२०१४साली मलेशियाहून चीनला जाताना बेपत्ता झालेल्या एमएच ३७० या विमानाचे शोध अभियान थांबविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियातील जॉइन्ट एजन्सी को आँर्डिनेशन सेंटरच्या नेतृत्वाखाली एमएच ३७०चा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू होती.
या शोधमोहिमेदरम्यान हिंदी महासागरातील १ लाख २० हजार चौरस मीटर एवढ्या क्षेत्रात विमानाचा शोध घेण्यात आला.
या शोधमोहिमेवर सुमारे १६० मिलियन अमेरिकन डॉलर एवढा खर्च करण्यात आला होता. यादरम्यान या विमानाचे २० पैकी केवळ ७ भागच मिळाले.
८ मार्च २०१४ रोजी मलेशियातून चीनला जाताना हे विमान रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते. या विमानात एकूण २३९ जण होते.
मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या सरकारने संयुक्तरित्या हे शोध अभियान थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ख्यातनाम शास्त्रज्ञ सी. व्ही. विश्वेशर यांचे निधन
कृष्ण विवरांचे (ब्लॅक होल्स) भारतीय अभ्यासक व ख्यातनाम शास्त्रज्ञ प्रोफेसर सी. व्ही. विश्वेशर यांचे १६ जानेवारी रोजी निधन झाले.
मेरीलँड येथील विद्यापीठामध्ये १९७०मध्ये त्यांनी कृष्ण विवरांचा अभ्यास सुरू केला.
त्यांनी जी गणिते मांडली त्यामुळे दोन एकमेकांत विलीन होणाऱ्या कृष्ण विवरांतून निघणाऱ्या सिग्नल्सना ग्राफीकचे रुप देता आले.
दोन कृष्णविवरांचा आघात होऊन ते एकमेकात विलीन होऊन एकच कृष्णविवर तयार होते व त्या वेळी गुरुत्वीय लहरी बाहेर पडतात, असे भाकित त्यांनी वर्तविले होते.
‘विशू’ या नावाने ते सर्वपरिचित होते. त्यांनी व्यंगचित्रेही काढली होती. त्यापैकी अनेक भौतिकशास्त्र परिषदेच्या पुस्तकात प्रसिद्ध झाली होती.
चंद्रावर गेलेल्या शेवटच्या अंतराळवीराचे निधन
चंद्रावर जाणारे शेवटचे अंतराळवीर जीन सर्नन यांचे १६ जानेवारी रोजी निधन झाले. १९७२च्या मोहिमेदरम्यान चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांपैकी सर्नन हे एक होते.
नौदलाचे वैमानिक, विद्युत अभियंता व १९७२मध्ये चंद्रावर चालणारा अखेरचा माणूस ही त्यांची ओळख होती.
जेमिनी ९ ए, अपोलो १० व अपोलो १७ अशा तीन मोहिमांत ते चंद्रावर जाऊन आले होते. जेमिनी मोहिमेत त्यांनी स्पेस वॉकही केले होते.
जेमिनी अवकाश मोहिमेत त्यांना अमेरिकेच्या वतीने पहिले स्पेसवॉक करण्याची आव्हानात्मक कामगिरी करता आली.
चंद्रावर एकूण जाऊन आलेल्या १२ जणांपैकी दोनदा चंद्रावर प्रत्यक्ष चालण्याचा अनुभव घेणारे सर्नन हे एकमेव होते.
अपोलो १७ हे नासाच्या अपोलो अभियान मालिकेतील शेवटचे अभियान होते. जीन सर्नन अपोलो १७ अभियानाचे कमांडर होते.
७ डिसेंबर १९७२रोजी अपोलो १७ या अभियानादरम्यान मानवाने दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले.
त्यांच्या जीवनावर ‘द लास्ट मॅन ऑन द मून’ हा माहितीपट तसेच डिस्कव्हरी वाहिनीने त्यांच्यावर ‘व्हेन वुई लेफ्ट अर्थ, द नासा मिशन्स’ हा लघुपट काढला.
एचबीओने त्यांच्यावर काढलेल्या‘फ्रॉम द अर्थ टू मून’ या लघुपटास एमी पुरस्कार मिळाला होता.
‘द स्काय अॅट नाइट’ या बीबीसीच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. ‘इंटरनॅशनल स्पेस हॉल ऑफ फेम’सह अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.
नासा: नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन
टाटा मोटर्सच्या अध्यक्षपदी नटराजन चंद्रशेखरन
टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा मोटर्सच्या अध्यक्षपदीही निवड करण्यात आली आहे.
१२ जानेवारीला चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
जर्मन पासपोर्ट जगात सर्वाधिक प्रभावी
जगभरातील पासपोर्टची क्रमवारी करणाऱ्या आर्टन कॅपिटलच्या पासपोर्ट निर्देशांकाच्या नव्या आवृत्तीत जर्मन पासपोर्टने पहिले स्थान पटकावले आहे.
या पद्धतीमध्ये जगभरातील पासपोर्टची माहिती संकलित केली जाते, ती दर्शवली जाते आणि पासपोर्टच्या प्रभावीपणानुसार त्यास क्रमवारी दिली जाते.
तसेच पासपोर्टधारकाला किती देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करता येऊ शकतो किंवा देशात प्रवेश केल्यावर व्हिसा घेता येतो (व्हिसा ऑन अरायव्हल) त्यानुसार संबंधित पासपोर्टला ‘व्हिसा-फ्री स्कोअर’ दिला जातो.
यामध्ये जर्मनीचा व्हिसा स्कोअर सर्वाधिक १५७ आहे, तर १५६ स्कोअर नोंदवून सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ २३ स्कोअरसह अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत कमी प्रभावी ठरला आहे.
भारताचा स्कोअर ४६ असून भारतीय पासपोर्ट ७८ व्या क्रमांकावर आहे. चीन व पाकिस्तान अनुक्रमे ५८ व ९४व्या स्थानावर आहेत.
धरमपाल गुलाटी देशातील सर्वात श्रीमंत सीईओ
एमडीएच कंपनीचे सर्वेसर्वा ९४ वर्षीय धरमपाल गुलाटी देशातील सर्वात श्रीमंत सीईओ ठरले आहेत.
गुलाटी यांनी गोदरेज कन्झ्युमरचे आदि गोदरेज, हिंदुस्थान युनिलिव्हरचे संजीव मेहता यांना मागे टाकत प्रथम क्रमांत पटकावला आहे.
फक्त पाचवीपर्यंत शिकलेल्या गुलाटी यांच्याकडे एमडीएच कंपनीच्या एकूण समभागांपैकी ८० टक्के हिस्सा आहे.
गुलाटी यांचे वडील चुन्नीलाल यांनी १९१९ साली पाकिस्तानातील सियालकोटमध्ये एक दुकान सुरू केले. त्याच दुकानाचे रुपांतर आज १५०० कोटी रुपयांच्या कंपनीमध्ये झाले आहे.
फाळणीनंतर धरमपाल गुलाटी दिल्लीतील करोल बाग भागात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी भारतात १५ कारखाने सुरू केले.
१००० डीलर्सना ते मसाल्यांचा पुरवठा करतात. त्याशिवाय, दुबई आणि लंडनमध्येही एमडीएचचे ऑफिस आहे. जवळपास १०० देशांमध्ये एमडीएच मसाल्यांची निर्यात होते.
एवढे पैसे कमावूनही गुलाटी यांचे पाय अद्यापही जमिनीवर असून आपल्या मिळकतीमधील ९० टक्के रक्कम ते दान करतात.
त्यासोबतच २० शाळा आणि १ हॉस्पिटल उभारून त्यांनी सामाजिक जाणिवेचेही दर्शन घडवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा