प्रसिद्ध संशोधक आणि ‘परम’ महासंगणकाचे (सुपरकॉम्प्युटर) निर्माते डॉ. विजय भटकर यांची बिहारमधील नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.
नालंदाचे मावळते प्रभारी कुलगुरू प्रा. पंकज मोहन यांच्याकडून भटकर पदभार स्वीकारतील. कुलगुरू म्हणून ते तीन वर्षे काम पाहतील.
दोन महिन्यांपूर्वी सिंगापूरचे माजी मंत्री असलेले जॉर्ज यिओ यांनी राजीनामा दिल्याने कुलपतिपद रिक्त झाले होते.
त्यामुळे पंकज मोहन यांच्यावर प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
महाराष्ट्राने लोकमान्यांच्या १६०व्या जयंती वर्षानिमित्त आपल्या चित्ररथाद्वारे टिळकांचे बहुआयामी व्यक्तीमत्व सादर केले.
लोकमान्य टिळकांचे व्यक्तीमत्व आणि त्यांच्या सामाजिक जनजागृतीच्या कार्यावर आधारीत देखावा महाराष्ट्राच्या चित्ररथातून मांडण्यात आला होता.
या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती विख्यात कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ४० कारागिरांनी हा अतिशय लक्षवेधी चित्ररथ तयार केला होता.
यावर्षी अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला असून त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक मिळवला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वी चित्ररथांची एक स्पर्धा भरवण्यात येते. गेल्यावर्षी त्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता.
शहीद हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र
राष्ट्रीय रायफल्सचे शहीद हवालदार हंगपन दादा यांना २६ जानेवारी रोजी मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यांनी काश्मीरच्या हिमाच्छादित पर्वतराजीत लपून बसलेल्या ३ दहशतवाद्यांचा एकट्याने खात्मा केला होता. परंतु या चकमकीत त्यांना आपला प्राण गमवावा लागला होता.
६८व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पत्नी चासेन लोवांग दादा यांना हा पुरस्कार प्रदान केला.
अशोक चक्र हा भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. शांततेच्या काळात दाखवलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात येतो.
अरुणाचल प्रदेशच्या बोदुरिया गावातील मूळ रहिवासी हवालदार हंगपन यांना त्यांचे सहकारी प्रेमाने दादा अशी हाक मारत.
दादा १९९७मध्ये लष्कराच्या आसाम रेजिमेंटद्वारे लष्करात सहभागी झाले होते. नंतर त्यांची ३५ राष्ट्रीय रायफल्समध्ये नेमणूक करण्यात आली.
सेरेना विल्यम्सला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद
अमेरिकेच्यासेरेना विल्यम्सने तिची बहिण व्हीनस विल्यम्सचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचे (महिला एकेरी) विजेतेपद पटकावले.
हा सेरेनाचा २३वा ग्रँड स्लॅम विजय असून, या विजेतेपदासह तिने स्टेफी ग्राफचा २२ ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मोडला आहे.
महिलांच्या टेनिस स्पर्धांमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅमची विजेती होण्यासाठी आता तिला अजून दोन विजेतेपदांची गरज आहे. सध्या हा विक्रम मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर आहे.
सेरेनाने अंतिम सामन्यात व्हीनसचा ६-४, ६-४ अशा दोन सरळ सेटमध्ये व्हीनसचा पराभव केला.
सेरेनाचे हे सातवे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या विजेतेपदासह तिने जागतिक क्रमावरीत पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सात मुस्लिमबहुल देशांतील निर्वासितांना अमेरिकेत येण्यास बंदी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका आदेशाद्वारे ७ मुस्लिमबहुल देशांतील निर्वासितांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशातल्या नागरिकांवर अमेरिकाप्रवेशासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या ही बंदी तात्पुरत्या स्वरुपात असणार आहे.
कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांपासून अमेरिकेचा बचाव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण ट्रम्प यांनी दिले आहे.
निवडणूकीपूर्वीच मुस्लिम नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.
तसेच त्यांनी यापूर्वी स्थलांतरीत नागरिकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचे आदेश दिले आहेत.
आता या नव्या नियमामुळे अमेरिकेच्या निर्वासित आणि विस्थापित पुनर्वसन कार्यक्रमाला किमान १२० दिवसांची स्थगिती मिळाली आहे.
तसेच अमेरिकेत येणाऱ्या कोणाही नागरिकाला पुढील ९० दिवसांपर्यंत व्हिसा दिला जाणार नाही.
यादरम्यानच्या काळात, नवे नियम आणले जातील, ज्यांमध्ये व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या पार्श्वभूमीची कसून चौकशी करण्यात येईल.
विशेष म्हणजे या नियमातून काही धर्मांना अपवाद करण्यात आले आहे. म्हणजेच हे नियम ख्रिस्ती लोकांना लागू नसतील.
स्थानिक मुक्त चळवळींचे गट तसेच दहशतवादविरोधी अभ्यासकांनी हा निर्णय मुस्लिमांप्रति भेदभाव करणारा असल्याचे सांगत त्याचा निषेध केला आहे.
माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी निर्वासितांसाठी वार्षिक १.१० लाख इतकी मर्यादा घातली होती. ही मर्यादा ५० हजारापर्यंत आणण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे.
सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर कन्नड चित्रपट बनणार
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट कन्नड भाषेत तयार केला जात आहे.
कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रख्यात कलाकार तारा व सुचिंद्र प्रसाद हे अनुक्रमे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमिका साकारणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार सर्जू काटकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीवर आधारित चित्रपट काढण्यात येत आहे.
सावित्रीबाई फुले यांचे कार्य इतर भाषेतही कळावे आणि त्यांच्या थोरवीची जाणीव व्हावी म्हणून काटकर यांनी ही कादंबरी लिहिली.
ऑस्ट्रेलिया सरकारद्वारे तीन भारतीय वंशाच्या व्यक्तींचा सन्मान
सामाजिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रामधील भरीव योगदानाबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारने भारतीय वंशाच्या तिघांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे.
पुरुषोत्तम सावरीकर, माखनसिंग खांगुरे आणि विजय कुमार अशी या तिघांची नावे असून, त्यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल २०१७ जाहीर झाले आहे.
सावरीकर यांचा सिडनी येथे वैद्यकीय व्यवसाय आहे. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करत व्यापक जनहित साधल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सावरीकर हे ऑस्ट्रेलियन इंडियन मेडिकल ग्रॅज्युएट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, त्यांनी आकाशवाणी सिडनीचीही स्थापना केली आहे.
पर्थ येथे राहणारे माखनसिंग खांगुरे यांनीही न्यूरोरेडिओलॉजी, शिक्षण आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या माध्यमातून जनतेची सेवा केल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.
विजय कुमार हे न्यूक्लिअर मेडिसीन तज्ज्ञ आणि संशोधक आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनकार्याबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
कुमार हे सिडनी येथील तमीळ संगम संघटनेचेहे सदस्य आहेत. त्यांना न्यूक्लिअर सायन्स क्षेत्रामधील योगदानाबद्दलही २००७ आणि २०१४मध्येही पुरस्कार मिळाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा