतीच्या उत्तन्नावर परिणाम झाला.
  • प्राथमिक विश्लेषणानुसार जीएसटीमुळे अप्रत्यक्ष करदात्यांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली. प्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येमध्येही मोठी वाढ झाली आहे.
  • महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांमधून जीएसटीसाठी सर्वाधिक उद्योगांनी नोंदणी केली.
  • देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या पाच राज्यांनी देशाच्या एकूण निर्यातीच्या ७० टक्के निर्यात केली.
  • जीएसटीच्या माध्यमातून देशांतर्गत उद्योगात झालेल्या उलाढालीचे प्रमाण एकूण जीडीपीच्या ६० टक्के इतके आहे.
  • २०१७-१८ या वर्षात देशातील महागाई नियंत्रणात राहिली. ग्राहक किंमत निर्देशांकानुसार यंदाच्या आर्थिक वर्षातील महागाईचे प्रमाण सरासरी ३.३ टक्के इतके राहिले. महागाईच्या दराचा हा गेल्या सहा वर्षातील नीच्चांक आहे.
  • खासगी गुंतवणूकीत सुधारणा होईल तसेच निर्यातीलाही चालना मिळेल.
  • आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय व्यापारावर राज्यांची समृद्धता अवलंबून आहे.
  • चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर २.१ टक्के राहण्याचा अंदाज.
  • चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट ३.२ टक्के राहण्याचा अंदाज.
  • १२ टक्क्यांपर्यंत कच्चा तेलाच्या किंमती वाढू शकतात. त्यामुळे महागाई भडकण्याचा धोका.

सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत भारताची तिसऱ्या स्थानी

  • सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत गेल्यावर्षी पहिल्या स्थानी असलेल्या भारताची यावर्षी तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
  • भारताचा विचार केला तर प्रसारमाध्यमे, उद्योग व अशासकीय संस्था यावरील लोकांचा विश्वास २०१७च्या तुलनेत घटला आहे.
  • अर्थात, विश्वास घटला असला तरी अद्याप विश्वसनीय गटातून बाहेर फेकले जाण्याएवढी घट नसल्याने भारत तिसऱ्या स्थानी राहू शकला आहे.
  • जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या कठोर आर्थिक सुधारणांनंतरही केंद्र सरकारवरील लोकांचा विश्वास ढळलेला नसल्याचे हा निर्देशांक सांगत आहे.
  • एडलमन या संपर्कक्षेत्रातल्या कंपनीकडून गेदरवर्षी दावोस येथून ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स जाहीर करण्यात येतो. त्यामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
  • उद्योग व्यवसायस अशासकीय संस्था व प्रसारमाध्यमे यांच्याकडे जनता कुठल्या नजरेने बघते या निकषावरही भारत विश्वसनीय या कसोटीस उतरला आहे.
  • या निर्देशांकानुसार सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत पहिल्या दोन स्थानांवर चीन व इंडोनेशिया हे देश आहेत.
  • चीन २०१७ मध्ये ६७ गुणांसह तिसऱ्या स्थानी होता. यावर्षी चीनने ७ गुणांची कमाई करत ७४ गुणांसह पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
  • भारत गेल्या वर्षी ७२ गुणांसह पहिल्या स्थानी होता. मात्र, यावर्षी चार गुणांनी घट झाली असून ६८ गुणांसह भारताची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
  • ग्लोबल ट्रस्ट इंडेक्समध्ये अमेरिकेला सर्वाधिक नुकसान सोसावे लागले असून, अमेरिकेच्या रँकिंगमध्ये नऊ गुणांची घट झाली आहे.

कृषीशास्त्रज्ञ गुरचरण सिंग कालकट यांचे निधन

  • देशाच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा असलेले कृषीशास्त्रज्ञ गुरचरण सिंग कालकट यांचे २७ जानेवारी रोजी निधन झाले.
  • कृषी क्षेत्रातील सर्व प्रश्नांची त्यांना बारकाईने माहिती होती. त्यावर त्यांनी उपायही सुचवले होते.
  • पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे त्यांचा जन्म झाला. सध्या पाकिस्तानात असलेल्या लायलपूर येथील पंजाब कृषी विद्यापीठातून त्यांनी बीएस्सी पदवी घेतली.
  • त्यानंतर कृषी क्षेत्रात स्नातकोत्तर पदवी घेऊन ते रॉकफेलर फेलोशिपवर अमेरिकेत गेले. तेथे ओहिओ स्टेट विद्यापीठातून त्यांनी कृषीशास्त्रात पीएचडी केली.
  • मेक्सिकन गव्हाच्या प्रजातीचे बियाणे भारतात आणून १९६०च्या मध्यावधीत हरितक्रांती घडवण्यात आली त्यात त्यांचाही सहभाग होता.
  • नोबेल विजेते नॉर्मन बोरलॉग व डॉ. एम एस स्वामिनाथन यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. पंजाबमधील कृषी संशोधनास वेगळी दिशा देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
  • पंजाब राज्य शेतकरी आयोगाचे माजी अध्यक्ष, पंजाब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी आयुक्त ही पदे त्यांनी भूषवली होती.
  • इंदिरा गांधी यांच्या काळात ते देशाचे कृषी आयुक्त होते. जागतिक बँकेत त्यांनी दहा वर्षे कृषितज्ज्ञ म्हणून काम केले होते.
  • जागतिक बँकेच्या श्रीलंका, नेपाळ व इंडोनेशिया देशांसाठीच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी त्यांनी केली.
  • त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांच्या पद्मश्री व पद्मभूषण या नागरी सन्मानांनी त्यांचा गौरव केला.

परराष्ट्र सचिवपदी विजय गोखले

  • डोकलाम प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी विजय गोखले यांनी परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार २९ जानेवारी रोजी स्वीकारला.
  • एस जयशंकर यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. पुढील २ वर्षांसाठी गोखले हा पदभार सांभाळतील.
  • विजय गोखले हे १९८१च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात एमए केले आहे.
  • यापूर्वी त्यांनी परराष्ट्र खात्यात उपसचिव (अर्थ), संचालक (चीन व पूर्व आशिया, सहसचिव (पूर्व आशिया) आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
  • जानेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत त्यांनी मलेशियात भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले आहे.
  • तर ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१६ या कालावधीत ते जर्मनीत भारताचे राजदूत होते. तसेच त्यांनी हाँगकाँग, बीजिंग आणि न्यूयॉर्कमध्ये काम केले आहे.
  • जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या काळात ते चीनमध्ये भारताचे राजदूत होते. चिनी भाषा व तेथील राजनैतिक व्यवहारांची त्यांना माहिती आहे.
  • पाकिस्तान आणि चीन या शेजारी राष्ट्रांसोबत भारताचे असलेले तणावपूर्ण संबंध हे त्यांच्यासमोरील आव्हान असेल.
  • याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पॅलेस्टाईन, यूएई आणि ओमान हा दौरा देखील गोखले यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
  • गोखले हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांच्या आधी १९७९ ते १९८२ या कालावधीत पुण्याचे राम साठे यांनी देशाचे परराष्ट्र सचिवपद सांभाळले आहे.

इन्डोनेशियन मास्टर्स स्पर्धेत सायना नेहवालला उपविजेतेपद

  • इन्डोनेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या ताय झ्यू यिंगने पराभूत केले.
  • जेतेपदाच्या लढतीत ताय झ्यू हिने सायना नेहवालचा अवघ्या २७ मिनिटांत २१-९, २१-१३ अशी मात केली.
  • पायाच्या दुखापतीतून सावरलेली सायना जवळपास वर्षभरानंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होती.
  • १२व्या क्रमांकावर असलेल्या सायनाला ताय झ्यू यिंग हिने गेल्या १० लढतींमध्ये ९ वेळा नमविले आहे.
  • २०११मध्ये सायनाने तैवानच्या या खेळाडूला पराभूत केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये सायनाने तायविरुद्ध स्वीस ओपनमध्ये विजय नोंदविला होता.

चालू घडामोडी : २८ जानेवारी

रॉजर फेडररला ऑस्ट्रेलियन ओपनचे विक्रमी विजेतेपद

  • स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने क्रोएशियाच्या मारिन सिलिचला ६-२, ६-७, ६-३, ३-६ आणि ६-१ असे नमवत पुरुष एकेरीच्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदावर आपले नाव कोरले.
  • रॉजर फेडररचे हे ऑस्ट्रेलियन ओपनचे सलग दुसरे आणि एकूण सहावे विजेतेपद आहे. गेल्यावर्षीही फेडररने सिलिचला हरवूनच हे विजेतेपद जिंकले होते.
  • रॉजर फेडररचे टेनिस करिअरमधले २०वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. त्यामुळे पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिसपटू फेडरर ठरला आहे.
  • याबरोबरच त्याने सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा रॉय एमर्सन यांच्या ६ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याच्या रेकॉर्डची बरोबरीही केली.
  • स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि क्रोएशियाचा सिलिच हे दोघेही आत्तापर्यंत दहावेळा प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर आले आहेत.
  • यापैकी ९ वेळा रॉजर फेडरर तर एकदा सिलिच विजयी झाला आहे. सिलिचने २०१४ मध्ये अमेरिका ओपनमध्ये फेडररचा पराभव केला होता.
  • ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात धडक देण्याची फेडररची ही ३०वी वेळ होती. त्याच्या नावावर आता ऑस्ट्रेलियन ओपनची ६, विम्बल्डनची ८, फ्रेंच ओपनचे १ आणि अमेरिकन ओपनची ५ विजेतेपदं आहेत.
  • आतापर्यंत तीन महिला टेनिसपटूंनी एकेरीची २० हून अधिक ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावण्याची किमया केली आहे.
  • मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर सर्वाधिक २४ जेतेपदं असून सेरेना विल्यम्सने २३, तर स्टेफी ग्राफनं २२ ग्रँडस्लॅम ट्रॉफींवर नाव कोरले आहे. या क्लबमध्ये रॉजर फेडररच्या रूपाने पुरुष टेनिसपटूने प्रवेश केला आहे.
  • सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे ५ खेळाडू
    • रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) : २०
    • राफेल नदाल (स्पेन) : १५
    • पीट सँप्रस (अमेरिका) : १४
    • रॉय इमर्सन (ऑस्ट्रेलिया) : १२
    • नोवाक जोकोविच (सर्बिया) : १२
  • सर्वाधिक ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे खेळाडू
    • रॉजर फेडरर ( स्वित्झर्लंड) : ६
    • रॉय इमर्सन (ऑस्ट्रेलिया) : ६
    • नोवाक जोकोविच (सर्बिया) : ६
    • जॅक क्रॉफोर्ड (ऑस्ट्रेलिया) : ४
    • आंद्रे अगासी (अमेरिका) : ४
    • केन रॉसवेल (ऑस्ट्रेलिया) : ४

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

  • प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित संचलनात महाराष्ट्राने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला.
  • प्रा. नरेंद्र विचारे यांची संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ कलादिग्दर्शक नितीन सरदेसाई यांनी साकारला होता.
  • चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली होती.
  • मध्यभागी रायगडाची प्रतिकृती व त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले होते.
  • याशिवाय आभूषण देणारा दरबारी, गागाभट्ट, या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजनही दाखवण्यात आले होते.
  • दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे तर मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या होत्या.
  • यावेळी संचलनात राजपथावर १४ राज्यांसह केंद्र सरकारच्या ७ खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे २ चित्ररथ असे एकूण २३ चित्ररथ सादर झाले होते.
  • प्रथम क्रमांक पटकावण्याची हॅटट्रिक करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. १९९२ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला होता.
  • २०१५मध्ये महाराष्ट्राने सादर केलेल्या पंढरीची वारी या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता. आता २ वर्षांनंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा हा सन्मान मिळाला.
  • गेल्या वर्षी लोकमान्य टिळक यांच्यावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला होता.

गुरु सिद्धेश्वर स्वामी यांनी पद्मश्री नाकारला

  • कर्नाटकातील विजयपूर येथील ‘ज्ञान योगाश्रम’चे आध्यात्मिक गुरु सिद्धेश्वर स्वामी यांना जाहीर झालेला यंदाचा ‘पद्मश्री’ किताब त्यांनी नाकारला आहे.
  • आपण सन्यासी असल्याने असल्याने पुरस्कारांमध्ये मला स्वारस्य नाही, त्यामुळे हा प्रतिष्ठित पुरस्कार स्विकारता येणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
  • २०१५मध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता. आपल्याला हा पुरस्कार खूपच उशीरा देण्यात आला असे त्यांनी म्हटले होते.

दिव्यांगाना केंद्राचे चार टक्के आरक्षण

  • आत्मकेंद्रीपणा (ऑटिझम), मनोरुग्ण, बौद्धिक दुर्बलता आणि अ‍ॅसिड हल्ल्याने बाधित झालेल्या व्यक्तींना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
  • ‘अ’,‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील थेट भरतीच्या पदांपैकी ४ टक्के जागा विवक्षित प्रमाणात अपंगत्व (बेंचमार्क डिसेबिलिटी) असलेल्या दिव्यांगांसाठी राखून ठेवल्या जाणार आहेत.
  • ठराविक प्रकारच्या ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्वास ‘बेंचमार्क डिसेबिलिटी’ म्हटले जाते.
  • केंद्र सरकारच्या सर्व खात्यांमध्ये अंध व अधूदृष्टी, कर्णबधीर, सेलेब्रल पाल्सीसह अवयव व्यंगता असलेले, स्नायूंचा शक्तीपात झालेले, खुजेपणाने उंची खुंटलेले आणि अ‍ॅसिडहल्ल्याने बाधीत झालेले अशा लोकांसाठी प्रत्येकी एक टक्का जागा राखून ठेवण्यात येणार आहेत.
  • तसेच ऑटिझम, बौद्धिक दुर्बलता, शिक्षणात मंद असलेले व मनोरुग्ण यांच्यासाठीही हे १ टक्का आरक्षण लागू असेल.
  • याआधी सन २००५मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार दिव्यांगांसाठी तीन टक्के आरक्षण होते. २०१६साली नवा दिव्यांग हक्क कायदा संमत झाल्यानंतर हे आरक्षण एक टक्क्याने वाढवण्यात आले आहे.
  • दिव्यांगासाठी असलेल्या राखीव जागांवर फक्त याच प्रवर्गातील व्यक्ती नेमल्या जाव्यात आणि त्या जागा रिकाम्या असतील तर त्यावर अनुसुचित जाती व जमातींच्या व्यक्तींची नेमणूक न करण्याची तरतूदही नव्या नियमांमध्ये करण्यात आली आहे.

चालू घडामोडी : २७ जानेवारी

कॅरोलिन वोझ्नियाकीला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

  • डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिचे हे कारकीर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.
  • महिला एकेरीच्या अंतिम लढतीत कॅरोलिनने रोमानियाच्या अव्वल मानांकित सिमोना हॅलेपला ७-६ (२), ३-६, ६-४ असे पराभूत केले.
  • यापूर्वी या दोघी सहा वेळा आमनेसामने आल्या होत्या. त्यात चार वेळा कॅरोलिनने, तर दोन वेळा सिमोनाने बाजी मारली होती.
  • यापूर्वी कॅरोलिनला २००९ व २०१४मध्ये युएस ओपनच्या तर २०११मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
  • सिमोना हॅलेपला फ्रेंच ओपनच्या दोन उपविजेतेपदानंतर आता पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

आधार : हिंदी वर्ड ऑफ दि इयर २०१७

  • जगभरात प्रसिद्ध असलेला इंग्रजी शब्दकोश अर्थात ऑक्सफोर्ड डिक्शनरी दरवर्षी ‘इंग्रजी वर्ड ऑफ दि इयर’ घोषित करते.
  • त्याचप्रमाणे ऑक्सफोर्डने यंदा पहिल्यांदाच ‘हिंदी वर्ड ऑफ दि इयर’ घोषित केला असून २०१७सालासाठी हा मान ‘आधार’ या शब्दाला मिळाला आहे.
  • राजस्थानात सुरु असलेल्या जयपूर साहित्य संमेलनात (जेएलएफ) ऑक्सफोर्ड डिक्शनरीकडून ही घोषणा करण्यात आली.
  • गेल्या वर्षी सर्वात जास्त चर्चा झालेला आणि जनतेचे लक्ष वेधून घेणाऱ्या शब्दाची निवड समितीने निवड केली.
  • ‘हिंदी वर्ड ऑफ दि इयर’च्या स्पर्धेमध्ये नोटबंदी, स्वच्छ, आधार, योग, विकास, बाहुबली असे अनेक पर्यायी शब्द होते. अखेर यांमधून ‘आधार’ या शब्दाची निवड करण्यात आली.
  • भारत सरकारने देशवासियांना एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी ‘आधार’ ही योजना जाहीर केली.
  • सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्याचबरोबर बँक खाती आणि मोबाईलसाठीही ‘आधार’ गरजेचा झाला आहे. त्यामुळे आधार कार्ड आता हळूहळू प्रमुख ओळखपत्र म्हणून पुढे येत आहे.

अर्थसंकल्प : विशेष माहिती

  • दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. या अर्थसंकल्पाबाबत काही महत्त्वाच्या बाबी येथे जाणून घेऊ.
  • बजेट (अर्थसंकल्प) या शब्दाची उत्पत्ती फ्रेंच शब्द ‘बुगेट’ पासून झाली आहे. याचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम १७३३ मध्ये वापरण्यात आला.
  • वित्तीय वर्षांतील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती व त्याचबरोबर गतवर्षांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा, नवीन कर योजना व भांडवली खर्च भागविण्याची व्यवस्था म्हणजे अर्थसंकल्प.
  • भारताची सत्ता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली, त्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी जेम्स विल्सन याने मांडला.
  • स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील लियाकत अली खान यांनी १९४७-४८चा अर्थसंकल्प मांडला.
  • स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले वित्तमंत्री आर के शण्मुखम शेट्टी यांनी देशाचा स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला.
 अर्थसंकल्पाविषयी तरतुदी 
  • राज्यघटनेच्या कलम ११२नुसार केंद्र सरकारचा तर २०२व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. हा अर्थसंकल्प १ एप्रिल ते ३१ मार्च या वित्तीय वर्षासाठी असतो.
  • भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्रक (Annual Financial Statement) हा शब्द वापरण्यात आला आहे.
  • अर्थसंकल्प हे राज्यघटनेतील कलम ११०अन्वये अर्थ विधेयक आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार केवळ लोकसभेलाच असतो. राज्यसभा केवळ त्यातील तरतुदींवर चर्चा करू शकते.
  • अर्थसंकल्प हा वित्त मंत्रालयांतर्गत कार्य करणाऱ्या आर्थिक कामकाज विभागामार्फत (Department of Economic Affairs) तयार केला जातो.
  • अर्थसंकल्प संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचे कार्य राष्ट्रपतींचे आहे व राज्याचा अर्थसंकल्प मांडताना ते कार्य राज्याच्या राज्यपालांचे आहे.
  • भारतात दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी (२८ फेब्रुवारी/२९ फेब्रुवारी) रोजी अर्थसंकल्प संसदेत मांडला असे. परंतु गेल्या वर्षीपासून तो १ फेब्रुवारीला सादर करण्याचे निश्चित झाले आहे.
  • साधारणत: अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी चालू वर्षांची भारताची आर्थिक पाहणी (Economic survey) अहवाल संसदेत मांडला जातो.
  • १९२१च्या अ‍ॅकवर्थ समितीच्या शिफारशीनुसार १९२४पासून रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा मांडला जात होता.
  • मात्र मागील वर्षापासून मोदी सरकारने साधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्रितरित्या मांडण्याचा निर्णय घेतला. 
  • कोणत्याही वर्षांच्या अर्थसंकल्पात सरकारी जमाखर्चाचे तीन वर्षांचे आकडे दिलेले असतात.
    1. गेल्या वित्तीय वर्षांचे प्रत्यक्ष आकडे
    2. चालू वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाज व संशोधित अंदाज
    3. तसेच पुढील वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाज 
 अर्थसंकल्पाचे प्रकार 
  1. समतोल अर्थसंकल्प : जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च दोन्ही सारखे असतात.
  2. शिलकीचा अर्थसंकल्प : जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते.
  3. तुटीचा अर्थसंकल्प : जेव्हा सरकारच्या अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च जास्त असतो.
 अर्थसंकल्पांचे स्वरूप 
  1. पारंपरिक अर्थसंकल्प : पारंपरिक अर्थसंकल्पात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते. त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो. 
  2. निष्पादन अर्थसंकल्प : या अर्थसंकल्पाचा मुख्य भर वित्तीय संसाधनांची विभागणी अधिक कार्यक्षम व परिणामकारकरीत्या होण्यासाठी प्रदानांवर आधारित अर्थसंकल्प निर्मिती करणे हे अंतर्भूत आहे. निष्पादन अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग अमेरिकेमध्ये झाला.
  3. शून्याधारित अर्थसंकल्प : शून्याधारित अर्थसंकल्प याचा अर्थ दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्च अंदाज करणे तसेच खर्चाची योजना तयार करताना प्रत्येक बाबीवरील खर्च आणि त्यापासून सामाजिक लाभ यांचा हिशोब मांडणे आणि खर्चासाठी प्राधान्यक्रम ठरवून खर्चाला मंजुरी देणे असा आहे. पीटर पिहर यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते. भारतात महाराष्ट्र राज्याने १ एप्रिल १९८६ रोजी पहिल्यांदा शून्याधारित अर्थसंकल्प साजरा केला. त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते. २००१मध्ये आंध्र प्रदेशात शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. (हा शेवटचा प्रयोग होता.)
  4. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प : गुंतवणूक खर्चापासून होणारे परिणाम, जेव्हा त्या परिणामांना आधार बनवून बजेट तयार केले जाते तेव्हा त्याला फलनिष्पत्ती बजेट म्हणतात. या अर्थसंकल्पात सामान्य अर्थसंकल्पाद्वारे प्रत्येक मंत्रालय/विभाग/ संस्थांना वाटावयाच्या योजनानिहाय/ प्रकल्पनिहाय वित्तीय साधनांबरोबर त्यांनी साध्य करावयाच्या फलनिष्पत्तींचा किंवा परिणामांचा समावेश असतो. या परिणामांचे मोजमाप करण्यासाठी मोजता येऊ शकतील असे भौतिक लक्ष्य निश्चित करण्यात आलेले असते.
 अर्थसंकल्पाविषयी इतर महत्वाची माहिती 
  • आधुनिक भारतात अर्थसंकल्पाची सुरुवात करण्याचे श्रेय ब्रिटिश-भारताचे पहिले व्हाईसरॉय लार्ड कॅनिंग यांना जाते.
  • १८५७च्या उठावानंतर अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांनी १८ फेब्रुवारी १८६० रोजी व्हाईसरॉय परिषदेत पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. ब्रिटिश अर्थमंत्र्यांच्या परंपरेचे अनुकरण करत त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या आर्थिक स्थिती विषयाची माहिती आणि सर्वेक्षण सादर केले. यामुळे जेम्स विल्सन यांना भारतीय अर्थसंकल्पाचे संस्थापक म्हणू शकतो.
  • १८६०नंतर दरवर्षी व्हाईसरॉय परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू झाली. इंग्रजांचे राज्य असल्याने भारतीय प्रतिनिधींना या काळात आपले मत मांडण्याचा अधिकार नव्हता.
  • स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी अर्थमंत्री आर के शण्मुखम चेट्टी यांनी मांडला.
  • मोरारजी देसाई हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री आहेत. त्यांनी १० वेळेस अर्थसंकल्प मांडला आहे.
  • पी. चिदम्बरम यांनी ८ वेळा अर्थसंकल्प मांडून मोरारजी देसाई यांच्यानंतर दुसरा क्रमांक मिळवलेला आहे.
  • प्रणव मुखर्जी, यशवंत सिन्हा, यशवंतराव चव्हाण आणि सी.डी. देशमुख यांनी ७ वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे.
  • टी टी कृष्णम्माचारी आणि डॉ. मनमोहन सिंह यांनी प्रत्येकी ६ वेळेस अर्थसंकल्प मांडलेला आहे.
  • प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदावरती कार्यरत असताना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आणि ते राष्ट्रपती झाले.
  • १९९९पर्यंत बजेट संध्याकाळी ५ वाजता सादर केले जाई. मात्र १९९९पासून ते सकाळी ११ वाजता सादर केले जाऊ लागले. सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करणारे यशवंत सिन्हा पहिले अर्थमंत्री ठरले.
  • २०१७ साली सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र करण्यात आला. यापूर्वी ९२ वर्षे हे दोन्ही अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात होते. मात्र नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्र केले.
  • डॉ. मनमोहन सिंह, यशवंत सिन्हा यांनी सलग पाच अर्थसंकल्प मांडले आहेत. १ फेब्रुवारी २०१८ला बजेट मांडल्यावर अरुण जेटलीसुद्धा सलग ५ अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री होतील.
  • २०१८-१९ या वर्षासाठी सादर केले जाणारे बजेट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या या रालोआ सरकारचे शेवटचे ‘पूर्ण’ बजेट असेल.

चालू घडामोडी : २५ व २६ जानेवारी

एस. सोमनाथ विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे नवे संचालक

  • विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या संचालकपदी जेष्ठ वैज्ञानिक एस. सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे सध्याचे संचालक के सिवन यांची इस्त्रोच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर सोमनाथ यांची वर्णी लागली आहे.
  • सोमनाथ हे या केंद्राचे माजी सहायक संचालक असून सध्या ते लिक्विड प्रॉपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत.
  • इस्रोपुढे जीएसएलव्ही म्हणजे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी करण्याचे जे मोठे आव्हान होते ते पेलण्यात सोमनाथ यांचा मोठा वाटा आहे.
  • डिसेंबर २०१४ मध्ये जीएसएलव्ही एमके ३ या प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी झाले होते, त्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
  • इस्रोने गेल्या वर्षी एकाच वेळी १०४ उपग्रह सोडण्याचा विक्रम केला होता. या मोहिमेतही ते सहभागी होते.
  • सोमनाथ हे मूळचे केरळचे असून, त्यांचे शिक्षण बेंगळूरु येथील आयआयएस्सी या संस्थेत झाले. तेथे त्यांना हवाई अभियांत्रिकीत सुवर्णपदक मिळाले होते.
  • १९८५मध्ये इस्रोत दाखल झाल्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, क्रायोजेनिक इंजिने, द्रव इंधनावर चालणारे प्रक्षेपक या अनेक प्रकल्पांत काम केले आहे.
  • अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अवकाश सुवर्णपदक, इस्रोचा उत्तम गुणवत्ता पुरस्कार, सामूहिक नेतृत्व पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
  • इंडियन नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग, एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांचे ते फेलो आहेत.

राजपथवर शिवराज्यभिषेकाचा चित्ररथ

  • २६ जानेवारी रोजी देशभरात ६९वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या संघटनेतील १० देशांचे राष्ट्रप्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
  • यावेळी राजपथावर १४ राज्यांसह केंद्र सरकारच्या ७ खात्यांचे आणि भारत-आसियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे २ चित्ररथ असे एकूण २३ चित्ररथ सादर करण्यात आले.
  • महाराष्ट्रातर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाच्या माध्यमातून यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा सादर करण्यात आला होता.
  • ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है ।’ या कवी भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ राजपथावर उतरला होता.
  • चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली होती.
  • मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखविण्यात आले होते.
  • यासोबतच गागाभट्ट, आभूषण देणारा दरबारी तसेच या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजनही दाखवले.
  • दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे तर मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या होत्या.
  • या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.

लेफ्ट. जन. राजेंद्र निंभोरकर यांना परमविशिष्ट सेवा पदक

  • संरक्षण मंत्रलयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सेना दलाच्या पुरस्कारांची घोषणा २५ जानेवारी रोजी करण्यात आली.
  • यामध्ये परमविशिष्ठ सेवा पदक, कीर्ती चक्र, उत्तम युद्धसेवा पदक, अति विशिष्ठ सेवा पदक, शौर्य चक्र, व सेना पदक या पुरस्कारांचा समावेश आहे.
  • यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये २८ जवानांना परम विशिष्ठ सेवा पदक, ४९ जवानांना अति विशिष्ठ सेवा पदक १० जवानांना युद्ध सेवा तर १२१ जवानांना विशिष्ठ सेवा पदक, १४ शौर्य चक्र, १० युद्ध सेवा पदक तर एका जवानास कीर्ती चक्र पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • याशिवाय देशातील ३९० जवानांना सेना पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे, महाराष्ट्राच्या २२ जवानांचा यात समावेश आहे.
  • महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना संरक्षण मंत्रालयाच्या वतीने दिले जाणारे परमविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.
  • सर्जिकल स्ट्राइकची रणनीती आखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल निंभोरकर हे मुळचे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामधील आहेत.
  • निंभोरकर यांनी आजवर लेह, कारगिल, काश्मीर खोरे, पुंछ, ईशान्य भारत आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. सध्या त्यांच्यावर जम्मू-काश्मीर येथील सीमा रक्षणाची जबाबदारी आहे.
  • पंजाब रेजिमेंटच्या कर्नल ऑफ रेजिमेंट हा मानाचा किताबही निंभोरकर यांना बहाल करण्यात आला असून लेफ्ट. जन. थोरात यांच्यानंतर असा किताब मिळविणारे ते एकमेव मराठी अधिकारी आहेत.
  • आजवर त्यांना युद्ध सेवा, विशिष्ट सेवा, अतिविशिष्ट सेवा अशा अनेक पदकांनी गौरविण्यात आले आहे.
  • नाशिकचे वीर जवान मिलींद खैरनार यांनी दाखविलेले अदम्य साहस व विलक्षण धाडसाची दखल घेत त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे.

मुरलीकांत पेटकर पद्मश्री पुरस्कार

  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवडच्या मुरलीकांत पेटकर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • मुरलीकांत पेटकर यांनी पॅरालिम्पिक प्रकारात भारताला जलतरण स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
  • १९६०साली पेटकर लष्कराच्या संघाकडून हॉकी खेळत होते. मात्र काही कारणामुळे त्यांनी १९६४साली बॉक्सिंगकडे मोर्चा वळवला.
  • १९६५साली पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात पेटकर यांना अपंगत्व आले. त्यामुळे पेटकर यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन बॉक्सिंगला रामराम करत जलतरणाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
  • १९७२साली जर्मनी येथे झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर जलतरणासाठी ३७.३३ सेकंदाचा जागतिक विक्रम करत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले.
  • १९७५साली पेटकर यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानीत केले.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

 प्रजासत्ताक दिनाबद्दल 
  • भारतात दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिवस राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते.
  • संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारलेले भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आले.
  • जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
  • २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.
  • या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे एक मोठी परेड (संचलन) निघते.
  • संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक ‘अमर जवान ज्योती’ येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते.
  • त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र, कीर्ती चक्र, परमवीर चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात.
  • भारतीय फौजांचे (नौदल, पायदळ, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/क्षेपणास्त्रे, रणगाडे समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
  • या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्ये आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठवितात.
  • या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
  • स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले. भारताच्या ‘विविधतेतून एकता’ या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती.
 प्रमुख अतिथी 
  • १९५०पासून भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून दरवर्षी दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला बोलावण्याची प्रथा आहे.
  • यंदाच्या ६९व्या प्रजासत्ताक दिनासाठी आसिआन संघटनेतील देशांचे प्रतिनिधी (खालीप्रमाणे) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहात आहेत.
  • सुलतान हसनल बोल्काय (अध्यक्ष, ब्रुनेई)
  • ह्युन सेन (पंतप्रधान, कंबोडिया)
  • जोको विडोडो (राष्ट्राध्यक्ष, इंडोनेशिया)
  • थाँगलून सिसूलिथ (पंतप्रधान, लाओस)
  • नजीब रजाक (पंतप्रधान, मलेशिया)
  • आंग सान सू की (स्टेट कौन्सीलर, म्यानमार)
  • रोड्रिगो रोआ ड्युआर्टे (राष्ट्राध्यक्ष, फिलिपाइन्स)
  • ली ह्यसीन लूंग (पंतप्रधान, सिंगापूर)
  • प्रायुथ चान ओचा (पंतप्रधान, थायलंड)
  • न्ग्युएन झुआन फुक (पंतप्रधान, व्हीएतनाम)
यापूर्वीचे प्रमुख अतिथी
वर्ष प्रमुख अतिथी देश
१९५० राष्ट्रपती सुकर्णो इंडोनेशिया
२०११ राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो इंडोनेशिया
२०१२ पंतप्रधान यिंगलक शिनावत थायलंड
२०१५ राष्ट्रपती बराक ओबामा अमेरिका
२०१६ राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद फ्रान्स
२०१७ राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान संयुक्त अरब अमिराती

चालू घडामोडी : २४ जानेवारी

१०० टक्के सेंद्रिय कृषी उत्पादने पिकविणारे सिक्कीम देशातील पहिले राज्य

  • १ एप्रिल २०१८ पासून सिक्कीमध्ये असेंद्रिय म्हणजेच रसायनांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या आणि फळे यांच्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
  • १ एप्रिल २०१८ पासून सिक्कीममध्ये केवळ आणि केवळ रसायनांचा वापर न करता पिकवलेल्या सेंद्रिय भाज्याच मिळणार आहेत.
  • अन्य राज्यांतून रसायनांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या येऊ न देण्याचा निर्णय सिक्कीम सरकारने घेतला आहे.
  • केवळ सेंद्रिय कृषी उत्पादने म्हणजे भाज्या आणि फळेच उपलब्ध असणारे सिक्कीम हे त्यामुळे भारतातील पहिले राज्य असेल.
  • सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या आणि फळे बाजारात आणण्यासाठी राज्य सरकार वाहने उपलब्ध करून देणार आहे.
  • २००३मध्ये मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी विधानसभेत राज्यातील संपूर्ण शेती सेंद्रिय करण्याची घोषणा केली होती. ती आता प्रत्यक्षात आली आहे.
  • सिक्कीमचे मुख्यमंत्री : पवनकुमार चामलिंग

चारा घोटाळ्याशी निगडीत चैबासा प्रकरणी लालू दोषी

  • राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चारा घोटाळ्याशी निगडीत चैबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविले आहे.
  • चैबासा प्रकरणी लालूप्रसाद यांना दोषी ठरवत ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
  • त्याचप्रमाणे या घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही ५ वर्षाची शिक्षा आणि ५ लाखाचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
  • चारा घोटाळ्यातील हे तिसरे प्रकरण आहे. न्यायालयाने याप्रकरणी ५६ पैकी ५० आरोपींना दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा सुनाविली आहे.
  • याआधी देवघर कोषागार चारा घोटाळ्यात साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले लालूप्रसाद रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
  • आता त्यांना हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे. तुरुंगात एक कैदी म्हणून त्यांना माळीकाम देण्यात आले असून, त्यासाठी त्यांनी वेतनही मिळणार आहे.
 चारा घोटाळ्याबद्दल 
  • शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चारा पुरवला जावा या उद्देशाने सरकारतर्फे मदत योजना राबवली जाते. बिहारच्या स्थापनेपासून या योजनेची अंमलबजावणी होत आहे.
  • सरकारी अधिकारी जनावरांची संख्या निश्चित करुन त्याप्रमाणे चारा खरेदीसाठी अनुदान द्यायचे. या अनुदानाचा हिशेब नंतरच्या महिन्यात देणे अपेक्षित असते. परंतू या प्रकरणात कोणताही हिशोब दिला गेला नाही.
  • देशाचे तत्कालीन महालेखापाल टी एन चतुर्वेदी यांना १९८५साली पहिल्यांदा या प्रकरणात काही काळेबेरे असल्याचा संशय आला. बिहार सरकार या खर्चाचे हिशेबच देत नसल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारला खडसावले होते.
  • १९९२ साली बिहार सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील बिंदुभूषण त्रिवेदी या पोलीस अधिकाऱ्याने या घोटाळ्याची चौकशी देखील केली.
  • बिहारच्या पोलीस महासंचालकांना त्यांनी अहवाल देखील दिला. मात्र, त्रिवेदी यांची तडकाफडकी बदली आणि हे प्रकरण थंड पडले.
  • १९९६मध्ये पश्चिम सिंगभूम जिल्ह्याचे उपायुक्त अमित खरे यांनी या प्रकरणी धाडी घालण्यास सुरुवात केली आणि चारा घोटाळ्याचे घबाडच त्यांच्या हाती लागले.
  • चारा घोटाळ्यात अनेक संस्थांना अनुदान देण्यात आले. या संस्था प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हत्या, अशी माहिती समोर आली.
  • चारा घोटाळा उघड करण्यात अमित खरे यांची महत्त्वाची भूमिका होती. मूळचे बिहारचे असेलेले खरे हे १९८५ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.
  • ९५० कोटींच्या या घोटाळ्याच्या ३३ पैकी ६ खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी ३ खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य ३ खटल्यांचे कामकाज सुरू आहे.
  • प्रत्यक्षात चाऱ्याचा पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता.
  • चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना ५ वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.
  • २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला, पण शिक्षेला स्थगिती न दिल्याने त्यांना ११ वर्षे निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. नव्या शिक्षेने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी आणखी ६ वर्षांनी वाढेल.
 लालूंवरील यापूर्वीचे खटले 
  • पहिला चारा घोटाळा : चाईबासा कोषागारातून ३७.७० कोटी रक्कम अवैधरीत्या काढल्याचा आरोप. ३० सप्टेंबर २०१३मध्ये दोषी ठरविण्यात आले. ५ वर्षांचा तुरुंगवास व २५ लाख रुपयांचा दंड.
  • दुसरा चारा घोटाळा : देवघर कोषागारातून ८९ लाखांची रक्कम अवैधरीत्या काढल्याच्या प्रकरणात लालूंना साडेतीन वर्षांची कैद आणि १० लाख दंड अशी शिक्षा झाली होती.

चालू घडामोडी : २३ जानेवारी

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये मोदींचे भाषण

  • स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे २२ जानेवारीपासून ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या ४८व्या वार्षिक सभेला सुरुवात झाली आहे.
  • या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसमध्ये दाखल झाले असून, गेल्या २० वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी या परिषदेला हजर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. १९९७साली तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा या परिषदेला हजर राहिले होते.
  • या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदीमध्ये भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी आज जगासमोर असलेल्या वेगवेगळया आव्हानांचा आढावा घेतला.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे
  • परदेशात भारतीयांवर कोणतेही संकट आले, तरी त्यांना सर्वप्रथम भारताकडून मदत होते.
  • व्यापाराला संरक्षण देण्याची वृत्ती वाढत आहे. सरकारे मुक्त व्यापारात अडथळे निर्माण करीत आहेत. याची काळजी वाटते.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेत भारताचा सर्वाधिक सहभाग.
  • भारतात लोकशाही, लोकसंख्या आणि गतिशीलता देशाच्या भविष्याला एकत्रितपणे आकार देत आहेत. यामुळे देश विकासाच्या मार्गावर.
  • लोकशाही आणि विविधतेचा अभिमान. लोकशाही म्हणजे केवळ राजकीय व्यवस्था नव्हे. विविध धर्म, संस्कृती, भाषा, वेशभूषा, अन्न यातील विविधता ही समाजासाठी जीवनशैली होय.
  • ३० वर्षांनंतर भारतीय मतदारांनी एका राजकीय पक्षाला बहुमत दिले. विशिष्ट गटाचे नव्हे, तर प्रत्येकाच्या विकासाचे आमचे ध्येय. ‘सबका साथ सबका विकास’ हाच आमचा नारा.
  • एकात्मता आणि ऐक्यावर भारताचा विश्वास आहे. 'वसुधैव कुटुंबकम' या विचारांनुसार आम्ही वाटचाल करीत आहोत. जगातील अंतर कमी करण्यासाठी हा विचार महत्त्वाचा आहे.

एफडीआयसाठी आकर्षक देशांच्या यादीत भारत पाचवा

  • जगातीलगुंतवणुकीसाठी आकर्षक देशांची एक यादी तयार करण्यात आली असून या यादीत भारताने जपानला मागे टाकत पाचवे स्थान मिळविले आहे.
  • ‘प्राईसवॉटर हाऊस कुपर्स’ या संस्थेने जगभरातील टॉप कंपन्यांच्या सीईओंची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार केला आहे.
  • या यादीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे. अमेरिकेत गुंतवणुकीसाठी पुरेशा संधी आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
  • चीन या यादीत दुसऱ्या स्थानी असून जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे. तर युरोप चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानी आहे.
  • भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. भारत उद्योगस्नेही देश असल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जात आहे.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार चंडी लाहिरी यांचे निधन

  • पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चंडी लाहिरी यांचे १८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांनी ५० वर्षे व्यंगचित्रकार म्हणून काम केले.
  • साधेपणा व सोपेपणा ही त्यांच्या व्यंगचित्राची खास वैशिष्ट्ये होती. त्यांच्या विनोदबुद्धीची धार तीक्ष्ण होती, पण त्यामुळे कधी कुणी दुखावले गेले नाही.
  • त्यांचा जन्म १३ मार्च १९३१ रोजी नडिया जिल्ह्यात झाला. १९४२च्या राजकीय चळवळीत सहभागी होते.
  • पत्रकारितेत त्यांची सुरुवात १९५२मध्ये दैनिक ‘लोकसेवक’ या बंगाली वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून झाली. पण नंतर ते १९६१मध्ये व्यंगचित्रकलेकडे वळले.
  • त्यानंतर ते ‘आनंदबझार पत्रिका’ समूहात काम करू लागले. त्यांची राजकीय व्यंगचित्रे ही नेहमीच चर्चेचा विषय ठरत.
  • भारताच्या राजकीय इतिहासाचे व स्वातंत्र्यलढय़ाचे सखोल ज्ञान त्यांना होते, ते त्यांच्या व्यंगचित्रातून जाणवत असे.
  • कारकीर्दीच्या आरंभीच ट्राम अपघातात त्यांचा एक हात गेला होता तरी त्यावर मात करून ते जीवनात यशस्वी झाले.
  • मिश्के, नेंगटी, बिदेशीदर चोखे बांगला, चंडीर चंडीपथ, बांगलार कार्टून इतिहास ही त्यांची बंगाली, तर चंडी लुक्स अराउंड व सिन्स फ्रीडम ही इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
  • कोलकाता दूरदर्शन केंद्रासाठी सचेतपटकार (ॲनिमेटर) म्हणूनही त्यांनी मोठे काम केले.
  • तसेच रुद्रप्रसाद सेनगुप्ता यांच्या ऑबिराटो चेनामुख या मालिकेत त्यांनी रंगीत व्यंगचित्रांचे अ‍ॅनिमेशन केले होते.
  • संवेदनशील मनाच्या चंडीदांनी बाल कर्करोग रुग्णालयासाठी मोफत व्यंगचित्रे काढून दिली होती.
  • बंगाल व कोलकाता या दोन विषयांवर त्यांना व्यंगचित्र मालिका काढायची होती. त्यांनी ती तयारही करून दिली, पण ती पुस्तकरूपात येणे राहिले.

महिला टी-२० विश्वचषक२०१८चे यजमानपद वेस्ट इंडिजला

  • २०१८मध्ये पार पडणाऱ्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाचे यजमानपद वेस्ट इंडिजकडे सोपविण्यात आले आहे.
  • ९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार असून, यावेळी यजमान वेस्ट इंडिजचा संघ आपले २०१६चे विजेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
  • २०१६ साली झालेल्या विश्वचषकात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाच्या संघावर ८ गडी राखून मात केली होती.
  • वेस्ट इंडिजसह या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ सहभागी होणार आहेत.
  • उर्वरित दोन स्थानांसाठी बांगलादेश, हॉलंड, आयर्लंड, पापुआ न्यू गिनीआ, स्कॉटलंड, थायलंड, युगांडा, संयुक्त अरब अमिरात यांच्यात स्पर्धा रंगणार आहे.

लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी माजी फुटबॉलपटू जॉर्ज विआ

  • लायबेरियाचे माजी फुटबॉलपटू जॉर्ज विआ यांची लायबेरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
  • २००२नंतर फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर जॉर्ज विआ हे राजकारणात सक्रिय झाले. ते लायबेरियाच्या संसदेत सिनेटरही आहेत.
  • २६ डिसेंबर २०१७ रोजी लायबेरियात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या जोसेफ बोआकाई यांचा पराभव करत जॉर्ज यांनी त्यांच्याहून ६० टक्के जास्त मते मिळवली.
  • जॉर्ज विआ यांनी २३ जानेवारी रोजी लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष एलेन जॉन्सन यांची जागा घेतली आहे.

चालू घडामोडी : २२ जानेवारी

एनएसजीच्या महासंचालकपदी सुदीप लखटाकिया

  • राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) महासंचालकपदी नुकतीच आयपीएस अधिकारी सुदीप लखटाकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • लखटाकिया हे तेलंगण केडरचे १९८४च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असून सध्या ते केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष महासंचालक आहेत.
  • सध्या एनएसजीचे महासंचालक असलेले एस पी सिंह हे ३१ जानेवारी रोजी निवृत्त होत असून त्यांच्याकडून ते सूत्रे घेतील.
  • पुढील वर्षी जुलैपर्यंत लखटाकिया हे एनएसजीचे महासंचालक राहतील त्यानंतर ते निवृत्त होत आहेत.
  • प्रत्यक्ष दहशतवाद व नक्षलवाद मोहिमांविरोधातील मोर्चेबांधणीत लखटाकिया हे निपुण आहेत.
  • केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक या पदावर नियुक्त होण्यापूर्वी ते आठ वर्षे एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप) या सुरक्षा संस्थेत महानिरीक्षक होते.
राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी)
  • राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात एनएसजी ही जगात सहाव्या क्रमांकाची नावाजलेली संस्था आहे.
  • दहशतवादी हल्ले, विमान अपहरण किंवा तत्सम प्रसंगात या जवानांची कसोटी लागत असते. त्यांचे नव्वद दिवसांचे प्रशिक्षणही अतिशय खडतर असते.
  • जर्मनीच्या जीएसजी ९ व ब्रिटनच्या एसएएस सुरक्षा संस्थेच्या धर्तीवर या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
  • एनएसजीच्या काही ब्लॅक कॅट कमांडोजना प्रशिक्षणासाठी इस्रायलमध्येही पाठवण्यात येते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो करीत असतात.
  • देशात एनएसजीची एकूण पाच केंद्रे असून, त्याचे मुख्यालय गुरुग्राममधील मनेसर येथे आहे.

मोदींच्या काळात भारताची अधोगती : गॅलप अहवाल

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताची अधोगती झाली असा निष्कर्ष गॅलप पाहणी अहवालात नमूद करण्यात आला आहे.
या अहवालातील ठळक मुद्दे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा बराचसा वेळ विदेश दौऱ्यांमध्ये घालवला. त्यांनी विदेश दौऱ्यांपेक्षा देशावर लक्ष केंद्रित करून देशाच्या जनतेला त्यांच्या शासनकाळाबाबत काय वाटते हे जाणून घ्यायला हवे होते असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात तीन वर्षांपूर्वी जी देशाची अवस्था होती त्याहीपेक्षा वाईट अवस्था झाल्याचे भारतीयांना वाटते आहे.
  • भारतीयांना त्यांचे आयुष्य प्रगतीपथावर नेण्यासाठी खडतर मार्ग अवलंबावा लागला आहे.
  • सध्या भारतातील फक्त ३ टक्के नागरिक २०१४च्या तुलनेत आपण समृद्ध झालो असे मानतात.
  • राहणीमानाचा आलेख घसरण्याची सुरुवात २०१४पासून झाली. २०१४-१५ या वर्षात हा आलेख ७ टक्क्यांपर्यंत खाली आला. तर पुढच्या वर्षात हे प्रमाण ३ टक्क्यांपर्यंत खाली आले.
  • बेरोजगारीचीही समस्या वाढली आहे. २०१४मध्ये बेरोजगारीचे प्रमाण ३.५३ टक्के होते २०१७मध्ये ते ४.८० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले.

ऑक्सफॅम अहवाल : देशात आर्थिक विषमतेमध्ये वाढ

  • दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या संस्थेने ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
  • देशात आणि जागतिक पातळीवर असलेली आर्थिक विषमता या अहवालातून समोर आली आहे.
  • जगातील १० देशांमधील सुमारे ७० हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
या अहवालातील ठळक मुद्दे
  • भारतातील १ टक्का श्रीमंताकडे देशातील ७३ टक्के संपत्ती आहे.
  • ६७ कोटी भारतीयांच्या संपत्तीमध्ये फक्त एक टक्क्यांनी वाढ.
  • जागतिक पातळीवर गेल्या वर्षभरात तयार झालेल्या एकूण संपत्तीतील ८२ टक्के वाटा हा १ टक्का लोकांकडे गेला.
  • ३ अब्ज ७० लाख लोकांच्या संपत्तीमध्ये काहीच वाढ झालेली नाही.
  • भारतातील १ टक्का श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये जवळपास २०.९ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली.
  • भारतातील ३७ टक्के अब्जाधीशांकडे वारसाहक्काने संपत्ती आली आहे.
  • भारतात फक्त ४ महिला अब्जाधीश असून यातील तीन जणांकडे वारसाहक्काने संपत्ती आली आहे.
  • देशातील १०१ अब्जाधीशांपैकी ५१ जण हे ६५ वर्षांवरील आहेत. त्यांच्याकडे एकूण १०,५४४ अब्ज रुपये इतकी संपत्ती आहे.
  • अब्जाधीशांच्या संपत्तींमध्ये २०१० पासून वर्षाला सरासरी १३ टक्के या वेगाने भर पडत आहे.
  • गरीब आणि श्रीमंत वर्गातल्या या दरीमुळे भारताचा आर्थिक समतोल बिघडला आहे.

चालू घडामोडी : २१ जानेवारी

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ओम प्रकाश रावत

  • केंद्र सरकारने मुख्य निवडणूक आयुक्तपदी ओम प्रकाश रावत यांची नियुक्ती केली आहे. ते मावळते मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांचे स्थान घेतील.
  • अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपतो आहे. त्यांनी ७ जुलै २०१७ रोजी तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांच्याकडून पदभार स्वीकारला होता.
  • निवडणूक आयोगाच्या नियमानुसार केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त, तर अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात.
  • मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रपती परंपरेप्रमाणे दोन निवडणूक आयुक्तांमधून वरिष्ठ अधिकाऱ्याची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करतात.
  • रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अशोक लवासा हे याआधी अर्थ सचिव म्हणून काम करत होते. तेदेखील २३ जानेवारीपासून पदभार स्वीकारणार आहेत.

‘आप’च्या २० आमदारांचे सदस्यत्त्व रद्द

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचे सदस्यत्त्व रद्द करत त्यांना अपात्र ठरवले आहे.
  • निवडणूक आयोगाने कारवाई करत लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या २० आमदारांना राष्ट्रपतींनी अपात्र ठरवावे अशी शिफारस केली होती.
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही शिफारस मान्य करत २० आमदारांना अपात्र ठरवले आहे.
  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला सगळ्यात मोठा झटका बसला आहे.
  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १३ मार्च २०१५ ते ८ सप्टेंबर २०१६ या काळात आपच्या २० आमदारांची संसदीय सचिव म्हणून नेमणूक केली होती.
  • या नियुक्त्या राज्यघटनेच्या अनुच्छेद १०२ (१) (अ) अन्वये बेकायदा असून, विधानसभेचे सदस्य असताना कोणीही हे पद स्वीकारू शकत नसल्याने २० आमदारांचे संसदीय सचिवपद दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केले होते.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०१८

  • बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे ६३वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २१ जन्वेवारी रोजी पार पडला.
  • या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी पुरस्कार मिळविला.
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री (क्रिटिक्स) या पुरस्कारांवर अनुक्रमे राजकुमार राव आणि झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली.
  • या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 पुरस्कार विजेते 
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मिडिअम
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलु  
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : झायरा वसीम, सिक्रेट सुपरस्टार 
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (लोकप्रिय): हिंदी मिडिअम 
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)  
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी) 
  • सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन) 
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार) 
  • सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान) 
  • सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन) 
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा - सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना - बद्रीनाथ की दुल्हनिया) 
  • सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा - सिनेमा जग्गा जासूस)

चालू घडामोडी : २० जानेवारी

भारताला अंध विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद

  • अंधांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत विश्वषचकावर आपले नाव कोरले.
  • पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे आव्हान २ गडी राखून पार केले. भारताकडून सुनील रमेशने ९३ आणि अजय रेड्डीने ६२ धावांची खेळी केली.
  • भारताने सलग दुसऱ्यांदा अंध क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी फक्त पाकिस्तानने सलग दोन वेळा अंध क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.

अमेरिकेत २०१३नंतर पुन्हा शटडाऊनची नामुष्की

  • सरकारी खर्चांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या विधेयकाला खासदारांची मंजुरी मिळू न शकल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारवर शटडाऊनची नामुष्की आली आहे.
  • शटडाऊन झाल्याने अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद पडणार आहेत तसेच लाखो कर्मचाऱ्यांची नोकरीही जाणार आहे.
  • निधीतील तूट भरून काढण्यासाठी सरकारतर्फे ‘स्टॉप गॅप बिल’ मांडले जाते. त्याला अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाची आणि सिनेट सदस्यांची मंजुरी बंधनकारक असते.
  • स्टॉप गॅप बिल हे अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाने मंजूर केले होते. मात्र सिनेट सदस्य याबाबत चर्चा करत असतानाच रात्रीचे १२ वाजले आणि त्यामुळे या विधेयकाला मंजुरी मिळाली नाही.
  • त्यामुळे आता अमेरिकेत अँटी डेफिशियन्सी अॅक्ट लागू झाला असून, त्याचमुळे अमेरिकेवर शटडाऊनची वेळ आली आहे.
  • त्यामुळे सोमवारपासून (२२ जानेवारी) अत्यावश्यक सेवा वगळता अमेरिकन प्रशासनाचे बहुतांशी विभाग बंद ठेवावे लागणार आहेत.
  • शटडाउनचा नागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेवर काहीही परिणाम होणार नाही. ते कर्मचारी काम करतील मात्र निधीची व्यवस्था होईपर्यंत त्यांना पगार दिला जाणार नाही.
 अमेरिकेत याआधीही शटडाऊन 
  • शटडाउनची ही समस्या अमेरिकेत पहिल्यांदा उद्भवलेली नाही. याआधी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना २०१३मध्येही अशी वेळ होती.
  • २०१३मध्ये दोन आठवडे सरकारी कामकाज पूर्णपणे बंद होते. त्यामुळे ८ लाख कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले.
  • त्याचप्रमाणे १९८१, १९८२, १९९०, १९९५ आणि १९९६ या वर्षांमध्येही अमेरिकेवर शटडाउनची नामुष्की ओढवली होती.

मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी आनंदीबेन पटेल

  • गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांच्याकडे सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.
  • नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकारी म्हणून २०१४ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या आनंदीबेन या राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या होत्या.
  • त्याआधी २००२ ते २००७ दरम्यान आनंदीबेन यांनी राज्य मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
  • पाटीदार आरक्षण आंदोलन आणि दलित आंदोलन तीव्र झाल्यानंतर २०१६मध्ये आनंदीबेन यांनी फेसबुकवरून आपला राजीनामा दिला होता.
  • नव्या पीढीला संधी मिळावी, अशी अपेक्षा असून मला जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर भाजपने राज्यात नेतृत्वबदल केला होता.
  • नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही आनंदीबेन लढल्या नाहीत. आपल्याजागी तरुण कार्यकर्त्याला तिकीट देण्यात यावे, असे त्यांनी पक्षाला सांगितले होते.