सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी महालेखापाल (कॅग) विनोद राय यांची नियुक्ती केली आहे.
तसेच रामचंद्र गुहा, डायना एडलजी आणि विक्रम लिमये यांची बीसीसीआयच्या चार सदस्यीय प्रशासकीय समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
डायना एडलजी या भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार आहेत तर विक्रम लिमये हे आयडीएफसीचे अध्यक्ष आहेत.
रामचंद्र गुहा इतिहासकार व स्तंभलेखक म्हणून देशभरात ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे गांधीनंतरचा भारत हे गाजलेले पुस्तक आहे.
पर्यावरण, राजकीय, सामाजिक आणि क्रिकेट या विषयात त्यांचा अभ्यास आहे. क्रिकेटचा इतिहासही त्यांनी लिहिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रशासकीय समितीच्या सदस्यरूपात क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांना सहभागी करून घेण्याची केंद्र सरकारची मागणी फेटाळली आहे.
न्यायालयाने बीसीसीआयमध्ये मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना पद न सांभाळण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयासंदर्भात हा निर्णय दिला आहे.
तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्यासाठी न्यायालयाने आमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी आणि विक्रम लिमये यांची नियुक्ती केली आहे.
फ्रान्सची आयरीस मिटेनेअर ‘मिस युनिव्हर्स’
फिलिपीन्समध्ये झालेल्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत फ्रान्सची सुंदरी आयरीस मिटेनेअरने २०१६चा 'मिस युनिव्हर्स किताब मिळविला.
या स्पर्धेत मिस हैती राक्वेल पेलिसीएरने दुसरे, तर मिस कोलंबिया अॅँड्रिया तोवारने तिसरे स्थान पटकावले.
‘मिस युनिव्हर्स’च्या या ६५व्या जागतिक स्पर्धेत एकूण ८६ देशांच्या सुंदरींनी भाग घेतला होता.
आयरीस ही दंतवैद्यक शास्त्राची विद्यार्थिनी आहे. तिने यापूर्वी ‘मिस फ्रान्स’ हा किताब मिळविलेला आहे.
या स्पर्धेत रोश्मिता हरिमूर्ती भारताचे प्रतिनिधीत्व करत होती. परंतु तिला अंतिम १३मध्ये स्थान मिळविता आले नाही.
इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचा शुभारंभ
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचा शुभारंभ झाला असून इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे.
भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची (आयआयपीबी) स्थापना करण्यात आली आहे.
माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांची ही संकल्पना होती. या बॅंकांमध्ये ग्राहकांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवता येऊ शकेल.
भारती एअरटेल आणि पेटीएम या दोन कंपन्यानंतर आयआयपीबी ही तिसरी संस्था आहे जी पैसे ठेवीच्या रुपाने स्वीकारू शकते. परंतु या बॅंका कर्ज देऊ शकणार नाहीत.
इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचे हंगामी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे ए. पी. सिंह आहेत. ते निर्गुंतणूक विभागाचे सह सचिव होते.
२०१५मध्ये आरबीआयने ११ संस्थांना पेमेंट बँक स्थापन करण्यासाठी परवानगी दिली होती.
त्यापैकी टेक महिंद्रा, सन फार्मा, आयडीएफसी, टेलेनॉर, चोलामंडलम इनवेस्टमेंट फायनान्स अॅंड कं. या कंपन्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली.
तर पेटीएम, भारती एअरटेल आणि आयआयपीबीने मात्र पेमेंट बँका सुरु केल्या आहेत.
आदित्या बिरला, फिनो पे टेक, नॅशनल सेक्युरिटीज डिपॉजिटरी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडस, व्होडाफोन एम-पेसा या कंपन्या पेमेंट बँक स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत.
रिलायन्स डिफेन्सला संरक्षण मंत्रालयाचे ९१६ कोटींचे कंत्राट
संरक्षण मंत्रालयाकडून ‘रिलायन्स डिफेन्स अँड इंजिनिअरिंग'ला ९१६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
या कंत्राटाअंतर्गत भारतीय तटरक्षक दलासाठी १४ 'फास्ट पेट्रोल वेसल्स' तयार करण्यात येणार आहेत.
रिलायन्स डिफेन्स ही पूर्णपणे रिलायन्स इनफ्रास्ट्रक्चरच्या मालकीची उपकंपनी आहे.
भारतीय सशस्त्र दलाचे एवढे मोठे कंत्राट ‘रिलायन्स डिफेन्स'च्या रुपाने प्रथमच खाजगी क्षेत्रातील कंपनीला मिळाले आहे.
आयएनएसव्ही तारिणी विश्वसंचारासाठी सज्ज
भारतीय नौदलाचे ५६ फुट उंच असलेले ‘आयएनएसव्ही तारिणी’ हे दुसरे प्रशिक्षण जहाज विश्वसंचारासाठी सज्ज झाले आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते विश्वसंचार मोहिमेला सुरुवात करणार आहे.
या जहाजाची धुरा नौदलातील सहा महिलांकडे असून कॅप्टन वर्तिका जोशी यांच्याकडे या महिला टीमचे नेतृत्व आहे.
विश्वसंचारासाठी निघालेले हे दुसरे जहाज आहे. यापूर्वी आयएनएस म्हादईने अशी मोहीम पूर्ण केली होती.
आयएनएसव्ही तारिणीचे बांधणीचे काम अॅक्वेरियस शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ११ महिन्यांत पूर्ण केले. यासाठी ४ कोटींचा खर्च आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा