चालू घडामोडी : २१ जानेवारी

कवितारतीचे संपादक पुरुषोत्तम पाटील यांचे निधन

  • ज्येष्ठ साहित्यिक तथा युवा साहित्यिकांचे प्रेरणास्थान असलेले ८९ वर्षीय प्रा. पुरुषोत्तम श्रीपत पाटील यांचे १६ जानेवारी रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.
  • केवळ काव्याला वाहिलेल्या कवितारती या द्वैमासिकाचे तसेच अनुष्टूभ या साहित्य विषयक मासिकाचे ते संपादक होते. मराठी साहित्य जगतात त्यांची ‘पुपाजी’ म्हणून ओळख होती.
  • तळातल्या सावल्या, बलिदान या कवितासंग्रहांसह तुकारामाची काठी हा त्यांचा वैचारिक लेखसंग्रह प्रसिद्ध आहे.
  • कवितेसाठी वाहिलेले 'कवितारती' हे द्वैमासिक त्यांनी १९८५ मध्ये सुरू केले. ते आजतागायत सुरू आहे.
  • उत्तम वक्ता म्हणून त्यांची केवळ राज्य अथवा देशातच नव्हे तर परदेशातही ख्याती होती. अभ्यासपुर्ण विवेचन हा त्यांचा गाभा होता.
  • ज्येष्ठ दिवंगत कवि बा. भ. बोरकर, ज्ञानपिठाचे सन्मानार्थी वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी कार्य केले होते. कवी कुसुमाग्रज हे त्यांचे प्रेरणास्थान होते.
  • त्यांच्या कविता संग्रहांना शासनाचा केशवसुत आणि बालकवी पुरस्कारही मिळाले आहेत.
  • पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म ३ मार्च १९२८ रोजी जळगाव जिल्ह्यात झाला. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर त्यांनी कविता करण्यास सुरुवात केली.
  • त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली होती. त्यांनी पुढे ‘जनशक्ती’मध्ये उपसंपादक म्हणूनही काम केले.
  • त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'तळ्यातल्या सावल्या' १९७८मध्ये प्रकाशित झाला. त्यास राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.
  • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांचे ते सदस्य होते.
  • १९८५मध्ये प्रजासत्ताकदिनी झालेल्या अखिल भारतीय बहुभाषिक कविसंमेलनात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. 

जलिकट्टू अध्यादेशाला मंजुरी

  • जलिकट्टू खेळावरून तामिळनाडूमध्ये चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जलिकट्टू अध्यादेशाला काही बदलांसह मंजुरी दिली आहे.
  • हा अध्यादेश मंजुरीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. तामीळनाडूचे मुख्यमंत्री ओ पान्नीरसेल्वम यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. 
  • जलिकट्टू या पारंपारिक खेळाला परवानगी मिळावी, यासाठी लाखो लोकांसोबत सेलिब्रिटींनीही आवाज उठवला.
  • संगीतकार ए. आर. रहमान, रजनीकांत, अभिनेते कमल हसन, विश्वनाथन आनंद, आर अश्विन, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवीशंकर यांनी जलिकट्टूचे समर्थन केले आहे.
 जलीकट्टू 
  • जलीकट्टू हा तामिळनाडूतील सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा पारंपारिक खेळ आहे. पीके कापणीच्यावेळी हा खेळ खेळला जातो.
  • यामध्ये ३००-४०० किलोच्या बैल/सांड यांच्या शिंगांना नोटा बांधल्या जातात. त्यानंतर बैलाला चिडवले जाते आणि गर्दीत सोडून देतात.
  • या खेळात भाग घेणाऱ्यांनी त्या बैलांची शिंगे पकडून त्याला शांत करायचे असते. अशा पिसाळलेल्या बैलाला काही अंतरावरच रोखण्याचा हा खेळ आहे.

महामेट्रोच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी

  • महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनच्या (महामेट्रो) स्थापनेला केंद्र शासनाने २० जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे.
  • राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी या कंपनी मार्फत करण्यात येणार आहे.
  • नागपूर येथील मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कार्पोरेशन या कंपनीमार्फत केले जात होते. त्यानंतर पुणे मेट्रोला मंजुरी मिळाल्याने पुन्हा नवीन कंपनी स्थापन करण्याची दीर्घकालीन प्रक्रिया पार पाडावी लागणार होती.
  • त्यामुळे शासनाने नागपूर मेट्रो कंपनीचे रूपांतर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनमध्ये करून त्या कंपनीकडे मुंबई वगळता सर्व प्रकल्प सोपविण्याचा निर्णय घेतला होता.
  • महामेट्रोचे अध्यक्ष व केंद्रीय नगरविकास विभागाचे प्रधान सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत नगरविकास मंत्रालयात महामेट्रोच्या संचालक मंडळाची पहिली बैठक पार पडली.
  • या निकालामुळे आता मेट्रो कंपनीला नदीपात्रातील कामात येणारा अडथळा दूर झाला आहे. पुणे मेट्रोचा साधारण १.७ किलोमीटरचा मार्ग नदीपात्रातून जाणार आहे.

अभय योजनेमध्ये ठेवी स्वीकारण्यास सहकारी बॅंकांना बंदी

  • केंद्र सरकारच्या नव्या अभय योजनेमध्ये ठेवी स्वीकारण्यास केंद्र सरकारने सर्व सहकारी बॅंकांना बंदी केली आहे.
  • ५० टक्के कर भरून काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकारने अभय योजना जाहीर केली आहे. ३१ मार्चपर्यंत ही योजना लागू आहे.
  • याआधी नोटबंदी जाहीर केल्यानंतर जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा सहकारी बॅंकांनी स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली होती.
  • काळा पैसा पांढरा करण्यासाठी सरकारी बॅंकांचा वापर होईल, अशी शंका केंद्र सरकारला असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं होते.
  • याच कारणास्तव आता पुन्हा एकदा सरकारकडून अभय योजनेचे पैसे स्वीकारण्यास सरकारी बॅंकांना मनाई केली आहे.

९७वे अ. भा. मराठी नाट्यसंमेलन उस्मानाबादमध्ये

  • ९७वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन उस्मानाबाद येथे ७ ते ९ एप्रिल २०१७ या कालावधित होणार आहे.
  • ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी याआधीच निवड झाली आहे.
  • नोटाबंदी आणि फेब्रुवारीमध्ये राज्यात होणाऱ्या निवडणुका यामुळे दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होणारे नाट्यसंमेलन यावर्षी एप्रिलमध्ये होणार आहे.

पाकिस्तानच्या ताब्यातील जवान चंदू चव्हाणची सुटका

  • पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान चंदू चव्हाण याची पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली आहे.
  • चंदू चव्हाण हा २३ वर्षांचा असून, तो मुळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथील आहे. लष्कराच्या ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये तो सेवेत आहे.
  • ३० सप्टेंबरला गस्त घालत असताना तो नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता.
  • यानंतर चंदू चव्हाणला पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले होते. तेव्हापासून चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात होता.
  • चंदू चव्हाण याच्या सुटकेसाठी भारताच्या डिजीएमओंनी १५ ते २० वेळा पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत संवाद साधला होता.
  • केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना यश आले आणि २१ जानेवारी रोजी चंदू चव्हाणची सुटका करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा