भारत व पाकदरम्यान अणुआस्थापनांच्या यादीची देवाणघेवाण
भारत व पाकिस्तान यांनी लागोपाठ सव्विसाव्या वर्षी त्यांच्या अणुआस्थापनांच्या यादीची देवाणघेवाण केली आहे.
एका द्विपक्षीय करारानुसार दोन्ही देशांना एकमेकांच्या अणुआस्थापनांवर हल्ला करण्यास प्रतिबंध आहे, त्यातील तरतुदीनुसार यादीची देवाणघेवाण करण्यात आली.
भारत व पाकिस्तान यांनी राजनैतिक मार्गाने नवी दिल्ली व इस्लामाबाद येथे याद्यांची देवाणघेवाण केली.
भारत व पाकिस्तान यांच्यात एकमेकांच्या अणुआस्थापनांवर हल्ले न करण्याबाबत करारावर ३१ डिसेंबर १९८८मध्ये करार झाला होता.
हा करार २७ जानेवारी १९९१मध्ये अमलात आला होता. त्यानुसार दोन्ही देशांनी एकमेकांना अणुआस्थापनांची यादी दरवर्षी सादर करणे आवश्यक आहे.
दरवर्षी १ जानेवारीला या यादीची देवाणघेवाण होते. १ जानेवारी १९९२ पासून लागोपाठ २६व्या वर्षी या यादीची देवाणघेवाण करण्यात आली.
दोन्ही देशांनी त्यांच्या तुरूंगात असलेल्या कैद्यांची यादीही एकमेकांना सादर केली. राजनैतिक संपर्क कराराअंतर्गत या याद्या एकमेकांना देण्यात आल्या. याबाबतचा करार २१ मे २००८ रोजी झाला होता.
अग्नी-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
ओडिशाच्या किनारपट्टीवरील असलेल्या अब्दुल कलाम बेटावर स्ट्रटेजिक फोर्सेस कमांडने अग्नी-४ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
एक टन वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणारे अग्नी-४ हे स्वानातीत क्षेपणास्त्र ४ हजार किलोमीटरपर्यंत मारा करु शकते.
अग्नी-४ क्षेपणास्त्र जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे बॅलेस्टिक प्रकारातील क्षेपणास्त्र आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) वतीने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.
मध्यम ते लांब पल्ल्याच्या अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेतील हे चौथे क्षेपणास्त्र असून, सध्या ते चाचणीच्या टप्प्यात आहे.
आतापर्यंत अग्नी-१, २, ३ ही तीन प्रकारची क्षेपणास्त्रे लष्करी वापरासाठी सज्ज झाली आहेत.
डिसेंबर २०१६मध्ये अग्नी-५ क्षेपणास्त्राचे शेवटच्या टप्प्यातील कॅनिस्टर चाचणीदरम्यान यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले होते.
अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून हटवले
बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशी मान्य करण्यास नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटवले आहे.
कोर्टाने वारंवार सूचना देऊनही या आदेशांचे पालन न केल्याने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यात असमर्थ असल्याचे आणि क्रिकेट संघटनांत पारदर्शकता आणण्यात अपयशी ठरल्याची कारणे ठाकूर आणि शिर्के यांना हटविण्यामागे दिली आहेत.
बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱ्यांसाठी नाव सुचविण्यासाठी कोर्टाने फली नरीमन आणि गोपाल सुब्रमण्यम या न्यायमित्रांची (अमायकस क्युरी) नेमणूक केली आहे.
शंकर बालसुब्रह्मण्यम यांना ब्रिटनचा नाइटहूड किताब
भारतीय वंशाचे केम्ब्रिज विद्यापीठाचे डीएनए तज्ज्ञ व रसायनशास्त्राचे प्राध्यापक शंकर बालसुब्रह्मण्यम यांना ब्रिटनचा नाइटहूड किताब जाहीर झाला आहे.
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना नाइटहूड किताब दिला जातो.
बालसुब्रह्मण्यम यांचे डीएनए संशोधनातील महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी डीएनए क्रमवारी लावण्याच्या नवीन तंत्राचा शोध लावला आहे.
त्यांनी शोधलेल्या नव्या पद्धतीने व्यक्तिगत पातळीवर जिनोमची क्रमवारी लावली जाऊ शकते व त्यासाठी एक हजार पौंडापेक्षा कमी खर्च येतो.
व्यक्तिगत पातळीवर हे तंत्र वापरून आपण एखाद्या व्यक्तीला एखादा रोग कोणत्या जनुकामुळे झाला आहे, हे सांगू शकतो.
जीवशास्त्रातील हा क्रांतिकारी शोध असून वैद्यक क्षेत्रातही त्याचे अनेक उपयोग आहेत.
सर शंकर बालसुब्रह्मण्यम हे रॉयल सोसायटीचे फेलो असून ते जन्माने भारतीय असलेले ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९६६मध्ये चेन्नईत झाला व नंतर १९६७मध्ये ते ब्रिटनला गेले.
ब्रिटनमधील केम्ब्रिज संस्थेत ते कर्करोग संशोधन गटाचे प्रमुख आहेत व ट्रिनिटी कॉलेजचे फेलोही आहेत. केम्ब्रिज एपिजेनेटिक्स व सोलेक्सा यांच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा आहे.
सध्या ते केम्ब्रिज विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात हर्शेल स्मिथ प्रोफेसर आहेत. केम्ब्रिज विद्यापीठातील रसायनशास्त्राच्या काही प्रयोगशाळांचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे.
न्यूक्लिइक अॅसिडमध्ये त्यांनी मोठे संशोधन केले आहे. सोलेक्सा जनुक क्रमवारी तंत्र शोधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
कर्करोगातील उपचारात उपयोगी पडू शकतील अशा अनेक रेणवीय क्रिया त्यांनी शोधून काढल्या असून त्यात जी क्वाड्रप्रेक्सेसचा समावेश आहे.
त्यांना यापूर्वी टेट्राहेड्रॉन पुरस्कार, कोर्ड-मार्गन पुरस्कार, मलार्ड ग्लॅक्सो वेलकम पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत.
किरगिझस्तानच्या मेजर जनरलपदी भारतीय वंशाची व्यक्ती
किरगिझस्तान सैन्याच्या मेजर जनरलपदी भारतीय वंशाचे शेख रफिक मोहम्मदयांची निवड करण्यात आली आहे.
किरगिझस्तानचे संरक्षण मंत्री अली मिर्झा यांनी शेख रफिक मोहम्मद यांची मेजर जनरलपदी नियुक्ती केली. ते मूळचे केरळचे आहेत.
केरळमधील मल्ल्याळी व्यक्तीला दुसऱ्या देशाचे सैन्याचे प्रमुखपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रफिक यांच्याकडे किरगिझस्तानचे नागरिकत्वदेखील आहे. रफिक याआधी २००५ आणि २०१०मध्ये माजी राष्ट्रपती कुर्मानबेक सेलियेविच बेकियेव यांचे सल्लागार होते.
किरगिझस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या वाटचालीत रफिक मोहम्मद यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
रफिक यांनी किरगिझस्तानमधील कर रचना सोपी आणि सुटसुटीत करण्यावर भर दिला. त्यामुळे किरगिझस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झाली.
त्यांनी संयुक्त अरब अमिरात, इराण, सौदी अरेबिया आणि किरगिझस्तानसाठी काम केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा