चालू घडामोडी : ३० नोव्हेंबर

जन-धन खात्यांमधून पैसे काढण्यावर निर्बंध

  • प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांचा काळा पैसा जमा करण्यासाठी होत असलेला संशयित दुरुपयोग रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या खात्यांमधून पैसे काढण्यावर निर्बंध लागू केले आहेत.
  • सध्या कोणत्याही बँक खात्यातून पैसे काढण्यावर आठवड्याला २४ हजार रुपयांची कमाल मर्यादा लागू आहे.
  • मात्र रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशानुसार ‘केवायसी’ निकषांची पूर्णांशाने पूर्तता करणाऱ्या जन-धन खात्यांमधून आता महिन्याला जास्तीत जास्त १० हजार रुपयेच काढता येतील.
  • खातेदारांना याहून जास्त रक्कम काढायची असेल तर एवढ्या पैशाची कशासाठी गरज आहे हे त्यांना बँक व्यवस्थापकास पटवून द्यावे लागेल.
  • तसेच खातेदारास या मर्यादेहून जास्त पैसे का काढू दिले याची नोंद बँकेला आपल्या रेकॉर्डमध्ये करावी लागेल.
  • ९ नोव्हेंबरपासून ज्या जन-धन खात्यांमध्ये बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा जमा करण्यात आल्या आहेत अशाच खात्यांना हे निर्बंध लागू असतील.
  • ‘केवायसी’ निकषांची अजिबात पूर्तता न करणाऱ्या किंवा काही प्रमाणात पूर्तता करणाऱ्या जन-धन खात्यांवर याहून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
  • अशा खात्यांमध्ये बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा जमा केल्या असतील तरच त्या रकमेपैकी जास्तीत जास्त पाच हजार रुपये खात्यातून महिन्याला काढता येतील.
  • जन-धन खातेदार असलेले निष्पाप शेतकरी व ग्रामीण भागातील इतर लोक अशा लबाडांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी रिझर्व्ह बँकेने हे नवे निर्बंध लागू केले आहेत.
  • यामुळे ज्यांनी कोणी खरंच इतरांच्या जन-धन खात्यांमध्ये बेहिशेबी पैसे भरले असतील त्यांनी ते पुन्हा काढून घेऊन पांढरे करण्यावर मर्यादा येतील.
  • मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून देशभरातील जन-धन खात्यांमध्ये ६७ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत.
  • बेहिशेबी रोकड पांढरी करून घेण्यासाठी जन-धन खात्यांचा दुरुपयोग होत असल्याचा संशय असून अशी अनेक प्रकरणे उघडही झाली आहेत.
  • असे लबाडीचे व्यवहार करणाऱ्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा व बेनामी मालमत्ता कायद्यान्वये कारवाई करण्याचे सरकारने ठरविले आहे.
  • त्यानुसार लबाडीने काळ्याची पांढरी केलेली रक्कम जप्त करण्याखेरीज खातेदार आणि त्याचा दुरुपयोग करणारा अशा दोघांनाही ७ वर्षांपर्यंतची कैद होऊ शकते.

१०० प्रभावशाली छायाचित्रांत गांधींच्या  छायाचित्राचा समावेश

  • महात्मा गांधी चरख्यावर सूतकताई करत असलेल्या १९४६मधील छायाचित्राचा समावेश कायम प्रभावशाली ठरणाऱ्या जगातील १०० छायाचित्रांत झाला आहे.
  • ‘टाइम’ मासिकाने १८२०पासून २०१५पर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध आणि इतिहास घडवणाऱ्या छायाचित्रांचा संग्रह केला आहे. त्यात गांधीजींच्या या छायाचित्राचाही समावेश आहे.
  • या छायाचित्रात महात्मा गांधी खाली बसलेले असून, ते बातमी वाचत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या समोरच्या बाजूला त्यांचा चरखा आहे.
  • हे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट छायाचित्र १९४६मध्ये छायाचित्रकार मार्गरेट बौर्के यांनी टिपलेले आहे.
  • भारतातील नेत्यांवरील एका लेखासाठी हे छायाचित्र घेतले होते; पण गांधी यांच्या हत्येनंतर श्रद्धांजली स्वरूपात हे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते.
  • ‘शांतीदूत’ म्हणून गांधीजींचे नाव जगात अजरामर करण्यात या छायाचित्राचा हातभार लागला व या चित्राची नोंदही कायमस्वरूपी कोरली गेली, असे टाइमने म्हटले आहे.
 या संग्रहातील अन्य छायाचित्रे 
  • बोड्रमच्या समुद्रकिनारी एकाकी अवस्थेतील सिरियातील निर्वासित कुटुंबातील तीन वर्षांच्या ॲलन कुर्दी या मुलाच्या मृतदेहाचे छायाचित्रही यात आहे.
  • निर्वासितांच्या, व्यथा, वेदना आणि दु:ख यांना अधोरेखित करणारे हे छायाचित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचले.
  • अतिरेकी ओसामा बिन लादेन याला मारण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी जे ऑपरेशन केले त्याच्याशी संबंधित एका छायाचित्राचा समावेश आहे.
  • एका रूममध्ये ओबामा, त्यांची टीम या ऑपेरशनबाबत माहिती घेताना छायाचित्रात दिसत आहेत.
  • ९/११ अमेरिकेतील अतिरेकी हल्ल्यात स्वतःच्या सुटकेच्या प्रयत्नात असलेला एक जण ट्विन टॉवरमधून खाली पडतोय, असे २००१ मधील छायाचित्र या संग्रहात आहे.
  • अन्य एक छायाचित्र सुदानचे आहे. या दुष्काळी भागात एका क्षीण मुलाचे टिपलेले हे छायाचित्र येथील भीषणता दर्शविते.

ओबीसी वर्गात १५ नवीन जातींचा समावेश

  • केंद्र सरकारने अन्य मागासवर्गीय (ओबीसी) वर्गात १५ नवीन जातींचा समावेश केला आहे.
  • महाराष्ट्र, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड या राज्यांमधील जातींचा यात समावेश आहे.
  • याशिवाय या वर्गात आधीपासून समावेश असलेल्या १३ उपजातींमध्ये बदल करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
  • राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने महाराष्ट्र, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेशसह अन्य चार राज्यांमध्ये जातीविषयक २८ बदल करण्याची शिफारस केली होती.
  • यात १५ नवीन जातींचा समावेश होता. याशिवाय ९ पोटजातींचा समावेश करणे आणि ४ जातींमध्ये सुधारणा करावी अशी शिफारसही आयोगाने केली होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शिफारशींना मंजुरी दिली आहे.
  • नवीन सुधारणांमुळे या जात किंवा पोटजातींमधून येणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरी, शिक्षण संस्थेमध्ये आरक्षणाचा फायदा मिळेल.
  • याशिवाय विविध कल्याणकारी योजना, शिष्यवृत्तींचाही त्यांना लाभ घेता येणार आहे.
  • राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशींच्या आधारे २५ राज्य आणि ६ केंद्रशासीत प्रदेशांमधील ओबीसी वर्गाच्या केंद्रीय यादीत आता एकूण २,४७९ जातींचा समावेश झाला आहे.

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे सुप्रीम कोर्टाचा आदेश

  • देशातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
  • राष्ट्रगीतावेळी चित्रपटगृहाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजही दाखवला गेला पाहिजे. तसेच सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करावा, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
  • राष्ट्रगीताचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर केला जाऊ नये. राष्ट्रगीत आक्षेपार्ह वस्तुंवर छापू नये, असे कोर्टाने आपल्या निर्देशात म्हटले आहे.
  • एका जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले. राष्ट्रगीत संक्षिप्त स्वरुपात वाजवू नये. ते पूर्णच वाजवावे, असेही कोर्टाने बजावले आहे. 
  • राष्ट्रीय ओळख, अखंडत्व आणि घटनात्मक देशभक्तीबद्दलचा आदर यासाठी राष्ट्रगीत शिष्टाचार पाळणे आवश्यक असल्याचे सांगून खंडपीठाने या आदेशाची एक आठवड्याच्या आत अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्राला दिले.

फॉर्च्युनच्या यादीत चार भारतीय वंशाच्या व्यक्ती

  • बिझनेस मॅगझिन फॉर्च्युनने जगभरातील ५० ग्लोबल कॉर्पोरेट्स हेड्सची यादी प्रसिद्ध केली आहे.
  • या यादीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, एचडीएफसीचे एमडी आदित्य पुरी, मायक्रोकार्डचे सीईओ अजय बंगा आणि एओ स्मिथचे सीईओ अजित राजेंद्र या भारतीय वंशांच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. 
  • बिझनेस मॅगझिन फॉर्च्युनच्या यादीत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे पहिल्या स्थानी विराजमान आहेत.
  • भारतीय वंशाचे सत्या नाडेला या यादीत पाचव्या स्थानी आहेत. अजित राजेंद्र ३४व्या, आदित्य पुरी यांनी ३६व्या व अजय बंगा हे ४०व्या स्थानावर आहेत.

चालू घडामोडी : २९ नोव्हेंबर

आर्थिकदृष्ट्या सक्षम महानगरांमध्ये दिल्ली आघाडीवर

  • जगातील आर्थिकदृष्ट्या सक्षम ५० महानगरांची आकडेवारी ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जारी केली असून या यादीत दिल्ली ३०व्या स्थानावर असून मुंबईला ३१वे स्थान मिळाले आहे.
  • ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ही जगातील स्वतंत्र आर्थिक सल्लागार संस्था आहे. या संस्थेने २०१५मध्ये २०० देशातील १०० औद्योगिक सेक्टर आणि ३ हजार शहरांचे आर्थिक विश्लेषण करुन हा अहवाल सादर केला आहे.
  • २०१५ मध्ये या विस्तारीत मुंबईसह मुंबईचा विकास दर क्रयशक्ती समानतेच्या (पीपीपी) ३६८ बिलियन अमेरिकन डॉलर होता.
  • तर दिल्ली व एनसीआरचा जीडीपी ३७० अरब डॉलर म्हणजे किमान २५,१६४ अरब रुपयेवर पोहचला आहे.
  • भविष्यात मुंबई आर्थिक राजधानीच्या या स्पर्धेत दिल्लीला मागे टाकेल अशी शक्यता नसल्याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
  • या संस्थेच्या मते २०३०मध्ये मुंबई आणि दिल्ली ही दोन्ही शहरे जगातील सर्वात मोठ्या आर्थिक केंद्रांपैकी एक असतील.
  • या संस्थेच्या अंदाजानुसार २०३०मध्ये आर्थिक सक्षमतेत दिल्ली ११व्या तर मुंबई १४ व्या स्थानी असेल.

मालिनी सुब्रमणियम यांना इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम पुरस्कार

  • भारतीय पत्रकार मालिनी सुब्रमणियम यांना न्यूयॉर्कचा ‘इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • संघर्षांत प्रसंगी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो.
  • छत्तीसगडमधील माओवादी व सुरक्षा दले यांच्यातील संघर्षांचा केंद्रबिंदू असेलेल्या बस्तर जिल्ह्यातील परिस्थिती जीव धोक्यात घालून मालिनी यांनी जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले.
  • त्या भागात पोलीस व सुरक्षा दलांनी महिला व मुलांवर केलेले अत्याचार, हत्या अशी प्रकरणे स्क्रोल या संकेतस्थळासाठी माहिती देणाऱ्या सुब्रमणियम यांनी हाताळली.
  • त्यात त्यांनी मानवाधिकार उल्लंघन व राजकारण यांचा संबंध जोडून दाखवला. परंतु या मार्गात त्यांना अनेक अडथळे आले.
  • अनेकदा पोलिसांनी त्यांचे जाबजबाब घेऊन त्यांचा छळ केला. नक्षलविरोधी गटाने सुब्रमणियम यांच्या घरासमोर निदर्शने करताना ‘डेथ टू मालिनी’ अशा घोषणा दिल्या.
  • पोलिसांनी त्यांना माओवाद्यांच्या हस्तक संबोधून त्यांचे प्रतिमाहनन केले, पण जगाने मात्र त्यांच्या या कार्याचा सन्मान केला आहे.
  • त्यांच्या ‘द ट्रुथ बिहाइंड छत्तीसगड्स रिसेंट माओइस्ट सरेंडर’ या त्यांच्या वृत्ताला ‘आशियन सेंटर फॉर जर्नालिझम’ पुरस्कार मिळाला होता.
  • छत्तीसगडचा फिअरलेस प्रिंटींग पुरस्कार, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजचा पुरस्कारही त्यांना मिळाला.
  • सत्य बाहेर काढणे हे पत्रकारितेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रसंगी प्राणावर उदार होणाऱ्या मोजक्या पत्रकारांपैकी एक असलेल्या मालिनी यांची पत्रकारिता साहसाचेच प्रतीक आहे.

विकास कृष्णनला सर्वोत्तम मुष्टियोद्धा पुरस्कार

  • आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता विकास कृष्णनला यावर्षी त्याने केलेल्या सुरेख कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेतर्फे (एआयबीए) ‘सर्वोत्तम मुष्टियोद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • भारतीय बॉक्सिंग इतिहासातील ही पहिली घटना ठरेल. २० डिसेंबर रोजी विश्व संघटनेच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
  • २०१०मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि २०१४मध्ये कास्यपदक जिंकणाऱ्या विकासने यावर्षी दोन एपीबी बाऊटमध्ये सहभाग नोंदवला.
  • एआयबीएच्या या वर्धापनदिनी भारतीय महिला बॉक्सर एमसी मेरीकॉमलादेखील तिच्या खेळातील योगदानाबद्दल ‘लिजेंड पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

अर्जेंटिनाला प्रथमच डेव्हिस कप स्पर्धेचे जेतेपद

  • अर्जेंटिनाने संघर्षपूर्ण लढतीत माजी चॅम्पियन क्रोएशियाचा ३-२ ने पराभव करून प्रथमच डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत जेतेपद पटकावले.
  • फेररिको डेलबोनिस अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अखेरच्या निर्णायक लढतीत इव्हो कार्लोविचचा पराभव करून संघाला ऐतिहासिक जेतेपद पटकावून दिले.
  • अर्जेंटिनाने पाच वेळा डेव्हिस कप स्पर्धेत अंतिम फेरी गाठली; पण प्रथमच जेतेपद पटकावले. डेव्हिस कप स्पर्धेच्या इतिहासात जेतेपद पटकावणारा अर्जेंटिना १५वा देश ठरला आहे.

मुंबईत देशातील पहिले वेलनेस सेंटर

  • लहान मुलांच्या आरोग्यावर भर देणारे ‘बेबीज कॅसल’ हे देशातील एकमेव ठरणारे वेलनेस सेंटर मुंबईत सुरू झाले आहे.
  • ‘बेबीज कॅसल’च्या बेबी अँड मदर वेलनेस सेंटरचे उद्घाटन अभिनेत्री जेनेलिया डिसूझा हिच्या हस्ते झाले.
  • डॉ. प्रियंका भोईर यांनी ही संकल्पना राबविली असून त्या केंद्राच्या संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आहेत.
  • आई व बाळासाठी अनुक्रमे गरोदरपण व बाल्यावस्थेतील प्रत्येक क्षण आनंददायी होण्यासाठी तसेच त्या क्षणांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे.
  • ऑस्ट्रेलियातील ‘फ्रेंड्स स्वीम अ‍ॅकेडमी’ अंतर्गत ‘बेबीज कॅसल’ या केंद्राची नोंदणी करण्यात आली. हे भारतातील पहिले आणि एकमेव ‘बेबी अँड मदर वेलनेस सेंटर’ आहे.
  • हे केंद्र नवजात बालकांची आकलन क्षमता विकसित करण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे मातांचे गरोदरपण, त्यानंतरचे बाळंतपण व संपूर्ण पहिले वर्ष सुखकर जगण्यासाठी सहकार्य करेल.

चालू घडामोडी : २८ नोव्हेंबर

प्राप्तिकर सुधारणा विधेयक लोकसभेत सादर

  • नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा धारकांना चाप लावण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्राप्तिकर सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले आहे.
  • या सुधारित विधेयकानुसार ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत जमा झालेल्या बेहिशेबी रकमेवर कर लावण्याचा प्रस्ताव आहे.
  • बँक खात्यात जमा होणाऱ्या बेहिशेबी रकमेवर ५० टक्के तर ही बेहिशेबी रक्कम आयकर विभागाने पकडल्यास त्यावर तब्बल ८५ टक्के कर लावण्याची तरतूद या विधेयकात केलेली आहे.
  • यामध्ये बेहिशेबी रकमेवर ३० टक्के कर, १० टक्के दंड आणि ३३ टक्के सरचार्ज आकारला जाईल. हा सरचार्ज एकूण कराच्या १३ टक्के असणार आहे. या सरचार्जला ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण सेस’ असे नाव देण्यात आले आहे.
  • मात्र जो व्यक्ती बेहिशेबी रक्कम स्वतःहून जाहीर करणार नाही आणि आयकर विभागाने त्याला पकडले तर अशा व्यक्तींना ७५ टक्के कर आणि १० टक्के दंड भरावा लागेल.
  • याशिवाय काळा पैसा धारकांना जाहीर केलेल्या रकमेच्या २५ टक्के रक्कम ही गरीब कल्याण योजनेच्या निधीत जमा करावी लागेल.
  • या पैशांचा वापर शिक्षण, आरोग्य, सिंचन, पायाभूत सुविधा, शौचालय अशा विविध कामांसाठी केला जाणार आहे. ४ वर्षांसाठी हे पैसे या योजनेसाठी वापरले जातील.
  • १० नोव्हेंबरपासूनच्या नोटाबंदीच्या प्रक्रियेत चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा केवळ बँकेतच जमा करण्याची मुभा आहे. ती येत्या ३० डिसेंबपर्यंत लागू आहे.

हाँगकाँग सुपर सिरीजमध्ये समीर वर्माला रौप्यपदक

  • हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूपाठोपाठ समीर वर्मालाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 
  • पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत यजमान हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगसने समीरवर २१-१४, १०-२१, २१-११ अशी मात केली.
  • उपांत्य फेरीत समीरने डेन्मार्कच्या यान ऑर्गेनसेनला पराभवाचा धक्का दिला होता.
  • १९८२मध्ये प्रकाश पदुकोण यांनी ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एकाही भारतीयाला या स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकाविता आले नाही.

निको रोसबर्ग विश्वविजेता

  • अबू धाबीमधील अटीतटीच्या शर्यतीनंतर मर्सिडीज संघाच्या निको रोसबर्गने द्वितीय स्थान पटकावत पहिल्यांदाच फॉर्म्युला वन विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
  • वर्षांतील शेवटच्या या शर्यतीत रोसबर्गचा सहकारी लुइस हॅमिल्टनने बाजी मारली. परंतु सरस गुणांच्या बळावर रोसबर्गने जेतेपदावर नाव कोरले.
  • अबू धाबी शर्यतीपूर्वी गुणतालिकेत रोसबर्ग हॅमिल्टनपेक्षा १२ गुणांनी आघाडीवर होता.
  • विश्वविजेतेपदासाठी त्याला अबू धाबी शर्यतीत अव्वल तीनमध्ये स्थान पटकावणे अनिवार्य होते.
  • निकोचे वडील केके रोसबर्ग यांनी १९८२मध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.

टाटा स्टीलचा लिबर्टी हाऊस समूहाशी करार

  • टाटा स्टीलने यूकेमधील लिबर्टी हाऊस समूहाशी करार केला. यामुळे युकेमधील स्पेशॅलिटी स्टील्स ही टाटा समूहाची कंपनी विकण्यास चालना मिळणार आहे.
  • या कंपनीचे मूल्य १०० दशलक्ष पौंड इतके आहे. टाटा स्टील व लिबर्टी हाऊस यांच्यात इच्छापत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
  • लिबर्टी हाऊस समूह हा भारतीय वंशाचे व्यावसायिक संजीव गुप्ता यांच्या मालकीचा आहे.
  • स्पेशॅलिटी स्टीलमध्ये १७०० कर्मचारी काम करत आहेत. हा व्यवसाय विकल्यास या कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार आहे.

आयआरसीटीसीच्या अर्जामध्ये तृतीयपंथीय पर्याय समाविष्ट

  • ‘आयआरसीटीसी’तर्फे (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) तिकीट आरक्षणाच्या अर्जामध्ये ‘पुरुष’ आणि ‘स्त्री’ या दोन पर्यायांसह ‘तृतीयपंथीय’ असा पर्यायही समाविष्ट करण्यात आला आहे.
  • दिल्लीस्थित जमशेद अन्सारी या वकीलाने दिल्ली हायकोर्टात याविषयी याचिका दाखल केली होती.
  • या याचिकेवर रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत दाद मागावी, असे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने ती फेब्रुवारीमध्ये निकाली काढली होती.
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन आरक्षण करण्याच्या आणि आरक्षण रद्द करण्याच्या दोन्ही अर्जांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.
  • तृतीयपंथी व्यक्तींची काळजी आणि संरक्षण यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०१४मध्ये हिजडे, तृतीयपंथी, द्विलिंगी यांना तृतीयलिंगी समजण्यात येऊन त्यांचे हक्क अबाधित राखावे, असा आदेश दिला होता.

नोटबंदीमुळे सीआरआरमध्ये वाढ

  • पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्याने देशातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटा जमा झाल्याने बाजारातील रोखता वाढली होती.
  • त्यामुळे सर्व बँकांनी जमा रकमेपैकी सर्व रक्कम रिझर्व्ह बँकेत ‘कॅश रिझर्व्ह रेशो’ (सीआरआर) म्हणून जमा करण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे.
  • नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमध्ये जमा होणाऱ्या अतिरिक्त रकमेचा सांभाळ करणे अवघड होत आहे.
  • बाजारातील वाढत्या रोखतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर ‘सीआरआर’चा दर १०० टक्के करण्यात आला. 
  • बँकांमध्ये जमा होणाऱ्या रकमेचा जो हिस्सा रिझर्व्ह बँकेकडे जमा होतो, त्याला ‘सीआरआर’ असे संबोधले जाते. त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळत नाही.

चालू घडामोडी : २७ नोव्हेंबर

सिंधूला हाँगकाँग सुपर सीरिजचे उपविजेतेपद

  • रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिला हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. 
  • चीनची जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली खेळाडू ताई त्झू यिंग हिने सिंधूचा १५-२१ व १७-२१ असा पराभव केला.
  • सिंधूने उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या चेऊंग नगान हीचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला होता.
  • यिंग हिचे हाँगकाँग ओपनचे दुसरे विजेतेपद असून तिने जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित आणि रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मारिन हिला पराभवाचा धक्का देऊन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
  • चायना ओपनमध्ये बाजी मारून कारकिर्दीतले पहिले सुपर सीरिज जेतेपद नावावर करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने बीडब्लूएफच्या जागतिक क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे.

कमर जावेद बाजवा पाकिस्तानचे १६वे लष्करप्रमुख

  • पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी कमर जावेद बाजवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पाकिस्तानचे १६वे लष्करप्रमुख आहेत.
  • जावेद बाजवा मावळेत लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारतील. २९ नोव्हेंबरला शरीफ यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपत आहे.
  • बलुचिस्तान रेजिमेंटमधून येणाऱ्या व काश्मीर आणि उत्तर भागातील समस्यांचा चांगला अनुभव असलेल्या बाजवा यांनी पाकिस्तानी लष्करामध्ये विविध पदे भूषवली आहेत.
  • पाक लष्कराच्या सर्वांत मोठ्या आणि प्रतिथयश ‘१० कोअर’चे नेतृत्व त्यांनी केले आहे. ही कोअर भारताबरोबरच्या ताबारेषेवरील सुरक्षेला जबाबदार असते.
  • मेजर जनरल पदावर असताना त्यांनी ‘फोर्स कमांड नदर्न एरिआज’चे नेतृत्व केले. क्वेट्टामध्ये असणाऱ्या पायदळाच्या प्रशिक्षण केंद्राचे कमांडंट म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
  • ते रावळपिंडी तुकडीचेही कमांडर होते. सध्या ते ट्रेनिंग आणि मूल्यमापन विभागाचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
  • बाजवा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेत आफ्रिकेतील देशात भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंह यांच्या नेतृत्वात काम केले आहे.
  • पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारपेक्षा लष्करप्रमुखाची भूमिका महत्वाची असते. पंतप्रधानांपेक्षा तेथील लष्करप्रमुखाचे देशावर जास्त नियंत्रण असते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नियमांत सुधारणा

  • नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत खर्च सादर न करणाऱ्या उमेदवाराला तो निवडून आला असला तरी अपात्र घोषित करण्यात येईल, असा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
  • राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी या वर्षीपासून नियमांचे काटेकोर पालन होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
  • नवीन नियमांनुसार राजकीय पक्षांना ६० दिवसांच्या आत खर्चाचे विवरणपत्र सादर करावे लागणार आहे.
  • मतदारसंघात उमेदवार असलेल्या प्रत्येकाला त्याचा स्वत:चा, पक्षाचा आणि त्याच्या मित्रमंडळाने केलेल्या खर्चाचा लेखाजोखा आयोगाला सादर करावा लागणार आहे.
  • यापूर्वीही ३० दिवसांच्या आत खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक होते. मात्र, कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश या वेळी प्रथमच देण्यात आले आहेत.
  • नगरपालिका या लोकशाहीच्या प्राथमिक शाळा असल्याने सुधारणांचा कार्यक्रम तेथून राबवणे आवश्यक असल्याचे आयोगाने ठरवले आहे. 
  • महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुमारे अडीच लाख लोकप्रतिनिधी निवडून पाठवले जातात.
  • नगर परिषद आणि नगरपालिकेच्या सध्याच्या टप्प्यात १५० ठिकाणी मतदान होणार आहे.
  • यावर्षी महाराष्ट्राच्या गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकांत प्रथमच संगणकाचा पूर्ण वापर करण्यात आला आहे.
  • नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी सर्व उमेदवारी अर्ज या वेळी पूर्णत: संगणकाद्वारे स्वीकारण्यात आले.

कृषी विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीवरील स्थगिती उठवली

  • भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीवरील स्थगिती दोन वर्षांसाठी उठवली आहे.
  • पण, आयसीआरने घालून दिलेल्या अटींचे पालन कृषी विद्यापीठांना पूर्ण करावे लागणार आहे.
  • कृषी विद्यापीठांनी मनुष्यबळाची पूर्तता करावी, तसेच खासगी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनात वेळ खर्च घालू नका आदी अटी आयसीएआरने घातल्या आहेत.
  • आयसीएआरकडून शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यक्रमासाठी देशातील कृषी विद्यापीठांना तीन ते साडेतीन टक्के निधी उपलब्ध केला जातो.
  • या संदर्भात दर पाच वर्षांनी आयसीएआरच्या मूल्यांकन समितीकडून आढावा घेतला जातो.
  • जानेवारीमध्ये या समितीने विद्यापीठातील शैक्षणिक सुविधा, गुणवत्ता व कर्मचारी वर्गाची पाहणी केली असता, त्यांना राज्यातील चारही कृषी विद्यापीठात ६० टक्के मनुष्यबळ कमी असल्याचे आढळून आले.
  • त्यामुळे चारही कृषी विद्यापीठांच्या गुणवत्ता मानांकनावर आयसीएआरने प्रश्नचिन्ह निर्माण करू न कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती स्थगित केली होती.

चालू घडामोडी : २६ नोव्हेंबर

सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भात समितीची स्थापना

  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यासाठी राज्य सरकारने एका समितीची नियुक्ती केली. 
  • सेवानिवृत्त सनदी अधिकारी बी.सी. खटुआ हे या समितीचे अध्यक्ष असतील.
  • राज्य कर्मचाऱ्यांचे/अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे योग्य ठरेल की नाही याबाबत सर्व दृष्टीने ही समिती अभ्यास करेल आणि शासनाला अहवाल सादर करणार आहे. 
  • सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याची मागणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सातत्याने केली आहे. ही मागणी ध्यानात घेऊनच खटुआ समिती नेमण्यात आली आहे. 
  • समितीमध्ये वित्त आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, लेखा व कोषागरे संचालक हे सदस्य असतील तर वित्त विभागाचे उपसचिव हे समितीचे सदस्य सचिव असतील.
  • युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यासंदर्भातील विचार झाला होता. 
  • मात्र, त्यास शिवसेनेतूनच विरोध झाल्यानंतर तो मागे पडला. या निर्णयाने बेरोजगारी वाढेल, असा मोठा आक्षेप त्या वेळी घेण्यात आला होता.

सचिनसिंगला एआयबीए युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

  • माजी वर्ल्ड ज्युनियर ब्राँझपदक विजेता बॉक्सर सचिनसिंगने (४९ किलो) एआयबीए युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.
  • रशिया, सेंट पीटर्सबर्ग येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या फायनलमध्ये सचिनने क्युबाचा राष्ट्रीय विजेता जॉर्ज ग्रिनन याला हरवून जगज्जेतेपदाचा मान संपादला.
  • युवा जगज्जेता होणारा तो तिसरा भारतीय बॉक्सर ठरला आहे. याआधी ननॅओसिंग आणि विकास क्रिशन यांनी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • ननॅओने २००८मध्ये ४८ किलो वजनी गटात तर विकासने वेल्टरवेटमध्ये २०१०मध्ये देशासाठी सुवर्णपदक आणले होते.
  • यंदा भारताने या युवा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि ब्राँझपदकाची कमाई केली.  २०१४मध्ये भारताला या स्पर्धेत ब्राँझचीच कमाई करता आली होती.
  • नमन तन्वरला (९१ किलो) उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने ब्राँझवर समाधान मानावे लागले होते.
  • या विजयासाठी सचिनला भारताच्या नव्या बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियानेकडून एक लाख रुपयांचे, तर नमनला २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो कालवश

PDF स्वरूपातील नोट्स MT ॲपवर उपलब्ध
  • क्युबाचे क्रांतिकारी नेते आणि माजी राष्ट्रपती फिडेल कॅस्ट्रो यांचे २५ नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले.
  • क्यूबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी सरकारी वाहिनीवरून फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाची माहिती दिली.
  • क्युबा सरकारने कॅस्ट्रो यांच्या निधनाबद्दल नऊ दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे.
  • त्यांच्या पार्थिवावर ४ डिसेंबर रोजी सॅन्टियागो येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सॅन्टियागो हे कॅस्ट्रो यांच्या क्रांतीचे जन्मस्थळ आहे.
  • फिडेल कॅस्ट्रो यांनी त्यांचा भाऊ राऊल कॅस्ट्रो यांच्या हाती २००८मध्ये सत्ता देण्यापूर्वी सुमारे ५० वर्षे क्यूबावर एकहाती वर्चस्व राखले होते.
 फिडेल कॅस्ट्रो यांच्याबद्दल 
  • सशस्त्र संघर्षानंतर क्युबाची सत्ता हस्तगत करणारे आणि सोव्हिएत संघाच्या पतनानंतरही आपल्या देशात साम्यवादाची पाळेमुळे भक्कम ठेवणारे क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी नेते  म्हणजे फिडेल कॅस्ट्रो.
  • क्युबामधील ओरिएंट प्रांतात १३ ऑगस्ट १९२६ रोजी कॅस्ट्रो यांचा जन्म झाला. यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली.
  • फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबा क्रांतीच्या माध्यमातून फुल्गेकियो बॅतिस्ता यांच्या हुकुमशाहीला मुळापासून उपटून बाहेर फेकले आणि ते सत्तेवर आले.
  • फुल्गेंकियो बॅतिस्ता यांना अमेरिकासमर्थित नेता मानले जायचे. यामुळेच फिडेल कॅस्ट्रो अमेरिकेच्या निशाण्यावर होते.
  • फेब्रुवारी १९५९ ते डिसेंबर १९७६ पर्यंत फिडेल यांनी क्युबाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली.
  • त्यानंतर ते क्युबाचे राष्ट्राध्यक्ष झाले. फेब्रुवारी २००८ साली त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
  • आपल्या ५० वर्षांच्या एकहाती राजवटीदरम्यान त्यांनी बलाढ्य अमेरिकेच्या ११ राष्ट्राध्यक्षांना कधीही जुमानले नाही. कठोर आर्थिक निर्बंध लादल्यानंतरही त्यांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले नव्हते.
  • अमेरिका पुरस्कृत पिग्स उपसागरातील १९६१चे आक्रमण आणि त्यानंतर वर्षभराने रशियाने क्युबात क्षेपणास्त्र तैनात करण्यावरून निर्माण झालेला पेच या दोन घडामोडींनी कॅस्ट्रो यांची राजवट विशेष गाजली.
  • त्यांना वेसण घालण्यासाठी अमेरिकेने अनेक क्लृप्त्या लढविल्या. मात्र, कॅस्ट्रोंच्या तडाख्यापुढे त्या फिक्या पडल्या.
 चमत्कारिक कॅस्ट्रो 
प्रदीर्घ काळ सत्ता
  • स्वत:च्या देशावर प्रदीर्घ काळ राज्य करणारे फिडेल कॅस्ट्रो हे जगातील तीन मोठ्या नेत्यांपैकी होते.
  • क्युबाची सत्ता त्यांनी १९५९ साली हाती घेतली होती. २००८ साली स्वत:हून त्यांनी ही जबाबदारी त्यांचे बंधू राउल कॅस्ट्रो यांच्यावर सोपवली.
लांबलचक भाषणाचा विश्वविक्रम
  • कॅस्ट्रो यांच्या नावावर सर्वात मोठ्या भाषण केल्याचा विश्वविक्रम आहे. गिनीज बुकात तशी नोंद आहे.
  • २९ सप्टेंबर १९६० रोजी कॅस्ट्रो यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ४ तास २९ मिनिटांचे भाषण केले होते. तर, १९८६साली क्युबामध्ये ७ तास १० मिनिटांचे भाषण केले होते. 
सर्व कटातून सुखरूप सुटका
  • कॅस्ट्रो यांची हत्या घडवून आणण्याचे ६३८ प्रयत्न झाले. अमेरिकी गुप्तचर संस्था व कॅस्ट्रोच्या विरोधकांचा यात हात होता.
  • विषारी गोळ्या, विषारी सिगारेट, विषारी कपडे घालून त्यांना मारण्याचे कट रचले गेले. मात्र, या सगळ्यातून कॅस्ट्रो सुखरूप निसटले.
११ अमेरिकी अध्यक्षांशी संघर्ष
  • कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली क्युबाने तब्बल ४५ वर्षे अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा सामना केला.
  • आयसेनहोवर ते बिल क्लिंटनपर्यंत ११ राष्ट्राध्यक्षांशी त्यांचा संघर्ष झाला. बुश यांच्या कारकिर्दीत त्यांना सर्वाधिक विरोध सहन करावा लागला.
दूध उत्पादनाचा विक्रम
  • फिडेल कॅस्ट्रो यांनी १९८०च्या दशकात दूध उत्पादनाचा एक प्रकल्प राबवला होता. त्या अंतर्गत पाळण्यात आलेल्या गायी एका दिवसात ११० लीटर दूध द्यायच्या. हा जागतिक विक्रमच होता.
अमेरिकेविरोधी क्षेपणास्त्र
  • शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाला क्युबाच्या भूमीवर अमेरिकेविरोधी क्षेपणास्त्र तैनात करण्याची परवानगी देऊन कॅस्ट्रो यांनी जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते.
 कॅस्ट्रो आणि भारत 
  • नाम (अलिप्त राष्ट्र चळवळ) परिषदेच्या निमित्ताने १९८३साली फिडेल कॅस्ट्रो भारतात आले, तेव्हा त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले होते.
  • भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे राजशिष्टाचार प्रमुख होते. त्या वेळी क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना दिल्या होत्या.
  • त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, भारतीय कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फेही त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

  • फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्त्वामुळेच क्युबा हा लहानसा देश बलाढ्या अमेरिकेला पुरून उरला होता.
  • फिडेल यांच्या निधनामुळे साम्यवादाच्या बळावर क्युबासारख्या छोट्याशा देशाला अस्तित्व मिळवून देणा‍ऱ्या एका युगाचा अंत झाला आहे.

चालू घडामोडी : २५ नोव्हेंबर

जुन्या नोटांच्या स्वरूपातील काळ्या पैशावर ५० टक्के कर

  • बँकेत जुन्या नोटांच्या आधारे भरण्यात आलेल्या बेहिशेबी रकमेवर ५० टक्के कर आकारण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.
  • काळ्या पैशापैकी उरलेल्या ५० टक्के रकमेतील अर्धीच रक्कम खातेदाराला वापरता येईल. म्हणजेच एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम खातेदाराला चार वर्षे बँकेतच ठेवावी लागणार आहे.
  • तसेच जे आपल्याकडील बेहिशेबी रकमा जाहीर करणार नाहीत व प्राप्तिकर वा अन्य यंत्रणांच्या छाप्यांमध्ये त्या उघड झाल्या, तर त्यावर ९० टक्के करआकारणी करण्यात येणार आहे. शिवाय त्यावर मोठा दंडही आकारला जाणार आहे.
  • त्यासाठी प्राप्तिकर तसेच अन्य कायद्यांत दुरुस्ती करण्यासाठी संसदेमध्ये विधेयक आणण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारने यापूर्वी बँक खात्यात अडीच लाख रुपये जमा करणाऱ्यांना कोणताही कर तगादा अथवा दंड लागू होणार नाही, असे स्पष्ट केले होते.
  • त्याहून अधिक रक्कमही खातेदारांना बँकेतील आपल्या खात्यांमध्ये जमा करता येईल. त्याचे नीट हिशेब दिल्यास त्यावर कर आकारण्यात येणार नाही.
  • केवळ ज्या रकमेचा हिशेब खातेदार देणार नाही, त्यावरच ५० टक्के कर आकारण्यात येईल आणि उरलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम पुढील चार वर्षे खातेदाराला काढता येणार नाही.

डॉ. अनिल भारद्वाज यांना इन्फोसिस पुरस्कार

  • विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांना भौतिकशास्त्रातील प्रतिष्ठेचा इन्फोसिस पुरस्कार जाहीर झाला.
  • उत्तर प्रदेशात जन्मलेले असले भारद्वाज गेली दोन दशके संशोधनाच्या निमित्ताने केरळ येथे कार्यरत आहेत.
  • त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण लखनौ विद्यापीठातून झाले. वाराणसीच्या दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी २००२मध्ये ग्रह व अवकाश विज्ञान या विषयात पीएचडी केली.
  • मंगळ व गुरूचा चंद्र युरोपा यांच्या वायुरूपातील वातावरणाचा अभ्यास त्यांनी केला आहे.
  • त्यांच्या मते त्यातून या दोन ठिकाणी जीवसृष्टीची शक्यता नसली, तरी ग्रहमालेची उत्पत्ती कशी झाली यावर प्रकाश पडू शकतो.
  • भारद्वाज हे मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कम्पोझिशन अ‍ॅनलायझर या प्रयोगात मुख्य संशोधक आहेत.
  • चंद्रा अ‍ॅटमॉस्फेरिक कम्पोझिशन एक्सप्लोरर या चांद्रयान दोनमधील प्रयोगाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.
  • त्यांनी आतापर्यंत गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, युरोपा, गिनीमीड, ट्रिटॉन, टायटन या ग्रह व उपग्रहांवर संशोधन केले आहे.
  • चांद्रयान १ मोहिमेत त्यांनी सारा म्हणजे अ‍ॅटॉमिक रिफ्लेक्टिंग अ‍ॅनलायझर प्रयोगात मोठी भूमिका पार पाडली होती.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर क्ष किरण दुर्बीण, हबल दुर्बीण, न्यूटन एक्सरे दुर्बीण, भारतातील जीएमआरटी रेडिओ दुर्बीण या प्रकल्पातही त्यांनी काम केले आहे.
  • आताचा पुरस्कार त्यांना चांद्रयान १ व मंगळ मोहिमेतील काही प्रयोगांसाठी देण्यात येत आहे.
  • यापूर्वी त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे निधन

  • ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे २५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
  • पाडगावकर यांची किडनी निकामी झाली होती. उपचारासाठी त्यांना रूबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
  • आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते अभ्यासक म्हणून परिचीत होते. शिवाय, त्यांचा काश्मीर प्रश्नाबाबतचा अभ्यासही गाढा होता.
  • पाडगावकर यांचा १ मे १९४४ रोजी जन्म झाला होता. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती. फ्रान्समधून दिग्दर्शन व पटकथा लेखन पदवी मिळवली होती.
  • त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात केली होती. सन १९७८ ते ८६ या काळात त्यांनी युनेस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसेवा अधिकारी म्हणून काम पाहिले होते.
  • फ्रान्सद्वारे २००२मध्ये पाडगावकरांचा पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.

दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी

  • सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन) मधील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. 
  • दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे दिल्ली आणि एनसीआरमधील प्रदूषणात मोठी वाढ झाली होती.
  • त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आता दिल्ली आणि परिसरातील सर्व फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत.
  • या आदेशाची तात्काळ अंलबजावणी करण्यात येणार असून, पुढच्या आदेशांपर्यंत ती कायम राहणार आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारलाही फटाक्यांच्या दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याते निर्देश दिले आहेत.
  • तसेच न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला ६ महिन्यांत फटाक्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या हानीकारक परिणामांबद्दल अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
  • फटाके नागरिकांच्या आयुष्याचा भाग बनले आहेत मात्र त्यांच्या वापरावर निर्बंध येणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणी होणेही गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

टाटा स्टीलच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी

  • टाटा स्टील कंपनीने सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून दूर केल्याचे जाहीर केले आहे.
  • मिस्त्री यांच्या जागी कंपनीतील स्वतंत्र संचालक असलेल्या ओ पी भट यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • भट हे यापूर्वी देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुखपदी कार्यरत होते.
  • टाटा स्टीलला तिच्या प्रमुख प्रवर्तकांकडून सायरस मिस्त्री व नसली वाडिया यांना संचालकपदांवरून दूर करण्याविषयी विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी, असेही सुचवण्यात आले होते.
  • यानुसार, टाटा स्टीलने ठराव मंजूर करून ओ. पी. भट्ट यांना कंपनीचा अध्यक्ष म्हणून घोषित केले. पुढील निर्णयापर्यंत भट्ट हेच कंपनीचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार आहेत.
  • ११० अब्ज डॉलर्सच्या व्यवसाय समूहातील विशेषत: टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस कंपन्यांना मिस्त्री यांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक फटका सहन करावा लागला होता.
  • या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते.
  • आता टाटा समूहातील आदरातिथ्य व्यवसायाच्या प्रमुखपदावरून मिस्त्री यांना हटविण्यासाठी इंडियन हॉटेल्सनेही प्रस्ताव मांडला आहे.
  • टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यानंतरही सध्या मिस्त्री हे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या अध्यक्षपदी कायम आहेत.

चालू घडामोडी : २४ नोव्हेंबर

एअरटेलने सुरू केली देशातील पहिली पेमेंट बँक


  • एअरटेल या मोबाईल कंपनीने डिजीटल आणि पेपरलेस बँक सुरू केली असून देशातील ही पहिली पेमेंट बँक ठरली आहे.
  • ११ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने एअरटेल बँकेला पेमेंट बँकेचा परवाना दिला होता. राजस्थानमधून भारती एअरटेलने प्रायोगिक तत्वावर ही बँक सुरू केली आहे. 
  • याद्वारे ग्राहकांना एअरटेलच्या गॅलरीतून रोख रक्कम काढण्याची मुभाही देण्यात आली आहे. मोबाइल फोनच्या माध्यमातूनही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
  • या बँकेतील बचत खात्यातील रकमेवर ७.२५ टक्के या दराने व्याज देण्यात येणार आहे. बँकिग क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याज देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • राजस्थानमधील शहरे आणि ग्रामीण भागांतील नागरिकांना एअरटेल रिटेल आउटलेटमध्ये जाऊन बँकेत खाते उघडता येणार आहे.
  • तसेच ग्राहकांना मोबाईल फोनच्या माध्यमातूनही बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार असून बँकेत पेपरलेस खाते उघडण्यासाठी ग्राहकांना आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • एअरटेल पेमेंट बँकेच्या पहिल्या टप्प्यात बँकिंगविषयक सर्व सुविधांच्या चाचण्या सुरू असून, त्यानंतरच बँकेची सेवा देशभरात शाखांद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

नेपाळमध्ये नव्या ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांवर बंदी

  • नेपाळच्या केंद्रीय बँकेने भारतातील नव्या ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे.
  • जोपर्यंत विनिमय अंतर्गत भारताकडून काही व्यवस्था केली जात नाही तोपर्यंत भारतीय नोटा बेकायदा मानले जाणार असल्याचे नेपाळ राष्ट्र बँकेने सांगितले.
  • भारतीय रिझर्व्ह बँकेने फॉरेन एक्सचेंजतंर्गत जारी केलेल्या अधिसूचननेनंतरच विदेशी नागरिकांना भारतीय रूपये देण्याची परवानगी मिळते.
  • रिझर्व्ह बँकेबरोबर झालेल्या समजोत्यानुसार एक नेपाळी नागरिक ५०० आणि १००० रूपयांच्या जुना नोटांच्या रूपात २५ हजार रूपये जवळ ठेऊ शकतो.
  • केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा नेपाळवरही परिणाम झाला.
  • भारतातील नोटबंदीमुळे नेपाळमधील बँकिंग क्षेत्राने ३.५ कोटींचे भारतीय चलन रोखण्याचा निर्णय घेतला होता.
  • नेपाळमध्ये मोठ्याप्रमाणात भारतीय रूपयांचा व्यवहारात वापर केला जातो. त्यामुळे अनेक नेपाळी नागरिक जुन्या नोटा कशा बदलायच्या या चिंतेत आहेत.
  • नेपाळच्या राष्ट्रीय बँकेने जुन्या भारतीय नोटा बदलण्याची नियमावली तयार करण्यासाठी एका विशेष समितीचे नेमणूक केली आहे.

पुण्याच्या प्रसाद शिंदेला आयर्न मॅन किताब

  • पुण्यातील प्रसाद शिंदे या तरुणाने मलेशियात झालेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘ट्रायथलॉन’ शर्यत पूर्ण करून ‘आयर्न मॅन’चा किताब मिळविला.
  • अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण, जलतरणपटू कौस्तुभ राडकर यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे.
  • कौस्तुभने सलग चारवेळा हा किताब मिळविला आहे. तर अभिनेता मिलिंद सोमण याने मागील वर्षी ‘आयर्न मॅन’ किताब पटकावला होता.
  • काही वर्षांपूर्वी वजनाची शंभरी ओलांडलेल्या प्रसादने खडतर व्यायामातून फिटनेस मिळवला.
  • त्यानंतर त्याने २०१५मध्ये ४२ किलोमीटरची हैदराबाद मॅरेथॉन साडेचार तासांत, २०१६मध्ये ४२ किलोमीटरची मुंबई मॅरेथॉन ४ तास १३ मिनिटांमध्ये पूर्ण केली.
  • मलेशियात १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत त्याने सहभाग घेतला आणि १४ तास १२ मिनिटांमध्ये ही स्पर्धा यशस्विरीत्या पूर्ण केली.
  • या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास सलग २.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे अशा तीन प्रकारांतील २२४.८ किलोमीटर अंतर ठराविक वेळेत पूर्ण करावे लागते.
  • त्यात जगभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रसादने निश्चित केलेल्या वेळेपूर्वी शर्यत पूर्ण करून ‘आयर्न मॅन’ किताब पटकावला.

चालू घडामोडी : २३ नोव्हेंबर

अग्नी १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • भारतीय बनावटीच्या अग्नी १ या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनाऱ्याजवळ लष्करातर्फे २२ नोव्हेंबर रोजी यशस्वी चाचणी करण्यात आली.
  • जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अब्दुल कलाम बेटावरील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरून (आयटीआर) डागण्यात आले.
  • अद्ययावत रडार, टेलिमेट्री ऑब्झर्वेशन स्टेशन्स, इलेक्ट्रो-ऑप्टिक इन्स्ट्रुमेंट्स आणि नौदलाच्या नौकांनी या क्षेपणास्त्राचा माग घेतला.
  • अग्नी १ क्षेपणास्त्रामध्ये अद्ययावत नेव्हिगेशन यंत्रणा असल्याने लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता त्यामध्ये आहे.
  • या आधीच संरक्षण दलामध्ये दाखल झालेले अग्नी १ क्षेपणास्त्र हे त्याचा पल्ला, अचूकता आणि संहारक क्षमता यासाठी ओळखले जाते.
  • १२ टन वजनाचे आणि १५ मीटर लांब असलेले हे क्षेपणास्त्र एक टनाहून अधिक वजन वाहून नेऊ शकते. तसेच ७०० किमीपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करण्याची अग्नी १ची क्षमता आहे.
  • डीआरडीओने डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, रिसर्च सेंटर इमिरत आणि हैदराबादेतील भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्या सहकार्याने या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.

युनोतील अमेरिकेच्या राजदूत म्हणून निकी हॅले यांची नियुक्ती

  • अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साऊथ कॅरोलिना प्रांताच्या विद्यमान गव्हर्नर निकी हॅले यांची संयुक्त राष्ट्रांतील (युनो) अमेरिकेच्या पुढील राजदूत म्हणून निवड केली आहे.
  • सध्या समंथा पावर या संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत आहेत. निक्की हॅले आता पावर यांची जागा घेत संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे नेतृत्व करतील. 
  • अमेरिकेच्या प्रशासनात कॅबिनेट दर्जाच्या पदावर नियुक्ती झालेल्या हॅले या पहिल्या भारतीय-अमेरिकी नागरिक असतील.
  • तसेच ट्रम्प यांनी वरिष्ठ स्तरीय प्रशासनासाठी निवडलेल्या हेली पहिल्या महिला आहेत.
  • अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रारंभी ट्रम्प यांच्या टीकाकार असलेल्या हॅले यांनी नंतर आपली भूमिका बदलत ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता.

मालिनी सुब्रह्मण्यम यांना आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार

  • भारतीय पत्रकार मालिनी सुब्रह्मण्यम यांना नक्षलग्रस्त बस्तर भागातून केलेल्या वार्ताकनासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • एकूण चार पत्रकारांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मालिनी सुब्रह्मण्यम यांना एल साल्वादेरचे ऑस्कर मार्टिनेझ व तुर्कस्थानचे कान डुंदर यांच्यासमवेत पुरस्कार देण्यात आला.
  • इजिप्तचे सध्या तुरुंगात असलेले छायाचित्रकार अबाऊ झैद ऊर्फ शौकन यांना अनुपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • सुब्रह्मण्यम या स्क्रॉल या संकेतस्थळासाठी काम करीत असून, त्यांनी नक्षलग्रस्त भागात महिलांविरोधात होणारा लैंगिक हिंसाचार, पोलीस व सुरक्षा दले यांच्याकडून होणारा अत्याचार याविरोधात बातम्या दिल्या होत्या.
  • छत्तीसगडमधील बस्तर जिल्हय़ात नक्षलग्रस्त भागात लहान मुलांना होणारा कारावास, बंद पडलेल्या शाळा, न्यायबाहय़ मृत्यू, पत्रकारांना धमक्या असे विषय त्यांनी बातम्यांतून हाताळले.
  • मार्टिनेझ यांना एल साल्वादोर येथून तीन आठवडे बाहेर जावे लागले, कारण त्यांना पोलिसांनी ठार केलेल्या आठ संशयितांच्या प्रकरणातील चौकशीबाबत धमक्या येत होत्या.
  • दुंदर यांना २६ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती, कारण सरकारी गुप्तचरांनी सीरियन बंडखोर गटांना शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न केल्याबाबत लेख त्यांनी लिहिला होता.
  • झैद यांना १४ ऑगस्ट २०१३ रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर हत्यारे बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, खून व खुनाचा प्रयत्न असे आरोप ठेवण्यात आले आहेत.
  • या चार पत्रकारांनी जीव धोक्यात घालून वृत्तपत्र स्वातंत्र्य जिवंत ठेवले आहे व समाजाला महत्त्वाच्या घटनांबाबत खरी माहिती दिली आहे, असे कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट या संस्थेने म्हटले आहे.

नाबार्डद्वारे शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रुपये वितरीत होणार

  • रबी हंगामासाठी शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, सरकारने शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रुपये वितरित करण्याची परवानगी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेला (नाबार्ड) दिली आहे.
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून हा पैसा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
  • छोट्या शेतकऱ्यांना सहकारी बँकांमार्फतच पीककर्ज मिळते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांकडे नगदी रकमेची चणचण आहे.
  • यंदा मान्सून चांगला झाल्याने, शेतकऱ्यांच्या रब्बीबाबतच्या आशा उंचावल्या आहेत, पण नोटाबंदीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत होता.
  • रब्बी हंगामासाठी बी-बियाणे आणि खते खरेदी करणे अवघड झाले. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • मात्र त्याच वेळी जिल्हा व सहकारी बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून देण्याची विनंती सरकारने अजून तरी मान्य केलेली नाही.

चालू घडामोडी : २२ नोव्हेंबर

इस्त्रोचे माजी अध्यक्ष प्रा. एम. जी. के. मेनन कालवश

  • प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ, इस्त्रोचे माजी अध्यक्ष प्राध्यापक एम. जी. के. मेनन यांचे २२ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
  • एम. जी. के. मेनन यांनी व्ही. पी. सिंह सरकारच्या मंत्रिमंडळात विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद भूषवले होते.
  • याआधी मेनन केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाचे सचिव म्हणूनही कार्यरत होते.
  • १९७२मध्ये मेनन यांची इस्त्रोच्या प्रमुखपदी नेमणूक झाली होती. वयाच्या ३५व्या वर्षी ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या संचालकपदी विराजमान झाले.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांचा पद्मभूषण (१९६८) आणि पद्मविभूषण (१९८५) पुरस्काराने सन्मान केला आहे.
  • १९८२ ते १९८९ या कालावधीत ते नियोजन आयोगाचे सदस्य होते. तर १९८६ ते १९८९ या कालावधीत पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते.
  • १९८९ ते १९९० या काळात कौन्सिल ऑफ सायन्टिफिक ऍण्ड इंडस्ट्रीयल रिसर्चचे उपाध्यक्ष आणि १९९० ते ९६ या काळात राज्यसभेचे सदस्यही होते.
  • मेनन यांनी वैश्विक किरणे आणि कण भौतिक (पार्टिकल फिजिक्स) विज्ञानाच्या संशोधनात आपले अमूल्य योगदान दिले आहे.

प्रख्यात गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे निधन

  • कर्नाटकी संगीताला वेगळी दिशा देणारे प्रख्यात गायक मंगलमपल्ली उर्फ एम. बालमुरलीकृष्ण यांचे २२ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
  • मूळचे आंध्र प्रदेशमधील असणाऱ्या एम. बालमुरलीकृष्ण यांनी त्यांच्या जीवनातील बराच काळ चेन्नईमध्ये व्यतीत केला.
  • पूर्वीच्या मद्रास इलाख्यात पूर्व गोदावरी जिल्ह्यात संगीतज्ज्ञ माता-पित्याच्या पोटी बालमुरली यांचा जन्म झाला.
  • त्यांचे वडील पट्टाभीरामय्या पट्टीचे गायक होते तर आई सूर्यकांतम्मा सिद्धहस्त वीणावादक होती.
  • ‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा’ या सरकारी जाहिरातीच्या गाण्याच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले.
  • तेलुगु, संस्कृत, कन्नड आणि तामिळमध्ये बांधलेल्या ४००हून अधिक बंदिशी ही त्यांची संगीतकलेला दिलेली अजोड देन आहे.
  • एक सुप्रसिद्ध गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालमुरलीकृष्ण यांनी संगीतकार आणि अभिनेता म्हणूनही भूमिका निभावल्या होत्या.
  • तेलगू चित्रपट ‘भक्त प्रल्हाद’ यात त्यांनी नारदाची भूमिका साकारली होती. व्हॉयलिन, मृदंग आणि कंजिरा ही वाद्ये वाजविण्यातही ते निष्णात होते.
  • भारतीय संगीत कलेमध्ये दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९७१) आणि पद्मविभूषण (१९९१) या पद्म किताबांनी बालमुरलींना गौरविले होते.
  • सर्वोत्तम पार्श्वगायक व सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक म्हणून ते राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले होते.
  • संगीत अकादमीने ‘संगीत कलानिधी’ या सर्वोच्च उपाधीने त्यांचा सन्मान केला होता. फ्रान्स सरकारनेही नागरी सन्मानाने त्यांच्या थोरवीची कदर केली होती.
  • कर्नाटकी संगीत कलेची ख्याती जागतिक पातळीवर पोहोचवण्यामध्ये एम. बालमुरलीकृष्ण यांचा मोलाचा वाटा आहे.

अँडी मरेला एटीपी वर्ल्ड टूरचे जेतेपद

  • ब्रिटनच्या अँडी मरेने सर्बियाचा नोव्हाक जोकोविचला नमवून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या किताबावर नाव कोरले.
  • या विजेतेपदासह मरेने यंदाच्या वर्षाची अखेर जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू म्हणून करणार असल्याचे निश्चित केले.
  • तर दुसरीकडे जोकोविचला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून यंदाच्या वर्षाचा निरोप घ्यावा लागेल.
  • अत्यंत आक्रमक खेळ केलेल्या मरेने या अंतिम सामन्यात जोकोविचचा ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला.
  • विशेष म्हणजे यांसह मरेने कारकिर्दीत पहिल्यांदाच एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे जेतेपदही पटकावले.
  • १ तास ४३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मरेने जोकोवर पूर्ण वर्चस्व राखताना सलग २४वा विजय मिळविला.
  • यंदाच्या वर्षी मे महिन्यात मरेने जोकोलाच पराभवाचा धक्का देत आपले पहिले इटालियन जेतेपद पटकावले होते.

इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहंमद मोर्सी यांची जन्मठेपेची शिक्षा रद्द

  • इजिप्तच्या अपिलीय न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहूडचे माजी अध्यक्ष मोहंमद मोर्सी यांची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे.
  • त्यांच्याविरुद्ध पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, पॅलेस्टिनी गट हमाससाठी हेरगिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 
  • मोर्सी हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले अध्यक्ष होते, मात्र २०११मध्ये बंडखोरीमुळे २०१३मध्ये अब्दुल फतेह अल सीसी याने त्यांना हटविले होते.
  • अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकले होते आणि त्यांच्याविरुद्ध विविध खटले दाखल करून त्याची सुनावणी सुरू करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राम नरेश यादव यांचे निधन

  • उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राम नरेश यादव यांचे २२ नोव्हेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
  • राम नरेश यादव हे मधुमेह व फुफ्फुसाच्या विकाराने ग्रस्त होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर लखनऊ येथील संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात उपचार सुरू होते.
  • रामनरेश यांनी १९७७ व १९७९ या कालावधीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

चालू घडामोडी : २१ नोव्हेंबर

पृथ्वी २चे यशस्वी प्रक्षेपण

  • भारताने ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथून पृथ्वी २ या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. 
  • अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असे हे क्षेपणास्त्र २००३मध्ये सैन्यात दाखल झाले होते.
  • पृथ्वी २ ला दोन इंजिने आहेत. द्रवरुप इंधनावरही हे क्षेपणास्त्र चालते. तसेच यामध्ये ५०० ते १००० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
  • पृथ्वी २ मध्ये जमिनीवरुन जमिनीवर ३५० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात अचूक मारा करण्याची क्षमता आहे.
  • यापूर्वी १२ ऑक्टोबर २००९ला पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.
  • नऊ मीटर लांबीचे एकाच टप्प्यात थेट लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेले अतिशय प्रभावी स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.

इंटरनेट वर्गणीदारांच्या संख्येत महाराष्ट्र पहिला

  • सरकारी माहितीनुसार भारतातील इंटरनेट वर्गणीदारांच्या संख्येत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.
  • महाराष्ट्रात २९.४७ दशलक्ष इतके इंटरनेटधारक आहेत. त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक यांचा क्रमांक लागला आहे.
  • सरकारी माहितीनुसार मार्चअखेर भारतात ३४२.६५ दशलक्ष इतके इंटरनेट वर्गणीदार आहेत.
  • तामिळनाडूत त्यांची संख्या २८.०१ दशलक्ष, आंध्रात २४.८७ दशलक्ष, तर कर्नाटकात २२.६३ दशलक्ष इतकी आहे.
  • हिमाचल प्रदेशात सर्वात कमी इंटरनेट वर्गणीदार असून त्यांची संख्या ३.०२ दशलक्ष आहे.
  • तामिळनाडूत शहरी वर्गणीदार सर्वाधिक २१.१६ दशलक्ष आहेत, तर उत्तर प्रदेशात ग्रामीण वर्गणीदार सर्वाधिक म्हणजे ११.२१ दशलक्ष आहेत.
  • दिल्लीत इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या २०.५९ दशलक्ष होती, तर मुंबई व कोलकात्यात ती अनुक्रमे १५.६५ दशलक्ष व ९.२६ दशलक्ष होती.
  • सरकारने डिजिटल इंडियाला प्राधान्य दिले असून, भारत नेट प्रकल्प सर्व २.५ लाख ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी राबवला आहे.
  • भूमिगत फायबर लाइन्स व इतर साधनांचा वापर करून इंटरनेटची सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जात असून, मार्च २०१७पर्यंत १ लाख ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जाणार आहेत.

केहकशा बासूची बाल शांतता पुरस्कारासाठीच्या अंतिम यादीत निवड

  • बालकांच्या हक्कांमध्ये सुधारणा घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या केहकशा बासू मूळ भारतीय वंशाच्या मुलीची निवड आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन स्पर्धकांमध्ये करण्यात आली आहे.
  • या पुरस्कारासाठी जगभरातून १२० नावे पुढे आली होती. तज्ज्ञांनी त्यातून ही निवड केली.
  • केहकशासह कॅमेरूनमधील दिवीना मालौम आणि सीरियातील मुझून अलमेल्लेहान यांचीही निव झाल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय बालहक्क संघटनेने केली आहे.
  • शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त मोहम्मद युनूस यांच्या हस्ते २ डिसेंबर रोजी हॅंग्वे येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 
  • केहकशा ही आठ वर्षांची असताना तिने पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक मोहीम हाती घेतली होती.
  • टाकाऊ वस्तूंपासून पुनर्निर्माण करण्याविषयी तिने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली असून, यासाठी तिने ग्रीन होप नावाची एक संस्थाही स्थापन केलेली आहे.
  • ही संस्था दहा देशांमध्ये कार्यरत असून, टाकाऊ वस्तू गोळा करणे, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे आदी कामे तिच्या माध्यमातून होतात. 
  • दिवीना या १२ वर्षांच्या मुलीने कॅमेरूनमधील मुलांमध्ये अराजक स्थिती, संभाव्य धोके यांबाबत मोठी जागृती केली असून, ती त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे धडेही देत आहे.

उवेना फर्नांडिस यांना एएफसी रेफ्री विशेष पुरस्कार

  • भारताची महिला फुटबॉल रेफ्री उवेना फर्नांडिस हिला क्वालालांपूर येथे एएफसी रेफ्री विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • जॉर्डन येथे झालेल्या अंडर १७ महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे उवेना यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
  • अखिल भारतीय फुटबॉल संघटना अध्यक्ष: प्रफुल्ल पटेल

डॉ. डेन्टन कुली यांचे निधन

  • अमेरिकेतील पहिली कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करणारे हृदयशल्यचिकित्सक डॉ. डेन्टन कुली यांचे १८ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
  • कुली यांनी त्यांच्या आयुष्यात किमान १ लाख तरी हृदय शस्त्रक्रिया केल्या. आज या शस्त्रक्रिया सोप्या वाटतात, पण ज्या काळात त्यांनी हे काम सुरू केले तेव्हा तंत्रज्ञान आता इतके पुढे गेलेले नव्हते.
  • कुली यांनी मुलांच्या हृदयाच्या झडपा बदलण्यातही तंत्रज्ञान विकसित केले होते.
  • ४ एप्रिल १९६९ रोजी एका मरणाऱ्या रुग्णाला दात्याचे हृदय मिळत नव्हते, त्यामुळे त्याच्यावर त्यांनी कृत्रिम हृदयप्रत्यारोपण केले.
  • नैसर्गिक हृदय मिळेपर्यंत त्या रुग्णाला ६५ तास जिवंत ठेवण्यात त्यांना यश आले, पण तो रुग्ण नंतर दगावला. वैद्यकीय क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणारी ती घटना होती.
  • कुली यांनी वापरलेले कृत्रिम हृदय हे ह्य़ूस्टनच्या बेलर कॉलेज येथे डिबेकी यांनी तयार केले होते.
  • कुली यांचा जन्म २२ ऑगस्ट १९२० रोजी ह्य़ूस्टन येथे झाला. बाल्टीमोर येथील जॉन हॉपकिन्स संस्थेतून त्यांनी वैद्यकाची पदवी घेतली.
  • हार्ट लंग मशीन वापरून शस्त्रक्रिया करताना द्याव्या लागणाऱ्या रक्ताचे प्रमाण त्यांनी कमी केले, ही त्यांची मोठी कामगिरी होती.
  • जगातील पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा मान दक्षिण आफ्रिकेचे ख्रिश्चन बर्नार्ड यांच्या नावे आहे.

मासिक : ऑक्टोबर २०१६ (PDF)

'ऑक्टोबर २०१६'च्या सर्व चालू घडामोडींच्या सखोल अभ्यासासाठी तसेच राज्यसेवा, PSI, STI, Asst व इतर अनेक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी MPSC Toppersचे PDF स्वरूपातील हे मासिक मोफत डाउनलोड करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील SHARE करा.

हे मासिक फक्त MPSC Toppers मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.



हे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers Mobile App (Version 2.0)
★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★

नोबेल पुरस्कार २०१६


ही नोट्स मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers Mobile App (Version 2.0)
★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★

चालू घडामोडी : २० नोव्हेंबर

पी.व्ही.सिंधूला चायना बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद

  • ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
  • सिंधूने चीनच्या सून यू हिचा पराभव करून आपले पहिले सुपरसीरिज विजेतेपद जिंकले आहे.
  • अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या सून यू हिचा २१-११, १७-२१ आणि २१-११ अशा सेटमध्ये पराभव केला.
  • गेल्या ३० वर्षांमध्ये आजवर केवळ तीन चीन व्यतिरिक्त बॅडमिंटनपटूंनी ही स्पर्धा जिंकली होती. यात दोन भारतीय महिला बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. याआधी ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम सायना नेहवाल हिने केला होता.
  • सिंधूने आपल्या उपांत्य फेरीच्या लढतीत कोरियाच्या जी ह्य़ून हिच्यावर रोमहर्षक विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.

प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर मंगळयानाद्वारे काढलेले छायाचित्र 

  • मंगळयानाद्वारे काढण्यात आलेल्या एका छायाचित्राला नॅशनल जियोग्राफिक या प्रसिद्ध मासिकाने मुखपृष्ठावर स्थान दिले आहे.
  • यासोबतच मंगळयानाने या आठवड्यात मंगळाच्या कक्षेत तीन वर्षे पूर्ण केली आहेत.
  • भारताच्या मंगळयान मोहिमेआधी जगभरातील देशांनी मंगळाच्या ५० पेक्षा अधिक मोहिमा केल्या आहेत.
  • मात्र आतापर्यंत कोणालाही मंगळ ग्रहाचे मंगळयानाने काढलेल्या छायाचित्राइतके सुस्पष्ट छायाचित्र काढता आलेले नाही.
  • मंगळयानात लावण्यात आलेल्या कमी किमतीच्या कॅमेऱ्याने मंगळ ग्रहाची अनेक छायाचित्रे टिपली आहेत.
  • या छायाचित्रांमधील एका छायाचित्राला नॅशनल जियोग्राफिक मासिकाने मुखपृष्ठावर स्थान दिले आहे.
  • भारताने मंगळयान मोहिमेवर एकूण ४५० कोटी रुपये खर्च केले आहेत. या मोहिमेला ‘मार्स ऑर्बिट मिशन’ (एमओएम) असे नाव देण्यात आले आहे.
  • २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताने मंगळयान अवकाशात सोडत इतिहास रचला. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिम यशस्वी करणारा देश हे बिरुद या मोहिमुळे भारताने पटकावले.
  • प्रतिष्ठीत टाईम्स मासिकाने मंगळयान मोहिमेचा उल्लेख ‘द सुपरमार्ट स्पेसक्राफ्ट’ या शब्दांमध्ये केला होता.

पाकिस्तानकडे १३० ते १४० अणुबॉम्ब

  • अमेरिकेतल्या ‘बुलेटिन ऑफ अ‍ॅटोमिक सायन्टिस्ट’च्या अहवालानुसार, पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आपली आण्विक शक्ती वाढवत चालला असून, पाकिस्तानकडे सुमारे १३० ते १४० अणुबॉम्ब आहेत.
  • तसेच पाकिस्तान एफ-१६ आणि अन्य लढाऊ विमानांना आण्विक हल्ल्यांसाठी सज्ज करीत असल्याचेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
  • काही व्यवसायिक उपग्रहांनी टिपलेल्या पाकिस्तानी सैन्यतळ आणि हवाई तळांची छायाचित्रे टिपली आहेत.
  • यामध्ये अनेक ठिकाणी अणवस्त्रांशी संबंधित असणारे मोबाईल प्रक्षेपक आणि भूमिगत सुविधा उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे.
  • पाकिस्तानकडून अणवस्त्रांच्या साठ्यात, त्यासाठी लागणाऱ्या प्रक्षेपण व्यवस्थेची आणि सुट्या भागांच्या उत्पादन क्षमतेतही मोठी वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • येत्या १० वर्षांत पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची संख्या ३५०पर्यंत पोहोचेल, असाही अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
  • तसे प्रत्यक्षात झाल्यास पाकिस्तान हा जगभरातील सर्वाधिक अण्वस्त्रधारी असलेला तिसरा देश ठरू शकेल.

डॉ. उषा देशमुख यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार

  • ज्येष्ठ संत साहित्य लेखिका डॉ. उषा देशमुख यांना राज्य शासनाने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे.
  • मुंबई विद्यापीठातून मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या उषाताई मूळच्या खानदेशातील अमळनेरच्या आहेत.
  • १९५२मध्ये त्यांचा विवाह प्रसिद्ध समीक्षक-नाटककार प्रा. मा. गो. देशमुख यांच्याशी झाला.
  • मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात ज्ञानदानाचे कार्य करत असतानाही त्यांनी मानवतावादी मूल्यांचा अवलंब करत विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जडणघडण केली.
  • प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास आणि साहित्य संशोधन व साहित्य समीक्षा हे त्यांच्या अभ्यासाचे क्षेत्र राहिले.
  • उषाताईंनी प्राचीन व अर्वाचीन वाङ्मय, संत साहित्य, संशोधन व समीक्षा, असे सर्व प्रकार लेखनात हाताळले आहेत.
  • संतसाहित्यावरची उषाताईंची ‘कुसुमाग्रज साहित्यदर्शन’, ‘ज्ञानेश्वरी एक शोध’, ‘दीपमाळ’ व ‘रामायणाचा आधुनिक साहित्यावरील प्रभाव’ ही काही गाजलेली पुस्तके आहेत.
  • संतांची लोकशिक्षणविषयक भूमिका, त्यांचा भक्तीविषयक दृष्टिकोन, संतांची शिकवण या सर्व गोष्टींची उकल त्यांनी त्यांच्या साहित्यातून केली आहे.
  • याशिवाय, त्यांनी ‘वाङ्मयीन व्यक्ती’, ‘साहित्यतोलन’, ‘ज्ञानेश्वरी जागरण’, ‘दलित साहित्य स्थिती गती’, ‘मराठी नियतकालिकांचा वाङ्मयीन अभ्यास’ यासह अनेक पुस्तकांचे संपादनही केले आहे.
  • विदर्भ साहित्य संघाच्या पुसदला झालेल्या संमेलनाचे, तसेच वैदर्भीय लेखिका संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
  • बडोदा विद्यापीठात त्यांनी मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्य म्हणून काम केले आहे.
  • निवृत्तीनंतरही त्या विविध साहित्य व सांस्कृतिक व्यासपीठावर तेवढय़ाच जोमाने सक्रिय आहेत.

चालू घडामोडी : १९ नोव्हेंबर

‘आयएनएस चेन्नई’वर सुरक्षा’कवच’

  • ‘आयएनएस चेन्नई’ या विनाशिकेवर भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना शत्रूपासून रोखणारे सर्वात पहिले ‘कवच’ चढविण्यात आले आहे.
  • गेल्या काही वर्षांपासून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (डीआरडीओ) ‘कवच’ या नव्या चकवायंत्रणेची निर्मिती करण्यासंबंधी संशोधन सुरू होते.
  • या ‘कवचा’चे सर्व चाचण्या ‘आयएनएस चेन्नई’ या विनाशिकेवर करण्यात आल्याव त्या यशस्वी झाल्यानंतर सर्वात पहिले ‘कवच’ही आता याच युद्धनौकेवर चढविण्यात आले आहे.
  • यापुढे नौदलात दाखल होणाऱ्या सर्व युद्धनौकांनाही हे ‘कवच’ चढविण्यात येणार आहे.
 ‘कवच’प्रणाली 
  • पूर्वी टेहाळणीदरम्यान शत्रूने भारतीय युद्धनौकांवर क्षेपणास्त्र डागल्यास युद्धनौकेचा बचाव करण्यासाठी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र वापरण्याखेरीज दुसरा पर्याय नौदलाकडे उपलब्ध नव्हता.
  • म्हणूनच गेली काही वर्षे ‘डीआरडीओ’तर्फे शत्रूच्या क्षेपणास्त्राला चकवा देणाऱ्या ‘कवच’ या नव्या चकवायंत्रणेची निर्मिती सुरु होती.
  • शत्रूचे क्षेपणास्त्र येते आहे, हे लक्षात येताच ‘कवचा’द्वारे युद्धनौकेपासून दूर अंतरावर एक मोठी युद्धनौका असल्याचा आभास निर्माण होतो.
  • क्षेपणास्त्राला अधिक मोठी युद्धनौकाच असल्याचा आभास आहे, हे लक्षात येत नाही आणि युद्धनौकेऐवजी त्या आभासी ठिकाणी जाऊन ते फुटते. परिणामी युद्धनौकेचा यशस्वी बचाव होतो.
 आयएनएस चेन्नई 
  • भारतीय नौदलाच्या ‘प्रकल्प १५ अल्फा’मधील कोलकाता वर्गातील गायडेड मिसाईल विनाशिकांपैकी ही तिसरी आणि अखेरची विनाशिका आहे.
  • या तीन विनाशिकांच्या प्रकल्पावर नौदलाने सुमारे साडेअकरा हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.
  • १६४ मीटर्स लांबीच्या या विनाशिकेचे वजन साडेसात हजार टनांचे असून त्यावर भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणारी ब्राह्मोस, त्याचप्रमाणे लांब पल्ल्याची भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बसविण्यात आली आहेत.
  • याशिवाय पाणतीरांचा मारा झाल्यास त्यालाही चकवा देणारी ‘मारीच’ नावाची यंत्रणा प्रथमच बसविण्यात आली आहे.
  • शत्रूचा संहार करणारी या अर्थाने संस्कृतमधील ‘शत्रो संहारक:’ हे या विनाशिकेचे घोषवाक्य आहे.
  • २१ नोव्हेंबर रोजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते ही विनाशिका समारंभपूर्वक नौदलात दाखल होईल आणि ती नौदलाच्या पश्चिमी ताफ्यामध्ये कार्यरत असेल.

जागतिक पातळीवरही पुणे ‘स्मार्ट’

  • देशांतर्गत ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या पुणे शहराने जागतिक पातळीवरही नावलौकिक मिळविला आहे.
  • ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस’ या उपक्रमात सहभागी झालेल्या ४५ देशांतील २५० शहरांमधून अंतिम ६ शहरांच्या यादीत पुण्याने स्थान पटकावले आहे.
  • आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, निधी उभारणीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे.
  • बार्सिलोना येथे झालेल्या या स्पर्धेत तीन गटांमध्ये विविध देशांतील शहरांनी भाग घेतला होता.
  • त्यामध्ये ‘प्रोजेक्ट’ विभागात भुवनेश्वर आणि ‘सिटी’ विभागात पुणे शहराने भाग घेतला होता.
  • अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराने यात पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर सोल (कोरिया), हॉलंड (नेदरलॅंड), जिउक्वॉन (चीन) आणि मॉस्को (रशिया) व पुणे या शहरांनी अनुक्रमे २ ते ६ क्रमांक पटकावले.  
  • शाश्वत विकास, जगण्यायोग्य शहर आणि नागरिकांचा लोकसहभाग या तीन निकषांवर पुण्याची निवड अंतिम सहा शहरांच्या यादीत करण्यात आली आहे.
  • त्यामुळे आता जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांमध्ये योग्य संदेश जाण्यास मदत होईल आणि पुण्यातील प्रकल्पांसाठी निधी उभारणे सोपे होऊ शकेल. 
  • केंद्र सरकारने यापूर्वी देशांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत भुवनेश्वर शहराने पहिला तर पुणे शहराने दुसरा क्रमांक पटकावला होता.

वाहतूक नियमांचे २० वेळा उल्लंघन केल्यास परवाना रद्द

  • वाहतूक नियमनात ई-चलन प्रणाली अस्तित्वात आल्याने आता वाहतूक नियमांचे २० वेळा उल्लंघन केल्यास चालकाचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्राच्या गृह विभागात काही अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • त्यानुसार मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. उर्वरित महापालिका क्षेत्रातही ही यंत्रणा बसविण्याचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे.
  • वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यावर दंड भरताना किंवा कारवाई करताना वाहनचालक आणि पोलिसांदरम्यान भांडणाचे प्रसंग ओढवतात, परिणामी वाहतूक विस्कळित होते.
  • यासाठी ई-चलन व्यवस्था कार्यान्वित केली आहे. वाहनचालकाने नियम तोडल्यास त्याला ई-चलनाची नोटीस जागेवरच देता येईल किंवा घरच्या पत्त्यावर जाईल. दंडाची रक्कम त्याला संगणकाद्वारे भरता येईल.
  • या यंत्रणेमुळे वाहनचालकाने किती वेळा नियम तोडला त्याचा तपशील उपलब्ध असेल.
  • दहा वेळा नियम तोडल्यास दोन महिन्यांसाठी, तर वीस वेळा नियम तोडल्यास कायमस्वरूपी चालक परवाना रद्द करण्यात येणार आहे. 
 गृह विभागात होणारे अन्य बदल 
  • पोलिस भरतीसाठी संगणकाद्वारे वजन, उंची व धावण्याच्या चाचण्या.
  • आग, आरोग्य, पोलिस मदतीसाठी देशभरात एकच ११२ टोल फ्री क्रमांक.
  • पोलिसांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी, उपलब्धता याचा तपशील स्वतंत्र ॲपवर.