स्त्री शिक्षण आणि महिला सबलीकरण यांच्यासाठी केलेल्या कार्याला मानवंदना म्हणून सावित्रीबाई फुलेंच्या १८६व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डूडल तयार केले आहे.
३ जानेवारी १८३१ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. महिलांचे शिक्षण आणि त्यांचे सबलीकरण यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या आणि कवी म्हणून सावित्रीबाई फुले सुपरिचित आहेत. आपल्या साहित्यातून सावित्रीबाईंनी नेहमीच समानतेचा पुरस्कार केला.
देशातील पहिल्या महिला शिक्षिका असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक सुधारणेच्या चळवळीत मोलाची भूमिका बजावली.
पती ज्योतीराव फुले यांना खंबीरपणे साथ देत आणि प्रसंगी समाजाच्या विरोधात जात सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे सामाजिक कार्य अखंडितपणे सुरू ठेवले.
महिलांचे शिक्षण, त्यांचे सबलीकरण, त्यांचे हक्क यांच्यासाठी सावित्रीबाई आयुष्यभर झटत होत्या.
पुण्यातील भिडे वाड्यात १८४८मध्ये ज्योतीराव फुलेंच्या मदतीने सावित्रीबाईंनी फुले यांनी देशातील महिलांसाठीची पहिली शाळा सुरु केली.
त्यामुळेच २०१४मध्ये पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे करण्यात आले.
एलपीजीच्या ऑनलाइन पेमेंटवर पाच रूपयांची सूट
कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आता घरगुती सिलिंडरच्या (एलपीजी) ऑनलाइन पेमेंटवर पाच रूपयांची सूट जाहीर केली आहे.
यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाइन व्यवहारांसाठीही ग्राहकांना ०.७५ टक्के सूट देण्याचे आदेश सरकारने तेल कंपन्यांना दिले होते.
तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडर ऑनलाईन बुक करण्याची आणि नेट बॅंकिंग, क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सिलेंडर बुक केल्यानंतर पैसे भरताना येणाऱ्या बिलातून पाच रुपये वजा करण्यात येणार आहेत.
न्यायमित्रांच्या समितीतून एफ एस नरिमन यांची माघार
बीसीसीआयच्या प्रशासकांच्या नावांची सूचना करण्यासाठी नियुक्त केलेल्या न्यायमित्रांच्या समितीतून (अमायकस क्युरी) कायदेतज्ज्ञ एफ एस नरिमन यांनी माघार घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एफ एस नरीमन यांच्या स्थानी सीनिअर वकील अनिल दिवाण यांची नियुक्ती केली आहे.
न्यायालयाने दोन्ही वकिलांना दोन आठवड्यांत संभाव्य प्रशासकांची नावे सुचविण्यास सांगितले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे पालन न केल्याने बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना कोर्टाने पदावरून हटविले होते.
त्यानंतर त्याजागी नवे पदाधिकारी निवडण्यासाठी कोर्टाने एफ एस नरिमन आणि गोपाल सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली होती.
भारतीय टेनिसपटू सोमदेव देववर्मन निवृत्त
भारतीय टेनिसपटू सोमदेव देववर्मनने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली आहे.
त्याची कारकीर्द २०१२मध्ये खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे संपुष्टात आली. या दुखापतीचा प्रभाव त्याच्या कारकिर्दीवर झाला आणि अखेर त्याने टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
सोमदेवने २००८ मध्ये डेव्हिस कपमध्ये कारकिर्दीचा प्रारंभ केला. त्यानंतर एकेरीमध्ये त्याने सातत्याने भारताचे नेतृत्व केले.
भारताच्या डेव्हिस कप संघाचा नियमित सदस्य असलेला सोमदेव १४ सामने खेळला आणि २०१०मध्ये भारताला विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सोमदेवने एटीपी टूर-२००९ चेन्नई ओपनमध्ये वाईल्ड कार्ड प्रवेश मिळवताना अंतिम फेरी गाठली होती. त्याचप्रमाणे २०११मध्ये दक्षिण आफ्रिका ओपनमध्ये अंतिम फेरी गाठली होती.
सोमदेवने ग्वांग्झूमध्ये २०१०च्या आशियाई स्पर्धेत एकेरी व दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. २०११मध्ये तो अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
सोमदेव जवळजवळ एक दशक भारताचा एकेरीतील सर्वोत्तम खेळाडू मानला जात होता.
डेव्हिड वॉर्नरचे कसोटीच्या पहिल्याच सत्रात शतक
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने पहिल्याच सत्रात ७८ चेंडूत शतक करण्याचा पराक्रम केला आहे.
अशी किमया करणारा डेव्हिड वॉर्नर हा जगातील पाचवा तर ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे.
वॉर्नरने ७८ चेंडूंमध्ये शतकी खेळी करताना सिडनी मैदानावर सर्वांत वेगवान शतक झळकावण्याचा नवा विक्रम नोंदवला.
यापूर्वीचा विक्रमही वॉर्नरच्याच नावावर होता. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ८२ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
वॉर्नरच्या आधी १९३०साली ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांनी, तर १९७६साली पाकिस्तानच्या माजिद खान याने अशी शतकी कामगिरी केली होती.
ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टर ट्रंपर याने १९०२साली मॅनचेस्टरमधील सामन्यात उपहारापूर्वी १०३ धावा केल्या होत्या.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच चार्ली मैकार्टनी यांनी १९२६साली लिड्समध्ये ११२ धावा केल्या होत्या.
डॉन ब्रॅडमन यांनी १९३०साली उपहारापूर्वी १०५ धावा करून विक्रम केला होता. त्याचसोबत याच डावात त्यांनी ३३४ धावांच्या विक्रमाची नोंद केली होती.
पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता
पाकिस्तानच्या सिनेटने हिंदू विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता मिळण्याच्या विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे आता हिंदू पद्धतीने विवाह केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी करता येणार आहे.
तसेच, घटस्फोट घेता येणे आणि पतीच्या निधनानंतर महिलांना पुनर्विवाहाची परवानगी मिळाली आहे. हिंदू पद्धतीनुसार विवाह केलेल्या जोडप्यांना नोंदणीचे अधीकृत प्रमाणपत्र मिळणार आहे.
या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास शिक्षा होऊ शकते अशी तरतूदही या कायद्यामध्ये आहे.
ज्या जोडप्यांचे घटस्फोट झाले आहेत त्यांना देखील लग्न करण्याची परवानगी मिळाली आहे. या कायद्यानुसार हिंदू विधवांना पुनर्विवाहाची मान्यता मिळाली आहे.
सप्टेंबरमध्ये हिंदू विवाह कायदा २०१६चा मसुदा नॅशनल असेम्ब्लीमध्ये ठेवण्यात आला होते. त्याला मान्यता मिळाल्यानंतर हे विधेयक वरिष्ठ सभागृहात म्हणजे सिनेटमध्ये आले.
पाकिस्तानमध्ये १.६ टक्के हिंदू राहतात. तरीदेखील पाकिस्तानच्या निर्मितीपासून आतापर्यंत तेथे हिंदू विवाहांना कायदेशीर मान्यता नव्हती.
त्यामुळे हिंदूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या जाचातून पाकिस्तानमधील हिंदूंची सुटका होणार आहे.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार टायरस वाँग यांचे निधन
ज्येष्ठ व्यंगचित्रकार टायरस वाँग यांचे वयाच्या १०६व्या वर्षी निधन झाले. ‘बॅम्बी’हे त्यांनी काढलेले कार्टून व्यक्तिचित्र चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले.
वाँग यांनी वॉल्ट डिस्ने स्टुडिओ, वॉर्नर ब्रदर्स, हॉलमार्क या ख्यातनाम कार्टून कंपन्यांसाठी काम केले.
मूळचे चीनचे असलेले वाँग वडिलांबरोबर अमेरिकेत स्थायिक झाले आणि त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून नाव कमावले.
वाँग यांनी वॉल्ट डिस्ने स्टुडिओसाठी १९३८ ते १९४१ दरम्यान तीन वर्षांसाठी काम केले.
तुर्कस्तानातील हल्ल्याला आयसिस जबाबदार
तुर्कस्तानात नववर्षदिनी नाइट क्लबवर करण्यात आलेल्या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली आहे.
या हल्ल्यात ३९ जण ठार झाले. त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. यातील हल्लेखोर अजून बेपत्ता असून तो आयसिसशी संबंधित आहे.
जूनमध्ये इस्तंबूलच्या अतातुर्क विमानतळावर हल्ले करणाऱ्या गटातीलच एकाने हा हल्ला केला असावा अशी शक्यता आहे.
इस्लामिक स्टेट आणि कुर्दिश दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे २०१६ हे वर्ष तुर्कीसाठी रक्तरंजित ठरले. दुर्दैवाने २०१७ची सुरुवातही रक्तरंजितच झाली.
ट्विटरच्या चीनमधील प्रमुख केथी चेन यांचा राजीनामा
सोशल नेटवर्किंगमध्ये जगातील आघाडीच्या संकेतस्थळांपैकी एक असलेल्या ट्विटरच्या चीनमधील प्रमुख केथी चेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांच्याकडे आठ महिन्यांपूर्वीच ट्विटरच्या चीनमधील व्यवसायाची सूत्रे सोपविण्यात आली होती.
चीनमध्ये २००९ पासून ट्विटर ब्लॉक करण्यात आलेले आहे, मात्र व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क्सवरून (VPN) येथे ट्विटर वापरले जाते.
चीनमध्ये देशांतर्गत सोशल मीडियाला जास्त वाव देण्यात आला असून, त्यामध्ये ‘सिना वेईबो’ हे मायक्रोब्लॉगिंगचे संकेतस्थळ आणि ‘वीचॅट’ हे मेसेजिंग अॅप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा