मूळ भारतीय असलेल्या अमेरिकेतील पराग हवालदार यांना तंत्रज्ञानातील ऑस्कर पुरस्कार (टेक्निकल ऑस्कर) जाहीर झाला आहे.
अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅण्ड सायन्सेसतर्फे हा पुरस्कार दिला जातो. ११ फेब्रुवारी २०१७ रोजी हवालदार यांना तो प्रदान केला जाईल.
हवालदार हे खरगपूर आयआयटीतून कॉम्प्युटर इंजिनीअर झाले आहेत. १९९१मध्ये पदवीधर झाल्यानंतर काही तरी नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी ते अमेरिकेत गेले.
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅनिफोर्नियामधील उच्चशिक्षणानंतर ते सोनी पिक्चर्स इमेजवर्क्समध्ये रुजू झाले.
चित्रपट आणि खेळांमध्ये द्विमिती आणि त्रिमिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
त्यांचे हे तंत्रज्ञान ‘ॲलिस इन वंडरलॅण्ड’, ‘मॉन्स्टर हाऊस’ आणि ‘स्पायडरमॅन’ मालिकेतील चित्रपटांमध्ये वापरण्यात आले आहे.
मल्टिमीडिया तंत्रज्ञानामध्ये त्यांचा हातखंडा असून ते सी++, सी, मॅटलॅब, जावा, पायथॉन, लिस्प आणि सीलोज या संगणकीय भाषांचेही तज्ज्ञ मानले जातात.
या त्यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांना टेक्निकल ऑस्करचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी राखीव आसने
भारताची राष्ट्रीय हवाई कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी राखीव आसने ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या १८ जानेवारीपासून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
जगात पहिल्यांदाच अशाप्रकारे कोणत्याही विमानांमध्ये महिलांसाठी आसने राखीव ठेवण्यात येणार आहेत.
एकट्याने विमान प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.
छत्तीसगडमध्ये सूर्यनमस्कारांचा विश्वविक्रम
छत्तीसगडमध्ये योगगुरु बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात १ लाख लोकांनी सूर्यनमस्कार आणि योगा करून एक विश्वविक्रम प्रस्थापित केला. या विश्वविक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
याआधी बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत २०१६मध्ये ५० हजार लोकांनी योग सादर करून विश्वविक्रम केला होता.
या योग शिबिराला छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह आणि योगगुरु रामदेव बाबा यांची उपस्थिती होती.
तंबाखूबाबत डब्लूएचओचा अहवाल प्रसिद्ध
तंबाखू आणि त्याचे दुष्परिणाम यासंबंधी जागतिक आरोग्य संघटना आणि युएस कॅंसर इंस्टिट्यूटने एक अहवाल सादर केला आहे.
हा एकूण ६६८ पानांचा अहवाल असून या अहवालाचे परीक्षण ७० तज्ज्ञांनी केले आहे. धुम्रपान आणि त्यातून उद्भवणाऱ्या आजारांच्या उपाययोजनांवर अब्जावधी डॉलर्स खर्च होतात असे या अहवालात म्हटले आहे.
कर्नाटकमध्ये बायोडिझेलवर धावणाऱ्या बस
वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी कर्नाटक परिवहन अर्थात केएसआरटीसीने (कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) १०० टक्के बायोडिझेलवर धावणाऱ्या २५ लक्झरी बस खरेदी केल्या आहेत.
बायोडिझेलवर धावणाऱ्या या प्रत्येक मल्टिअॅक्सल बसची किंमत ९१.१० लाख इतकी आहे.
या सर्व बसला बायोडिझेल किट बसवण्यात आलेले आहे. या बसमुळे हवेत होणारे प्रदूषण टळणार आहे.
या बसची खास रचना करण्यात आली आहे. यातून आरामदायक प्रवास करता येईल अशा पद्धतीने याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे.
प्रत्येक सीट्सच्या रांगेत लॅपटॉप आणि मोबाइल चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.
त्याचबरोबर प्रवाशांच्या मनोरंजनासाठी रांगेत फोल्डेड एलसीडी मॉनिटर आणि डिव्हिडी प्लेअरची सुविधा देण्यात आली आहे.
आणीबाणीच्या वेळी बसमध्ये अलार्म वाजेल. उल्लेखनीय म्हणजे या बसला ६ इमरजन्सी दरवाजे आहेत.
बायोडिझेलवरील या बसमुळे प्रतिवर्षी सुमारे ८६.६ लाखांची बचत होणार असल्याचा दावा केएसआरटीसीने केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा